तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान

तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान

बर्ट्रंड रसेल दर्शन भाग ११ विसाव्या शतकात युरोप-अमेरिकेत विज्ञान-तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली होती. त्याचाच एक अनिवार्य हिस्सा या स्वरुपात तत्त्वज्ञानाचे स्वरूप, कार्य, उपयोग, उपयुक्तता, उपयोजन, मर्यादा इत्यादींवर गंभीर चर्चा व चिकित्सा सुरु झाली. त्या समग्र चर्चेतून Meta-Philosophy चा उदय झाला. रसेलचे समग्र तत्त्वज्ञान या तात्त्विक चिकित्सा चळवळीचा, पर्यायाने Meta-Philosophy चा अनिवार्य हिस्सा बनले.

बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली
तत्त्वज्ञानाचा नकाशा
उपयोजित तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व

“…..चे तत्त्वज्ञान” या मागील लेखात ‘…चे’ (Philosophy ‘ Of ‘….) हे उपपद केवळ शब्दयोगी अव्यय नसून ती एक विशिष्ट स्वरुपाची ‘तार्किक संकल्पना’ आहे आणि तिच्या संधीतून अन्य कितीतरी तत्त्वज्ञाने किंवा तत्त्वज्ञानाच्या उपशाखा निर्माण होतात, हे आपण समजून घेतले आहे.

“…..चे तत्त्वज्ञान” या शब्दप्रयोगातून दोन अर्थ व्यक्त होतात. पहिला, ‘एखाद्या तत्त्ववेत्त्याने मांडलेले तत्त्वज्ञान. दुसरा, ‘एखाद्या वैचारिक परंपरेने मांडलेले तत्त्वज्ञान’. त्यातून व्यक्तींची तत्त्वज्ञाने आणि विविध परंपरांची तत्त्वज्ञाने यांचे आकलन सुलभ होऊ शकते.

तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान

‘…चे’ (Philosophy ‘ Of ‘….) च्या उपयोजनातून एखाद्या व्यक्तीचे आणि एखाद्या विषयाचे तत्त्वज्ञान मांडले जातेच, पण खुद्द ‘तत्त्वज्ञानाचेही तत्त्वज्ञान’ (Philosophy of Philosophy) निर्माण करण्याचे कामही तत्त्वज्ञानच करते.

‘तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान’ ही देखील तत्वज्ञानाची शाखा आहे, तिचे तत्त्वज्ञानात्मक तांत्रिक नाव Meta-Philosophy – ‘अधि-तत्त्वज्ञान’ असे आहे. त्याचेही दोन अर्थ होतात. पहिला अर्थ Philosophy about Philosophy आणि दुसरा Philosophy that goes beyond Philosophy. –’तत्त्वज्ञानापलिकडे जाणारे तत्त्वज्ञान’.

पहिला अर्थ लक्षात घेतला तर इतर विषयांचे तात्त्विक ज्ञान निश्चित करून देणारे तत्त्वज्ञान खुद्द ‘स्वतःकडे कसे पाहाते’, याचेच ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ म्हणजे ‘अधि-तत्त्वज्ञान’ असे म्हणता येते. एखाद्या तत्त्वज्ञानाच्या निर्मिती प्रक्रिया, तिची उद्दिष्टे, तिच्या निर्मितीच्या पद्धती – म्हणजे चिंतनाच्या पद्धती इत्यादींची चिकित्सा  करते.

थोडक्यात, “तत्त्वज्ञान म्हणजे काय? ते कसे करावे?” हा अधि-तत्त्वज्ञानाचा मध्यवर्ती प्रश्न आहे.

अधि-तत्त्वज्ञान: स्वरूप 

तत्त्वज्ञान मूलभूत तात्त्विक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. असा मूलभूत तात्त्विक मूळ प्रश्न खुद्द “तत्त्वज्ञान म्हणजे काय?” (What is Philosophy?) हाच आहे! तोच प्रश्न सोडवण्याचा तत्त्वज्ञान करते. त्याच अनुषंगाने ‘कशासाठी तत्त्वज्ञान?’ ‘तत्त्वज्ञान (निर्माण) कसे करावे?’, ‘तत्त्ववेत्ता म्हणजे नेमका कोण? इत्यादी प्रश्न निर्माण होतात, तेही तत्त्वज्ञानच सोडवते. हे तत्त्वज्ञानविषयक प्रश्न असल्याने त्यांना ‘अधि-तत्त्वज्ञानात्मक’ म्हंटले जाते. तत्त्वज्ञानाचे स्वरूप, पद्धती, विकास याविषयीचे हे प्रश्न आहेत. त्यांना उत्तर देण्यातूनच अनेक तत्त्वज्ञान परंपरा विकसित होत गेल्या आणि जात असतात.

मूळ तत्त्वज्ञान ‘अस्तित्वाबाबत, वस्तूंच्या वास्तवाबाबत, त्यांच्या ज्ञानाच्या शक्यतांबाबत, सत्याच्या स्वरूपाबाबत आणि इतरही प्रश्न विचारते.तथापि ‘हे प्रश्न नेमके कोणते प्रश्न असावेत, ते कसे विचारले गेले पाहिजेत, त्यांची उत्तरे कशी-कोणत्या रीतींनी प्राप्त करावीत, त्यांचे अंतिम हेतू काय व कोणते असावेत, ते साध्य कसे होतील, हेतू व साध्य यात फरक पडणार नाही, याची काळजी कशी घ्यावी, असे सारे प्रश्न विचारणे म्हणजे ‘अधि-तत्त्वज्ञान (निर्माण) करणे होय.

थोडक्यात, एखाद्या तत्त्वज्ञानाच्या निर्मिती प्रक्रिया, तिची उद्दिष्टे, तिच्या निर्मितीच्या पद्धती – म्हणजे चिंतनाच्या पद्धती इत्यादींची चिकित्सा  म्हणजे ‘अधि-तत्त्वज्ञान’. थोडक्यात, “तत्त्वज्ञान म्हणजे काय? ते कसे करावे?” हा अधि-तत्त्वज्ञानाचा मध्यवर्ती प्रश्न आहे.

आता, ह्या निर्मितीला तत्त्वज्ञानाची पूर्वतयारी समजावी की तिला तत्त्वज्ञानाचाच भाग समजावे की तिला ‘आपसूक तत्त्वज्ञान’ समजावे की त्या निर्मितीला या साऱ्यांचे एकत्रीकरण समजावे की अन्य काही याबाबत घनघोर चर्चा होत आल्या आहेत.

 रसेलचा भाषाभेद

Meta हा शब्द फारच जुना आहे, हे एव्हाना आपल्याला सुजाणपणे उमगले आहेच. जसे की MetaPhysics हे Philosophy चे प्राचीन ग्रीक नाव आहे. Meta हा शब्द त्यानंतर अनेक संदर्भात वापरला गेला.

विसाव्या शतकात भाषेच्या संदर्भात विश्लेषण करताना रसेलने Object Language आणि Meta language असा फरक केला. (या फरकाचे स्वरूप आपण नंतर सविस्तरपणे समजून घेऊच).  Object Language’चा मराठीत ‘वस्तुभाषा’ आणि Meta language चा ‘अधिभाषा’ असा अनुवाद केला जातो. वस्तुभाषा म्हणजे कोणतीही भाषा आणि अधिभाषा म्हणजे त्या वस्तुभाषेसंबंधी बोलणारी-विचार करणारी भाषा’ होय. भाषेची चिकित्सा म्हणजे अधिभाषा.

‘वस्तुभाषा’ आणि ‘अधिभाषा’ या सापेक्ष संकल्पना आहेत. उदाहरणार्थ कोणतीही नैसर्गिक भाषा घेतली तर ती वस्तुभाषा असते आणि तिचे व्याकरण ही अधिभाषा असते. नैसर्गिक भाषा कशी असावी, तिची रचना, नियम, रूढी, संकेत इत्यादींचा विचार त्या भाषेचे व्याकरण करते. थोडक्यात, मराठी हिंदी, तेलगु, कानडी, रशियन, इंग्लीश, जर्मन, चिनी इत्यादी कोणतीही नैसर्गिक भाषा म्हणजे वस्तुभाषा; तर त्यांचे व्याकरण हे त्यांची ‘अधि-भाषा’ असते.

थोडक्यात, नैसर्गिक भाषा = वस्तुभाषा आणि त्या भाषेसंबंधी बोलते-चर्चा करते ती होते अधि-भाषा. म्हणजेच मूळ भाषा = वस्तुभाषा आणि त्या भाषेची चिकित्साभाषा = अधिभाषा. अधिभाषा त्या नैसर्गिक भाषेच्या (नियम इत्यादींच्या) ‘पलिकडे’ (beyond) जाऊन भाषेसंबंधी (about) व्याकरण निश्चित करते. एकदा व्याकरण निश्चित झाले की नैसर्गिक भाषा व तिचे स्वरूपही निश्चित होते.

आपण शाळेत मराठी भाषा शिकतो तेव्हा ती मराठी भाषा ‘वस्तुभाषा’ असते आणि तिचे ‘व्याकरण’ असते ‘अधिभाषा’ असते. इथे आपण मराठीतूनच मराठी  शिकतो. पहिली, आपली शिकण्याची मराठी भाषा (मुळाक्षरे, वाक्ये, परिच्छेद-कथा, कविता, निबंध, निवेदन इत्यादी) ही ‘वस्तुभाषा’ बनते. आणि तिचे व्याकरणही आपण मराठीतूनच शिकतो तेव्हा ती व्याकरणाची मराठी भाषा  मात्र मूळ भाषेच्या पलिकडे, उच्च स्थानावर गेलेली, नियम रचणारी असते म्हणून ती ‘अधिभाषा’ बनते.

पण आपण जेव्हा मराठी भाषेतून इंग्लिश भाषा शिकतो, तेव्हा काय घडते? तर इंग्लिश ही शिकण्याची वस्तुभाषा  बनते आणि मराठी ही शिकवली जाणारी अधिभाषा  बनते. म्हणजे मराठीतून मराठीच शिकणे आणि मराठीतून इंग्लिश शिकणे, यात भाषेच्या पातळीत फरक करणे आवश्यक ठरते. असा फरक सर्वच भाषांच्या बाबतीत असतो.

एखाद्या भाषेतून गूढभाषा शिकणे किंवा संकेतभाषा शिकणे ही प्रक्रिया देखील अशीच वस्तुभाषा व अधिभाषा पातळीवरील भाषाशिक्षण असते.

थोडक्यात कोणतीही नैसर्गिक भाषा ही वस्तुभाषा (Object Language) असते तर त्या भाषेची भाषा ही अधिभाषा (Meta language) असते. ही भाषेची द्विस्तरीय रचना असते. एकच भाषा दोन्ही कामे करू शकते किंवा वस्तुभाषा वेगळी आणि अधिभाषा वेगळी असेही असू शकते.                  

Meta-Philosophy चा उदय

हीच Object आणि Meta ची परिभाषा खुद्द तत्त्वज्ञानाच्या आधुनिक तऱ्हेच्या चिकित्सेसाठी उपयोजनात आणली गेली. विसाव्या शतकात युरोप-अमेरिकेत विज्ञान-तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली होती. त्याचाच एक अनिवार्य हिस्सा या स्वरुपात तत्त्वज्ञानाचे स्वरूप, कार्य, उपयोग, मर्यादा इत्यादींवर गंभीर चर्चा झाली. तिचीच फलश्रुति या रुपात तत्त्वज्ञानाची अतिशय गंभीर चिकित्सा झाली. त्या समग्र चर्चेतून Meta-Philosophy चा उदय झाला. वस्तुभाषा (Object language) आणि अधिभाषा (Meta language) यातील फरक लक्षात घेऊनच विसाव्या शतकात भाषा-तत्त्वज्ञान क्षेत्रात Meta-Philosophy ही संकल्पना रूढ झाली. प्रथम ती भरड कच्ची, अस्पष्ट होती. नंतर तिला यथावकाश निश्चित स्वरूप दिले गेले. 

मॉरिस लाझेरोवित्झचे योगदान

हेन्री ला फेव्र

हेन्री ला फेव्र

Meta-Philosophy आणि Philosophy of Philosophy या दोन शब्दांना कधी भिन्न संज्ञा, कधी समांतर तर कधी एकच मानले गेले. प्रत्येकवेळी त्या प्रत्येकाचे अर्थही वेगवेगळे अर्थ लावले गेले.

Meta-Philosophy ही संकल्पना सर्वप्रथम मॉरिस लाझेरोवित्झ (Morris Lazerowitz जन्म: २२ ऑक्टोबर १९०७, मृत्यू: २५ फेब्रुवारी १९८७) या अमेरिकन तत्त्ववेत्त्याने बनवली. ‘Meta philosophical’ ही संज्ञा त्याने विटगेन्स्टाईन या जर्मन तत्त्ववेत्त्याने मांडलेल्या “तत्त्वज्ञानाचे वारस” (“heirs” of philosophy) या संकल्पनेच्या संदर्भात १९४० ला उपयोगात आणली. नंतर ती त्याने सी. जे. ड्युकास (C. J. Ducasse) या व्यावसायिक तत्त्ववेत्त्याच्या “Philosophy as a Science: Its Matter and Its Method” या पुस्तकाच्या परीक्षणात १९४२ ला वापरली. त्यामुळे जगप्रसिद्ध “Mind” या मासिकाचा संपादक जॉर्ज एडवर्ड मूरने त्यावर मॉरिसकडून लेख लिहवून घेतला. अशा रीतीने ही संकल्पना तत्त्वचिंतनाच्या विश्वात रूढ झाली.

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर तत्त्वज्ञानाच्या ‘चिकित्सेचे युग’ जणू सुरु झाले होते. तीच Meta-Philosophy चळवळ बनली. परिणामी १९७० ला Metaphilosophy हे नियतकालिक सुरु झाले, त्यावेळी नियतकालिकाच्या संपादकांनी मॉरिसला नियतकालिकाच्या शीर्षकाबाबत टिपण लिहिण्याची विनंती केली, त्या टिपणात तो ही माहिती देतो. “अनिर्णीत तात्त्विक दावे आणि त्याविषयीचे युक्तिवाद यांच्या (तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जाणवणाऱ्या) अभावाचे समाधानकारक स्पष्टीकरण देणे शक्य व्हावे, हा हेतू केंद्रीभूत ठेवून तत्त्वज्ञानाच्या स्वरुपाची काटेकोर चिकित्सा करणे म्हणजे अधि-तत्त्वज्ञान” अशी संकल्पना मॉरिसने मांडली. तत्त्वज्ञानाकडे नव्याने पाहाण्यास शिकले पाहिजे, तात्त्विक चिंतन आणि त्या चिंतनाचे व्यावहारिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन, तत्त्वज्ञानासंबंधी कोणतेही गैरसमज होणार नाहीत, असे नवे प्रश्न तत्त्वज्ञानाबाबतच उपस्थित केले पाहिजेत, असा मॉरिसचा आग्रह होता. या संबंधात जी चळवळ झाली तिच्यातून Metaphilosophy हे नियतकालिक जन्माला आले.

फ्रेंच मार्क्सवादी तत्त्ववेत्ता, समाजशास्त्रज्ञ आणि “रोजमर्रा जिंदगी’ चा टीकाकार (the critique of everyday life)  हेन्री ला फेव्र (Henri Lefebvre, जन्म: १६ जून १९०१, मृत्यू: २९ जून १९९१) याने ही संज्ञा वरील सर्व अर्थांपेक्षा वेगळ्या अर्थाने वापरात आणली. तत्त्वज्ञानाचा ‘दुःखद अंत’ झाल्या‘नंतर’ (after the demise of philosophy) जी काही सैद्धांतिक आणि व्यावहारिक कृती करण्यास अवकाश उरेल त्याला तो “अधि-तत्त्वज्ञान” म्हणतो.

दोन परिप्रेक्ष्य 

अधि-तत्त्वज्ञानाचा विचार पाश्चात्य-युरोपीय तत्त्वविश्वात दोन मुख्य परिप्रेक्ष्यातून केला जातो. पहिला प्रकार विद्यापीठीय अभ्यासक्रम केंद्रित आहे तर दुसरा मुक्तचिंतन स्वरूपाचा आहे, जो अजून विद्यापीठीय चर्चाविश्वात स्थान मिळवू शकलेला नाही. याचे उघड कारण हे ‘मुक्तचिंतनवान अधि-तत्त्वज्ञान’ विद्यापीठीय आणि राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील हितसंबंधांना आणि प्रस्थापित व्यवस्थांनाच प्रश्न विचारते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने मुक्तच राहिलेले आहे. Philosophy that goes beyond Philosophy-‘तत्त्वज्ञानापलिकडे जाणारे तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘अधि-तत्त्वज्ञान’ चा हाच दुसरा अर्थ म्हणजे ‘मुक्तचिंतनवान अधि-तत्त्वज्ञान’ होय.

अभ्यासक्रमकेंद्रित अधि-तत्त्वज्ञान

पाश्चात्य तत्त्वज्ञानात विद्यमान काळात अधि-तत्त्वज्ञानाचे तीन प्रवाह मानले गेले: (१) विश्लेषक (Analytic philosophy) (२) फलवादी तत्त्वज्ञान (Pragmatist philosophy) (३) आंग्लेतर युरोपीय तत्त्वज्ञान (Continental philosophy). हे तीन प्रवाह स्पष्ट करणे म्हणजे तत्त्वज्ञानाचा आधुनिक इतिहास अभ्यासणे. तो फारच तांत्रिक भाग आहे. या प्रवाहांवर आधारित जगातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये आणि इतर उच्चशिक्षण संस्था इत्यादीत तत्त्वज्ञानविषयक अभ्यासक्रम तयार केले जातात. हे बंदिस्त असतात, त्यांना पद्धतीशास्त्रीय चौकट असते.

मुक्तचिंतनवान अधि-तत्त्वज्ञान : आत्म-चिकित्सा 

दुसरा अर्थ म्हणजे ‘तत्त्वज्ञानापलिकडे जाणारे तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘अधि-तत्त्वज्ञान’ ही संकल्पना म्हणजे ‘मुक्तचिंतनवान अधि-तत्त्वज्ञान’ आधुनिक व उत्तराधुनिक कालखंडात जास्त मौलिक मानला जातो. हा अर्थ असे मत व्यक्त करतो की, ‘चिंतनक्षेत्रात असाही काहीएक विचार आहे की जे प्रचलित तत्त्वज्ञान नाही, पण त्या प्रचलित तत्त्वज्ञानाच्याही पुढे जाते, आणि खुद्द तत्त्वज्ञानासंबंधी काहीएक विचार मांडते. ते विचारही तात्त्विकच असतात, त्यामुळे ते ‘तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान’ ठरते. तो विचारही तत्त्वज्ञानाचाच भाग बनत असल्याने तेही तत्त्वज्ञानच असते.

असे हे उत्तराधुनिक अधि-तत्त्वज्ञान ‘आत्म-चिकित्सा’ करणारे असते आणि आत्मचिकित्सा हा तर चिंतनाचा केंद्रबिंदु आहे. ही चिकित्सा प्राचीन आहे, ती “स्वतःला जाणा” या वाचनातून व्यक्त होते, पण नेमकी तीच मधल्या काळात विसरली गेली. परिणामी तत्त्वज्ञान कुंठीत, अप्रवाहित बनले. ते अवरुद्ध बनले.

“स्वतःला जाणा”  (Know thyself ) हे वचन सॉक्रेटीसमुळे प्रसिद्ध झाले. तथापि ते मुळात सॉक्रेटीसपूर्व प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता ‘लॅसिडिमॉनचा चिलॉन्’  (Chilon of Sparta  इ. स. पूर्व अंदाजे ५८०) याचे आहे. ‘चिलॉन्’ हा प्राचीन ग्रीसमधील “शहाणे सप्तर्षी” नावाने ओळखल्या जाणाऱ्या सात ऋषींपैकी (The Seven Sages of Greece) हा एक होता. हे वचन ‘डेल्फीच्या मंदिरा’ वर कोरलेले होते. त्यानंतर ते वचन सॉक्रेटीसच्या नैतिक तत्वज्ञानाचे मूळ स्त्रोत बनले. या वचनाला पुन्हा जागले पाहिजे, असा नारा उत्तराधुनिक तत्त्ववेत्त्यांनी दिला. विशेषतः रसेलनंतर हा जागर अधिक तीव्र बनला.

तत्त्वज्ञान- रसेलनंतर 

रसेलनंतर तत्त्वज्ञानात नवीन काही घडलेच नाही, तसे समजणे ही अंधश्रद्धा मानली पाहिजे. तत्त्वज्ञान सतत प्रश्न विचारते, म्हणून ते जिवंत राहाते. पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानात ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?” हा प्रश्न सातत्याने विचारत ठेवणे, तो जिवंत ठेवणे ही परंपरा अनेकांनी जिवंत राखली. उदाहरणार्थ गिल्बर्ट राईल किंवा  सायमन ब्लॅकबर्न इत्यादींनी यथार्थपणे हे अन्वेषण केले आहे. तत्त्ववेत्त्यांच्या मांदियाळीत सर्वात जास्त चर्चिले गेलेले उत्तराधुनिक तत्त्ववेत्ते म्हणजे गिलेस देल्युज (Gilles Deleuze, जन्म: १८ जानेवारी १९२५, मृत्यू : ०४ नोव्हेंबर १९९५) फेलिक्स गुतारी (Pierre-Félix Guattari ( जन्म: ३० मार्च १९३० मृत्यू : २९ ऑगस्ट १९९२). त्यांचे मत थोडक्यात पाहाणे योग्य ठरेल.

जगातील तत्त्ववेत्त्यांनो, निर्माण करा

देल्युज आणि गुतारी या अत्याधुनिक उत्तराधुनिक फ्रेंच तत्त्ववेत्त्यांचा “What ls philosophy?” हा ग्रंथ १९९१ साली प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी एक घोषणा केली. “जगातील तत्त्ववेत्त्यांनो, निर्माण करा” (Philosophers of the world, create!).

ग्रंथाच्या शीर्षकापेक्षा त्या पुस्तकाच्या रूपाने गाजलेली घोषणाचं जास्त प्रसिद्ध झाली. तत्त्वज्ञान ही संकल्पना, विविध तत्त्ववेत्त्यांची आणि परंपरागत तत्त्वज्ञाने आणि तत्त्ववेत्ते यांच्याबद्दलचा तात्त्विक चिकित्सात्मक उहापोह ह्या ग्रंथात करण्यात आला आहे.

देल्युज आणि गुतारी टीका करतात की, तत्त्वज्ञानाचे स्वरूप सुस्पष्ट करणाऱ्या ग्रंथांची आजपर्यंत निर्माण झालेली यादी फार काही विशेष उल्लेखनीय संख्येची नाही. जी आहे ती ‘त्या त्या व्यक्तीचे किंवा तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप’ स्पष्ट करणारी पुस्तकांची यादी असते, त्यातून केवळ त्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजतो; किंवा ती ज्या परंपरेचा पुरस्कार करते त्या परंपरेचा पूर्वेतिहास आणि अपेक्षित विकासाची दिशा सूचित होते.

परिणामी ‘तत्त्वज्ञानाचे साधारण’ म्हणा किंवा ‘समग्र स्वरूप’ खरे तर आकलनाच्या कक्षेत येईल, असे असेलच असे नाही. “तत्त्वज्ञान म्हणजे काय?” हा प्रश्न अतिशय अस्वस्थ मनोदशेत सुचणारा, कोणीही आपले लक्ष विचलित करून मनस्वास्थ्य घालवण्याची शक्यता नसलेल्या वेळी अथवा अगदी प्रशांत मध्यरात्री मनाच्या तळातून उद्भवणारा असतो.

हा प्रश्न मानवी इतिहासात पूर्वी विचारला गेला आहे, आणि सतत विचारला गेला आहे, पण अनेकदा तो अप्रत्यक्षपणे किंवा कशाचा तरी-कोणत्या तरी प्रश्नाचा पर्यायी प्रश्न या स्वरुपात विचारला गेला आहे. हा प्रश्न खूपच कृत्रिम, अतिशय अमूर्त आहे. हा प्रश्न प्रश्नकर्त्याने कह्यात घेण्याऐवजी त्यांनी केवळ प्रश्नाचा आरंभ केला आणि वैचारिक प्रवास करता करता त्यावर नियंत्रण आणले. ते लोक तितके काही सौम्य स्वभावाचे नव्हते.

देल्युज आणि गुतारी अधोरेखित करतात की “ते  काय असू शकेल, ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करणे ही ‘तत्त्वज्ञान करणे’ (to do philosophy) ह्या कृतीची प्रश्नकर्त्यांची प्रचंड उत्कट इच्छा होती. पण केवळ त्यांची लेखनशैलीची कवायत होती ती!” . त्यांच्या मते, आविष्कारशैली प्रेमपूर्वक बाजूला सारून “अरे, हे काय करत आलोय मी माझ्या आयुष्यभर!? ” या प्रश्नाकडे कोणी येतच नाही, ही शोकांतिका नव्हे का?”

तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान: भारतीय

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘अधि-तत्त्वज्ञान’ निर्मिती ही पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानाची आणि तेथील तत्त्ववेत्त्यांची मक्तेदारी होती. भारतीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा हा प्रश्न १९५० नंतरच्या दशकात अनेक तत्त्ववेत्त्यांनी उपस्थित केला आणि आपापल्या परीने उत्तरे दिली. प्रो. देबीप्रसाद चट्टोपाध्याय, प्रो. सुरेंद्र बारलिंगे, प्रो. दयाकृष्ण, प्रो. राजेन्द्रप्रसाद, प्रो.सच्चिदानंद मूर्ती इत्यादींनी ह्या प्रश्नाचा खोलवर उहापोह केला आहे.

भारतीय तत्त्वज्ञानाची काटेकोर चिकित्सा अंदाजे सत्तरच्या दशकापासून भारतात आणि भारताबाहेर सुरु झाली. आणि तिने ‘भारतीय अधि-तत्त्वज्ञान’ या ज्ञानविषयाला जन्म दिला. अर्थात त्यातून अजून परंपरा निर्माण झालेली नाही, ही शोकांतिका आहे, तिची विविध कारणे आहेत, यात शंका नाही.

भारतातील नेहमीचे अडथळे म्हणजे वर्णजातीभेद आणि लिंगभेद, ही (कु) प्रसिद्ध कारणे तर आहेतच; पण त्यांच्या जोडीला नवपरंपरा निर्माण करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव, विविध प्रकारची कंपूशाही, ज्ञानविषयावरील अहंकारी मक्तेदारी आणि व्यक्तीस्तोमबाजी, आत्मश्लाघा यांची भर पडलेली आहे. उघडच ही ज्ञानशत्रूता आहे.

प्राचीन भारतात व्यक्तिस्तोम न माजवता केवळ परंपरेला वाहून घेणारी वैदिक आणि अवैदिक परंपरा अतिशय समृद्ध व सुदृढ होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दशकात उगम पावलेल्या व्यक्तिस्तोमवादी भूमिकेने अवनत अवस्था आणली आहे, ही अर्थातच संवेदनशील बाब नव्हे. त्यातच विद्यापीठीय व महाविद्यालयीन संशोधन क्षेत्रात ‘एकस्व अधिकारशाही’ (एकस्व किंवा पॅटंट, patent) ने व्यक्तीचा विचार केवळ व्यक्तीचाच राहातो, तो प्रवाही न होता, स्थितीजड बनतो, याचे भान भारतीय संशोधकांना उरलेले नाही, असे खेदाने म्हणावे लागते. अर्थात या प्रवृत्तीला काहीसा अपवाद विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आढळतो, पण तोही केवळ व्यक्तिगत स्तोमबाजी आणि दादागिरी यांनी ग्रस्त आढळतो. सामाजिक विज्ञाने व मानव्य ज्ञानक्षेत्रात मात्र ज्ञानासाठी वैचारिक हिंसा हे अनियंत्रित कारण आढळते, असेच दिसते. ‘अधि-तत्त्वज्ञान; निर्मितीतील तात्त्विक अडथळे कोणते आहेत, याचा महाराष्ट्रासंदर्भातील विचार मी माझ्या “राज्यातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास: एक विलापिका” या लेखात केला आहे. हा ‘लोकसत्ता’ (१७ नोव्हेंबर २०२१६) मध्ये प्रकाशित झाला होता.

 

(मुक्त-संवाद’, १६ २०२१च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0