नवी दिल्ली : भारतीय संसदेने ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील सामाजिक व आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली असून आज होणाऱ्या गटविकास परिषदेच्या
नवी दिल्ली : भारतीय संसदेने ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील सामाजिक व आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली असून आज होणाऱ्या गटविकास परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी २६० मान्यवरांनी राष्ट्रपती राम नाथ कोविद यांना एक पत्र लिहिले आहे.
या निवडणुकांवर भाजप सोडून अन्य राजकीय पक्षांनी अगोदरच बहिष्कार घातला आहे. तरीही केंद्राकडून या निवडणुका घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तेथे होणाऱ्या निवडणुकांना काहीच अर्थ नाही अशी भूमिका अनेक मान्यवरांची आहे.
राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रांवर अकील बिलग्रामी, अपूर्वानंद, अरुणा रॉय, आयेशा किडवाई, हर्ष मंदर, जयती घोष, ज्याँ ड्रेज, कपिल काक, मेधा पाटकर, नंदिनी सुंदर, निखिल डे, पी. साईनाथ, प्रशांत भूषण, शबनम हाश्मी, शांता सिन्हा, सयेदा हमीद व स्वामी अग्निवेश अशा मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या मान्यवरांच्या मते, काश्मीरमधील परिस्थिती निवडणुका घेण्या योग्य नसून राज्यातील दूरसंपर्क सेवा अजूनही बंद वा विस्कळीत आहे. सामान्य काश्मीरी नागरिकाचे मूलभूत हक्क सरकारने हिरावून घेतले आहेत. तेथे संचारबंदी लागू असल्याने जनजीवनही थांबलेले आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घेणे लोकशाहीच्या संकल्पनेत बसत नाही. निवडणुका घ्यायच्या असतील तर तेथील वातावरण खुले असले पाहिजे. भय, दहशत असता कामा नये. जनतेला निर्भयपणे आपला उमेदवार निवडता यायला हवा. काश्मीर खोऱ्यातील सर्वच पक्षांचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत, तुरुंगात ठेवले असताना निवडणुका कशाच्या जोरावर घेता येतात हा प्रश्न आहे, असे मुद्दे या मान्यवरांनी आपल्या पत्रात उपस्थित केलेले आहेत.
मूळ बातमी
COMMENTS