नवी दिल्ली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ज्या पिस्तुलाने हत्या केली ते पिस्तुल अरब
नवी दिल्ली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ज्या पिस्तुलाने हत्या केली ते पिस्तुल अरबी समुद्रातील ठाण्यानजीकच्या खारेगांव खाडीतून नॉर्वेच्या प्रशिक्षित पाणबुड्यांना सापडले आहे. याच पिस्तुलातून डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचा सीबीआयचा संशय असून सध्या ते पिस्तुल फोरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर या पिस्तुलासंदर्भातील अधिक माहिती उघड होईल असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०१३रोजी डॉ. दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २०१४मध्ये त्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात सध्या सात जण ताब्यात असून ईएनटी सर्जन वीरेंद्र तावडे व वकील संजीव पुनाळेकर हे दोघे या हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करताना त्यांची हत्या ज्या पिस्तुलाने करण्यात आली होती ते पिस्तुल मारेकऱ्याने खारेगांव खाडीत फेकून दिल्याची माहिती पुढे आली होती. २०१९मध्ये सीबीआयने पुण्यातील न्यायालयाला हे पिस्तुल शोधून काढण्यासाठी प्रशिक्षित पाणबुडे व खोल समुद्रातील वस्तू शोधून काढणारे तंत्रज्ञान लागेल असे सांगितले होते. त्यानंतर सर्व परवानग्या मिळाल्यानंतर पिस्तुलाचा शोध सुरू झाला.
सीबीआयने दुबईस्थित एनव्हीटेक मरीन कन्स्ल्टंट कंपनीशी संपर्क साधला. या कंपनीने नॉर्वेला आपली सर्व यंत्रणा पाठवली व प्रशिक्षित पाणबुडे आणि तंत्रज्ञान भारतात आले. या पाणबुड्यांनी खारेगाव खाडीतील भागाची पाहणी केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिस्टंट मेजरिंग, अँगल मेजरमेंट व लेव्हल मेजरमेंट तंत्रज्ञान वापरून ज्या ठिकाणी पिस्तुल असेल ती जागा हेरून प्रशिक्षित पाणबुडे व लोहचुंबकाचा वापर करून ते पिस्तुल बाहेर काढले.
सीबीआय या पिस्तुलाच्या फोरेन्सिक अहवालाची वाट पाहात असून डॉ. दाभोलकर यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या याच पिस्तुलातून झाडण्यात आल्या आहेत का, याची तपासणी पुढे होणार आहे.
या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी साडे सात कोटी रु.चा खर्च करण्यात आला असून सुमारे ९५ लाख रु.चा सीमाशुल्कही माफ करण्यात आला आहे. हा मोहीम खर्च सीबीआय व महाराष्ट्र एटीएस यांच्यामध्ये विभागण्यात आला आहे.
मूळ बातमी
COMMENTS