पूर्वग्रहांचा श्रीगणेशा

पूर्वग्रहांचा श्रीगणेशा

भारतात असो वा ब्रिटनमध्ये भेदाभेदाची सुरुवात शाळेतूनच होते. शाळा हा मुलांना अर्थशून्य पूर्वग्रहांच्या जगात घेऊन जाणारा दीर्घ संस्कारच होय. हा लेख ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकांमध्ये २१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा मराठी अनुवाद..

डॉ. गेल ऑमव्हेट: नव्या युगाची दिशा
दिल्ली दंगलीतले अस्वस्थ करणारे प्रश्न
२४ महिला आमदारांचा फेसबुकवरचा वावर सोहळ्यांपुरताच

सकाळी सकाळी माझ्या भावाच्या मेसेजने मला जाग आणली. “… झालं बघ सुरू!”

माझा भाचा रडवेला होऊन आपल्या आईवडिलांना सांगत आला होता.  त्याचा मित्र त्याला म्हणाला होता की वर्गातली निम्मी मुले त्याच्याशी खेळायला तयार नाहीत. कारण? कारण त्यांना चिनी चेहरे नाही आवडत. त्या मित्राला कसं कळलं हे? बहुतेक त्यानं इतर मुलांना विचारलं असणार.

केवळ सहा वर्षाचा आहे हा माझा भाचा. चिनी आई आणि भारतीय वडिलांचा अगदी गोड छोकरा आहे तो. माझा भाऊ आणि त्याची बायको दोघेही अर्थशास्त्रात पीएच.डी. मिळवलेले प्राध्यापक आहेत.

आणि तरी या छोट्या मुलाच्या वाट्याला हे आलंय. रोजरोजचे नाकारले जाणे, नावाला म्हणून स्वीकारले जाणे आणि औदार्याचे प्रदर्शन करत मिसळून घेतले जाणे.

ब्रिटनमधल्या शाळेत तर चक्क सहिष्णुता दिनच साजरा करतात. माझ्या भाच्याला चांगल्यात चांगलं काय मिळणार तर ही दिखाऊ सहिष्णुता. मनापासून केलेला स्वीकार नव्हे. स्वाभाविकपणे हसत खेळत मिसळणं नव्हे. तर ही सहिष्णुता. वर्षातून खास एक दिवस. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका चिनी प्राध्यापकांनी एका ट्विटमध्ये लिहिलंय : विद्यापीठाला भेट द्यायला परदेशी पर्यटक आले होते. फोटो काढताना त्यांनी या चिनी प्राध्यापकांना फ्रेममधून जरा बाजूला व्हायला सांगितले. कारण? कारण त्यांना “ऑक्सफर्डचे अस्सल दर्शन घडवणारा” फोटो हवा होता.

मी स्वतः ब्रिटनमध्ये डॉक्टरेटचा अभ्यास करत होते त्यावेळी दुकानदार माझ्याशी बोलताना बऱ्याचदा मोठा आवाज लावत. त्यांचे इंग्लिश एरवी मला कळणार नाही म्हणून ते ही मेहरबानी करत. “छान इंग्लिश बोलता हं तुम्ही.” अशी उदार प्रशंसा भारतीयांच्या वाट्याला नेहमीच येई. तुमच्या देशात डॉक्टर आहेत का हो असेही आम्हाला विचारले जाई. आकडेवारी पाहिली तर जगभरात इंग्लिश बोलणारी सर्वाधिक माणसे अमेरिका वगळता आपल्या भारतातच आहेत. इंग्लंडमधली NHS ही सरकारी आरोग्य व्यवस्था प्रामुख्याने भारतीय डॉक्टर आणि नर्सेसच चालवतात! पण पूर्वग्रहांपुढे आकडेवारीची काय मातब्बरी?

म्हणून मग त्यांचा सामना विनोदाचे हत्यार वापरून करणेच योग्य. किंवा थोडा बेफिकीर ताठा दाखवून. एकदा कुणी मला विचारलं, “तुमच्या  भारतात आंबे असतात का हो?” यावर मी नुस्तीच फिसकन हसले. इंग्लंडच्या हिरव्यागार कुरणात आंबे तर मला कधी दिसले नव्हते. डुकरापासून बनवलेले ब्लॅक पुडिंग किंवा बेकन मी खाऊन तरी बघावे असा आग्रह झाला तेव्हा मी म्हणाले, “डुक्करं, कुत्री किंवा बेडकं खायला आवडत नाही मला. पण खातात त्यांच्याबद्दल आदर मी नक्कीच बाळगते.”

पण मग आमच्या हेही लक्षात आले की असल्या विनोदांचा कितीही भडिमार आम्ही केला तरी समान दर्जा काही आम्हाला मिळू शकत नाही. आम्ही गोऱ्या लोकांच्या घोळक्यात असतो तेव्हा त्यांच्यातल्या बऱ्याचजणांचं आमच्याकडे लक्षही जात नाही. पुन्हा गाठ पडली तर पूर्वी झालेली भेट त्यांना आठवत नाही. जणू आम्ही अस्तित्वातच नसल्यासारखी फिरते त्यांची नजर आमच्यावरून.

प्रेम सारे काही जिंकून घेत असेल पण वंशभेदावर मात्र त्याची मात्रा चालत नाही हे आता आम्हाला कळून चुकलंय. गर्ल फ्रेंड किंवा बॉय फ्रेंड जरूर होता येईल पण आणाभाका घ्यायची वेळ आली की मात्र, “ब्रिटिश संस्कृतीशी जुळवून घेणं कठीण जाईल तुला.” किंवा “स्वतःच्या नेमक्या ओळखीबद्दल मुलांचा गोंधळ नाही का उडणार?”

हे चक्र माझ्या डोक्यात गरागरा फिरू लागतं. माझे हृदय विदीर्ण होते.

या साऱ्याची सुरुवात शाळेपासूनच होते. तिथेही आणि इथेही.

सहा वर्षाची होते मी तेव्हा. माझा भाचा आता आहे त्याच वयाची. माझ्या महाराष्ट्रीय बाईंनी मला जवळ बोलावलं. म्हणाल्या, “तुझे बाबा उजवीकडून डावीकडे जात लिहितात ना?” माझे बाबा मुस्लिम असल्याचे त्यांना माहीत होते आणि त्यांना त्यांच्या उर्दू लेखनपद्धतीची टर उडवायची होती. मी गोंधळले. माझे बाबा का म्हणून चुकीच्या पद्धतीने लिहितील? मी माझ्या आईला त्याबद्दल विचारलं. आपल्या बाळाला या निष्ठुर, अडाणी जगापासून आपण वाचवू शकत नाही या जाणीवेने कोलमडून गेली असेल ती त्यावेळी. काल माझ्या भावाची झाली तशीच अवस्था झाली असेल तिची.

माझे बाबा आणि त्यांचे सगळेच नातेवाईक कोंकणी मुसलमान होते. त्यांच्यापैकी बहुतेकांना अस्खलित मराठी लिहिता-बोलता यायचं. पण सगळे याबद्दल आश्चर्य दाखवत त्यांचं कौतुक करत. किती सुंदर मराठी बोलता नाही ‘तुम्ही’!

मी पाच वर्षाची असताना संस्कृत श्लोकपठणात माझा पहिला नंबर आला. सगळे शिक्षक गोळा होऊन विचारविनिमय करू लागले. या असल्या नावाच्या मुलीला संस्कृतचे पारितोषिक द्यावे का असा प्रश्न त्यांना पडला होता.

माझ्या भावाने एकदा एक चित्र काढलं. त्यात त्याने निळंभोर आकाश, चंद्रकोर आणि चमचमत्या चांदण्या दाखवल्या होत्या. त्याच्या शिक्षकाला ही गोष्ट रुचली नाही. “असले चित्र तू का काढलंस? पाकिस्तानच्या झेंड्यासारखं? मुस्लिम आहेस म्हणून की काय?” माझा भाऊ भांबावून गेला. आपण मुस्लिम आहोत काय? आणि हे पाकिस्तान काय असतं? त्याला काही कळेना.

आमचे आईवडील समाजवादी विचाराचे हिंदू , मुसलमान होते. आम्ही रशियन पुस्तके, दलित कविता, आणि क्रांतिकारी समूहगीतांवर पोसले गेले होतो. तथापि बाबा मुसलमान असल्याने आमच्यावर मुस्लिम असल्याचा शिक्का होता. पितृसत्ताक पद्धती ही अशी एकसुरी समाजव्यवस्था आहे.

मात्र याच पितृप्रधान व्यवस्थेमुळे काही अत्यंत कटू अनुभव मला भोगावे लागले नाहीत. मुलगी होते ना मी. बिचाऱ्या मुस्लिम मुलीला तर तिच्या स्वतःच्या समाजापासूनच जपायला हवं होतं. चार चार बायका असलेले नवरे, तोंडी तीन तलाक – काय आणि काय! माझा भाऊ मुलगा होता, मुस्लिम मुलगा. नक्कीच “शत्रू” गटातला. तो बारा वर्षाचा असताना काही मुले खेळात त्याच्याविरुद्ध हरली. लगेच त्यांना चीड आली. त्यांनी शिवीगाळ करत भांडण सुरू केलं. “राजपुतांनी मुगलांना संपवले, आता आम्ही तुम्हाला संपवू.” ते ओरडू लागले. पुरुषत्व आणि हिंसा यांच्यातील गुंतागुंतीचे नाते मुलांना धोकादायक प्रदेशात लोटते. इतिहासाच्या पुस्तकातील धड्याचे रूपांतर “आम्ही” विरुद्ध “ते” अशा द्वंद्वात होते. औरंगजेब आणि शिवाजी यांच्यातील लढायांचे खापर वर्गातल्या  एकुलत्या मुस्लिम मुलावर फोडण्यात येते. सुंता केलेल्या पुरुषाबद्दल वापरल्या जाणाऱ्या उपमर्दकारक शब्दाने माझ्या भावाला आणि आत्येभावांना व चुलतभावांना रोजच चिडवले जाई. इतके की त्यांनी ते घरी सांगणेसुद्धा बंद केले.

शाळा ही मुलांना अर्थशून्य जगात घेऊन जाणारा एक दीर्घ संस्कारच बनते. दलित आत्मचरित्रात याच स्वरूपाचे अनुभव येतात. शिक्षण घेणाऱ्या पहिल्याच पिढीला शाळेत पाऊल ठेवताच ज्या अवहेलनेला आणि एकाकीपणाला तोंड द्यावे लागते त्याचे चित्रण या कथांत आपल्याला दिसते. गरीब, दलित, मुस्लिम, ओबीसी मुले नापास होऊन शाळेबाहेर फेकली जातात ते त्यांना गणित, विज्ञान किंवा भाषाविषय कठीण जातात म्हणून नव्हे. उच्चवर्णीय शिक्षक आणि सहाध्यायी यांच्या वाकड्या वागण्यामुळे त्यांना काहीही शिकणे अशक्य बनते.

बालवयातील हे मानभंग प्रौढपणीही आपला पिच्छा सोडत नाहीत. आताची उच्च विद्याविभूषित आणि स्वयंपूर्ण मी लहानपणीच्या  गोंधळलेल्या आणि दुखावलेल्या मला वाचवू शकत नाही. त्याचे शल्य जन्मभर वागवावेच लागते.

पुढच्या पिढीलाही हे सारे असेच पहिल्यापासून भोगत राहणे भाग आहे काय?

पूर्व प्रसिद्धी : इंडियन एक्स्प्रेस २१ ऑक्टोबर, २०२१

अनुवाद : अनंत घोटगाळकर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0