गा विहंगांनो….

गा विहंगांनो….

अन्नाचे साठे, शत्रूचा ठावठिकाणा यांच्याविषयी परस्परांना माहिती देण्यासाठी पक्षी आवाज करतात. विणीच्या हंगामात जोडी जमवण्यासाठी केला जाणारा आवाज हे एक प्रकारचं शक्तिप्रदर्शन असतं. मी इतका खणखणीत आवाज काढू शकतो याचा अर्थ माझ्या फुफ्फुसात किती ताकद आहे याची ती जाहिरात असते. त्याचबरोबर इतर प्रतिस्पर्धी नर पक्ष्यांना दिलेला तो इशारा असतो.

चांदवा
मुंबईकरांचे सखे शेजारी
पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याचा दर पूर्वीपेक्षा शंभर पट

निसर्गातल्या ज्या घटकांचा माणसाशी अगदी जवळून संबंध येतो असा एक घटक म्हणजे पक्षी. मनुष्यवस्तीपासून ते सर्व प्रकारच्या अधिवासांपर्यंत पक्ष्यांचा वावर असतो. जसे त्यांचे रंग आपलं लक्ष वेधून घेतात तसेच त्यांचे आवाजही आपल्या कानावर पडत असतात. कदाचित माणसानं संगीताची प्रेरणा या निसर्गातल्या गायकांकडूनच घेतली असेल. दिवस उजाडताना आणि मावळताना केले जाणारे आवाज हा आपली  हद्द सांगण्याचा, आपलं अस्तित्व जाहीर करण्याचा एक मार्ग असतो. शहरालगतच्या प्रदेशात असाल तर दयाळ पक्ष्याचं गाणं, शेतीच्या किंवा विरळ झाडीच्या गवताळ परिसरात असाल तर राखी रानकोंबड्याचं (ग्रे जंगल फाऊल ) आरवणं आणि पश्चिम घाटातल्या जंगलात असाल तर शीळकरी कस्तुराच्या (मलबार व्हिसलिंग थ्रश ) शिळेनं दिवस सुरू होतो. स्तब्ध दुपारी एखाद्या निष्पर्ण झाडावर बसून तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट) एका सुरात ‘पुक.. पुक’

कॅसी क्लेबा.

कॅसी क्लेबा.

असा आवाज करत राहतो. दिवस मावळलाय पण अजून किर्रर्र काळोख नाही अशा वेळी वातावरण आणखीच गडद करणारा घुबडाचा घुत्कार ऐकता येतो. रात्रभर ‘कापू.. कापू’ असा कातर आवाज करत रातवा (नाइटजार) आपली सोबत करत राहतो. अन्नाचे साठे, शत्रूचा ठावठिकाणा यांच्याविषयी परस्परांना माहिती देण्यासाठी पक्षी आवाज करतात. विणीच्या हंगामात जोडी जमवण्यासाठी केला जाणारा आवाज हे एक प्रकारचं शक्तिप्रदर्शन असतं. मी इतका खणखणीत आवाज काढू शकतो याचा अर्थ माझ्या फुफ्फुसात किती ताकद आहे याची ती जाहिरात असते. त्याचबरोबर इतर प्रतिस्पर्धी नर पक्ष्यांना दिलेला तो इशारा असतो. याखेरीज पक्षी धोक्याची सूचना देण्यासाठी कलकलाट केल्यासारखे वेगळे आवाज काढतात. खाद्य मागण्यासाठी पिले करत असलेल्या आवाजावरून तो परिसर म्हणजे त्या पक्ष्याचा विणीचा प्रदेश असल्याचं सूचित होतं. एखाद्या दुर्मिळ पक्ष्याचा आवाज तो पक्षी त्या परिसराचा रहिवासी असल्याची खूण असते. रातव्यासारख्या पक्ष्यांमध्ये बाह्य रंगरूपावरून दोन प्रजातीतील फरक ओळखणे अवघड असले तरी आवाजावरून त्यांची ओळख पटवणे सहज शक्य असते. जसा प्रत्येक माणसाचा अंगठ्याचा ठसा वेगळा तसाच प्रत्येक पक्ष्याच्या आवाजाचा आलेख वेगवेगळा असतो. म्हणजेच आवाज ही प्रत्येक पक्ष्याची स्वतंत्र ओळख आहे.

पक्ष्यांचे आवाज आणि त्याचा अभ्यास हा पक्षीविज्ञानातला एक महत्त्वाचा विषय आहे. भारतात पक्षीविज्ञानातील अनेक दिग्गज कार्यरत असले तरी पक्ष्यांचे आवाज या विषयात मोजक्याच लोकांनी काम केलेलं आहे. सांगलीमध्ये स्थायिक असलेले आणि गेल्या २० वर्षांहून अधिक काळ पक्ष्यांच्या आवाजाच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेले शरद आपटे हे त्या मोजक्या मंडळींपैकी एक. आजघडीला त्यांच्याकडे पक्ष्यांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करणारी अद्ययावत उपकरणे आहेत. चारशेहून अधिक पक्ष्यांचे आवाज त्यांच्या संग्रहात आहेत. त्यांच्या कामाची देशपातळीवर दखल घेतली जात असून अनेक वृत्तपत्रे, मासिके यातून त्यांच्या कामाचा परिचय करून दिला जात आहे. पक्षीअभ्यासाकडे नव्याने वळणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी ते कार्यशाळादेखील घेतात.

शरद आपटे सांगतात, “पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करताना रेकॉर्डिंगची कितीही उत्तम साधनं जवळ असली तरी ही प्रक्रिया अत्यंत अनिश्चित असते. त्यासाठी पक्ष्यांच्या सवयी, आवाज करण्याची ठिकाणं, वेळा, ऋतू यांची जाण हवी. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रानावनातून भटकण्याची ओढ हवी. वाऱ्याची दिशा, आसपासचे नको असणारे आवाज या आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टी अडथळा आणू शकतात याची कल्पना हवी. सगळं जुळवून आणलं तरी कधी पक्ष्याची लहर फिरेल आणि आणि तो मौनव्रत धारण करेल हे सांगता येत नाही. कधी आपण कसल्याही तयारीत नसताना अचानक आपल्या जवळ येऊन खणखणीत आवाजात आपल्या

शरद आपटे पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करताना.

शरद आपटे पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करताना.

उपस्थितीची नोंद करून जाईल याची खात्री नाही. फिल्डमध्ये रोमांचक वाटणारं हे काम घरी आल्यानंतर तितकंच क्लिष्ट आणि थकवणारं असतं. रेकॉर्ड केलेला प्रत्येक आवाज ऐकणं, त्यातला उत्तम आवाज मास्टर कॅसेटवर सेव्ह करणं, त्या आवाजाची तारीख, ठिकाण, वेळ याची नोंद करणं हे काम प्रत्यक्ष रेकॉर्डिंगइतकंच, किंबहुना त्याहून कणभर अधिक महत्त्वाचं असतं. पण हळूहळू या सगळ्याची सवय होते. कान तिखट होतात. झाडाचं पान जरी पडलं तरी ते ऐकू येतं. आपण त्या सगळ्या वातावरणाचा एक घटक होऊन जातो. मग हुकलेल्या क्षणांची खंत न वाटता दुप्पट उत्साहाने आपण त्या पक्ष्याचा मागोवा घेत राहतो. आपल्याला सतत अजमावणारी आणि संयम शिकवणारी ही एक प्रकारची साधना आहे.”

गंमतीची बाब अशी की एका ठिकाणचे पक्षी दुसऱ्या ठिकाणच्या पक्ष्यांचे आवाज ओळखू शकत नाहीत. या संदर्भातली दोन उदाहरणं फार बोलकी आहेत.

पहिला किस्सा आहे कॉलर्ड आऊलेट (उत्तर भारतातील जंगलात आढळणारे एक लहानसे घुबड) आणि त्याचं भक्ष्य असणाऱ्या वॉर्ब्लर, फ्लायकॅचर अशा काही पक्ष्यांचा. हिमालयातील काही अभयारण्यांत पर्यटकांना हमखास पक्षी पाहता यावेत यासाठी एक शक्कल लढवली जाते. कॉलर्ड आऊलेट या घुबडाचा आवाज टेपमधून वाजवला की आजूबाजूचे  वॉरब्लर्स, फ्लायकॅचर्स असे पक्षी धोक्याची सूचना देणारा कलकलाट करत आपल्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी झुडुपांतून बाहेर येतात आणि मग त्यांच्यावर नजर ठेवून असणाऱ्या पर्यटकांना ते सहजपणे पाहता येतात. शरद आपटे एकदा अशाच एका पर्यटकांच्या गटासोबत असताना गाईडने प्ले केलेल्या आवाजाला ते पक्षी काही दाद देईनासे झाले. तिथल्याच मुक्कामात त्यांनी रेकॉर्ड केलेला कॉलर्ड आवाज टेपवर वाजवून पाहावा अशी कल्पना त्यांना सुचली आणि त्याप्रमाणे जेव्हा त्यांनी तो आवाज ऐकवला तेव्हा मात्र नेहमीप्रमाणे पक्षी त्यांच्या शत्रूचा शोध घेत झुडुपाबाहेर आले. असे का घडले याचा शोध घेताना समोर आलेली माहिती रंजक होती. त्या गाईडने प्ले केलेला आवाज हा कुठल्याशा वेबसाइटवरून डाउनलोड केलेला होता. म्हणजेच तो वेगळ्या ठिकाणच्या कॉलर्ड आऊलेटचा आवाज तिथल्या पक्ष्यांच्या ओळखीचा नसल्याने त्यांनी त्या आवाजाकडे साफ दुर्लक्ष केले मात्र जेव्हा त्यांच्याच परिसरातल्या कॉलर्ड आवाज त्यांना ऐकवला गेला तेव्हा त्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला.

दुसरा किस्सा आहे कॉलर्ड आऊलेट आणि ग्रीनीश वॉरब्लर या पक्ष्यांचा.  हिमालयातल्या जंगलात कॉलर्ड आऊलेटचा आवाज ऐकून धोक्याची सूचना देण्यात आणि शत्रूवर हल्ला करण्यात ग्रीनीश वॉरब्लर आघाडीवर असतो. हा ग्रीनीश वॉरब्लर हिवाळ्याच्या दिवसात स्थलांतर करून सांगली आणि परिसरात दाखल होतो. एक प्रयोग म्हणून जेव्हा सांगलीत आलेल्या ग्रीनीश वॉरब्लरला कॉलर्ड आऊलेटचा आवाज ऐकवला तेव्हा मात्र त्याने त्या आवाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले कारण हजारो मैल ओलांडून आल्यानंतर आपला शत्रू आपला पिच्छा पुरवणार नाही याची त्याला पुरेपूर खात्री होती.

माणसांच्या बोलण्याची, विशिष्ट लकबींची हुबेहूब नक्कल करणारे कलाकार आपण नेहमीच पाहतो. पक्ष्यांच्या जगातही असे ‘नकलाकार’ आहेत. नकल्या खाटिक (Long-tailed Shrike), शामा (Indian Shama) आणि हरेवा (Chloropsis sp.) ही यांची काही उदाहरणं. गोव्यातल्या नेत्रावलीच्या जंगलात आम्ही काहीजण पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ असल्यानं पुष्कळ पक्ष्यांचे आवाज येत होते आणि आम्ही आमच्या दुर्बिणीतून काही नवीन दिसतंय का याचा शोध घेत होतो. दाट पानं असलेल्या एका झाडावर एका शामा पक्ष्यानं बैठक मारलेली आम्हाला दिसली. पुढच्या काही मिनिटात त्यानं आपल्या गळ्यातून नेहमीचे सुरेल आवाज द्यायला सुरवात केली. नेहमीची सुरावट संपली आणि इतर पक्ष्यांच्या नकला सुरू झाल्या तेव्हा आमचेही कान टवकारले गेले. शामाराव त्या दिवशी भलत्याच बहारदार मूडमध्ये होते. एखाद्या गायकाच्या खाजगी मैफिलीत त्यानं आपल्याकडच्या ‘खास’ रचना श्रोत्यांना ऐकवाव्यात तसं या पठ्ठ्यानं पुढच्या अर्ध्या तासात पंचवीस तरी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल आमच्यासमोर पेश केली.

एखाद्या परिसरात येणारे पक्ष्यांचे आवाज हे त्या परिसंस्थेबद्दल खूप काही सांगत असतात. त्यांची भाषा आपण समजून घेतली तर तो अधिवास आणि पर्यायानं ते पक्षी सुरक्षित राहू शकतात. एखाद्या परिसरातल्या पक्ष्यांच्या आवाजाच्या वर्षानुवर्षे केलेल्या नोंदी आणि एकाच पक्ष्याच्या विविध ठिकाणच्या आवाजांच्या नोंदी या दोन्ही गोष्टी पक्षी संवर्धनात महत्वाची भूमिका बजावू शकतात.

ऋजुता खरे
निसर्ग-पर्यावरण या विषयांवर मुक्त लेखन आणि अनुवाद तसेच महाराष्ट्र आणि इतर राज्यात अनेक पक्षीनिरीक्षण मोहिमांत सहभाग. NatureNotes

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0