अस्वस्थ आणि आश्वस्तही करतो ‘विवेक’!

अस्वस्थ आणि आश्वस्तही करतो ‘विवेक’!

भारताच्या सामाजिक परिदृश्यामध्ये भेगा पाडण्याचा निर्धार केलेल्या शक्तींच्या विरोधातल्या आपल्या युक्तिवादांना धार लावण्याचे काम हा माहितीपट करतो.

हा लेख इंग्रजीमध्ये प्रथम ११ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध झाला होता. केरळ महोत्सवामध्ये या माहितीपटाचे प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने थांबवल्याच्या पार्श्वभूमीवरतो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

एका उदास दुपारी मी आनंद पटवर्धन यांचा चार तास लांबी असलेला ‘Reason’ (हिंदीमध्ये विवेक)हा माहितीपट पाहायला गेलो. आनंद पटवर्धन यांच्या चित्रपटांकडून नेहमीच अशा प्रकारे तथ्ये मांडली जाणे अपेक्षित असते, की ती शेवटी मनामध्ये आशा जागवतील. ‘राम के नाम’ असो किंवा ‘वॉर अँड पीस त्यांचे चित्रण वास्तवामध्ये रुजलेले असते, लोककेंद्रित असते, आणि ते सर्वसामान्य सामाजिक विश्वासांना आणि आपल्याला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या चंगळवादी संकल्पनांना आव्हान देते.

विवेकने माझा अपेक्षाभंग केला.

तो केवळ एक आनंद पटवर्धन यांनी बनवलेला चित्रपट नाही. तो भारताच्या बहुसंख्यांकवादी रुपांतरणाच्या रक्तरंजित समकालीन इतिहासाचा धडा आहे. चित्रपटाची धार आणि आशा या दोन्ही गोष्टी चित्रपटकर्त्याची ओळख देतातच, पण त्याबरोबरच हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या भोवती फिरणारा तो एक मन ढवळून काढणारा अनुभवही आहे. समोर येणाऱ्या काही गोष्टी केवळ हादरवून टाकणाऱ्याच नाहीत तर अक्षरशः धोकादायक आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर विवेक एखाद्या माहितीपटासारखा वाटतच नाही – तो एखाद्या पुस्तकासारखा आहे, एक अभिजात पुस्तक, जे एका बैठकीत वाचून काढावे लागते.

या माहितीपटात आठ प्रकरणे आहेत. सुरुवातीला नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या जीवनाबद्दलचा (आणि मृत्यूबद्दलचा) भाग येतो. या दोघांचेही विवेकवाद, समता आणि न्याय यांचा पुरस्कार केल्याबद्दल खून झाले. सारतः, ‘विवेक हा त्यांच्या हौतात्म्याला केलेला सलाम आहे. दोन विवेकवाद्यांच्या संघर्षांचे चित्रण करताना हा माहितीपट विरोधाची चेतना पकडतो. दोन्ही खुनांची योजना ज्यांनी बनवली असा आरोप आहे ती गोव्यातली सनातन संस्था धर्मनिरपेक्ष भारताच्या शिरांमधून द्वेषाचे विष कसे पसरवते हे हा माहितीपट उघडून दाखवतो.

आनंद पटवर्धन

आनंद पटवर्धन

सनातन संस्थेचे खरे स्वरूप दाखवताना, पटवर्धन स्वतःच धैर्याचा आवाज बनतात. एका दृश्यात, सनातन संस्थेच्या वार्ताहर परिषदेमध्ये, संस्थेचा प्रवक्ता एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनानंतर निषेधमोर्चा आयोजित केल्याबद्दल पटवर्धनांना जाब विचारतो. या वार्ताहर परिषदेचे चित्रण करत असलेला चित्रपटकर्ता कॅमेऱ्याच्या मागून डोके उंचावून त्याला प्रत्युत्तर देतो. कल्पना करा – “जी संस्था एखाद्या व्यक्तीचे फुल्या मारलेले छायाचित्र पोस्ट करते आणि त्या व्यक्तीचा रहस्यमयरित्या खून होतो, अशा संस्थेच्या प्रवक्त्याला प्रत्युत्तर करणे. आजच्या काळात यापेक्षा अधिक धाडसाची गोष्ट कोणती असेल?”

माहितीपट नंतर दलितांवरील दडपशाहीच्या विरोधात त्यांनी केलेल्या संघर्षाच्या कहाण्यांकडे वळतो. तो उना येथील गायीचे कातडे सोलणाऱ्या दलित तरुणांना सार्वजनिकरित्या झालेल्या मारहाणीच्या विरोधातल्या संघर्षाचे चित्रण करू लागतो. देशामध्ये जिग्नेश मेवाणीसारख्या उभरत्या नेतृत्वाखाली दलितांची एक जनचळवळ कशी आकार घेत आहे ते दाखवतो. एका मोर्चामध्ये जिग्नेश मेवाणी आणि त्याच्याबरोबरचा जमाव भविष्यात ते मेलेली गुरे उचलणार नाहीत अशी शपथ घेतात.

माझ्याकरिता, तो माहितीपटातला आशेचा क्षण होता. संपूर्ण चित्रपटात पटवर्धनांची थोडक्या शब्दात पाहणाऱ्याला सुन्न करण्याची क्षमता दिसून येते. एका दृश्यामध्ये ते चाणक्याला ‘कुटिल ब्राह्मण’ म्हणतात. त्या पुरुषी अहंकारी माणसाकरिता यापेक्षा चांगले विशेषण दुसरे कोणते असणार! चित्रपटातल्या सर्वात सुंदर क्षणांपैकी एक म्हणजे एका दलित सभेतील शीतल साठेचे गाणे.

दलितांवर अत्याचार करणाऱ्यांवरच्या या कठोर टीकेनंतर, माहितीपट बहुसंख्यांकवादाच्या राजकारणाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जातो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटना तपशीलवार दाखवल्या आहेत. हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाची आत्महत्या आणि त्याच्या आत्महत्येच्या वेळचे पत्र, जे आपल्यापैकी काहींच्या चेतनेमध्ये सतत टोचणारा काटा बनून राहिले आहे, या दोन्हींची कहाणी हाही चित्रपटातील आशादायी क्षणांपैकी एक आहे. रोहीत वेमुलाचे मर्मभेदी शब्द आणि पटवर्धनांचा जादुई आवाज हे एक आशादायी मिश्रण वाटते.

चित्रपटात थोडा विनोदाचा शिडकावाही आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेला छाती ठोकणारा प्राईमटाईम न्यूज अँकर जेएनयू विद्यार्थी नेता उमर खलिदवर ओरडताना दिसतो. त्याच्या गोंगाटात त्याचा स्वतःचाच आवाज हरवून गेल्यासारखा वाटतो. स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात गेलेल्या भाजपच्या किमान पाच नेत्यांची नावे सांग या प्रश्नावरचे अभाविप नेत्याचे निरुत्तर होणे आणि अडखळत बोलणे हे केवळ विनोदी नाही तर बरेच काही सांगून जाणारे आहे.

माहितीपट शेवटी दादरी, मोहम्मद अखलाकच्या गावी जातो, जिथे गोरक्षकांच्या उन्मत्त जमावाने गायीचे मांस असल्याच्या संशयावरून त्याला ठार केले. पटवर्धन शिकार आणि शिकारी दोन्ही दाखवतात. अखलाकचा भारतीय हवाई दलात असणारा मुलगा मोहम्मद सिराज जेव्हा चित्रकर्त्याला सांगतो, “भारतासारखा दुसरा देश नाही. या देशात जन्म होणे हे माझे नशीबच आहे,” तेव्हा काळीज हलते.

एकूणात, ‘विवेक डोळ्यात घुसणाऱ्या सूर्यासारखा आहे – अस्वस्थ करतो, पण सूर्य अजून अस्तित्वात आहे याबाबत आश्वस्तही करतो. आपल्या सर्वांनी तातडीने पाहिलाच पाहिजे असा हा माहितीपट आहे, कारण तो भारताच्या सामाजिक परिदृश्यामध्ये भेगा पाडण्याचा निर्धार केलेल्या शक्तींच्या विरोधातल्या आपल्या युक्तिवादांना धार लावण्याचे काम करतो. जादू, विवेकहीनता, निराशा आणि रूढीवाद या सगळ्यांवर विवेक हेच एक उत्तर असू शकते.

शाह आलम खान हे एम्स, नवी दिल्ली येथे अस्थिरोगशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि ‘मॅन विथ द व्हाइट बिअर्ड’ या पुस्तकाचे लेखक आहे. लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.

मूळ लेख येथे वाचावा.

COMMENTS