बंगालमध्ये तृणमूल, पण ममतादीदींचा पराभव

बंगालमध्ये तृणमूल, पण ममतादीदींचा पराभव

४ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांत आसामवगळता भाजपला धक्का बसला आहे. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी

पक्षांतर आणि सामान्य मतदार
हाथरसः आरोपींच्या कारागृहात भाजप खासदार पोहचले
‘एक देश, एक निवडणूक’ – भाजपची खेळी

४ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांत आसामवगळता भाजपला धक्का बसला आहे. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पुन्हा दणदणीत बहुमत मिळवून मुख्यमंत्री बनण्याची हॅटट्रीक केली आहे. पण त्यांना नंदीग्राममध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांना अटीतटीच्या लढाईत १,७३६ मतांनी पराभूत केले.

ममतांच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

रविवारी रात्री १२ पर्यंत बंगालमध्ये तृणमूलने विक्रमी २१० जागांवर आघाडी घेतली असून भाजपला ८० जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने बंगालमधील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. केंद्रातले सर्व मंत्रिमंडळ बंगालच्या प्रचाराला आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभेला प्रतिसाद होता. अमित शहाही बंगालमध्ये अनेक दिवस तळ ठोकून होते. कोविडच्या काळातही निवडणुका घेतल्याने प्रचार आक्रमक झाला होता. भाजपने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूलच्या अनेक आमदारांना फोडून तृणमूलमध्ये मोठे खिंडार पाडले होते. पण भाजपचा असा कोणताही राजकीय डावपेच त्यांना यश देऊन गेला नाही. २०१६च्या तुलनेत भाजपला यश मात्र वाढले आहे. काँग्रेस व डावे पक्षांची आघाडी पूर्णपणे निष्प्रभ ठरली.

दरम्यान भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बंगालच्या मतदाराने कौल आपल्याला मान्य असून बंगालमध्ये आपली विचारसरणी व कार्य भाजप पसरवत जाईल अशी प्रतिक्रिया दिली.

तर तामिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेसने १४० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत अण्णाद्रमुककडून सत्ता खेचून घेण्यात यश मिळवले आहे. द्रमुकचे प्रमुख स्टालिन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील. अण्णा द्रमुकची १० वर्षांची सत्ता त्यांनी संपुष्टात आणली आहे.

केरळमध्ये पिनारयी विजयन यांच्या एलडीएफ१४० पैकी ९० जागांवर आघाडी घेत दुसर्यांदा सलग विजय मिळवून केरळच्या राजकीय इतिहासात नवी नोंद केली आहे. येथे काँग्रेसप्रणित यूडीएफला ४३ जागांवर आघाडी ठेवता आली आहे.

आसाममध्ये भाजपप्रणित आघाडीने १२६ पैकी ७६ जागांवर आघाडी घेत दुसर्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांना केवळ ४८ जागांवर समाधान मानावे लागले. पुड्डूचेरीत अण्णाद्रमुक-भाजप-एनआरसी युतीने१२ जागांवर आघाडी घेत काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली.

दरम्यान पाचही राज्यांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचार केला होता. पण प्रामुख्याने आसाम व केरळमधील पराभवाबद्दल राहुल गांधी यांनी जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली. काँग्रेस पक्षाचा निवडणुकांत पराभव झाला असला तरी आमचा पक्ष मूल्ये व आदर्श यांच्यासाठी सतत संघर्ष करत राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आम्हाला लाखो जनतेने पाठिंबा दिला आहे, त्याचे आपण ऋणी असल्याचेही ट्विट त्यांनी केले आहे. राहुल गांधी द्रमुकचे नेते स्टालिन यांचे विजयाबद्दलही अभिनंदन केले आहे. तामिळनाडूच्या जनतेला परिवर्तनाची गरज होती ती वेळ आली असून स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली आपला पक्ष काम करत राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: