नवी दिल्लीः पूर्वी बाबरी मशीद ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणचा भव्य राम मंदिर भूमीपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून य
नवी दिल्लीः पूर्वी बाबरी मशीद ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणचा भव्य राम मंदिर भूमीपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या प्रसंगी ४० किलो वजनाची चांदीची वीट पायाभरणीसाठी ठेवण्यात येणार आहे. तर मंदिराची उंची २० फुटाने वाढवून ती १६१ फूट करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर लगेचच मंदिराच्या उभारणीसाठी काम सुरू होईल, यासाठी एल अँड टी कंपनीचे एक पथक मदत करणार असून ते लगेचच कामाला लागेल. या मंदिराचे काम तीन ते साडेतीन वर्षांनी पूरे होईल, असे या मंदिराचे रचनाकार सी. सोमपुरा यांच्या मुलाने निखिल सोमपुरा यांनी सांगितले.
राम मंदिराचा आराखडा ३० वर्षांपूर्वी १९८८मध्ये मांडण्यात आला होता. आता त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असून मंदिरात दोन मंडप बांधण्यात येणार आहे. मंदिराच्या खांबावर नक्षीकाम होणार असून जनतेमध्ये मंदिराविषयी प्रचंड उत्सुकता असल्याने त्याची उंची १४१ फुटाहून १६१ फूट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोमपुरा यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.
५ ऑगस्टला भूमीपूजन झाल्यानंतर पुढचे तीन दिवस वैदिक पद्धतीने पण व्हर्चुअल धार्मिक सोहळे केले जाणार आहेत. ५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला केवळ ५० व्हीआयपींना प्रवेश देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अयोध्येत मोठा सीसीटीव्ही पडदा उभा करण्यात आला आहे.
दरम्यान सरकारने ५ ऑगस्ट हीच तारीख राम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यास का निवडली यावर चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टला जम्मू व काश्मीर राज्याला राज्यघटनेने मिळालेला ३७० कलमांतर्गत विशेष दर्जा संसदेने रद्द केला होता. त्या घटनेला एक वर्ष पुरे होत असून त्याचे औचित्य साधून सरकारकडून ही तारीख राम मंदिरासाठी निश्चित केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. हा खचित योगायोग नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हे मंदिर २०२४च्या अगोदर पूर्णत्वास नेण्याचाही सरकारचा प्रयत्न असून त्या वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. त्याचाही राजकीय फायदा भाजपला घ्यायचा आहे, असे मत आहे.
मूळ बातमी
COMMENTS