प्रशांत किशोर, अशोक लवासा यांच्यावरही लक्ष

प्रशांत किशोर, अशोक लवासा यांच्यावरही लक्ष

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांचा फोन एनएसओ ग्रुपचे पिगॅसस स्पायवेअर वापरून हॅक करण्यात आला

भारत-अमेरिका चर्चेवर चीन नाराज
बिल्किस बानो प्रकरणः ११ दोषींची सुटका करणाऱ्या समितीत भाजपचे ४ सदस्य
३० टक्के औष्णिक प्रकल्पांकडे केवळ १० टक्के कोळशाचा साठा

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांचा फोन एनएसओ ग्रुपचे पिगॅसस स्पायवेअर वापरून हॅक करण्यात आला होता, असे अम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने केलेल्या डिजिटल फोरेंजिक तपासणीस पुढे आले आहे. अम्नेस्टीने हे निष्कर्ष ‘द वायर’सोबत शेअर केले आहेत. निवडणूक आयोगाचे सदस्य अशोक लवासा यांचा क्रमांकही लक्ष्यीकृत क्रमांकांच्या यादीत आढळला आहे.

याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचाही मोबाइल क्रमांक एनएसओ ग्रुपच्या संभाव्य लक्ष्यगटात सामील करण्यात आला होता असे द वायर व अन्य माध्यम सहकाऱ्यांनी पिगॅसस प्रोजेक्टदरम्यान प्राप्त केलेल्या माहितीतून पुढे आले आहे. बॅनर्जी यांच्या स्वीय सचिवांचा क्रमांकही या यादीत आहे.

बॅनर्जी व किशोर यांच्या निकटवर्तीयांचे फोन फोरेंन्सिक तपासणीसाठी तत्काळ उपलब्ध होऊ न शकल्यामुळे ते हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता की नाही याबद्दल निश्चित काही सांगणे कठीण आहे.

पिगॅसस स्पायवेअर केवळ सरकारेच खरेदी करू शकतात हे एनएसओने वारंवार स्पष्ट केले आहे आणि तृणमूल काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांचा फोन क्रमांक या स्पायवेअरच्या लक्ष्यगटात सापडला आहे हा भारतात, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी, अज्ञात यंत्रणेद्वारे हे स्पायवेअर वापरले जात आहे, याचा धडधडीत पुरावा आहे.

अर्थात पश्चिम बंगाल निवडणुकांदरम्यान या स्पायवेअरचा वापर झाला असेल, तर अशा पद्धतीने पाळती ठेवून निवडणुकीच्या निकालावार परिणाम केला जाऊ शकत नाही याचे हे उदाहरण ठरेल, असे किशोर म्हणाले. अर्थात लोकांवर बेकायदा रितीने पाळत ठेवण्यासाठी सत्तेचा गैरफायदा घेतला जात होता हे तर नाकारता येणारच नाही, असेही त्यांनी नमूद केले.

किशोर यांनी तृणमूल काँग्रेसशिवाय तमीळनाडूत डीएमकेसाठी तसेच पंजाबमध्ये काँग्रेससाठी राजकीय सल्लागार व व्यूहरचनाकार म्हणून काम बघितले आहे. याचा अर्थ देशातील विविध भागांतील सरकारच्या राजकीय विरोधकांबाबतची माहिती गोळा करण्यासाठी स्पायवेअरचा वापर  केला जात आहे.

किशोर यांच्या सध्याच्या फोनच्या फोरेंन्सिक तपासणीत असे दिसून आले की, २०१८मध्ये लोकसभा निवडणुकांच्या काही महिने आधी, किशोर यांच्या फोनमध्ये स्पायवेअर घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. किशोर या निवडणुकीत सल्लागार म्हणून काम पाहणार अशा अटकळी जोरात असतानाच हा प्रयत्न झाला होता हे लक्षात घेण्याजोगे आहे.

पिगॅसस हे इझ्रायलमधून निर्यात केले जाणारे एक लष्कर दर्जाचे उत्पादन आहे आणि आपण याचे ग्राहक आहोत हे मोदी सरकारने कधीही नाकारलेले नाही. यावरून प्रशांत किशोर यांचा फोन हॅक करण्याचा प्रयत्न भारतातील यंत्रणेकडूनच झाला असावा असा निष्कर्ष अत्यंत वाजवी आहे. किशोर यांचा फोन हॅक करण्याचा प्रयत्न २८ एप्रिल रोजी म्हणजे बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याच्या एक दिवस आधी झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्यानंतर जून २०२१ व जुलै २०२१ या काळातही किशोर यांच्या फोनवर पिगॅससच्या खुणा दिसत आहेत. याच काळात ते दिल्लीच राहुल व प्रियंका गांधी यांना भेटले होते. ‘द वायर’चे प्रतिनिधी किशोर यांना भेटले त्या तारखेलाही फोन हॅक झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे.

अम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अन्वेषणाबद्दल बोलायचे तर स्मार्टफोन फोरेंन्सिक ही सतत उत्क्रांत होत जाणारी प्रक्रिया आहे. किशोर यांचा फोन हॅक केल्यानंतर तो हॅक करणाऱ्या व्यक्ती किंवा यंत्रणेने नेमके काय केले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पिगॅसस हे अत्याधुनिक व घातक स्पायवेअर म्हणून ओळखले जाते. ते लक्ष्य क्रमांकावरून झालेले कॉल्स रेकॉर्ड करते, सर्व मेसेजेस कॉपी करते आणि अगदी गुप्तपणे त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा फिल्मिंगही करू शकते.

अम्नेस्टी इंटरनॅशनलने केलेले तांत्रिक संशोधन हा माध्यमसंस्थांनी सामूहिकपणे राबवलेल्या ‘पिगॅसस प्रोजेक्ट’चा महत्त्वाचा भाग आहे. वायर, गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट आणि फोरबिडन स्टोरीज या पॅरिसस्थित संस्थेचा यामध्ये सहभाग आहे. एखादी व्यक्ती पाळतीसाठी संभाव्य लक्ष्य आहे हे यातून समजू शकते पण हॅकिंगचा प्रयत्न यशस्वी झाला की नाही याचा पुरावा मिळणे कठीण आहे. मात्र, फुटलेल्या डेटाची अस्सलता तपासून बघण्यास एआयच्या सिक्युरिटी लॅबने केलेली फोरेंन्सिक तपासणी उपयुक्त ठरली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी सदस्य अशोक लवासा यांचा क्रमांकही स्पायवेअरने लक्ष्य केलेल्या क्रमांकांच्या संभाव्य यादीत आढळला आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे असे मत निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांपैकी केवळ एकाने अर्थात अशोक लवासा यांनी व्यक्त केले होते. त्यानंतरच्या काही आठवड्यांत त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्या फोन क्रमांकाला लक्ष्य करण्यात आले असावे असे फोरेंन्सिक तपासणीत आढळले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: