महुआ मोईत्रा : १० मिनिटांचे तडफदार भाषण

महुआ मोईत्रा : १० मिनिटांचे तडफदार भाषण

गेल्या काही वर्षांत संसदेत विरोधी पक्षाकडून तडफदार, आवेशयुक्त, सरकारवर बोचरी टीका करणारी व सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारी भाषणे ऐकायला मिळत नसताना तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ती कसर भरून काढली असे म्हणता येईल.

ग्रामीण बंगालमधील मुलींचे लहानपण, बिडी कुस्करते आहे
पक्षांतराचे वारे, नेत्यांचे वातकुक्कुट
अमर्त्य सेन विरुद्ध शांतिनिकेतन वाद चिघळला

२५ जूनला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार महुआ मोईत्रा यांचे फक्त १० मिनिटांचे भाषण देशात चर्चेचे ठरले आहे. अत्यंत तडफदार आवेश, मुद्देसूद मांडणी आणि देशाच्या लोकशाहीपुढे मोदी सरकारने उभी केलेली फॅसिझमची आव्हाने यांचा धावता आढावा त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडला.

गेल्या काही वर्षांत संसदेत विरोधी पक्षाकडून तडफदार, आवेशयुक्त, सरकारवर बोचरी टीका करणारी व सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारी भाषणे ऐकायला मिळत नसताना महुआ मोईत्रा यांनी ती कसर भरून काढली असे म्हणता येईल.

महुआ मोईत्रा यांचे भाषण इतके स्पष्ट व तडफदार होते की, केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी सदस्यही स्तब्ध झालेले दिसले.

आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच महुआ मोईत्रा यांनी जनतेने भाजपला दिलेला जनाधार मान्य केला. ‘संसदेत भाजपला बहुमत मिळाल्याने या सदनात सरकारवर अंकुश ठेवणारा प्रबळ विरोधी पक्ष नाही. अशावेळी सरकारने विरोधकांचे म्हणणे ऐकून घ्यायलाच हवे. कारण लोकशाहीत असंतोष हा महत्त्वाचा असतो. सरकार अच्छे दिन आणल्याचा दावा करतेय आणि या देशावर यापुढे आपलीच सत्ता राहील असा दावा करतेय. पण या सरकारने आपले डोळे उघडून पाहिल्यास त्यांना देशाची खरी परिस्थिती काय आहे, हे लक्षात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

मोईत्रा यांनी ईशान्येतील एनआरसी मुद्द्यावरून मोदी व भाजपवर सडकून टीका केली. एनआरसीचा मुद्दा हा फक्त मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी उकरून काढल्याचा थेट आरोप त्यांनी भाजपवर केला. गेल्या पाच वर्षांत भाजपने देशाला अंध:कारात लोटलं. या पक्षाचा राष्ट्रवाद नकली आहे. लहानपणी माझी आई मला भूताच्या गोष्टी सांगून मनवत असे. तसे भाजपने राष्ट्रीय सुरक्षा नावाचे भूत उभे केले आहे, हे भूत रोज सरकार उभे करते आणि त्याची भीती दाखवत छद्म राष्ट्रवाद पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा देश अडीच एकर रामजन्मभूमीसाठी चिंतित नाही.  २०१९च्या लोकसभा निवडणूका बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या नाहीत; भाजपने ही निवडणूक व्हॉट्सअप व फेक न्यूजवर लढवली, असे त्या म्हणाल्या.

फॅसिझमची सात लक्षणे

महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारच्या काळात फॅसिझम देशात कसा पसरत आहे हे सांगण्यासाठी अमेरिकेतील ‘होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम’मधील २०१७मध्ये लावलेल्या एका पोस्टरचा हवाला दिला. या पोस्टरमध्ये फॅसिझम येण्याअगोदर सात लक्षणे कोणती असतात ती दिली असून या लक्षणांचे साम्य सध्याच्या भारतीय राजकारणात कसे दिसत आहे हे महुआ मोईत्रा यांनी क्रमाक्रमाने स्पष्ट केले.

एक : या देशात व्यक्ती-व्यक्तींमध्ये, फूट पाडून राष्ट्रवाद पसरवला जात आहे, या देशात राहणाऱ्यालाच आपण या देशाचे नागरिक आहोत याचे पुरावे द्यावे लागत आहेत. वास्तविक या सरकारमधील मंत्रीच आपण कुठून शिकलोय याचे प्रमाणपत्र दाखवत नसतील तर सामान्य माणूस आपल्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र कुठून आणेल, असा सवाल त्यांनी केला.

दोन : प्रत्येक स्तरावर मानवाधिकाराचे पतन होईल अशी सरकारची भूमिका आहे. दिवसाढवळ्या झुंडशाही निष्पापांचा बळी घेताना दिसतेय.

तीन : सरकार माध्यमांवर अंकुश आणत आहे. देशातील पाच बड्या मीडिया कंपन्यांवर सरकारचे अप्रत्यक्ष व एकाच व्यक्तीकडून नियंत्रण ठेवले जात आहे. हाच मीडिया फेक न्यूज देऊन जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहे. केंद्रीय माहिती व दूरसंपर्क खात्याने १२० असे कर्मचारी नेमले आहेत की ज्यांचे काम सरकारविरोधी बातम्या कोण देतेय त्यावर लक्ष ठेवणे, इतके आहे.

चार : राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली देशात शत्रू शोधले जात आहेत. वास्तविक काश्मीरमध्ये २०१४ ते २०१९ या काळात जवान शहीद होण्याचे प्रमाण १०६ टक्क्याने वाढले आहे आणि जवानांचे शौर्याचे श्रेय एकच माणूस स्वत: लाटून घेत आहे.

पाच : सरकार आणि धर्म एकमेकांची मदत करत आहेत. एनआरसी विधेयकाच्या माध्यमातून या देशांत फक्त एकाच धर्माच्या नागरिकांना राहण्याचा हक्क आहे असे सांगितले जात आहे.

सहा : देशातील बुद्धिजीवी, विचारवंत, कलाक्षेत्रातील कलावंत यांची उपेक्षा केली जात आहे, त्यांचा आवाज दाबला जात आहे. घटनेने विज्ञानवादी दृष्टिकोन वाढवण्यास सांगितले आहे पण सरकार शालेय पाठ्यपुस्तकातून मुलांना मध्ययुगीन काळात ढकलले जात आहे.

सात : निवडणूक प्रक्रियांवर गंडांतर आणून त्यांची स्वायत्तता कमी केली जात आहे.

राजकारणात येण्याअगोदर बँकर

महुआ मोईत्रा राजकारणात येण्याअगोदर जेपी मॉर्गन या बहुराष्ट्रीय कंपनीत बँकर म्हणून कार्यरत होत्या. पण राजकारणात यायच्या उद्देशाने त्यांनी २००८मध्ये आपली नोकरी सोडली आणि त्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘आम आदमी सिपाही’ प्रकल्पात सामील झाल्या. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर पडली आणि तृणमूलने त्यांना २०१६मध्ये प. बंगालमधील करीमपूर येथे विधानसभेचे तिकीट दिले. त्या निवडून आल्या. पक्षाने त्यांना महासचिव व प्रवक्ता अशी दुहेरी जबाबदारी दिली.

आपल्या बँकिंगच्या अनुभवातून महुआ मोईत्रा यांनी करीमपूरसाठी १५० कोटी रु.ची गुंतवणूक आणली. त्यांच्यातील हा आत्मविश्वास पाहून ममता बॅनर्जी यांनी महुआ यांना कृष्णानगर लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महुआ मोईत्रा यांनी भाजपचे उमेदवार कल्याण चौबे यांचा ६३ हजार मतांनी पराभव केला.

भाषणाची लिंक

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1