कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी येथे झालेल्या रॅलीत देश के गद्दारों को…गोली मारों सालों को..अशा घोषणा देणाऱ्या भाजपच्या तीन कार्
कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी येथे झालेल्या रॅलीत देश के गद्दारों को…गोली मारों सालों को..अशा घोषणा देणाऱ्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चिथावणीखोर घोषणा देणे हा गुन्हा असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
रविवारी अमित शहा यांची रॅली शहीद मिनार मैदानावर आयोजित करण्यात आली होती व भाजपचे कार्यकर्ते एस्प्लेनेड मार्गावरून मैदान बाजारकडे जात असताना या चिथावणीखोर घोषणा दिल्या जात होत्या. एका व्यक्तीने अशा घोषणा दिल्या जात असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवल्यानंतर भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या घोषणांसंदर्भातील एक व्हीडिओ माकप नेते एमडी सलीम यांनी ट्विटरवर टाकला होता. या व्हिडिओवर भाष्य करताना सलीम यांनी गोडसे समर्थक गोळीने प्रभावित होत असतील पण बंगाल ही विवेकानंद, काजी नजरूल इस्लाम व टागोरांची भूमी आहे, असा मजकूर लिहिला होता.
दरम्यान, अमित शहा यांच्या रॅलीत रविवारी झालेल्या आरोपांना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोलकात्याच्या रस्त्यावर गोली मारोच्या घोषणांचा मी निषेध करत असून कोलकाता ही दिल्ली नव्हे व असले प्रकार बंगालमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांना दिला. कायदा आपले काम करेल असेही त्या म्हणाल्या.
वाचकांच्या माहितीसाठी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोलकाता येथील जाहीर सभेत वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर ‘गोली मारो..’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणांमुळेच दिल्लीमध्ये वातावरण तंग होऊन नंतर दंगल पेटली होती. अमित शहा यांनी सीएएच्या समर्थनात आपली भूमिका मांडताना प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराला राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले होते. या दरम्यान सभेत उपस्थित असणाऱ्या भगवे रंगाचे कपडे व भाजपचे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांकडून गोली मारो.. सालो को..च्या घोषणा देण्यात आल्या. काही समर्थक ‘उन सभी को गोली मार दो जो देश को धोखा दे रहे हैं’, असे म्हणताना दिसत होते.
मूळ बातमी
COMMENTS