२०२०मध्ये जगभरात ५३ पत्रकारांच्या हत्या

२०२०मध्ये जगभरात ५३ पत्रकारांच्या हत्या

पॅरीसः यादवीग्रस्त, अशांतता असलेल्या देशांमध्ये पत्रकारांची हत्या करणे, त्यांना मारहाण करण्याच्या घटना २०२०मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचा अहवाल रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने जाहीर केला आहे. संघटित गुन्हेगारी, भ्रष्टाचार व पर्यावरणावर बातमीदारी करणार्या ५३ पत्रकारांच्या हत्या २०२० या वर्षांत झाल्या आहेत. तर ३८७ पत्रकारांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ही संख्या मोठी असून यातील १४ पत्रकारांना कोरोनाचे वार्तांकन केल्याप्रकरणात अटक करण्यात आली होती.

मेक्सिको हा देश पत्रकारितेसाठी सर्वात भयावह देश ठरला आहे, त्यानंतर इराक, अफगाणिस्तान, भारत व पाकिस्तान या देशांत पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत.

पत्रकारांच्या बळीचा आकडा २०१९च्या तुलनेत कमी असला तरी २०२०मध्ये पत्रकारांवरचे हल्ले वाढले आहेत. कोरोनाच्या महासाथीत मोठ्या प्रमाणावर पत्रकार प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन बातमीदारी करू शकले नाहीत, पण पत्रकारिता ही प्रामुख्याने सत्ता, गुन्हे जगत यांच्या निशाण्यावर दिसून आली. २०२०मध्ये अनेक पत्रकार कोविड-१९चे बळी ठरले आहेत, त्यांचा समावेश मात्र या अहवालात केला गेलेला नाही.

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या अहवालानुसार अमली पदार्थांची तस्करी, तस्करांचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध यांच्यासंदर्भात वृत्तांकन करणार्या पत्रकारांसाठी २०२० हे साल भीतीदायक ठरले आहे. मेक्सिकोमध्ये अशा हत्यांवर देहदंडाची शिक्षा नाही. त्यामुळे या देशात अमली पदार्थाच्या व्यापाराचे वृत्तांकन करणारे पत्रकार माफियांचे लक्ष्य ठरले आहेत.

अफगाणिस्तान या यादवीग्रस्त देशात अफगाण सरकार व तालिबान संघटना यांच्यात शांततेच्या चर्चा सुरू असल्या तरी ५ पत्रकारांना दहशतवाद्यांनी ठार मारले आहे.

तर इजिप्त, रशिया व सौदी अरेबियात तुरुंगात असलेले ३ पत्रकार कोरोनाचे बळी ठरले आहेत.

भारतात प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य दिवसेंदिवस आकुंचित होत असल्याचा अहवाल २०१९मध्येच जाहीर झाला होता. यात पत्रकारांना पोलिस, राजकीय नेते, गुन्हे जगताने लक्ष्य केले होते. २०१९मध्ये प्रसार माध्यम स्वातंत्र्याच्या यादीत १८० देशांमध्ये भारताचे स्थान १४० इतके घसरले होते.

मूळ बातमी

COMMENTS