भाजपने प. बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे व ते आता तृणमूलची ताकद कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. तर तृणमूलला भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा कसा रोखता येईल या प्रश्नाने ग्रासले आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुका संपूनही प. बंगालमधील राजकीय परिस्थिती तणावपूर्णच आहे. ममता बॅनर्जी यांचा प्रबळ गड मानल्या जाणाऱ्या प. बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने वेगाने मुसंडी मारून ४२ जागांपैकी १८ जागा मिळवल्या होत्या आणि ममतांना तगडे आव्हान दिले. हे आव्हान आता ममतांची राजकीय परीक्षा पाहणारे आहे.
लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या अशा अनपेक्षित विजयाने राज्यात तृणमूल समर्थक व भाजप समर्थकांमध्ये चकमकी घडल्याची वृत्ते येत आहेत. एक अंदाज असाही वर्तवला जात आहे की, प. बंगालमधील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याच्या कारणावरून तेथे राष्ट्रपती राजवट आणली जाऊ शकते. खुद्ध प. बंगालचे राज्यपाल व भाजपचे माजी नेते केसरी नाथ त्रिपाठी यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळल्यास तेथे कलम ३५६ लावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विधान केले होते. या विधानाने गदारोळ उडाला होता. त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती राजवट आणण्याचे केंद्राचे प्रयत्न एका लोकनियुक्त सरकारला पाडण्याचा हिंदुत्ववादी शक्तींचा कट आहे आणि तसे झाल्यास घटनेची पायमल्ली केल्यासारखे होईल, असे प्रत्युत्तर दिले आहे.
एकूणात भाजपचा असा आक्रमक पवित्रा पाहता ममतांचे प. बंगालमधील राजकीय स्थान डळमळीत होत आहे असा घ्यायचा? की अन्य भाजपशासित राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असतानाही केवळ प. बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असे दाखवण्याचा वृत्तवाहिन्यांचा प्रयत्न हा कट मानायचा?
संदेशखाली भागातील हिंसाचार
२४ परगाणा जिल्ह्यातील बशीरहाट मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवार नुसरत जहाँ यांनी भाजपचे उमेदवार सयातन बासू यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला होता. या पराभवानंतर या मतदारसंघ भाजप व तृणमूल समर्थकांमध्ये चकमकी घडू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात संदेशखाली व कांकिनारा येथे दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये चकमकी घडल्या होत्या. भाजपने या चकमकीत आपले पाच कार्यकर्ते ठार झाले असून अनेक कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा आरोप केला आहे. तर तृणमूलने आपले आठ कार्यकर्ते ठार व अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी या भागात हिंसाचार झाल्यानंतर भाजपने बंद पुकारला होता आणि संपूर्ण राज्यात पक्षाने रास्तारोको व निदर्शने केली होती. आपल्या मृत कार्यकर्त्यांची प्रेतयात्राही काढण्याचा भाजप समर्थकांचा प्रयत्न होता पण पोलिसांना त्याला अटकाव केला. भाजपचे सर्व बडे नेते आता बशीरहाट मतदारसंघात जमा झाले आहेत. मुकुल रॉय व बाबूल सुप्रियो या भाजपच्या नेत्यांनी या हिंसाचाराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे.
केंद्र-राज्यात तणाव
संदेशखाली भागात भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात राज्यातील परिस्थिती चिंताजनक असून सरकारने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. यावर राज्य सरकारने राज्यातील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून सर्व यंत्रणा अलर्ट असल्याचे उत्तर गृहमंत्रालयाला पाठवले आहे.
दरम्यान, राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आहे. त्यात राज्यपालांनी राज्यातल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारी एक मुलाखत दिल्याने परिस्थिती चिघळली आहे.
राज्यपालांच्या अशा वादग्रस्त टिपण्णीने संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांनी, भाजप अफवांचे राजकारण करत असून आपले सरकार पाडण्याचे केंद्राचे प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. केंद्र आपला आवाज दाबण्याचाही प्रयत्न करत आहे असे त्या म्हणाल्या. केंद्र सरकार गुजरातसारखे मॉडेल प. बंगालमध्ये लागू करत आहे, असाही त्यांचा आरोप आहे. भाजपचे प. बंगालमधील प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणतात, “आम्हाला राज्यात राष्ट्रपती राजवट नको आहे, पण भाजपने लोकसभा निवडणुकांत जो विजय मिळवला आहे तो त्यांना लोकशाही मार्गाने साजरा करण्याचा मागणी राज्य सरकारने मान्य करावी.”
या परिस्थितीवरून चित्र स्पष्ट दिसतेय की, भाजपने प. बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे व ते आता तृणमूलची ताकद कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. तर तृणमूलला भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा कसा रोखता येईल या प्रश्नाने ग्रासले आहे.
तृणमूलचे समर्थक गर्ग चटर्जी म्हणतात, ‘प. बंगालमधल्या राजकीय परिस्थितीचे चुकीचे चित्रण वृत्तवाहिन्या देशभर पसरवत आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण ६० हजार मतदार केंद्रापैकी केवळ ८ मतदान केंद्रावर पुनर्मतमोजणीचा निर्णय घेतला होता. आता जर परिस्थिती खरोखरीच वाईट असती तर निवडणूक आयोगाने तसा अहवाल तयार केला असता. पण तसे झालेले नाही. भाजप आपली मसल पॉवर व गुंडगिरी दाखवत असून ते तृणमूलच्या कार्यकर्त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करताना दिसतात, असे गर्ग म्हणतात.
पण भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि ते परिस्थितीचा राजकीय फायदा उठवण्याची संधी शोधत आहेत. परवा ११ जून रोजी कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. पण त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचाराबद्दल नाराजी व्यक्त करत एका डॉक्टरला मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी बेमुदत उपोषणावर जाण्याचा निर्णय घेतला. ही घटना घडल्यानंतर रुग्ण मुस्लिम व डॉक्टर हिंदू होता हे पाहून भाजप डॉक्टराच्या समर्थनार्थ धावला आहे. भाजपने एनआरएस मेडिकल कॉलेजमधील संपाला हिंदू-मुस्लिम असा रंग देण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियात उजव्या विचारसरणीच्या अनेक गटांनी तृणमूल काँग्रेस पक्ष मुस्लिमांचे संरक्षण करतो, त्यांचा अनुनय करतो असा प्रचार चालवला आहे.
हिंदूत्व विरुद्ध बंगाली अस्मिता
प. बंगालमधील भाजपला तेथे राष्ट्रपती राजवट नको आहे. कारण तशी ती लागू केल्यास त्याचा फायदा तृणमूलला होईल अशी त्यांना भीती वाटते. तर ममता बॅनर्जी यांनीही हिंदुत्वाचे राजकारण राज्यात येतेय हे पाहून बंगाली अस्मितेला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दीड महिन्यांपूर्वी भाजपच्या समर्थकांकडून बंगालमधील समाजसुधारक व प्रबोधनकार ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली होती. हा पुतळा ११ जून रोजी ममतांनी नव्याने बसवला. ममतांचे हे प्रयत्न बंगाली अस्मितांना जवळ करण्याचे प्रयत्न म्हणून पाहता येईल.
भाजपने प. बंगालमधील हिंदू उच्चवर्णीय वर्गाला आपल्याकडे ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचारयंत्रणा उभी केली आहे. या वर्गाच्या माध्यमातून ते गरीब वर्गालाही आपलेसे करण्याच्या प्रयत्नात आहेत. तृणमूल काँग्रेसची दादागिरी, भ्रष्टाचार, ममतांची अधिकारशाही व अल्पसंख्याकाचा अनुयय या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे.
प. बंगालमधील विधानसभा निवडणुकांना अजून दोन वर्षे अवकाश आहे पण या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातले वातावरण तापत जात आहे. या सर्व घटनांत मुस्लिमांचा आवाज दुर्दैवाने दाबताना दिसतोय.
COMMENTS