रामजन्मभूमीच्या निकालापर्यंत अयोध्येत १४४ कलम लागू

रामजन्मभूमीच्या निकालापर्यंत अयोध्येत १४४ कलम लागू

अयोध्या : राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत अयोध्येत जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अनुज झा यांनी रविवारी घेतला. ही जमावबंदी १० डिसेंबरपर्यंत असणार आहे.

ही जमावबंदी दिवाळी, चेहल्लूम व कार्तिक महोत्सवाच्या काळातही लागू असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दसऱ्याची आठवडाभर सुटी झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारी सुरू झाले. काही वर्षांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने २.७७ एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला या तीन पक्षकारांमध्ये समसमान वाटण्याचा निर्णय दिला होता, या निर्णयाच्या विरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात विशेष घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. या सुनावणी प्रक्रियेत येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत सर्व पक्षकारांच्या बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या ६ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष घटनापीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. १४ ऑक्टोबरला मुस्लीम पक्षकारांनी आपली बाजू मांडली असून या पक्षकारांनी सरन्यायाधीशांच्या पीठाने हिंदू पक्षकारांना प्रश्न न विचारता फक्त आम्हालाच प्रश्न विचारले असे नव्या घटनापीठाला सांगितले.

दरम्यान न्यायालयाने १६ ऑक्टोबरला हिंदू पक्षकारांना बाजू मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा निकाल १७ नोव्हेंबरला येण्याची शक्यता असून त्याच दिवशी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS