तत्त्वचिंतनाचे शत्रू

तत्त्वचिंतनाचे शत्रू

(उत्तरार्ध – भाग १) बर्ट्रंड रसेल दर्शन भाग १६ “तत्त्वचिंतनाचे शत्रू” या लेखाच्या ‘पूर्वार्ध’ भागात आपण ग्रीक-पाश्चात्य परंपरेतील ‘Misology’ आणि ‘Misosophy’ या संकल्पनांच्या व्युत्पत्तिचा शोध घेतला. या प्रस्तुतच्या ‘उत्तरार्ध-भाग १’ मध्ये त्या संकल्पनांचे स्वरूप जाणून घेऊ. त्यानंतर ‘उत्तरार्ध-भाग २’ मध्ये भारतीय तत्त्वज्ञानातील ‘दर्शन’ या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची ‘अदर्शन’ ही संकल्पना आणि चिनी तत्त्वज्ञानात स्पष्ट केलेली ‘मूर्खपणा’ ची लक्षणे थोडक्यात पाहू.

उपयोजित तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व
तत्त्वचिंतनाचे शत्रू
तत्त्वचिंतन : उपयोग (Use) की उपयोजन (Application)

प्लेटोची Misology संकल्पना

माणूस शिक्षण घेवून शहाणा, विद्वान होण्याचा प्रयत्न करतो, पण हेतूपूर्वक कोणीतरी अडाणी, मूर्ख राहील काय? याचे उत्तर “नाही” असेच असते. समाजात शहाणे लोक असतात तसे मूर्ख लोकही असतात; किंबहुना जगात मूर्खांची संख्या अधिक असते, असेही आढळते. “एकाला शोधावे तर लाखो सामोरे येतात” अशी स्थिती असते. ‘शहाणपणा’ आणि ‘शिक्षण’ यांचाही काही संबंध नाही, असेही आपल्या लक्षात येते. तत्कालिन शिक्षणव्यवस्थेनुसार प्लेटो  (इ. स. पूर्व ४२९ ते इ. स. पूर्व ३४७ ) अत्युच्च शिक्षित होता तर ज्याला  त्याने त्याच्या तत्त्वज्ञानातून अमर केले तो सॉक्रेटीस (इ. स. पूर्व ४७० ते इ. स. पूर्व ३९९) अशिक्षित होता. पण हा “अशिक्षित सॉक्रेटीसचं जगातील सर्वात शहाणा माणूस आहे” हे आजही सत्य आहे, यात शंका नाही. ‘शहाणपणा’ शी कोणत्याही ‘शिक्षण’ प्रक्रियेचा संबंधच नसल्याने प्राचीन ग्रीकांनी अतिशय सावधगिरीने “शहाणपणाचे प्रेम म्हणजे तत्त्वज्ञान’ अशी व्याख्या केली; त्यांनी “शिक्षणाचे प्रेम म्हणजे तत्त्वज्ञान’ अशी व्याख्या केलेली नाही, हे अधोरेखित झाले पाहिजे. कारण सुशिक्षित माणूसही अनेकदा मूर्खपणा करताना आढळतो. असे का होते, त्याचेच स्पष्टीकरण प्लेटो देतो.

प्लेटोचे ‘संवाद’ 

प्लेटोने त्याचे तत्त्वज्ञान ‘संवाद’ (dialogues) रुपात मांडले, हे पण जाणतोच. ग्रीक तत्त्ववेत्त्यांचा जीवनेतिहासकार डायोजीनस लार्शीअस (Diogenes Laërtius  इ. स. १८० ते २४० अंदाजे) याच्या मते प्लेटोने अंदाजे पस्तीस संवाद लिहिले असावेत. डायोजीनस त्याच्या  Lives and Opinions of Eminent Philosophers या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडात ही माहिती देतो. (Dialogues खेरीज प्लेटोने काही पत्रेही (The Epistles) लिहिली असावीत, असे नवे संशोधन आहे.)

हे सारे संवाद कोणत्या क्रमाने लिहिले असावेत, त्याचा एक अंदाज डायोजीनस देतो, त्यानुसार ‘फिडो’   हा संवाद प्लेटोच्या लेखनक्रमात सुरवातीला किंवा शेवटी न येत काही ‘संवादा’ नंतर ‘मध्ये’ कधीतरी येतो.

Misology ची चर्चा

या पस्तीसपैकी ‘फिडो’ (Phædo किंवा Phaedo ) या संवादात  Philosophy च्या विरुद्ध (the converse of Philosophy) कोणता शब्द किंवा संकल्पना आहे, त्याची चर्चा केलेली आहे. ही संकल्पना म्हणजे Misologist(Phaedo  89D). एक तत्त्वज्ञानात्मक संकल्पना म्हणून प्लेटोने त्याच्या फिडो’ या संवादात ‘Misology ची संकल्पना मांडली आहे. ‘फिडो’ प्रमाणे ‘रिपब्लिक’ (Republic 3-411 D) आणि ‘लॅचेस’ (Laches 188 C) या अन्य दोन संवादातही या संकल्पनेची चर्चा आढळते. “रिपब्लिक” हा त्याचा सर्वाधिक गाजलेला व चर्चिला गेलेला संवाद आहे. “रिपब्लिक” मध्ये दोन सर्वात महत्वाच्या प्रश्नांची चर्चा आहे. (१) न्याय म्हणजे काय? आणि (२) अन्यायी जीवनापेक्षा न्याय्य जीवन व्यक्तिला आणि समाजाला जास्त आनंदी असते का?  त्या अनुषंगाने चर्चा करताना तो चिंतनाच्या शत्रूचे वर्णन करतो.

तथापि ‘फिडो’ या संवादात Misologyची संकल्पना सविस्तर स्पष्ट केली आहे, म्हणून तोच संवाद या संदर्भात महत्वाचा मानला जातो. प्लेटोच्या मते, समाजात ‘ज्ञानाचे प्रेमी’  ‘ज्ञानाचे द्वेष्टे’ किंवा ‘ज्ञानशत्रू’  लोक असतातच असतात. ज्ञानमित्र म्हणजे ‘तत्त्ववेत्ते’. तत्त्वज्ञान प्रेमी दुर्मिळ असतात. पण ‘ज्ञानशत्रू’ मात्र उदंड असतात. अनेक प्रकारचे, अनेक स्तरावर, सर्व काळात सर्व मानव समाजात सर्वत्र असतात. ते संख्येने प्रचंड असतात. “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीची तीव्र आठवण सतत येत राहावी, इतके हे शत्रू पावलोपावली भेटत असतात. (अर्थात तुकोबांचे युद्ध आध्यात्मिकदृष्ट्या इच्छा, वासना इत्यादींच्या बाबतीत होते. मोह आणि मुक्ति यांच्यातील युद्धाचा निर्देश तुकोबा करतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात अनेक शहाण्या, ज्ञानप्रेमी माणसांना मुर्खांशी सतत युद्धाचं करावे लागते.)

हे ज्ञानशत्रू वंश-वर्ण-जात-लिंगभेदनिरपेक्ष असतात, म्हणजेच सर्व वंश-जातीजमातीत सर्वत्र असतात, स्त्री-पुरुष दोन्ही असतात. शिवाय आर्थिक, सामाजिक, राजकीय इत्यादी भेदाच्या अतीत असतात. म्हणजेच समाजाच्या सर्व स्तरात ते उपस्थित असतात. अनेकदा ते विद्वत्तेचा बुरखा पांघरून येतात. या ज्ञानशत्रूंना ‘जाणावे कसे’ याची जणू स्पष्ट निजखूण संत रामदासस्वामींच्या “मूर्खाची लक्षणे” मध्ये आढळतात.

तत्त्वज्ञानाच्या शत्रूस्त्रिया               

सॉक्रेटीस-प्लेटो कालखंडात प्राचीन भारताप्रमाणे स्त्रियांना कोणताही राजकीय व तात्त्विक दर्जा नव्हता. अथेन्समध्ये बापमुलगा आई-बहिणीला गुलाम मानत असत. त्यांना ते विकू शकत, इतरांच्या स्त्रिया विकत घेऊ शकत. पण ग्रीक-पाश्चात्य परंपरेत सॉक्रेटीस-प्लेटो स्त्रियांना काही प्रमाणात का होईना पण समता व स्वातंत्र्य देणारे पहिले सामाजिक व राजकीय विचारवंत होते. स्त्रियांना शिक्षणाचा, समाजकारण व राजकारणात हक्क आहे, असे प्रतिपादन करणारे होते. सॉक्रेटीस-प्लेटोच्या मते, ज्ञानाच्या बाबतीत स्त्रिया पुरुषाची बरोबरी करण्याची मानसिक व वैचारिक क्षमता बाळगतात, पण त्या भावनेच्या आहारी जातात. त्यामुळे स्त्रिया प्रथम दर्जाला जाऊ शकत नाहीत; स्त्रियांनी पुरुषाच्या अधिपत्याखाली राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

ज्ञानमित्र आणि ज्ञानशत्रू ही केवळ पुरुषांचीच विभागणी आहे, असे नाही तर स्त्रियांचेही ‘ज्ञानमित्र’ आणि ‘ज्ञानशत्रू’  असे प्रकार असतात, असे प्लेटो निदर्शनास आणून देतो. एके ठिकाणी प्लेटो स्त्री-पुरुषांची तुलना करताना व स्त्रियांचे समाजातील स्थान स्पष्ट करताना समाजात ‘तत्त्वज्ञानाच्या प्रेमिक स्त्रिया’ किंवा ‘ज्ञानप्रेमी तत्त्ववेत्त्या स्त्रिया’ असतात, तशा ‘ज्ञानद्वेष्ट्या तत्त्वज्ञानाच्या शत्रूस्त्रिया’ देखील असतात, असा उल्लेख करतो (Republic V 456a). सॉक्रेटीस आणि प्लेटो स्त्रियांना काही प्रमाणात आदर देताना आढळतात, काही बाबतीत त्यांना समान मानतात. पण अॅरिस्टॉटल मात्र स्त्रियांना अतिशय दुय्यम स्थान देतो. त्यांना तो ‘विचारशत्रू’ चं मानतो, असे आढळते. त्याच्या मते, स्त्री म्हणजे बिघडलेले अवनत रूप आहे.

प्लेटो- अॅरिस्टॉटल नंतर इमान्युएल कान्ट (१७२४ ते १८०४) आणि ऑर्थर शोपेनहॉवर (१७८८-१८६०) या दोन जर्मन तत्त्ववेत्त्यांनी स्त्रियांविषयीची मते मांडली. कान्ट स्त्रीपुरुष विषमतेचे निरीक्षण करताना तिची दुर्बल स्थाने व सामाजिक स्थान यांचे वर्णन करतो. तथापि शोपेनहॉवर मात्र स्त्रीला अतिशय हीन दर्जा देतो. ‘स्त्री केवळ प्रजो‍त्पादनासाठी पुरुषाला मोहात पाडते. मानवी दुःखाच्या मुळाशी असलेला एकमेव गुन्हेगार म्हणजे स्त्री’, असे त्याचे म्हणणे आहे. अर्थात हे सारे स्त्रीविषयीचे नकारात्मक चित्र औद्योगिक क्रांतीनंतर आणि स्त्रीवादाच्या उदयानंतर बदलले. स्त्रीला समान दर्जा मिळाला.

‘फिडो’सॉक्रेटीसचा शेवटचा उपदेश

‘फिडो’ (Phædo किंवा Phaedo ) हा संवाद अत्यंत हृद्य आहे. सॉक्रेटीसला ग्रीक राज्यकर्त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा दिलेली आहे आणि ती शिक्षा अमलात आणण्याच्या दिवशीचा हा संवाद आहे. हा संवाद घडताना प्लेटो तिथे-तुरुंगात हजर नव्हता. तो अथेन्सपासून जवळपास सत्तर किलोमीटर

सॉक्रेटीस हेमलॉक विषाचा प्याला पित असताना - कल्पना चित्र इंटरनेटवरून

सॉक्रेटीस हेमलॉक विषाचा प्याला पित असताना – कल्पना चित्र इंटरनेटवरून

दूरवर असलेल्या ‘मेगारा’ या शहरी जाण्याच्या तयारीत त्याच्या निवासस्थानी असावा, असे तज्ज्ञांचे अभ्यास आहेत.  पण प्लेटो त्यावेळी आजारी असावा, असे ‘फिडो’ संवादात म्हंटले आहे.

तत्त्ववेत्या सॉक्रेटीसला ग्रीक राज्यकर्त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा दिलेली आहे आणि ती शिक्षा अमलात आणण्याच्या दिवशी जो संवाद सॉक्रेटीस आणि त्याच्या मित्रांमध्ये झाला, तेच संवाद म्हणजे प्रस्तुत ‘फिडो’ हा संवाद आहे. त्यावेळी आत्मा अमर आहे, हे स्पष्ट करताना प्लेटो ‘मृत्युनंतरचे जीवन’ किंवा पुनर्जन्मावर सविस्तर चर्चा करतो. (Phaedo 84d2–107a1).

या संवादाची रचना :

  • स्थळ : अथेन्समधील तुरुंग. सॉक्रेटीसची कोठडी.
  • प्रसंग: सॉक्रेटीसच्या जीवनाच्या अंतिम दिन. सॉक्रेटीसला ‘हेमलॉक’ (hemlock) ह्या विषाचा पेला देण्यात येणार आहे. ते विष केवळ सॉक्रेटीससाठी तयार करण्यात आले आहे.
  • पात्रे: मुख्य पात्र सॉक्रेटीस. इतर पात्रे : फिडो (निवेदक), फ्लियस (Phlius) शहराचा एकेक्रेटस, आणि अपोलोडोरस, मेनेक्झेनस, हर्मोजेनीस, एपीजेनीस, एश्चीनस, अँटीस्थेनीस, स्टेसीप्पस,   क्रीटोचा मुलगा क्रीटोबुलस इत्यादी सॉक्रेटीसचे जीवलग मित्र. सिम्मियास (Simmias) आणि सेबेस (Cebes) हे सॉक्रेटीसचे नवे तरुण विद्यार्थी-मित्र केवळ त्याला भेटण्यासाठी अथेन्सबाहेरून दूरवरचा प्रवास करून आलेले आहेत. ते पायथागोरस पंथाचे अनुयायी आहेत. सॉक्रेटीसशी त्यांची होणारी ही भेट पहिली आणि शेवटचीच ठरणार आहे! क्रीटो सर्वात शेवटी आलेला आहे.
  • वातावरण: गंभीर व शांत.
  • घटना नाट्य : सॉक्रेटीस शांत बसला आहे. त्याची बायको झान्टिपी (Xanthippe) मुलाबाळांसह आक्रोश करते आहे. सॉक्रेटीस त्यांना बाहेर पाठवतो.
  • चर्चेचा विषय : “शहाण्या माणसाला मृत्यूचे भय वाटत नाही, पण तो आत्महत्या करत नाही. आपण सारेचजण ईश्वराची मालमत्ता आहोत. या मालमत्तेचा निकाल एकतर्फी लावता येत नसतो (म्हणजेच आत्महत्या करण्याचा निर्णय माणूस घेऊ शकत नाही.) ईश्वर मुक्तिचे वरदान देईपर्यंत आपल्याला प्रतिक्षा केलीच पाहिजे.” थोडक्यात, अस्सल तत्त्ववेत्त्याने मृत्यूकडे कसे पाहिले पाहिजे, मृत्यूचे स्वागत त्याने कसे केले पाहिजे, हा विषय आहे.
  • संवादाचे स्वरूप : सॉक्रेटीसच्या मृत्यू घडून गेलेला आहे आणि काही दिवसानंतर फिडो आणि एकेक्रेटस या दोघांमध्ये ही चर्चा होते आहे. फिडो एकेक्रेटसच्या निवासस्थानी फ्लियस या गावी गेलेला आहे आणि एकेक्रेटस “त्या दिवशी नेमके काय काय घडले? विषयांच्या अनुषंगाने या सर्वांमध्ये कोणती चर्चा घडली” याची माहिती फिडोचा मित्र एकेक्रेटस (Echecrates) फिडोला विचारतो, त्यावेळी   फीडो ती माहिती त्याला देतो. त्यावेळच्या वृत्तान्ताचे कथन म्हणजे प्लेटोने लिहिलेला हा संवाद होय.

फिडो सांगतो कीएखादा हंस जसा त्याच्या मृत्यूपूर्वी अतिशय सुरेल, मंजुळ गातो तसे मी माझी सेवा अपोलो देवतेला अर्पण करीत आहे”  असे नम्र कथन सॉक्रेटीसने केलेले असते !

आपल्या देहान्ताच्या दिवशी सॉक्रेटीस त्याच्या मित्रांशी ज्या विविध विषयांवर चर्चा करतो, त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा उपदेश करतो. तो उपदेश म्हणजेचतर्कदुष्ट लोकांपासून कसे सावध राहावे” याचे मार्गदर्शन आहे. या संवादात “तार्किक दुष्टपणा” (Misology) हाच माणसाचा “अनैतिक बौद्धिक दुष्टपणा” कसा बनतो, याची चर्चा आहे.  

तार्किक दुष्टपणा (Misology)

माणसाचा सर्वात धोकादायक शत्रू कोण, त्याच्यापासून का   कसे सावध राहावे , याचा उपदेश सॉक्रेटीस करतो.

यावेळी सॉक्रेटीस म्हणतो, मित्रहो, एक भीती आपल्याला टाळली पाहिजे, ती टाळली नाहीतर आपणतर्काचे शत्रू (misologists) होऊ. माणसाचे जितके वाईट होण्याची शक्यता आहे, त्यात तर्काचे शत्रू होण्याइतके सर्वाधिक वाईट काहीच नाही. कारण समाजात जसे माणसांचे तिरस्कर्तेशत्रू’ (misanthropist) असतात तसे वैचारिक कल्पनांचे किंवा विचारांचे शत्रू’ (misologists) देखील असतात. आणि या दोघांचा उगम एकाच कारणापासून होतो, ते कारण जगाविषयीचे अज्ञान हेच आहे ! “

सॉक्रेटीस पुढे स्पष्टीकरण देतो, तो म्हणतो,

जगाचा पुरेसा अनुभव नसताना निर्माण होणाऱ्या पोकळ गर्विष्ठपणातून माणसांचा तिरस्कार (misanthropy) उद्भवतो. एक माणूस अन्य दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवतो. त्याला तो  विश्वासू, नेहमीच खरा आणि सत्यवादी समजतो; पण काहीच काळात विश्वासू समजला जाणारा तो माणूस खोटारडा आणि फसवा, लफंगा, लबाड, विश्वासघातकी निघाला, असे त्याला आढळते. पुढे जाऊन दुसऱ्याच्या बाबतीत, तिसऱ्याबाबत, चौथ्याबाबत …. असेच घडते. एखाद्याच्या बाबत असे वारंवार घडत राहिले; विशेषतः ज्यांना माणूससर्वात जास्त विश्वासू आणि जीवलग मित्रसमजत असतो, ज्यांच्याशी त्याने संवाद साधलेला असतो; ते जीवलग मित्रही या तऱ्हेचे विश्वासघातकी आहेत, असे सिद्ध झाले की मग हा माणूस सर्वच लोकांचा तिरस्कार करू लागतो. अन मग, “कोणातहीकोणत्याही माणसात कोणताही चांगला गुण असू शकत नाही“, असा असेच तो समजू लागतो. तो समजच त्याचा जणूकाही पक्का विश्वास बनत जातो.”

हा माणूस मग माणसांचा शत्रू बनतो.

पण पुढे सॉक्रेटीस एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून देतो. तो म्हणतो की त्या माणसाने “कोणातही-कोणत्याही माणसात कोणताही चांगला गुण असू शकत नाही”  असे समजणे हे लज्जास्पद आहे. ह्याचे कारण उघड आहे. सॉक्रेटीस म्हणतो

इतर लोकांशी नेहमीच सहवासात येऊ पाहाणाऱ्या माणसाला मानवी स्वभावाचा अंदाजच आलेला नाही, हे उघड होत नाही का ? अनुभवाने त्याला अशी खरी वस्तुस्थिती शिकवली असती की ‘जगात काही माणसे चांगली असतात तर काही वाईट असतात’, आणि बहुसंख्य माणसे चांगल्यावाईटाच्या मध्येच हेलकावत असतात ..! तुम्ही जास्त लोकांच्या बाबतीत म्हणा कि अतिशय थोडक्या लोकांच्या बाबतीत म्हणा, त्यातील काहीचजण ‘अतिरेकी चांगले’  किंवा ‘अतिरेकी वाईट’ असतात हे खरे आहे, पण बहुतेक लोक ‘मध्ये’ असतात. आणि समजा, अगदी दुष्ट लोकांमध्ये ‘सर्वात जास्त कोण दुष्ट?” अशी स्पर्धा लावायची कल्पना केली तरी तिथेही आणि स्पर्धकातही अतिशय नगण्य लोकच दुष्ट असल्याचे आढळेल.”

अगदी ह्याच धर्तीवर वैचारिक युक्तिवाद माणसांपेक्षा वेगळे नसतात. ज्याला वाद कसा करावा याचे कौशल्य नाही, असा एखादा साधा सरळ माणूस एखाद्या युक्तिवादावर प्रथम ‘सत्य’ म्हणून विश्वास ठेवतो, मग तो युक्तिवाद वास्तवात ‘सत्य असो की असत्य’. कालांतराने तो विचार करतो की हा युक्तिवाद खोटाअसत्य आहे; असाच विचार तो दुसऱ्या युक्तिवादाबाबत करतो, मग तिसऱ्या युक्तिवादाबाबतही तसाच विचार करतो…. त्याचा युक्तिवाद करणे, विचार करणे, तर्क करणे या गोष्टीवरील विश्वासच हळूहळू नष्ट होतो. मग तो माणूस केवळ वाद घालणारा वितंडवादी बनतो. मग अशी वितंडवादी माणसे स्वतःला मानवजातीतील सर्वात शहाणी माणसे समजू लागतात….. ‘‘साऱ्या मानवजातीत आपणच खरी शहाणी माणसे म्हणून विकसित झालो आहोतअसे समजू लागतात. इतरांचे सारे बोलणे, विचार, युक्तिवाद त्यांना निव्वळ पोकळ, उथळ, चंचल आणि तुच्छ वाटू लागतात.”

पुढे सॉक्रेटीस म्हणतोअसे समजणे हे दुःखदायक, करुण आहे. कारण एखादी गोष्ट जी आधी सत्य नंतर असत्य ठरणार असेल ती गोष्ट माणसाने सत्य किंवा निश्चित समजून किंवा तिलाच ज्ञान समजून घेणे मग तिच्याविषयी स्वतःची मते बनवणे, हे शोकांतिक आहे. ती गोष्ट सत्य असो की नसो, माणसाने आपले स्वतःचे मत तपासून घेतलेले नसते आणि इतरांना, त्यांच्या युक्तिवादांना तो दोष देत राहातो, हि खरी शोकांतिका आहे”.

म्हणूनच सॉक्रेटीस पुढे म्हणतो, “पहिल्या प्रथम ‘इतरांच्या विचारात अथवा युक्तिवादात काहीच गांभीर्य नाही अथवा त्यांचे युक्तिवाद दोषी, रोगट आहेत’,  अशा कल्पनेला आपल्या आत्म्यात शिरकाव करून देताना खूपच काळजी घेतली पाहिजे. किंबहुना, आपणच आपल्यात अजूनही योग्य ते गांभीर्य मिळवू शकलेलो नाही आणि आपल्यात सर्व सामर्थ्यानिशी मनाचे आरोग्य प्राप्त करण्यासाठी झगडलो पाहिजे, शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत…! ”

असे सॉक्रेटीस लक्षात आणून देतो.

पहिलवान आणि तत्त्ववेत्ता

“रिपब्लिक”  या संवादात सॉक्रेटीसच्या मुखातून प्लेटो म्हणतो की, अशी माणसे केवळ स्वार्थी, आत्मकेंद्री असतात. पहिलवान, व्यायामपटू आणि तत्त्ववेत्ता यांच्यात तुलना केली तर व्यायामपटू केवळ शरीराकडेच लक्ष देतो, तो सतत खुराक खात खात आधी असतो त्याच्या दुप्पट दांडगा बनतो. पण साहित्य, संगीत, कला, चिंतन असे काहीही तो करत नाही. हिंसा आणि क्रूरता, भयानकता त्याच्यात भरलेली असते, तो रानटी बनतो. खाणे अन मस्ती दांडगाई करण्याशिबाय इतर काही त्याला सुचतच नाही. तो अज्ञानात आणि दुरितावास्थेतच जगतो. असा माणूस मग तत्त्वज्ञानाचा शत्रू बनतो.

प्लेटोच्या मते, मानवी स्वभावाची ‘आध्यात्मिक’ आणि ‘तात्त्विक’ अशी दोन तत्वे असतात. आध्यात्मिक तत्त्व वैश्विक चैतन्याशी संयोग पावलेले असते तर तात्त्विक तत्त्व माणसाच्या ‘मानस’ ला चिंतन करण्यास प्रवृत्त करत असते. चिंतनाचे विषय साहित्य-संगीत-कला इत्यादी असतात. त्यांची निर्मिती हा आत्म्याचा आविष्कार असतो. पण ही दोन्ही तत्त्वे विचारशत्रूला माहितच नसतात. तो केवळ जंगली जनावराचे जीवन जगण्यात धन्यता मानतो.

आत्मपरीक्षण करणारी माणसे हीच शत्रू

ही अशी एकांगी विचार करणारी, स्वतःचेच खरे समजणारी, आत्मपरीक्षण न करणारी, इतरांविषयी गैरसमज करून घेणारी आणि म्हणून त्यांचा तिरस्कार करणारी माणसे हीच ‘माणसांचे तिरस्कर्ते’ , ‘विचारांचे शत्रू’, ‘तर्काचे शत्रू’ आणि ‘तत्त्वज्ञानाचे शत्रू’ असतात, असे सॉक्रेटीस लक्षात आणून देतो. विचारप्रेमींनी, तत्त्वज्ञानप्रेमींनी, तत्त्ववेत्त्याने आणि तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्याने त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे..!

तर्कविरोध आणि मानवविरोध

या संवादातील सॉक्रेटीस ही सारी चर्चा मानवता विरोधाशी जोडतो. त्याच्या मते एखाद्याचा लोकांवरील वर्तनातील चांगुलपणावर विश्वास असेल तर तो सर्वच लोक मुळातून सचोटीने वागणारे आणि प्रमाणिक आहेत, असे समजतो. पण एखाद्याने जरी फसवले तरी तो सर्वांचा तिरस्कार करू लागतो. म्हणजे वर्तनातील चांगुलपणाचे जसे सार्विकीकरण होते तसे दुष्टपणाचेही सार्विकीकरण होते. अगदी असेच  तर्काच्या व  विचाराच्या बाबतीतही घडते. एखादा माणूस तर्कशास्त्रावर ‘योग्य युक्त व सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन’ म्हणून विश्वास ठेवतो पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेंव्हा तो माणूस  तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो. विशेषतः मित्र असे करतात, तेंव्हा सारेच भावविश्व उध्वस्त होते ! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा, तर्कशास्त्राचा आणि तत्त्वज्ञानाचा, तात्त्विक चिंतनाचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते. तेच त्याचे ‘ज्ञान’  बनते. मग असा माणूस त्या केवळ एखाद्या-दुसऱ्या दुरुपयोग करणाऱ्या माणसाचा शत्रू होता होता साऱ्या मानवजातीचाच शत्रू होतो ! कालांतराने त्याचे स्वतःचे विपरीत तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान तयार होते. तो ‘आपल्या त्या तर्कशास्त्रावर व तत्त्वज्ञानावर’ च श्रद्धा ठेवतो;  मग तेच तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान त्याच्या सोबतच्या इतरांना शिकवितो. हे तर्कशास्त्र बुद्धिच्या नव्हे तर भावनेच्या अंकित असते.

तर्कविरोध आणि मानवविरोध अशा रीतीने एकत्रच जन्माला येतात.

अतार्किकता हा आत्म्याचा रोग      

प्लेटोच्या मते, अंध मत, विश्वास यांनाच सत्य मानणे आणि तर्क खरा न मानणे (युक्तिवाद अथवा चर्चा करण्यात सत्य नसते, अशी श्रद्धा बाळगणे) हाच तर तर्काचा तिरस्कार आहे. अतार्किकता हा मानसिक आजार असून तो आत्म्याला होणारा रोग आहे. हा रोग अत्यंत निकडीचा, इमर्जन्सीने दुरुस्त केला पाहिजे. हा रोग झाला की लोकांना बोलण्यात, चर्चा करण्यात आत्मविश्वास वाटत नाही. काही काळाने त्यांना या रोगाची सवय होते मग ते अज्ञानाच्या गुहेतील अंधारे आयुष्य जगू लागतात. शरीर आणि त्याच्या इछाच खऱ्या समजून ते जणूकाही धूसर गोंधळल्या अवस्थेत जन्मभर राहतात. असा आत्मा रोगट बनतो. अशा रीतीने अतार्किकता हा आत्म्याचा रोग होतो. मग तो केवळ आत्मनाश करतो.

प्लेटोच्या या संकल्पनेतून दोन गोष्टी आढळतात, असे आज आपण म्हणू शकतो. माणूस बुद्धिमान प्राणी आहे, मान्य केले तरी समाजात सर्वच माणसे बुद्धिमान नसतात; बरीच माणसे साधी, भाबडी असतात. पण काही माणसे तरी बुद्धिमान असतात. प्लेटोच्या म्हणण्यांनुसार या बुद्धिमान माणसांवर नैतिक वागण्याची विशेष सामाजिक जबाबदारी असते. कारण असा बुद्धिमान, ज्ञानी माणूस जेंव्हा साध्या भाबड्या माणसाला फसवितो तेंव्हा त्या भाबड्या माणसाचा माणुसकीवरील विश्वास संपतोच पण त्या दुष्ट अनुभवातून त्या भाबड्या माणसाचे स्वतःचे स्व-तंत्र तर्कदुष्ट तर्कशास्त्र बनते. ते दुष्ट मानसिकता निर्माण करते. ते तर्कदुष्ट तर्कशास्त्र निर्घृण व निर्दय होण्याचा धोका संभवतो. असा माणूस मग सत्ताधीश झाला की साऱ्या मानवजातीलाच धोक्यात आणू शकतो. लोकशाहीत असे घडू शकते.

Misology चा अंतिम परिणाम म्हणजे अशा प्रकारचा आत्मनाश की त्यात जे काही नाश पावते ती माणसाची सक्रीय विवेकबुद्धी असते. ती बुद्धि ज्याचे आविष्करण करते त्या माणसाच्या आत्म्याच्या दिव्य पैलूचा तो नाश असतो.

Misology चा अंतिम अर्थ

      प्लेटोने केलेली समग्र चर्चा लक्षात घेता Misology चा अंतिम अर्थ पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल : “अतार्किक, बेताल, वितंडवादी बोलण्याने माणसाचा उच्च दर्जाचा आत्मनाश होतो. त्या आत्मनाशात जे काही नाश पावते ती एक शक्ती असते आणि ती शक्ती म्हणजे माणसाच्या माणूसपणाचे लक्षण व्यवच्छेदक लक्षण असणारी विवेकशक्ती-विचारशक्ती होय. ह्या विवेकबुद्धीचाच नाश होणे म्हणजे माणसाने तत्त्वज्ञानाचे शत्रू’  होणे होय.”

संक्षिप्तपणे प्लेटोच्या संकल्पना :  

  • Philosophy च्या विरुद्ध Misology
  • Philosopher च्या विरुद्ध Misologist / Misosopher
  • Misology = तर्काचा तिरस्कार/ द्वेष (the hatred of logic)
  • Misosophy = प्रज्ञानाचा तिरस्कार (the hatred of wisdom)
  • Misanthropy = माणसांचा तिरस्कार (anthrop = human being)  
  • Misanthropist = माणसांचा शत्रू  

थोडक्यात, प्लेटोने तर्काच्या शत्रूंना उद्देशून ‘misologist आणि तत्त्वचिंतनाच्या शत्रूंना उद्देशून ‘माणसांचे शत्रू ‘misanthropist’ असा शब्द वापरला. व्यापक अर्थाने Philosophy च्या विरुद्ध Misology आणि Philosopher च्या विरुद्ध Misologist या  संज्ञा वापरल्या गेल्या आहेत, असे म्हणता येते.

बुद्धिमान माणसांची विशेष नैतिक जबाबदारी

प्लेटोच्या या संकल्पनेतून दोन गोष्टी आढळतात, असे आज आपण म्हणू शकतो. पहिली गोष्ट अशी की “माणूस बुद्धिमान प्राणी आहे”. पण दुसरी गोष्ट अशी की समाजात सर्वच माणसे बुद्धिमान नसतात; काही माणसे बुद्धिमान असतात तर बरीच माणसे साधी, भाबडी असतात.

‘ज्ञानाचे प्रेमिक’ च्या विरुद्ध ‘अज्ञानाचे प्रेमिक’ असे कधी नसते, हे खरे. पण ज्यांना हुशार बुद्धिमान व्यक्ति म्हणून ओळखले जाते त्यांनी बुद्धीचा गैरउपयोग केला की ते ‘अज्ञानाचे प्रेमिक’ बनतात. सॉक्रेटिसच्या मते प्रज्ञानाला विरोध होतो तो केवळ बुद्धिमत्तेकडून. “तर्कबुद्धीला नीतीचा आधार नसेल तर बुद्धिमान तर्कज्ञ माणूस हाच समाजाला धोका असतो.” तर्कबुद्धी विघातक कामासाठी वापरली की ती आत्म्याचा नाश करतेच पण समस्त मानवजातीचाही नाश करते. बुद्धिमान लोकांच्या स्वार्थामुळे साध्या सरळ माणसाचा आधी बुद्धीवरील, मग तर्कावरील विश्वास उडतो आणि नंतर खुद्द बुद्धिमान माणसावरील विश्वास लयास जातो. मग “सारी माणसे अशीच स्वार्थी असतात”, हा साध्या सरळ सामान्य माणसाचा विश्वास हाच त्या भोळ्या माणसाचे जणू ‘पक्के ज्ञान’ बनते. पुढे जाऊन ती त्याच श्रद्धाच होते. मग हा भाबडा माणूस मग कशावरही विश्वास ठेऊ लागतो. तो हळूहळू मानवता विरोधी बनतो.

सामान्य माणसाची अशी शोकांतिका म्हणजे समाजाची शोकांतिका होते. समाजाची शोकांतिका घडू नये, यासाठी बुद्धिमान माणसाने किंवा ज्ञानी माणसाने बुद्धिमान असण्याबरोबर सद्गुणी असणेही अनिवार्य असते. बुद्धिमान पण दुर्गुणी माणसे, सॉक्रेटीसच्या मते खरी ज्ञानी नसतातच, ती केवळ ‘मिथ्या ज्ञानी’ असतात. तत्त्वचिंतनाचे, समाजाचे हेच शत्रू असतात.

प्लेटोच्या (म्हणजेच सॉक्रेटीससच्या) म्हणण्यांनुसार या बुद्धिमान माणसांवर नैतिक वागण्याची विशेष सामाजिक जबाबदारी असते. कारण असा बुद्धिमान, ज्ञानी माणूस जेंव्हा साध्या भाबड्या माणसाला फसवितो तेंव्हा त्या भाबड्या माणसाचा माणुसकीवरील विश्वास संपतोच पण त्या दुष्ट अनुभवातून त्या भाबड्या माणसाचे स्वतःचे ‘स्व-तंत्र’ तर्कशास्त्र बनते. ते तर्कदुष्ट असते, साहजिकच दुष्ट मानसिकता निर्माण करते. ते तर्कदुष्ट तर्कशास्त्र निर्घृण भयकारी हिंसक होण्याचा धोका संभवतो. असा माणूस मग सत्ताधीश झाला की साऱ्या मानवजातीलाच धोक्यात आणू शकतो.

लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि  व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0