आत्महत्या प्रकरणात चौकशीचे पाटील यांचे आश्वासन

आत्महत्या प्रकरणात चौकशीचे पाटील यांचे आश्वासन

मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सारडा यांची नावे समोर आली होती.

अर्णवला अटकपूर्वी ३ दिवस नोटीस हवी
टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक टीव्ही
नाविका कुमार यांना अटकेपासून सुप्रीम कोर्टाकडून तूर्त संरक्षण

मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात योग्य कारवाई करण्यात येईल असे ट्वीट गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या पत्नी ५ मे २०२०, अक्षता नाईक यांनी फेसबुकलाईव्ह करून आपली व्यथा पुढे मांडल्याने आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहिल्याने अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची केस पुन्हा पुढे आली आहे.

अन्वय नाईक (५३) यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (८४) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सारडा यांची नावे समोर आली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सारडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते.

अक्षता नाईक यांनी ५ मे फेसबुक लाईव्ह केले. त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला, की अर्णब यांचा रिपब्लिक स्टुडीओ अन्वय आणि त्यांची आई कुमुद यांच्या मृत्यूवर उभा आहे. रिपब्लिक स्टुडिओने वेळेवर पैसे दिले नाहीत, असा त्यांनी आरोप केला. त्या म्हणाल्या, “रायगड, अलिबाग येथील पोलीस अधिकारी सुरेश वराडे यांनी सांगितले, की यामध्ये खूप बडी माणसे आहेत. एफआयआर करताना पुन्हा पुन्हा विचार करा.” पोलीस अधिकारी अनिल पारसकर यांचेही अक्षता यांनी नाव घेतले आहे. एफआयआर दाबून टाकण्यात आल्याचा आरोप करून अक्षता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली, की त्यांनी न्याय द्यावा आणि आपल्याला व आपल्या मुलीला संरक्षण द्यावे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणी पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे, की गोस्वामी, शेख आणि सारडा यांच्यावर कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवलाखा यांनी म्हंटले आहे, की अर्णब गोस्वामी यांचे वडील १९९८ मध्ये आसाममध्ये लोकसभेचे उमेदवार होते. त्यांचे काका भाजपचे आमदार आहेत. अर्णब ज्या वाहिनीचे संपादक आहेत, त्या वाहिनीचे व्यावसायिक भागीदार सध्या भाजपचे खासदार आहेत. २०१८ साली राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते. पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे अर्णब यांना अटक न होता केवळ चौकशी झाली. त्यांचे राजकीय संबंध पाहता, पूर्वीची चौकशी ही दबावाखाली झाली आहे, असे वाटते. त्यामुळे या केसची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निलेश नवलाखा यांनी केली आहे.

दरम्यान असे समजते, की पोलिसांनी या प्रकरणात अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्याच विविध कार्यालयांची तपासणी केली. अन्वय यांचा लॅपटॉप आणि मोबाईल तपासणीसाठी घेतला, पण तो अजूनही त्यांच्या कुटुंबियांना परत दिलेला नाही.

देवेंद्र फडणवीस सरकारने या केसमध्ये नेमके काय केले, हे पुढे आलेले नाही. त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. अर्णब गोस्वामी याना अटक झाली नाही. सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्या इतर दोन लोकांचे काय झाले, केस बंद झाली, की पुढे काय झाले, याची उत्तरे न मिळाल्याने आता या केसचा तपास  पुन्हा करण्याची मागणी नाईक कुटुंबीय आणि नवलाखा यांच्याकडून होत आहे.

दरम्यान या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल आणि न्याय दिला जाईल, असे ट्वीट महाराष्ट्राचे गुह राज्य मंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसनेही हे प्रकरण गंभीर असून,  चौकशी करण्याची मागणी केली होती. कॉंग्रेसने तसे ट्वीट केले होते. त्याला सतेज पाटील यांनी उत्तर दिले आहे.

या संदर्भात रिपब्लिक वाहिनीकडून नव्याने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र २०१८ मध्ये वाहिनीने हे सर्व आरोप फेटाळले होते. आम्ही डिझाईन कॉन्ट्रक््टच्या संदर्भातील सर्व पैसे दिले असून, आमचा या केसशी काही संबंध नसल्याचे, वाहिनीने म्हंटले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0