समीर वानखेडेंची खंडणी ८ कोटींचीः पंचाचा गौप्यस्फोट

समीर वानखेडेंची खंडणी ८ कोटींचीः पंचाचा गौप्यस्फोट

मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाह रुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणातील अटकेनंतर सुरू असलेल्या वादात रविवारी या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल यांनी खळबळजनक खुलासा केला. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी यांनी शाह रुख खानकडे २५ कोटी रु.ची मागणी केली होती. त्यातील १८ कोटी रु.वर तडजोड झाली. त्यातील ८ कोटी रु.ची रक्कम या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायची होती, असा दावा साईल यांनी केला.

साईल हे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेले व आर्यन खान याच्यासोबत सेल्फी काढल्याने चर्चेत आलेले किरण गोसावी यांचे अंगरक्षक म्हणून काम करतात. सध्या किरण गोसावी हे बेपत्ता आहेत. आर्यन खान प्रकरणात साईल यांचा पंच क्रमांक १ म्हणून एनसीबीने जबाब घेतला असून तो घेण्याआधी कोर्या कागदावरही स्वाक्षरी घेण्यात आली, असा आरोप साईल यांनी केला.

साईल यांनी आर्यन खान प्रकरणातील सर्व वृत्तांत एका व्हीडिओद्वारे प्रसार माध्यमांपुढे आणला. नंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन घडलेला वृत्तांत पुढे आणला.

प्रभाकर साईल यांनी एकूण घटनेचा सांगितलेला वृत्तांत

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला साईल यांनी सांगितले की, क्रुझ कारवाई झाली त्यादिशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले…मी खालीच थांबलो होतो. गोसावी बरोबर सव्वा बाराला खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रँकी, थम्स अप घेतलं. तिथून ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रँकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रुझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते व ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं.

क्रुझवर घेऊन जायला एक बस होती. बसमधून कोण जातं त्याला ओळखायला सांगितलं होतं. २७०० नंबरच्या बसमध्ये फोटोमधली एक व्यक्ती बसली त्यालाच मी ओळखलं. बाकीच्यांना ओळखलं नाही कारण सर्वांनीच मास्क घातले होते. ४.२९ वाजता मला फोटो दिले त्यातील १३ व्यक्ती आल्या आहेत असा मेसेज दिला. आर्यन खान माझ्यासमोरच आले होते. त्यांना घ्यायला बस नाही तर क्रुझवरची व्हीआयपी गाडी आली होती.  कारवाई करतांना मी क्रुझवर नव्हतो. क्रुझच्या गेटवर होतो. क्रुझवर मी साडेअकरा दरम्यान पोहोचलो होतो.

क्रुझवर कारवाई दरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. रात्री ११.३० दरम्यान मी बोर्डींग होते तिथे गेलो. तेव्हा मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेलं बघितलं. एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणलं. तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात वर बोलावलं. तिथे साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यानं मला ब्लँक पेपरवर सह्या करायला लावल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे ब्लॅंक पेपरवर कशा सह्या करू असं विचारलं, तेव्हा समीर वानखेडे तिथे आले आणि म्हणाले काय नाही होत तू कर सह्या. मी सह्या केल्या. ९ ते १० ब्लॅंक पेपरवर मला सह्या करायला लावल्या. माझं आधारकार्ड नव्हतं पण मी त्यांना ते व्हॉट्सअप केलं. पंच म्हणून जेव्हा माझी सही घेतली तेव्हा पेपर पूर्ण ब्लँक होते.एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे ऑफिसमध्ये – सॅनिटरी पॅड, प्लास्टिकच्या बरण्या असं सामान होते. एनसीबी कार्यालयात तेव्हा एका चेअरवर आर्यन खान आणि शेजारी किरण गोसावी बसले होते तेव्हा मी त्यांचा गपचुप व्हीडिओ शूट केला. व्हीडिओमध्ये किरण गोसावी एका फोनवर आर्यनचं कुणाशी ती बोलणं करून देत होता.

किरण गोसावींकडे मी २२ जुलै पासून बॉडीगार्ड म्हणून काम करतो. ठाण्याला काम करायचो. गोसावी कारवाईच्या अगोदर अहमदाबादवरून निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफिसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाची व्यक्ती गोसावींना भेटायला आली होती. रात्रीतून दोन वेळा त्यांची मिटिंग झाली. साडेचारला एनसीबीहून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला. फोनवर म्हणाले, ‘उनको बोल २५ करोड में डील करने के लिये. १८ करोड में फायनल कर. ८ करोड वानखेडे को देना हैं’. सॅम हा शाहरुख खान आणि गोसावी मधला को ऑर्डिनेटर होता.

मला लोअर परळला दोन गाड्या दिसल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत पूजा ददलानी होती. किरण गोसावी, सॅम आणि पूजामध्ये १५-२० मिनिटे बोलणं झालं. ३ ऑक्टोबरच्या साडेपाचला सकाळी पुन्हा गोसावींना सॅमचा फोन आला. पूजा तेव्हा फोन उचलत नाही असं सॅम सांगत होता. किरण गोसावींनी व्हॉट्सअप कॉल साडेचार दरम्यान केला होता आणि कारवाईनंतरच्या डीलबाबत सांगितलं. पाचपर्यंत मला पुन्हा किरण गोसावींचा फोन आला. अर्जंट ताडदेव रोडला इंडियाना हॉटेल बाहेरून पैसे कलेक्ट करायचे आहेत. तिथे 5201 नंबरची गाडी होती. तिथे दोन कागदी पिशव्यांमधून ५० लाख रुपये घेऊन गाडीत बसून मी सांगितल्याप्रमाणे वाशीला आलो. वाशीला येऊन मी पैसे सरांना दिले. सर आणि त्यांची मिसेस बॅग घेऊन निघण्याच्या तयारीत होते. संध्याकाळी ५ ला वाशी इनऑर्बिट मॉलला बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा  पैशाची पिशवी दिली. तिथून ओलाने मी चर्चगेटला गेलो. ती पिशवी सॅमला दिली. त्या पिशवीत ३८ लाख रुपयेच होते. सॅमने याबाबत किरण गोसावीला फोनवरून विचारलं. गोसावीने दोन दिवसांत व्यवस्था करतो सांगितलं.

एसआयटी चौकशीची नबाव मलिकांची मागणी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत एनसीबीच्या कथित तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी साईल यांच्या खुलाशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सगळे प्रकरणच एसआयटीकडे तपासासाठी दिले पाहिजे अशी मागणी केली. अशा धाडी टाकून दहशत निर्माण केली जातेय, मोठी वसुली केली जातेय. मुंबईत अंमली पदार्थाबाबत गुन्हे होत आहे, त्या सर्व प्रकरणात वसुली केली जात आहे. त्यांचाच माणूस समोर येऊन सांगतो आहे. यामुळे या प्रकरणात कुठेतरी या घटनेची दखल घेऊन एसआयटी नेमून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बोलणार आहोत, असेही मलिक यांनी सांगितलं.

गोसावीच्या बॉडीगार्डनेच आर्यन खान अंमली पदार्थ प्रकणी गौप्यस्फोट केला आहे. हे षडयंत्र आता समोर आलं आहे. यामुळे आता या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. त्यातून सत्य समोर येईल. ज्यांच्याकडून पैसे वसूल केले गेले आहेत, तेही समोर येऊन बोलतील, असं मलिक म्हणाले. केंद्राने क्रूझ पार्टीला परवानगी कशी दिली, असा सवालही त्यांनी केला आहे.

बोगस केसेस तयार कराच्या, दहशत निर्माण करायची आणि श्रीमंतांना अडकवून खंडणी उकळण्याचा हा धंदा आहे. अंमली पदार्थ प्रकरणी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून तपास सुरू आहे. बॉलिवूडमधील कलाकारांना चौकशीसाठी बोलावून तोडपाणी सुरू आहे. आतापर्यंत एकालाही अटक झालेली नाही. हा सर्व प्रकार दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्या माध्यमातून वसुली सुरू आहे, असाही आरोप मलिक यांनी केला.

COMMENTS