मकाऊ – आशियातील कुबेर नगरी

मकाऊ – आशियातील कुबेर नगरी

तब्बल चारशे वर्षे राज्य करून पोर्तुगिजांनी १९९९ साली मकाऊ चीनच्या ताब्यात दिले. नुकतेच या हस्तांतरणाची वीस वर्षे पूर्ण झाली. आता ‘मकाऊ’ हा चीनचा विशेष

दोन सत्ताधीशांसाठी तैवान मुद्दा कळीचा
भारताच्या दोन शेजाऱ्यांमधले गुफ्तगू
भारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प

तब्बल चारशे वर्षे राज्य करून पोर्तुगिजांनी १९९९ साली मकाऊ चीनच्या ताब्यात दिले. नुकतेच या हस्तांतरणाची वीस वर्षे पूर्ण झाली. आता ‘मकाऊ’ हा चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश आहे. मात्र येथे पूर्णतः पोर्तुगाल संस्कृतीचा प्रभाव दिसतो.

आशियातील लास वेगास म्हणून ‘मकाऊ’ची जगभरात ख्याती आहे. मोठमोठे कॅसिनो, डोळे चक्रावून टाकणारी झगमगीत दुनिया म्हणजे ‘मकाऊ’. लास वेगासपेक्षाही पाच पटीने जास्त उलाढाल येथे कॅसिनोमधून केली जाते.

‘मकाऊ’मधून फिरताना काही ठिकाणी आपण गोव्यात असल्यासारखा भास होतो. आम्ही ‘हाँग काँग’ एअरपोर्टवर उतरल्यावर प्रथम ‘मकाऊ’ला जाण्याचा निर्णय घेतला. ‘ हाँग काँग’ एअरपोर्ट वर त्यासाठी खास बोटीचे काउंटर आहे. सिंगापूरहून आलो होतो आणि ‘मकाऊ’ला चाललो होतो. आमचे सिंगपुरहून येणारे सामान आम्हाला थेट ‘मकाऊ’ बेटावर मिळणार होत्या. ही सेवा तशी दुर्मिळच कारण मकाऊला जाणारी बोट, ही एअरपोर्टला लागून असणाऱ्या फेरी टर्मिनल वरून सुटणार होती. एअरपोर्ट आणि फेरी टर्मिनल अंतर्गतरित्या जोडलेले होते. आणि हवाई अड्डयावरील आमच्या बॅगा थेट बोटीतून ‘मकाऊ’ला पोहचणार होत्या. जो व्हिसा (Pre Arrival Registration) ‘हाँगकाँग’साठी काढला जातो, तोच  ‘मकाऊ’ बेटावर चालतो.

बोटीतून प्रवास करताना समुद्रातील सर्वात लांब असलेला पूल ‘हाँग काँग झुहाय’ हा ब्रीज लक्ष वेधून घेत होता. जशी बोट ‘मकाऊ’जवळ पोहचू लागली तसे तारे चमकावेत अशा विद्युत रोषणाईने नटलेल्या या छोट्याश्या प्रदेशाने स्वागत केले. एखाद्या रंग-बिरंगी ताऱ्यांच्या पुंजक्याकडे आपली बोट खेचली जाते आहे असे वाटत होते.

‘मकाऊ’ हे हाँग काँग पासून चाळीस मैलावर आहे. आज ‘हाँग काँग’ आणि ‘चीन’मधील संघर्ष उग्र झालेला दिसतो. परंतु फक्त चाळीस मैलावर ‘मकाऊ’ असूनही तिथे याचा काही परिणाम दिसत नाही. या विषयावर एक दोन जणांशी चर्चा केली असता, ‘मकाऊ’चे लोक खूप साधे आहेत असे कळाले. एका बाजूला जुगाराचा अड्डा असलेले हे उंच, विलासी, चैनी कॅसिनोज आणि दुसऱ्या बाजूला ‘मकाऊ’ची साधीसुधी मूळ जनता असे दृश्य पाहायला मिळते. ‘मकाऊ’च्या लोकांना राजकारणाशी काही देणे घेणे नाही. त्यांचे जीवन सामाजिक राजकीय गोष्टींपासून दूर आहे.

पोर्तुगिजकालीन जुने चर्च, इमारती इथे अजूनही दिमाखात उभ्या आहेत. पोर्तुगिज सत्तेचे अवशेष सतराव्या शतकातील सेंट लोरन्सेस पॅरिश चर्च रूपाने पाहण्यास मिळते.

‘मकाऊ’ हे बेट असल्याने येथे जमीन तोकडी आहे, साडे सहा लाखाच्या आसपास लोकसंख्या असून, दाटीवाटीने लोक राहताना दिसतात. रस्ते अरुंद असल्याने जुन्या गोव्यातील आठवण होते.

इथे वेनेशियन नावाचा कॅसिनो प्रसिद्ध आहे. हा कॅसिनो म्हणजे एखाद्या महाकाय मॉलसारखा आहे. याची रचना, सर्व बांधकाम, अंतर्गत रचना ही इटली मधील ‘व्हेनिस’ या शहरासारखी आहे. या मॉलमध्ये कॅनॉल आहे. त्यामध्ये लहान बोटी वाहतूक करताना दिसतात. तसेच पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल सुद्धा आहे. काही ठराविक मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत त्यालाच शटल असे म्हणतात या शटल तुम्हाला हॉटेल वरून फेरी टर्मिनलवर वा तेथून पुन्हा हॉटेलवर आणून सोडतात. अन्यथा टॅक्सी शिवाय येथे पर्याय नाही. खाद्य पदार्थांमध्ये विशेतः पोर्तुगाली एग टार्ट हे डेझर्ट आणि बदामाच्या कुकीज प्रसिद्ध आहेत. बाकी इतर जेवण चायनीज आणि पोर्तुगाल पद्धतीचे मिळते.

कॅसिनो म्हटले की ‘स्टॅन्ली हो’ याचे नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. याला कॅसिनो आणि जुगाराचा जनक असेही म्हणायला हरकत नाही. येथे ‘स्टॅन्ली’चे एकूण एकोणीस कॅसिनो आहेत. पोर्तुगिजांनी साधारण १८४७ मध्ये कॅसिनो किंवा जुगाराचा हा धंदा कायदेशीर स्वरूपात पुढे आणला.

मात्र ढोबळमानाने ‘मकाऊ’मध्ये दहा टक्के एवढी जनता दारिद्र्य रेषेखाली आहे असे म्हटले जाते. इथे हॉटेलमध्ये काम करणारे कामगार, हे व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स या देशातून आलेले दिसतात. पृथ्वी वरचे सर्वात श्रीमंत स्थळ असूनही, येथे दारिद्र्य आहे असे म्हटले तर खरे वाटत नाही. येथील मूळ लोकांना मॅकॅनिज असे म्हणतात, ज्यांची लोकसंख्या केवळ एखाद टक्का एवढी उरली आहे. बाकीचे चिनी लोक आहेत. आता मॅकनिज भाषा ही लोप पावते आहे. जास्तीत जास्त लोक कँटोनिज भाषा बोलतात. येथील चलन मॅकनिज पटाका आहे.  ‘हाँगकाँग’चे चलन ‘मकाऊ’मध्ये खरेदी विक्रीसाठी चालते, परंतु ‘मकाऊ’चे चलन हे ‘हाँग काँग’मध्ये खरेदी विक्री साठी स्वीकारले जात नाही.

१४८८ चे आमा देवीचे जुने मंदिर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थळ आहे. हीला समुद्र देवता असे म्हटले जाते, जेव्हा पोर्तुगाल लोक या बेटावर पोहचले तेव्हा त्यांना सर्व प्रथम हे समुद्र किनारी असलेले मंदिर दिसले. ही देवी मासेमारी करणाऱ्यांचे आराध्य दैवत आहे. येथे येणारे भाविक भुई चक्रासारख्या उदबत्त्या लावून पूजा अर्चा करताना दिसतात.

चीनला जेव्हा पोर्तुगिजांनी मकाऊ हस्तांतरण केले तेव्हा ब्राँझ धातूपासून तयार केलेली कमळाची प्रतिकृती असलेले शिल्प ‘चीन’ने ‘मकाऊ’ला भेट दिले होते. या कमळाची उंची सहा मीटर असून लोटस स्क्वेअर येथे ते शिल्प पाहता येते. हेच ‘मकाऊ’चे बोधचिन्ह आहे.

‘मकाऊ’चा फिशर मेन्स व्हॉर्फ हे ठिकाण अद्भुत आहे. तेथे जवळ जवळ शंभराच्या आसपास रेस्टॉरंट्स आणि दुकाने आहेत. तेथे तयार केलेलं हुबेहूब रोमन एम्फी थिएटर पाहण्यासारखे आहे. थोडक्यात ‘मकाऊ’ हा प्रदेश चीनच्या  अधिपत्याखाली जरी असला, तरी येथे लोक निवांत आणि सरळ आयुष्य जगताना दिसतात. रावाला रंक आणि रंकाला राव करणाऱ्या या श्रीमंत  माया नगरीमध्ये एक मोठा समूह अत्यंत दारिद्रयात आजही जगत असल्याचे पाहून, या कुबेर नगरीचे वैभव मात्र फिके वाटू लागते.

धनंजय भावलेकर, हे सिने-नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

सावनी विनिता, माध्यमविषयक अभ्यासक असून, सेंट मीरा महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या व्याख्यात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0