ग्रामीण बंगालमधील मुलींचे लहानपण, बिडी कुस्करते आहे

ग्रामीण बंगालमधील मुलींचे लहानपण, बिडी कुस्करते आहे

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तरुण मुलींना शाळा सोडून बिड्या वळण्याच्या कामाला लावले जाते आहे. कारण जर त्या कमावत्या असतील तर त्यांना चांगले स्थळ सांगून येण्याच्या शक्यता वाढतात.

ममता- राज्यपाल धनखड मतभेद चिघळले; ट्विटरवर ब्लॉक
बंगाल विधानसभाही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात
प. बंगाल ८ जणांचे हत्याकांड; तृणमूलच्या नेत्याला अटक

कोलकत्त्यापासून ३५० किलोमीटरवर, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मुस्कीनगर खेड्यात राहणारी आयेशा खातून बिडी (जाडीभरडी तंबाखू तेन्दुच्या पानांत गुंडाळतात) वळण्यात व्यग्र आहे. ती तेन्दुच्या पानामध्ये भरडलेली तंबाखू भरून पाने आयताकृती आकारात कापून ठेवत आहे. तिच्या कोवळ्या हातांनी ती पाने वळते आहे आणि त्यांना दोऱ्याने बांधते आहे. हे सर्व केल्यावर शेवटी ती या गुंडाळीचे एक तोंड लहानशा लोखंडी तुकड्याने आवळते. एका गरीबाची सिगरेट तयार!
बिडी वळताना नजर सतत घड्याळाच्या काट्याकडे असतो. तिचे हात वेगाने चालत असतात. ती सध्या दिवसाला २०० बिड्या वळते, पण सरावाने तिला ३००चा आकडा गाठायचा आहे. दहावीच्या वर्गात शिकणारी १४ वर्षाची आयेशा अनेकवेळा शाळेला दांडी मारते, तिला तिच्या शिक्षणाची फारशी फिकीर नाही. आपण दिवसाला किती गतीने आणि निगुतीने काम करतो, त्यानुसार लग्नाच्या बाजारात आपली पत ठरणार असल्याचे तिला पक्के माहिती आहे. त्यामुळे तिच्या भविष्याच्या आखणीमध्ये शिक्षणाला तितकेसे स्थान नाही.
ही कथा एकट्या आयेशाची नाही, तर मुर्शिदाबाद जिल्ह्यात बालकामगार म्हणून काम करणाऱ्या हजारो मुलींची आहे. हे काम करून चार पैसे मिळवले तर आपल्याला चांगला नवरा मिळेल आणि आत्तापासूनच आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू असा विचार ही कोवळी मने करतात.
कुटीर उद्योग
गंगा नदीच्या डाव्या किनारी वसलेला हा जिल्हा एकेकाळी त्याच्या सोन्या-चांदीच्या धाग्यातील भरतकाम आणि जरीच्या विणकामासाठी प्रसिद्ध होता. परंतु काळ बदलला आणि या पारंपरिक कलेची जागा हळूहळू आधुनिक उद्योगाने घेतली आहे. अंदाजे ७०लाख लोकसंख्या (२०११ सालची जनगणना) असलेले मुर्शिदाबाद हे देशातील बिडी उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. बिडी वळण्याच्या उद्योगात कामगार म्हणून ९०% महिला आणि लहान मुले यांचा समावेश आहे.
बिडी वळणे हा एक गृहोद्योग झाला आहे, जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक घरटी स्त्रिया आणि लहान मुले या व्यवसायात आहेत. परंतु त्यातून त्यांची आयुष्ये उजळून निघत नाहीत. सरासरी प्रत्येक बिडी कामगाराला १००० बिड्या वळल्यावर १५० रुपये मिळतात, शिवाय सतत तंबाखूशी संपर्क आल्याने गंभीर आजार होण्याची भीती असते.
पंचायती राज मंत्रालयाने २००६ साली मुर्शिदाबाद जिल्ह्याला ‘एकूण ६४० जिल्ह्यांपैकी सर्वाधिक मागास २५० जिल्ह्यांपैकी एक’ म्हणून घोषित केले आहे. साहजिकच, मुर्शिदाबाद बालविवाहांसाठी अव्वल स्थानावर असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ‘राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण-४ (एनएफएचएस-४)’ २०१५-१६साली करण्यात आले आणि अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण ३९.९% आहे. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण सरासरी ११.९%इतके आहे.

छोट्या मुलींचे बिडी वळण्याचे कौशल्य हा लग्न ठरण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा आहे आणि या जिल्ह्यात बालविवाहांचे प्रचंड प्रमाण आहे. सौजन्य: गुरविंदर सिंघ, व्हिलेज स्क्वेअर

छोट्या मुलींचे बिडी वळण्याचे कौशल्य हा लग्न ठरण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा आहे आणि या जिल्ह्यात बालविवाहांचे प्रचंड प्रमाण आहे. सौजन्य: गुरविंदर सिंघ, व्हिलेज स्क्वेअर

बालविवाहांच्या संख्येमध्ये २००५-०६ मध्ये बिहार पहिल्या क्रमांकावर, तर त्यामागोमाग झारखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक होता. पुढील १० वर्षांत शिक्षणामुळे बिहार, झारखंड आणि राजस्थान या राज्यांतील ही संख्या २०%नी घटली. पण पश्चिम बंगालमध्ये मात्र हे प्रमाण केवळ ४.८%नी घटले आहे.
मुली याच कमाईचे माध्यम
मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये बालविवाहांचे प्रमाण सर्वाधिक असले तरी, बाल लिंग गुणोत्तरात देखील राज्यात हा जिल्हा  पहिल्या स्थानावर आहे. सन २०११ सालच्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगालमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकी १००० मुलांमागे ९५६ मुली असा जन्मदर होता, तर मुर्शिदाबादमध्ये तेव्हा हजारी मुलांमागे ९६८ मुली असा जन्मदर होता. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, यामागे जनजागृती मोहीम नाही, तर आर्थिक घटक कारणीभूत आहेत.
“आमचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन देशाच्या अन्य भागातील लोकांपेक्षा वेगळा आहे, मुली कुटुंबासाठी कमवून आणत असल्याने, मुलगी होणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मुली ६ किंवा ७ वर्षाच्या झाल्या की बिडी वळण्याच्या कामाला लागतात”, असे मुस्कीनगर खेड्यात काम करणाऱ्या साहिना परवीन हिने व्हिलेजस्क्वेअर.इन ला सांगितले. “मुलींना शिकवण्यापेक्षा त्यांना कुशल बिडी कामगार करणे, याला लोक प्राधान्य देतात”.
दुहेरी जबाबदारी
लग्नाळू मुलींना तिने किती शिक्षण घेतले आहे, यापेक्षा तिचा दिवसाकाठी बिडी वळण्याचा वेग काय आहे याची विचारणा होते, ही आणखी एक धक्कादायक बाब परवीनने सांगितली. लग्न जुळवण्यातील हा निर्णायक घटक ठरतो.
अन्जुमा बीबी (४५), या फराक्का ब्लॉकजवळ सिबतोला परिसरात राहणाऱ्या एका कामगार स्त्रीने सांगितले की विवाहित स्त्रियांकडून घरकाम बरोबरच उत्तम बिडी वळता येणे अपेक्षित आहे. “बहुतांश पुरुष तर दारूच्या आहारी गेले आहेत, आणि ते चोरीमारी करून दिवस ढकलतात, नाहीतर दुसऱ्या राज्यात कामगार म्हणून रोजगार मिळवण्यासाठी स्थलांतर करतात.”, असे तिने व्हिलेजस्क्वेअर.इन शी बोलताना सांगितले.
यातील बहुतांश स्त्रिया मुस्लिम असून त्यांना उंबरा ओलांडण्याची मुभा नाही. बिडी वळण्याच्या कामाच्या निमित्ताने त्या चरितार्थ चालवतात आणि घराबाहेरही पडतात. दर १००० बिडीमागे १५०रुपये मिळतात. १५०रुपये मिळवायचे असतील तर या स्त्रियांना आपले हात भरभर चालवले लागतात. हातांमध्ये प्रचंड  कौशल्य असल्याशिवाय इतक्या बिड्या वळणे जवळजवळ अशक्यप्राय आहे.
स्वास्थ्यावरील परिणाम
रक्ताचे पाणी करून मिळवलेला हा पैसा अनेक गंभीर आजारांना बरोबर घेऊन येतोय. सतत तंबाखू हाताळल्याने श्वासोच्छ्वासासंबंधी आजार होण्याचा धोका वाढतो आहे. तासनतास बैठे आणि एकसलग काम केल्याने पाठदुखी सुरू होते आणि डोळ्यांवर ताण येतो.

बाल बिडी कामगारांचे प्रचंड आहे. जितक्या लवकर कमवायला सुरुवात कितके लग्नासाठी सुयोग्य स्थळ हे गणित पक्के आहे. सौजन्य: गुरविंदर सिंघ, व्हिलेज स्क्वेअर

बाल बिडी कामगारांचे प्रचंड आहे. जितक्या लवकर कमवायला सुरुवात कितके लग्नासाठी सुयोग्य स्थळ हे गणित पक्के आहे. सौजन्य: गुरविंदर सिंघ, व्हिलेज स्क्वेअर

जिल्ह्यामध्ये स्वास्थ्य सुविधांची वानवा आहे. मुर्शिदाबाद येथील धुलिआन येथे बिडी कामगारांसाठी एकच दवाखाना आहे, परंतु तो या लोकांच्या वस्तीपासून लांब आहे. दवाखान्यापर्यंत जायचे तर वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो, शिवाय रोजंदारीचे नुकसान होत असल्याने ते परवडत नाही, असे अनेक कामगारांनी सांगितले.
दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय, ६० खाटांचे दवाखाने वैद्यकीय साधने आणि कर्मचारी वर्ग नसल्याने बंद पडले आहेत. व्हिलेजस्क्वेअर.इन शी बोलताना त्या दवाखान्यातील कर्मचारी, मनोज विस्वास यांनी सांगितले, “आमच्याकडे दर महिन्याला क्षयरोगाचे साधारणपणे ६ रुग्ण तरी येतात, परंतु आमच्याकडे पुरेशा सुविधा नसल्याने आम्ही त्यांना अन्य दवाखान्यांमध्ये जायचा सल्ला देतो”. या दवाखान्यामध्ये २००० साली शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केल्यापासून एकही शल्यविशारद नाही आणि २०१५ सालापासून लॅब सुरु झाली असूनही लॅबमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी  नाही.
चरितार्थाचा पर्यायी मार्ग
बिडी कामगारांची ही दुरवस्था पाहून, सलमा खातून या महेसपूर येथील गृहिणीने बिडी स्त्री कामगारांना जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुर्शिदाबाद महिला उद्योग’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. व्हिलेजस्क्वेअर.इन शी बोलताना त्यांनी सांगितले, “माझ्या लक्षात आले की या स्त्रियांना चरितार्थ चालवण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिल्याखेरीज त्यांना या व्यवसायापासून परावृत्त करणे शक्य होणार नाही.”

या स्त्रियांना मशीनवरील शिलाई आणि संगणक यांची ओळख आणि त्यातील प्रशिक्षण देऊन कमाईचे नवीन पर्याय खुले करून देण्याचे काम सलमा करत आहेत. “आम्ही गेल्या वर्षभरात १२० स्त्रियांना प्रशिक्षण दिले आहे”, अशी माहिती सलमा यांनी दिली. या खडतर कामातून सुटका होण्यासाठी आणि चरितार्थाच्या अन्य पर्यायांकडे वळण्यासाठी, या वैयक्तिक प्रयत्नांना शासनाच्या ठोस कृतीची जोड मिळायला हवी, असे येथील बिडी कामगारांचे मत आहे.

(छायाचित्र ओळी – कोवळ्या वयात मुलींना बिडी वळण्याच्या कामाला लावण्याबाबत मुर्शिदाबादच्या गावकऱ्यांना अडचण वाटत नाही, कारण त्या कुटुंबाच्या कमाईत भर घालतात. सौजन्य: गुरविंदर सिंघ, व्हिलेज स्क्वेअर)

गुरविंदर सिंग हे कोलकत्ता येथील पत्रकार आहेत, त्यांनी मांडलेली मते व्यक्तिगत आहेत.

प्रस्तुत लेख व्हिलेज स्क्वेअर या मासिकातून येथे पुन:प्रकाशित केला आहे.

मूळ लेखासाठी पहा, https://thewire.in/labour/beedi-rolling-is-robbing-rural-bengals-girls-of-their-childhood

अनुवाद- श्वेता देशमुख  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0