बजरंग दलाद्वारे ‘विवादास्पद’ गणेशमूर्तीचे जबरदस्तीने विसर्जन

बजरंग दलाद्वारे ‘विवादास्पद’ गणेशमूर्तीचे जबरदस्तीने विसर्जन

ही मूर्ती नदीच्या प्रदूषणाबाबत जागृती करण्यासाठी बनवण्यात आली होती.

‘इंडिया’ने लॉक डाऊन उठवला नाही, तर ‘भारतीय’ रस्त्यावर येतील…
तुम्हाला सैन्यात यायला कुणी सांगितले? – व्ही.के. सिंग
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यावर यूएपीए कायद्याची अंमलबजावणी

नागपूर येथील बजरंग दल कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने एका गणेश मंडळाला गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास भाग पाडले. ही मूर्ती गंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बनवण्यात आली होती, परंतु बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार ती अनादर करणारी होती, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.या वर्षी नागपूरच्या जरीपटका येथील रुद्र गणेशोत्सव मंडळाने एक विशेष मूर्ती तयार केली होती. यामध्ये गणेशाला रुद्र या शंकराच्या एका अवताराच्या स्वरूपात दाखवण्यात आले होते. मूर्तीच्या एका बाजूला गंगा नदीचे प्रदूषण करणारा एक मनुष्य होता, तर दुसरीकडे गणेश गंगा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे दाखवण्यात आले होते.

बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना गणेशाचे हे रूप पसंत पडले नाही. त्यांनी मंडळाच्या संयोजकांना ताबडतोब मूर्तीचे विसर्जन करण्यास सांगितले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा दावा होता की एका स्त्रीला – गंगेला –हाताने पकडणारी ही मूर्ती “अत्यंत अयोग्य” होती.

बातमीमध्ये असेही म्हटले आहे, की जरीपटका येथील पोलिसांनी मंडळाच्या संयोजकांना संरक्षण दिले असले, तरीही काही पोलिस अधिकाऱ्यांनी मंडळाच्या सदस्यांना ताबडतोब मूर्तीचे विसर्जन करण्यास सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना बजरंग दलाच्या राजकुमार शर्मा  यांनी सांगितले, गंगेला अयोग्य प्रकारच्या कपड्यांमध्ये दाखवले होते हे अत्यंत चुकीचे होते. त्यामुळे गणेशाच्या या मूर्तीने त्यांच्या भावना “कमालीच्या दुखावल्या” आहेत. “भगवान शंकराचा अवतार असलेल्या रुद्राला गणपती म्हणून कसे  दाखवले जाऊ शकते? ही हिंदू धर्माची चेष्टा आहे,” असे ते म्हणाले.

असे समजते, की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच या मूर्तीला विरोध दर्शवला होता आणि काही दिवसांपूर्वी तलवारी घेऊन मूर्तीकाराच्या घरी जाऊन त्यांनी त्याला धमकावले होते. “त्यांनी मूर्तीकाराला सांगितले होते, की ते त्याच्या घरातून मूर्ती मंडळापर्यंत पोहोचूच देणार नाहीत. पण आम्ही कशीबशी ती इकडे आणण्याची व्यवस्था केली,” असे संयोजकांपैकी एकाने सांगितले.

मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी मंडळाच्या संयोजकांना पोलिस स्थानकामध्ये बोलावले. “पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिले असले तरीही त्यांनी बजरंग दलाचीच बाजू घेतली. पोलिसांनी आम्हालाच ते म्हणतात तसे करा आणि मूर्ती विसर्जित करून टाका असे सांगितले,” असे संयोजकांपैकी एकाने सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले, की ३ सप्टेंबर रोजी मूर्ती जागेवरून हटवण्यात आली आणि ४ सप्टेंबरला अगदी पहाटे तिचे विसर्जन करण्यात आले.

मंडळाच्या संयोजकांनी नंतर कोणताही विवाद टाळण्याकरिता बाहुबली गणेशाची मूर्ती स्थापन केली.

मंडळाच्या आणखी एका संयोजकाने सांगितले, की हिंदू धर्माची चेष्टा करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता आणि उजव्या संघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतच नाहीत. “आम्हाला तर केवळ प्रदूषणाबद्दल जागृती करायची होती. दर वर्षी शहरातील अनेक गणेश मूर्ती पोलिस वगैरेंच्या रूपात दाखवल्या जातात, त्यांना बजरंग दल कधी विरोध करत नाही,” ते म्हणाले.

एका फेसबुक पोस्टमध्ये, रुद्र गणेश उत्सव मंडळाने गणेशमूर्ती लवकर विसर्जन करावी लागल्याबद्दल लिहिले आहे.

मंडळाने सांगितले, त्यांनी त्यांचा हेतू स्पष्ट करून सांगितला असला तरीही त्यांना “प्रचंड दबावाखाली आणि त्यांची इच्छा नसताना” मूर्तीचे विसर्जन करणे भाग पडले. या पोस्टमध्ये पुढे गणेश चतुर्थीचा सण हा “केवळ आपल्या मनोरंजनाकरिता” कधीच नव्हता असेही म्हटले आहे.

भारताच्या नद्यांमध्ये “प्रचंड बदल होत आहेत” आणि धोक्यात असलेल्या नद्यांपैकी गंगा ही “सर्वात पवित्र नदी आहे” याकडे लक्ष वेधून मंडळाच्या संयोजकांना नद्या, तलाव, भूजल आणि पेयजल यांचे प्रदूषण किती गंभीर आहे त्याबाबत जागरूकता वाढवायची होती. “आपण आपल्या नद्या इतक्या प्रदूषित केल्या आहेत की आता गणपती बाप्पालाच येऊन प्रदूषित करणाऱ्या माणसांपासून गंगा नदीचा बचाव करावा लागत आहे, असा संदेश आम्हाला द्यायचा होता,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

गणपतीला रुद्र देवाच्या स्वरूपात दाखवणाऱ्या राकेश पाठराबे या मूर्तीकाराने यापूर्वीही ‘पेट्रोल वाचवा’ आणि ‘मुलींना वाचवा’ अशा विविध सामाजिक विषयांवर मूर्ती बनवलेल्या आहेत. “भारतामध्ये एखाद्या चांगल्या संदेशाचा प्रसार करायचा असेल तर तो देवाच्या माध्यमातून करणे खूपच उपयुक्त ठरते,” असेत्यांचे निरीक्षण आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0