तत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन

तत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन

(उत्तरार्ध-२) बर्ट्रंड रसेल दर्शन भाग १७ “तत्त्वचिंतनाचे शत्रू” या लेखाच्या ‘पूर्वार्ध’ भागात आपण ग्रीक-पाश्चात्य परंपरेतील ‘Misology’ आणि ‘Misosophy’ या संकल्पनांची व्युत्पत्तिचा शोध घेतला. त्यांतर ‘उत्तरार्ध : भाग- १’ मध्ये त्या संकल्पनांचे स्वरूप जाणून घेतले आहे. या प्रस्तुतच्या ‘उत्तरार्ध: भाग-२’ मध्ये ‘भारतीय तत्त्वज्ञानातील ‘दर्शन’ या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची ‘अदर्शन’ आणि ‘तर्कशत्रू’ या दोन संकल्पना, अनुषंगाने ‘भारतीय तर्कशास्त्र’ या संकल्पनेचा अतिसंक्षिप्त परिचय करून घेऊ. तसेच चिनी तत्त्वज्ञानात स्पष्ट केलेली ‘मूर्खपणा’ ची लक्षणे थोडक्यात पाहू.

() भारतीय दृष्टीकोन : अदर्शन आणि तर्कशत्रू

आपल्या दैनदिन व्यवहारात ‘दर्शन’ हा शब्द रुळला आहे. देवदर्शन, देशदर्शन किंवा ‘दर्शन अलभ्यम्’ असा शब्दप्रयोग आहे; म्हणजे ‘तुमचे न लाभणारे दर्शन’ (आता लाभले, आज तुम्ही मला भेटला आहात.) भारतीय परिभाषेत ‘दर्शन’ ला तत्त्वज्ञानात्मक किंवा आध्यात्मिक  आणि धार्मिक अर्थ आहे. ‘दर्शन’ ही खास प्राचीन भारतीय संकल्पना आहे. दर्शक म्हणजे दाखवणारा, प्रदर्शित म्हणजे ज्याचे दर्शन झालेले आहे, असे अनेक शब्द बनतात. पुढे ज्याला ‘दर्शन घडते’ किंवा जो ‘साक्षात दर्शन घेतो’  तो ‘दार्शनिक’.

() अदर्शन :

दर्शन’ च्या विरुद्ध अर्थी आहे ‘अदर्शन’.  तो विरुद्ध अर्थ समजून घेण्यासाठी प्रथम दर्शन’ चा अर्थ पाहाणे आवश्यक आहे.

दर्शन’ संज्ञेची व्युत्पत्ति  

 • दर्शन’ ही संज्ञा संस्कृत ‘दृश्’ (dṛś) धातुपासून बनते.
 • ‘दृश्’ चा अर्थ ‘पाहाणे’, ‘साक्षात अनुभवणे’.
 • ‘दृश्’ शब्दाला किंवा धातूला ‘ल्युट’ प्रत्यय ‘अन्’ लागून दर्शन’ ही संज्ञा बनते.
 • म्हणून दर्शन’ चा अर्थ ‘चाक्षुष ज्ञान’ (चक्षु= डोळा, म्हणून डोळ्यांना प्रत्यक्ष होणारे ज्ञान म्हणजे चाक्षुष ज्ञान),  किंवा ‘ईक्षण’ (ईक्ष = पाहणे, ईक्षणम् = पाहण्याची वर्तमानकालीन गतिमान प्रक्रिया, आणि ईक्षिका = डोळा). 

थोडक्यातडोळ्याने प्रत्यक्ष पाहाणे. चक्षुमहत्ता जाणूनच भारतीय परंपरेत ‘चक्षुर् सत्यम्’ अथवा ‘चक्षुर्वैसत्यम्’  अथवा ‘चक्षुर्वैप्रतिष्ठा’ असे म्हटले आहे. “चक्षुर्वैसत्यम्” म्हणजे डोळा या ज्ञानेन्द्रियाने सत्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, सत्याचे दर्शन घडणे. अन्य ज्ञानेंद्रियांच्या तुलनेत डोळा हे इंद्रिय ज्ञानाच्या विषयाच्या जवळ जाणारे असतो. ज्ञानाचा विषय ‘सत्य’ (truth or reality) असते, असत्य हा ज्ञानाचा विषय नसतो. म्हणून सत्य शोधणार्‍या कोणत्याही अध्यात्मशास्त्राला (Metaphysics) ‘दर्शन’ किंवा ‘दर्शनशास्त्र’ म्हटले जाते.

येथे दोन अर्थ संभवतात. (१) पहिला, “चक्षुर्वैसत्यम्” हा ‘भौतिक चक्षु’ या स्थूल भौतिक इंद्रियाने स्थूल भौतिक जग पाहाणे-अनुभवणे. (२) दुसरा, सूक्ष्म चक्षूने आध्यात्मिक ज्ञान प्राप्ति करणे.  सूक्ष्म चक्षु हा ‘दिव्यचक्षु’ मानला आहे. ‘भारतीय दर्शन’ या शब्दप्रयोगात हा दुसरा अर्थ गृहीत आहे. तथापि पहिला अर्थही तितकाच महत्वाचा मानला गेला. ज्यास ‘भारतीय तर्कशास्त्र’ मानले जाते ते ‘न्याय-वैशेषिक दर्शन’ हे ‘प्रत्यक्ष प्रमाण’ गृहीत धरूनच त्यांचा तर्कप्रपंच मांडते. चार्वाक दर्शन तर केवळ ‘प्रत्यक्ष हेच प्रमाण’ मानते.

‘दर्शन’ प्रक्रियेतील तीन घटक :

 • जे दिसते ते किंवा पाहण्याचा विषय ते ‘दृश्य’
 • दृश्य पाहाणारी व्यक्ती म्हणजे ‘द्रष्टा’
 • दृष्ट्याला जे दिसते ते ‘दर्शन’.

द्रष्ट्यालाचं ‘दार्शनिक’ म्हंटले जाते.

डिजिटल माध्यमांचे आव्हान

चक्षुज्ञान किंवा ‘प्रत्यक्ष ज्ञान’ या संकल्पनेला गेल्या दशकभरात डिजिटल माध्यमांनी क्षेत्रात आव्हान दिले आहेइलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाने इलेक्ट्रॉनिक माध्यमेमहाजाल माध्यमे आणि समाजमाध्यमेया विविध माध्यमपीठांद्वारे ‘डिजिटल मिथ्यारोपण’ करण्याची प्रचंड लाट उसळली आहे. ‘असत्याचे सत्य आणि सत्याचे असत्य’ रुपात सादरीकरण होते आहे. परिणामी माध्यमविषयक नव्या आणि जटील ज्ञानशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय समस्या उद्भवत आहेतहेही अधोरेखित होणे नितांत आवश्यक आहे.

अर्थात या आव्हानाला प्राचीन भारतीय वैदिक व अवैदिक आणि त्यांचेही विरोधक चार्वाक अथवा लोकायत दर्शन अतिशय तर्कशुद्धप्रमाण उत्तर देण्यास तयार आहेत. तथापि तो प्रस्तुत लेखाचा विषय नाही.

भारतीय दर्शन परंपरा

आज ज्यास ‘तत्त्वज्ञान’ म्हणून ओळखले जाते, त्यास प्राचीन भारतात ‘दर्शन’ असेही प्राचीन नाव आहे. न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा (वेदांत) आणि बौद्ध-जैन व चार्वाक अशी नऊ मुख्य दर्शने आहेत. या सर्वाना मिळून ‘भारतीय तत्त्वज्ञान’ म्हणतात.  प्रत्यक्ष डोळ्यांना व इतर ज्ञानेंद्रियांना जाणवणारे भौतिक जग:  पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश ही महाभूते ह्या साऱ्यांना ‘तत्त्व’ (elements किंवा principles) म्हंटले आहे. या जगात अस्तित्वात असणारे मानव व इतर प्राणी तसेच ब्रह्म, आत्मा, परमात्मा, कर्म, कर्मफल, ईश्वर, धर्म  इत्यादी अतिभौतिक तत्त्वे मानली आहेत. त्यामुळे त्या साऱ्या ‘तत्त्वां’ चे मूर्त-अमूर्त ज्ञानेंद्रियांना किंवा ज्ञानाच्या प्रत्यक्ष, अनुमान, अंतःप्रज्ञा इत्यादी साधनांमार्फत होणारे म्हणजे ‘तत्त्वज्ञान’ असेही म्हंटले आहे. म्हणून ‘तत्त्वज्ञान’ संज्ञेला समानार्थी शब्द म्हणजे ‘दर्शन’.

भारतीय दर्शनांचा हेतू

 दुःखाचा परिहार’ हा सर्व भारतीय दर्शनांचा हेतू आहे. महात्मा गौतम बुद्धाने तर ‘दुःख’ हेच अंतिम सत्य मानलेअर्थात हे अधोरेखित होणे आवश्यक आहे की दुःखमुक्तिची सिद्धी करण्याचा प्रत्येक दर्शनाचा मार्ग भिन्न आहेतरीही त्या सर्वांमध्ये एक विशिष्ट तर्हेची अंतर्निहित सूत्रता आहे. ती उच्च दर्जाची आहे.

‘दर्शन’ संज्ञेचा वरील शब्दार्थ आणि व्युत्पत्तीचा संदर्भ लक्षात घेता ‘दर्शन’ संज्ञेची व्याख्या पुढीलप्रमाणे:

‘दर्शन’ संकल्पनेच्या तीन व्याख्या

‘दर्शन’ संकल्पनेच्या तीन व्याख्या मान्य आहेत :

(१) `दृश्यते ही अनेन इति दर्शनं” म्हणजे “सत्य आणि असत्य यांचे ज्ञान”

(२) “दृश्यते यथार्थ तत्त्वम अनेन इति दर्शनम” म्हणजे ज्याच्या योगाने यथार्थ तत्त्व पहिले

जाते ते शास्त्र म्हणजे दर्शन.

(३) “तत्त्वज्ञानसाधनंशास्त्रं” म्हणजे तत्त्वांचे ज्ञान होण्याला साधक असे शास्त्र म्हणजे दर्शन. (त्याचा अर्थ “ज्या शास्त्राच्या आधारे लौकिक आणि पारलौकिक तत्त्वांचे ज्ञान होते, ते जाणणे”)

पहिल्या व्याख्या ‘दृश्यते अनेन इति दर्शनम्’ याचा अर्थ ‘डोळ्याने थेट साक्षात’ पाहाणे.  जर हीच व्याख्या मान्य केली तर ती ‘केवळ डोळ्यांनी होणारे ज्ञान’ यापुरती मर्यादित होते. इतर ज्ञानेंद्रिये कान (शब्दज्ञान), नाक (गंधज्ञान), त्वचा (स्पर्शज्ञान) आणि जीभ (रसनाज्ञान) यांचे ज्ञान प्रत्यक्ष नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.

आपण “मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले” असे म्हणतो; तसे “मी प्रत्यक्ष कानाने ऐकले, मी प्रत्यक्ष हात लावून स्पर्श करून अनुभवले, मी प्रत्यक्ष नाकाने श्वास घेतला, मी प्रत्यक्ष जीभेने चाखून पाहिले, ” असेही म्हणतो. मग ते ‘प्रत्यक्ष ज्ञान आहे की नाही?”

भारतीय दर्शनांच्या मते डोळा आणि इतर ज्ञानेंद्रियांनी अनुभवणे हेही ‘प्रत्यक्ष’ च आहे. म्हणून त्यांचाही ‘दर्शन’ मध्ये समावेश करण्याच्या हेतू निश्चित केला गेला. त्यासाठी ‘दृशिर प्रेक्षणे्’ या धातूला ‘ल्युट प्रत्यय आणि  भावार्थ म्हणून ‘ञ प्रत्यय’ लावून  “दृश्यते अनेन इति दर्शनम्” ही व्याख्या व्यापक केली गेली. पाणिनीय व्याकरणानुसार ‘दर्शन’ शब्द, ‘दृशिर् प्रेक्षणे’ धातुला ‘ल्युट्’ हा प्रत्यय लावल्याने निष्पन्न होतो. परिणामी ‘दर्शन’ शब्दाचा मूळ अर्थ ‘दृष्टी’. निष्पादित अर्थ  ‘ज्याच्यामार्फत पाहिले जाते’ किंवा ‘ज्याच्यात पाहिले जाते ते’ असा होतो. ‘प्रेक्षण’ म्हणजे ‘प्रकृष्ट ईक्षण’, ज्यात अंतःचक्षुंनी पाहाणे अथवा मनन करणे, अपेक्षित आहे. म्हणूनच योगी-साधू-मुनी इत्यादींना जाणवणारे योगाच्या साह्याने होणारे ‘यौगिक ज्ञान’ हे देखील ‘प्रत्यक्ष दर्शन’ मानले गेले आहे.  असे ज्ञान ज्या ग्रंथात ग्रथित केले आहे त्या ग्रंथांना ‘दर्शने’ असा नाव दिले गेले. न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, वेदांत दर्शन इत्यादी.

‘दृशिर प्रेक्षणे्’ या धातूतील ‘प्रेक्षण’ करणे म्हणजे विचार करणे; किंवा विचार करण्यास प्रवृत्त करणारी सर्व ज्ञानेंद्रिये व त्यांच्याद्वारे ग्रहण केली जाणारी सारी प्रत्यक्ष ज्ञाने स्वीकारणे. सर्व इंद्रियांद्वारे जे जे जाणवते ते ते सारे ‘दर्शन’ आहे, असे मान्य करणे. थोडक्यात, सर्व प्रत्यक्ष ज्ञान याचा अर्थ ‘दर्शन’. व्याख्या व्यापक केल्याने ‘केवळ प्रत्यक्ष हेच प्रमाण’ मानणाऱ्या चार्वाक तत्त्वज्ञानालाही ‘दर्शन’ चा दर्जा मिळतो.

या ‘दर्शन’ विरुद्ध आहे ‘अदर्शन’. आता ती संज्ञा पाहू.

अदर्शन संकल्पना   

‘दर्शन’ शब्दाचा अर्थ ‘प्रत्यक्ष ज्ञान’ होणे तर ‘अदर्शन’ शब्दाचा अर्थ ‘प्रत्यक्ष’ किंवा ‘प्रत्यक्ष ज्ञान होणे’. ज्ञान गायब होणे, ‘अदृश्य’, ‘लुप्त’ होणे. ‘अदर्शन’ च्या समांतर शब्द आहेत अविद्यमान’, ‘असाक्षात्’ किवा लोप पावणे, विनाश होणे. किंवा उपेक्षा करणे. येथे लक्षात ठेवले पाहिजे की ‘अदर्शन’ म्हणजे ‘अज्ञान’ नव्हे. भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत ‘अज्ञान’ ही स्वतंत्र संकल्पना आहे.

‘अदर्शनं लोपः’  सूत्र ची व्याख्या

‘लोप’ पावणे या संज्ञेबाबत महर्षि पाणिनी (इ .स. पूर्व ५२०-४६०) एक महत्वाचे सूत्र उद्धृत केले जाते. ते त्यांच्या “वैयाकरणसिद्धान्तकौमुदी” (०१/०१/६०) या ग्रंथात आहे:

प्रसक्तस्य अदर्शनं लोपसंज्ञकः भवति

यस्य वर्णस्य दर्शनम् / श्रवणम् / उच्चारणम् /

उपलब्धिः भवति,

तस्य वर्णस्यलोपःभवति इत्युच्यते

अर्थ :

जो वर्ण उच्चारण करूनही  श्रवणेंद्रियाने उपलब्ध होत नाही, त्यास ‘लोप’ म्हणतात किंवा त्या शब्दाला ‘लोप संज्ञा’ म्हंटले जाते. इथे ‘लोप पावणे’ याचा अर्थ विनाश होणे, नष्ट होणे असा नाही; तर केवळ ‘उपलब्ध नसणे’ असा केला जातो. (Something that should be present but is not seen / heard is said to have undergone a लोप).

संस्कृत व्याकरणाच्या अध्ययनाच्या दोन शाखा आहेत: प्राचीन व्याकरण आणि नव्य नवीन व्याकरण. (आता, हे नवीन व्याकरण ही इतके जुने झाले आहे की ते ‘प्राचीन’ वाटते.) ‘काशिकावृत्ति’ नावाचा एक प्राचीन व्याकरण ग्रंथ आहे. त्यानुसार, –

अदर्शनम्, अश्रवणम्, अनुच्चारनम्, अनुपलब्धिः

अभावो, वर्णविनाशः इत्यनर्थान्तरम्

एतैः शब्दैर्यो ऽर्थो ऽभिधीयते

तस्य लोपः इति इयं संज्ञा भवति.

या श्लोकाचा अर्थही वरीलप्रमाणे आहे. “ज्याचे दर्शन नाही, जो श्रवण होत नाही, ज्याचा उच्चार होत नाही; जो अनुपलब्ध आहे-ज्याचा अभाव जाणवतो, पण ज्याचा वर्णविनाश झालेला नाही, त्या शब्दाला ‘लोप’ संज्ञा उपयोजनात आणली जाते.

‘लोप पावणे’ ला अन्यत्र ‘अवधेय’ असेही म्हटले आहे. संस्कृत व्याकरणात ‘वर्ण’ नित्य आहे, त्याचा  नाश होत नाही. पण प्राप्त वर्णाचे ऐकले न जाणे हे ‘अवधेय’ होय.

एक लक्षात घेणे आवश्यक आहे की ‘अदर्शन’ या संज्ञेचा केवळ अर्थ मिळतो. ‘दर्शन – एक तत्वज्ञान’ या अर्थाने त्याच्या विरुद्ध ‘अदर्शन – एक तत्त्वज्ञान’ असे काहीही नाही. पण काही प्राचीन भारतात तत्वज्ञान निर्माण होताना काही गोष्टी घडल्या. त्या अनेक आहेत, पण त्यातील काही महत्वाच्या अशा:

 • ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या नावाने जी मुख्य ‘नऊ दर्शने’ विकसित झाली “ न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा (वेदांत) ही वैदिक दर्शने आणि बौद्ध, जैन, चार्वाक ही अवैदिक दर्शने. यातील वैदिक दर्शनांनी अवैदिक दर्शनांना ‘अदर्शन’ चाचं दर्जा दिला. स्वतःला वेदप्रामाण्य मानणारे म्हणून ‘वैदिक दर्शने’ म्हणवून घेतले व इतरांना ‘अवैदिक’ म्हंटले. वेदप्रामाण्यवादी म्हणून स्वतःला ‘आस्तिक दर्शने व अवैदिकांना ‘नास्तिक दर्शने’ अशीही नावे ठेवली.
 • उलट बाजूलाही तेच घडले. अवैदिक चार्वाक, बौद्ध व जैन दर्शनांनीही वैदिक दर्शनांना ‘अदर्शन’ चाचं दर्जा दिला.
 • अवैदिक चार्वाक, बौद्ध व जैन दर्शनांमधील प्रत्येक दर्शनाने वैदिकांबरोबर इतर दोघांनाही ‘अदर्शन’ म्हणूनच अवमान केला.
 • अवैदिक ‘चार्वाक दर्शन’ तर इतके प्रखर विरोधी दर्शन आहे की चार्वाकांनी मुख्यतः वैदिक दर्शनांना अतिशय कडक व अतिप्रखर विरोध केलाच; पण त्यांनी बौद्ध व जैन या दर्शनांनाही तेवढाच विरोध केला. त्यामुळे चार्वाक सर्वच दर्शनांचे शत्रू झाले.
 • याचा अर्थ प्रत्येक दर्शनाने इतर प्रत्येक दर्शनाकडे ‘अदर्शन’ म्हणूनच पाहिले आहे, ही बाब अधोरेखित केली पाहिजे. म्हणजेच प्रत्येक दर्शनाने आपल्या ज्ञानाचा विषय निश्चित केल्यानंतर इतरांच्या ज्ञानाचा संपूर्ण अथवा अंशतः धिक्कार करून त्यांना ‘अदर्शन’ म्हणून जाहीर केले!
 • सहा वैदिक दर्शनांची एक team झाली, तशी तीन अवैदिकांची team होऊ शकली नाही.
 • पण वैदिक दर्शनातील न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा (वेदांत) या सहा दर्शनांपैकीही प्रत्येक दर्शनानेही आपल्याच team मधील इतर दर्शनांना प्रारंभी विरोधच केला. इतरांना ‘अदर्शन’ चा दर्जा दिला तर काहीजणांनी इतरांशी जुळवून घेतले आणि इतरांनाही जुळवून घेणे भाग पडले. अनेक तत्त्ववेत्त्यांनी प्रचंड वैचारिक लढा दिला, मोठे वैचारिक युद्ध केले. मात्र अखेरीस सगळ्यांना पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा दर्शनांशी जुळवून घेणे नाईलाजास्तव भाग पडले. एवढेच नव्हे तर आपापल्या वैचारिक योजनांमध्ये अतिशय विसंगत, न जुळणारी ‘ईश्वर’ ही संकल्पना आणि ‘वेदप्रामाण्य’ आणि मनुस्मृती, धर्मशास्त्रे, याज्ञवाल्क्य स्मृती इत्यादी तत्त्वज्ञाने नसलेल्या-अतात्त्विक ग्रंथांना स्वीकारावे लागले. अर्थात हे सारे भयानक युद्ध होते आणि ते खूप प्राचीन काळापासून घडत आले आहे. त्यात अखेरीस अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाने विजय मिळविला, असा प्रोपोगंडा केला गेला. विशेषतः आदि शं‍कराचार्यांनी (इ. स. आठवे शतक) बौद्ध दर्शनाचा पाडाव केल्यानंतर हा प्रोपोगंडा सुरु झाला. हा ‘शांकर दिग्विजय’ चा आक्रमक प्रचारही अनेक शतके होत राहिला, म्हणजे याही घटनेला पंधराशे वर्षे झाल्याने तोही प्राचीन झाला. त्यामुळे जी काही दर्शन परंपरा समोर येते ती जणूकाही ‘नैसर्गिक परंपरा’ या रुपात येते, की जे अर्थातच कृत्रिम आहे.
 • वैदिक-अवैदिक आणि आस्तिक-नास्तिक या दोन्ही वर्गीकरणाविरुद्ध नवी वर्गीकरणे विसाव्या शतकात विकसित झाली. चार्वाक सर्वच दर्शनांच्या विरोधात असल्याने ‘चार्वाक दर्शन’ आणि ‘चार्वाकेतर दर्शने’ अशीही अत्याधुनिक मांडणी विसाव्या शतकाच्या अखेरीस करण्यात आली.
 • भारतीय दर्शने विकसित होण्याची ‘खंडन-मंडन पद्धती’ ही विशिष्ट पद्धती होती. शक्यतो ही पद्धती सचोटीने उपयोगात आणण्याचे प्रयत्न झाले असावेत, पण त्याची शाश्वती देता येत नाही. मुख्य प्रश्न चर्चेच्या भाषिक माध्यमाचा होता. वैदिक दर्शने मुख्यत: संस्कृत भाषेत आणि सूत्रशैलीत मांडली गेली. प्राचीन बौद्ध दर्शन पाली भाषेत आणि प्राचीन जैन दर्शनही मूलत: अर्धमागधी भाषेत आहे. म्हणजे  प्रारंभी वैदिक व अवैदिकांच्या ज्ञानभाषा स्वतंत्र होत्या; पण नंतर भारतीय दर्शनांचा विकास खंडनमंडन पद्धतीतून झाला. त्यातून संस्कृत ही ज्ञानभाषा बनली. संस्कृतमुळे एकसूत्रीकरण झाले, ही एका अर्थाने विधायक गोष्ट झाली; पण त्यामागे  दर्शनांच्या प्रांतात अंतर्गत विघातक राजकारण झाले.

() पहिले नुकसान : म्हणजे या तात्त्विक चर्चा प्राचीन काळी अतिशय छोटय़ा, खूपच मर्यादित संख्येच्या गटात होत राहिल्या, केल्या गेल्या किंवा झाल्या. म्हणून गुरुकुलही अतिछोटे होते. त्यात प्रवेश मिळणे अवघड होते. आत काय घडत आहे, हे बाहेर कधीच कळत नव्हते. पूर्वपक्ष हेतुत: चुकीचा मांडला गेला, अवैदिकांचे मूळ साहित्य नष्ट करण्यात आले किंवा तसे आटोकाट प्रयत्न झाले. अवैदिकांच्या विरोधात चार्वाकांना उंट म्हणूनच वैदिकांनी वापरले. त्याला बौद्ध आणि जैनांनी हरकत घेतली नाही. कारण चार्वाक त्यांचेही विरोधक होते! हा पहिला तात्त्विक बळी इहवादाचा ठरला. म्हणजे जे खऱ्या अर्थाने सामान्यजनांच्या सुखाचा, मन:शांतीचा विचार करणारे इहवादी होते, ते वैदिकांच्या वेदीवरील पहिले तात्त्विक हुतात्मा झाले.

() दुसरे नुकसान : एक मोठे अंतर्गत नुकसान झाले. वैदिकांचे तर्कशास्त्र तांत्रिकदृष्टय़ा अतिशय  किचकट झाले. त्यांची चर्चा पद्धती खूपच संकीर्ण आणि अतिशय अवघड बनले होते. चर्चा करताना वैदिकांच्या अनंत आक्षेपांनी बौद्ध व जैन तर्कशास्त्रज्ञानांही त्यांचीच पद्धती स्वीकारणे भाग पडले. परिणामी बौद्ध व जैन दर्शने व तर्कशास्त्रे पंडिती (स्कोलॅस्टिक) बनले आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली. .

() तिसरे नुकसान : हे चर्चागट मुख्यत: वर्णग्रस्त आणि पुरुषप्रधान होते. त्यात स्त्रियांना प्रवेश नव्हता. काही अपवाद निश्चितच होते. पण शूद्र व स्त्रिया साऱ्याचं बौद्धिक क्षेत्रातून बहिष्कृत होते. हे सारे जाणीवपूर्वक झाले, हा आक्षेप येथे येतो. इथूनच भारतीय जनतेचा तात्त्विक आत्मदुरावा सुरू झाला.
सामाजिकदृष्टय़ा भारतीय तत्त्वचिंतन संस्कृतमध्ये बंदिस्त झाल्याने ते लोकांपासून दूर गेले, हे मूलभूत कारण मानावे लागेल. वैदिक दर्शनांचे स्वरूपच असे बनले की ते सांस्कृतिक वर्चस्वाचे व धार्मिक दहशतीचे शस्त्र बनले. वर्ण-जात-लिंगभेद याचा पुरस्कार करणारे तात्त्विक साहित्य निर्माण झाले. ज्ञानबंदी हेच तत्त्वज्ञान होते. हा अडथळा स्वरूपाने धार्मिक असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप केला नाही, उलट त्या भेदाभेदाचा वापर करून घेतला गेला. बौद्ध दर्शनाचा भारताबाहेर प्रसार-विकास होण्याचे भाषिक कारण या दर्शनाने त्या त्या देशाच्या भाषा स्वीकारल्या. अशा रीतीने ही उच्च भारतीय दर्शन परंपरा स्वदेशात ‘परकी’ झाली.

आता या ज्ञानबंदीविरोधात अतिशय उच्च पातळीवर वेळोवेळी बंडखोरी झाली. उदाहरणार्थ महाराष्ट्रात चक्रधर, ज्ञानेश्वर ते तुकडोजी महाराजांपर्यंतच्या सर्व संत मंडळीनी शोषण व विषमतेविरोधात बंड केले. संत ज्ञानेश्वर हे अस्सल भाषिक देशीवाद मांडणारे पहिले विचारवंत होते. त्यांच्यापासून सर्व संतांनी तत्कालीन साध्या प्रादेशिक लोकभाषेत ओवी, अभंग इत्यादी शैलीत पारंपरिक तत्त्वज्ञान मांडण्याची परंपरा आणली. पण ही बंडखोरी भाषेपुरतीच मर्यादित ठरली. लोकांना तत्त्वज्ञान उपलब्ध झाले, सुलभ झाले, शैलीचा परिचय झाला. तथापि दर्शन परंपरा ज्या तार्किकतेचा पुरस्कार करते, त्या रीतीने तात्त्विक विचार करण्याचे शिक्षणच मिळाले नाही. भारतीय लोकशाही अशा भावुक, भाबडय़ा सामान्य जनतेच्या आधारावर विकसित होते आहे. परिणामी, दु:खमुक्ती या हेतूऐवजी ती अधिकाधिक दु:खाच्या खाईत लोटली जाते आहे.

थोडक्यात, प्राचीन भारतीय समाजधुरिणांनी समाजाचे दोन मुख्य वर्गात तुकडे केले: द्विज आणि शूद्र. द्विज म्हणजे शूद्र वगळता तीन वर्ण, त्यातही ब्राह्मण हा वर्ण सर्वौच्च. या वर्गीकरणाच्या रक्षणासाठी मनुस्मृती, याज्ञवक्यस्मृती, धर्मशास्त्रे, गीता, रामायण व महाभारत, इतर अनेक संहिता आणि इतर कथा, पुराणे इत्यादी मार्फत शूद्र लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि द्विज सेवेकरिता राबवून घेण्याचे धोरण काटेकोरपणे अमलात आणले गेलेले होते. त्या पार्श्वभूमीवरच समांतरपणे भारतीय विचार्विश्वाचा विकास होत गेला. किंबहुना द्विज आणि शूद्र या वर्गीकरणाच्या विरोधातच अवैदिक दर्शनांचा विकास झाला. ‘भारतीय दर्शनांचे सामाजिक कार्य’ हा खरा तर अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे. तर्कशास्त्र समाज नियंत्रणाचे वैचारिक हत्यार म्हणून वापरले गेले आहे.

अदर्शन संकल्पना

प्रत्येक दर्शनाने ‘सत्याचे दर्शन’ घडवले. पण प्रत्येकाची ‘सत्या’ ची संकल्पना भिन्न होती. जसे की चार्वाकांच्या मते ‘भौतिक जग हेच सत्य आहे’ तर वेदांताच्या मते ‘भौतिक जग असत्य आहे आणि ब्रह्म नामक सद्वस्तू सत्य आहे’ तर बुद्धाच्या मते ‘दुःख सत्य आहे’. असेच इतर दर्शनांचे जग, जगातील सजीव-निर्जीव वस्तू, त्यातील मानवाचे स्थान याबाबत प्रत्येकाचे सत्यविधान भिन्न असल्याने प्रत्येकजण इतरांना ‘अदर्शन’ मानतो. हा भारतीय दर्शन परंपरेचा ल. सा. वि. मानता येईल. ज्ञान विरुद्ध अज्ञान हा संघर्ष ‘ज्ञान’ या संकल्पनेभोवती गुंफला गेला असल्याने प्रत्येकजण इतरांना ‘अज्ञानी’ व स्वतःला ‘ज्ञानी’ मानतो. हा ‘भारतीय दर्शन परंपरेतील सापेक्षतावाद’ आहे. या भूमिकेमुळे प्रत्येकाच्या मते, इतर ‘प्रत्येक दर्शन हे अदर्शन’ चं आहे.

‘अदर्शन’ तत्त्वज्ञान ?

‘दर्शन’ हे तत्त्वज्ञान आहे, पण ‘अदर्शन’ या नावाचे स्वतंत्र तत्त्वज्ञान नाही. भारतीय परंपरेत ‘अदर्शन’ ही संकल्पना आहे, पण ती भाषेच्या संदर्भात आणि भाषेच्याच पातळीवर आहे, ती स्वतंत्र आणि तत्त्वज्ञान नाही; तर “आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट” या न्यायाने (म्हणजे अन्यायाने) दुसऱ्यांच दर्शन हे नेहमीच ‘अदर्शन’ बनले आहे.

दर्शनांच्या अतिशय अतिशय उग्र पण सूक्ष्म शीतयुद्धात ‘अद्वैत वेदांता’ ने आत्मविजयाचा प्रखर प्रचार केला. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे वेदांत तत्त्वज्ञान’ असा समज पसरला. वस्तुतः नऊ दर्शने आणि इतरही काही निष्पादित उपदर्शने मिळून ‘भारतीय तत्त्वज्ञान’ अशी खूप व्यापक व प्रचंड रचना बनते. ‘अद्वैत वेदांत’ स्वतःला ‘दर्शन’ मानते व इतरांना ‘अदर्शन’ हा थोडक्यात अर्थ आहे. पण इथेही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की वैदिक दर्शनांना ‘हिंदू दर्शने/ तत्त्वज्ञाने’ असे म्हणणे आवश्यक आहे. त्यांच्यातच आजच्या आक्रमक ‘हिंदुत्वा’ चा उदय होतो. भारताची आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती अशी आहे की केवळ एखाद्या धर्माचे तत्त्वज्ञान पुरेसे नसून सर्व धर्मांची सर्व तत्त्वज्ञाने मिळून एकत्र आली तर आणि तरच ‘लोकशाहीवादी सर्वधर्मसमभावी समाज’ बनतो. त्यातून ‘नव्या तत्त्वज्ञाना’ ची निर्मिती करण्यास यथेच्छ अवकाश आहे.

() तर्काचे शत्रुत्वभारतीय दृष्टीकोन

भारतीय तत्त्वज्ञानात ‘तर्काचे शत्रू’ अशी संकल्पना नाही; उलट पण त्याच्या पुढे जाऊन उलट “तर्क हाच शत्रू” मानला गेला. हे अर्थातच ‘हिंदू तत्त्वज्ञाना’ त प्रामुख्याने घडले. प्राचीन भारत वैदिक समाजव्यवस्थेने बनलेला होता. साहजिकच त्यावर मुख्यतः वैदिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. आणि आपण जाणतोच की वैदिक किंवा हिंदू भारतीय समाजव्यवस्था मूलतः पक्षपाती आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही पुरुषार्थव्यवस्था, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ही आश्रमव्यवस्था ही आयुष्याची समान चार टप्प्यात केलेली विभागणी ही केवळ पुरुषांसाठी होती, ती स्त्रियांसाठी नव्हती. त्याची लागण बौद्ध व जैन धर्मानाही झाली, तेही धर्म पुरुषप्रधान बनले.  या साऱ्यांना लगटून असलेली जातीव्यवस्था आणि त्यातील प्राचीन लिंगभेदव्यवस्था, या समग्र व्यवस्था भारतीय समाजातील ज्ञानव्यवस्था (म्हणजे शिक्षणव्यवस्था), राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था व सामाजिक रचना यांच्याशी खूप खोलवर आणि अतिशय संकीर्णरीत्या बांधल्या गेलेल्या आहेत. भारतीय समाजाच्या समग्र रचनेमागे भारतीय तात्त्विक दर्शनांचा खूप मोठा अदृश्य प्रभाव आहे. परिणामी लोक विचारशक्तीच हरवून बसले.

काही निवडक उदाहरणे पाहू. महाभारतात एक प्रसंग आहे. तो यक्ष आणि धर्मराज यांच्यातील संवाद आहे (महाभारत वनपर्व यक्षप्रश्न ३१४.११९)  यक्ष धर्मराजाला प्रश्न विचारतो की “कोणता मार्ग धर्ममार्ग आहे?” (का पंथ:?) धर्मराज उत्तर देतो, –

तर्कः अप्रतिष्ठः श्रुतयः विभिन्नाः
एकः मुनिः यस्य मतं प्रमाणम्
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्
महाजनः येन गतः सः पन्थाः

अर्थ : “तर्काला प्रतिष्ठा नाही, मजबूत पाया नाही. श्रुती (वेद) त्याचा अर्थ वेगळे वेगळे सांगत आहेत, स्मृतीही वेगवेगळा अर्थ लावत आहेत. जगात असा एकही मुनी किंवा ऋषी पृथ्वीवर नाही, की ज्याचे वचन प्रमाण मानले जाते, ज्याची शिकवण सर्वमान्य आहे. धर्माचे गूढ गुहेत लपल्यासारखे आहे. अशा स्थितीत महाजन म्हणजे मोठी माणसे, आदरणीय व्यक्ति ज्या मार्गाने गेल्या तो मार्ग चोखाळावा (तोच धर्ममार्ग आहे.)” 

आता, तर्क अप्रतिष्ठित का ? कारण, हिंदूंच्या मते, मानवी जीवनाचे ध्येय मोक्ष आहे आणि त्यात तर्क अडथळा आणतो. ऋषिमुनी तर्काच्या, बुद्धीच्या पलीकडे जाऊन, ज्ञान-अज्ञानाच्या पलीकडे जावून मोक्ष प्राप्त करतात.  येथे ‘मोक्षाला उपलब्ध होतात’ असे म्हणणे जास्त सयुक्तिक आहे. त्या उपलब्धीच्या उच्च प्रक्रियेत बुद्धी किंवा तर्क अडचण ठरते. म्हणून तर्काला प्रतिष्ठा नसते.

या प्रश्नात ज्ञानाचे साधन असलेला तर्क बाजूलाच राहिला आणि धर्म गूढ बनला. रामायण,  महाभारतात तर्काची सर्रास निंदा आढळते. मनुस्मृतीनुसार ‘जो तर्क करतो त्याला स्वर्गप्राप्ती होत नाही. तर्क लढवणाऱ्याला बहिष्कृत करावे. मनुस्मृती म्हणते, “श्रुति म्हणजे वेद असे समजावे व स्मृति म्हणजे धर्मशास्त्र समजावे. या दोघांचाही प्रतिकूल तर्क करून विचार करू नये. कारण, त्यांच्यापासून संपूर्ण धर्म प्रकट झाला आहे. जो द्विज या दोन मूळ ग्रंथसमूहाचा, उलटसुलट तर्क करून अवमान करील त्याला शिष्ट धार्मिकांनी अध्ययन-अध्यापन इत्यादी कर्मापासून दूर करावे. कारण वेदवाक्यही अप्रमाण आहे. कारण की तेही एक वाक्यच आहे. ठगाच्या वाक्याप्रमाणे असा प्रतिकूल तर्क करणारा चार्वादिकाप्रमाणे नास्तिक आहे असे समजावे. कारण, तो वेदाची निंदा करणारा आहे.” (मनुस्मृती२.१०, ११)

गंधर्वतंत्र’ (अध्याय १.५७) हा एक शिव-पार्वती संवाद आहे. शिव पार्वतीला विश्वाचे रहस्य विदित करतो. या ग्रंथानुसार तर गौतम अष्टपाद ऋषीच्या तर्कशास्त्राचे अध्ययन करणाऱ्याला शृगालयोनीत (कोल्हा) जावे लागते. ‘एवढेच काय, पण ” तू तर्काने ब्रह्मभेद केला आहेस त्यामुळे तुझे डोळे जातील” असा शाप महर्षी व्यासांनी अक्षपाद गौतमाला दिला होता म्हणतात! आता, ही एक कल्पित हास्यास्पद कथा आहे. कारण अक्षपाद गौतम इ.स.पूर्व १५० काळात होऊन गेला तर महर्षि व्यास महाभारतकाली होते. पण अशा कथांमधून त्यांच्याद्वारे सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण होते, ते तार्किक विचार करणेच काय, पण विचार करणेच बंद करतात.

ज्ञानेश्वरीतील टीका  

ज्ञानेश्वरीतही बुद्धि किंवा तर्कशक्ती बाजूलाचं ठेवण्याचा उपदेश आढळतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

“येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका ।
ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ? (९.५३)…..

ऐसा अवघाचि हा सुरवाडु आहे । तरी जना हातीं केविं उरों लाहे ।
हा शंकेचा ठावो कीर होये । परि न धरावी तुवां (९.५६)

अर्थ : “या ठिकाणी तर्ककुशल अर्जुना, तू जर अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी वस्तु अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली?…..याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकर आहे तर ते लोकांच्या तडाख्यातून राहिले कसे ? ही खरोखर शंकेची जागा आहे, परंतु तू अशी शंका घेऊ नकोस.”

याचाच अर्थ ‘विचारशक्ती’ चा वापर न करण्याचे सुचवले आहे. त्याच नवव्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांचे आणखी एक विवरण असे:

एर्‍हवीं अनुमानाचेनि  पैसें । आवडे कीर कळलें ऐसें ।
परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ? (९.१३७)
अर्थ :

“साधारणपणे पाहिले असता तर्काच्या वाढीने (माझी स्वरूपस्थिती) खरोखर कळल्यासारखी वाटते. (पण ते खरे कळले नाही. ते कसे तर…) मृगजलाच्या ओलाव्याने जमीन भिजेल काय ?” म्हणजे तर्क करून माझे स्वरूप अर्जुना तुला उमगणार नाही. तर्क हा मृगजळासारखा असतो. आहे असे वाटते, पण वास्तवात नसते.

याच नवव्या अध्यायात वासनेला शरण गेल्यास  करण्याशी माणसाची काय गत होते, याचे अधिक स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराज देतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते                                                             (अध्याय .२१)

 याचा सरळ मराठी अर्थ असा:

“ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यानंतर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदांमध्ये सांगितलेल्या, सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत राहातात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.”

याचे ज्ञानेश्वर महाराजप्रणित भावांतर असे

 मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।

आणि येऊं लागती माघारे । मृत्युलोका (९.३२८)

जैसा वेश्याभोगी कवडा वेंचे । मग दारही चेपूं नये तियेचें ।

तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ? (९.३२९)

याचा अर्थ : “मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला, म्हणजे त्या बरोबरच यज्ञकर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्युलोकात परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहात नाही; त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्याची स्थिती लज्जास्पद आहे, त्याचे वर्णन काय करावे?”

म्हणजे बुद्धिला ज्ञानदेवांनी वेश्येची उपमा दिली आहे, असे जाणवते. आत्मज्ञानासाठी बुद्धिच्या, विचारशक्तीच्या पलिकडे जा, म्हणजेच विचार करणे बंद करा. अद्वैत वेदांताच्या मते, ब्रह्मज्ञान किंवा ‘अहं ब्रह्मास्मि’ हा साक्षात्कार ‘ज्ञान आणि अज्ञान’ या द्वैताच्याही पलिकडे गेल्याशिवाय शक्यच होत नाही. म्हणजे ज्ञानाचा मार्ग असलेला तर्कही सत्य नाही !

भारतीय तर्कशास्त्र

वेदप्रमाण मानणाऱ्या वैदिक हिंदूंनी तर्काला प्रतिष्ठा, सन्मान दिला नाही, ही बाब खरी आहे. तथापि तर्काला जगण्याचा, विचार करण्याचा, युक्तिवाद करण्याचा महत्वाचा आणि अनिवार्य मार्ग म्हणून, एक उच्च वैचारिक साधन म्हणून मान्यता आहे. प्राचीन काळापासून भारतात वैदिक, बौद्ध व जैन अशा तीन दर्शनांनी, तत्त्वज्ञानांनी तर्कशास्त्र विकसित केले आहे. तर्कशास्त्र हे ज्ञानाची साधने, प्रमाणे, त्यांची वैधता आणि तर्कदोष यांचा अभ्यास करते. भौतिक जीवन जगायचे असेल तर तर्क हे आवश्यक साधन आहे, असे मत सर्वच दर्शनांचे होते. वैदिक तत्त्वज्ञानातील ‘न्याय दर्शन’ हे प्रगत तर्कशास्त्र मानले जाते. पण प्रत्येक दर्शनाने आपापल्या तार्किक शस्त्रांनी प्रतिपक्षाला नामोहरम करण्याचे ध्येय ठेवलेच होते, यात शंका नाही. उदाहरणार्थ, बौद्ध दर्शनावर टीका करताना न्याय दर्शनकार म्हणत असत की ‘कुत्र्याच्या कवटीत ठेवलेले दूध आम्ही पीत नाही!’

मुर्खांची लक्षणे

तार्किक विचार न करणाऱ्यावर रामदासस्वामींनी (जन्म: २४ मार्च १६०८, मृत्यू:  १३ जानेवारी, १६८१) कडक टीका केली आहे. त्यासाठी त्यांनी ‘दासबोध’ मध्ये मुर्खांची लक्षणे या नावाचे एक प्रकरण वाहिले आहे. अर्थात ती सामान्य सामाजिक वर्तन करताना माणूस ज्या चुका करतो त्यावर टीका केली आहे. ती माणसाने तार्किक विचार करावा, या तात्त्विक स्वरुपाची नसून नैतिक अंगाने जाणारी माणसाच्या वर्तनावर आणि अधार्मिकातेवर केलेली टीका आहे.

() चीनी तत्त्वज्ञानातील शहाणपणा आणि मूर्खपणा यांची संकल्पना 

चीनी तत्त्वज्ञानात नैतिकतेचे यथार्थ भान, जीवनात सदिच्छा बाळगणे आणि शिष्टाचार अंगी बाणवणे ही मूल्ये महत्वाची मानली आहेत. या मूल्यांच्या आधारे जीवनाची रचना करणे, ती जीवनात प्रत्यक्ष अमलात आणणे म्हणजे प्रज्ञान असे मानले आहे. अशा प्रज्ञानी व्यक्तीला तत्त्ववेत्त्याला ” प्रज्ञानाचे पोते” (“bag of wisdom”)   म्हंटले आहे.

चिनी तत्त्वज्ञान : संकल्पनेचे स्वरूप 

‘चिनी तत्त्वज्ञान’ हा शब्दप्रयोग इंग्लिशमधील Chinese Philosophy ह्या शब्दाचे भाषांतर मानला जातो. Philosophy हाच मुळात ग्रीक-पाश्चात्य शब्द असल्यामुळे Chinese Philosophy हा पाश्चात्य शब्द ठरतो आणि ‘चिनी तत्त्वज्ञान’ हे Chinese Philosophy या पाश्चात्य शब्दाचे मराठीकरण ठरते.

() निशी अमनचे योगदान  

निशी अमन

निशी अमन

ज्याला आज आपण मराठीत ‘तत्त्वज्ञान’ अथवा इंग्लिशमध्ये Philosophy असे म्हणतो, त्या अर्थाचा शब्द प्राचीन चिनी भाषेत नव्हता. एकोणिसाव्या शतकात निशी अमन (Nishi Amane जन्म :०७ मार्च १८२९, मृत्यू : जानेवारी ३० १८९७ ) ह्या जपानी तत्त्ववेत्त्याने ग्रीक Philosophia किंवा Philosophy (Love of Wisdom – प्रज्ञानाचे प्रेम) संकल्पनेचा आशय व्यक्त करणारी एक संज्ञा जपानी भाषेतून चिनी भाषेत आणली.  ती म्हणजे Tetsugaku  (उच्चार – ‘तेत्सुगाकु’). त्याने ती प्रथम जपानी भाषेत उपयोगात आणली. त्यानंतर तिचे उपयोजन त्याने चिनी भाषेत केले.Tetsugaku म्हणजे “मानवी स्वभावाचा अभ्यास आणि भौतिक जगाची आधारभूत तत्त्वे यांचा अभ्यास”. या जपानी भाषेतील Tetsugaku  (उच्चार – ‘तेत्सुगाकु’) संज्ञेचे चिनी भाषेत ‘ zhéxué ‘  असे रुपांतर निशी अमन करतो. हे चिनी भाषांतर त्याने त्याच्या “Hyakuichi-Shinron ” (अर्थ : नवा सिद्धांत) ह्या ग्रंथात १८७३ साली वापरले.

Zhéxué = Philosophy =  चे श्वे

चिनी भाषेतील zhé (श्वे) शब्दाचा अर्थ ‘प्रज्ञान’ (wisdom) असा होतो आणि  Xue शब्दाचा अर्थ शिकणे. म्हणून zhe-xue  म्हणजे “ज्ञानी आणि शहाणा माणूस होण्यासाठी शिक्षण घेणे”. या ‘ zhéxué ‘  चे मराठीत लेखन किंवा उच्चार ‘ चे श्वे ‘ असा करता येईल. ‘चे श्वे’ (zhéxué ) म्हणजे “प्रज्ञानाचे शिक्षण”.

जपानी भाषेतील Tetsugaku (‘तेत्सुगाकु’) आणि चिनी भाषेतील zhéxué (‘चे श्वे’) यांचे उच्चार वेगवेगळे दिसत असले आणि होत असले तरी ती मूळ संज्ञा एकच आहे. जसे ‘Philosophy’ आणि ‘तत्त्वज्ञान’ या दोन शब्दांचा उच्चार वेगवेगळा असला आणि शब्द वेगवेगळे दिसत असले तरी अर्थ एकच आहे किंवा मानला जातो; तसे ह्या जपानी Tetsugaku (‘तेत्सुगाकु’) व चिनी zhéxué (‘चे श्वे’) शब्दांचे आहे. त्यांचा अर्थ एकच आहे असे मानले जाते. त्यामुळे निशीने दोन्ही शब्द, परस्पर पर्यायी संज्ञा म्हणून उपयोजनात आणले. अशा रीतीने एकोणिसाव्या शतकापासून चिनी भाषेत zhéxué (‘चे श्वे’) आणि जपानी भाषेत Tetsugaku (‘तेत्सुगाकु’) असे शब्द Philosophy साठी रूढ झाले.

थोडक्यात ग्रीक Philosophia किंवा Philosophy साठी निशी अमनने ‘चे श्वे’ (zhéxué ) हे चिनी भाषांतर प्रचारात आणले आणि तेथून ते चीनी भाषेत रूढ झाले.

चिनी भाषेतीलज्ञानप्रज्ञान‘ (Wisdom)

येथे एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे प्राचीन चिनी भाषेत ‘ज्ञान-प्रज्ञान’ (Wisdom) ही संकल्पना व्यक्त करणारे दोन शब्द होते.

(१) kiken (उच्चार- ‘किकेन’) म्हणजे “ज्ञानाची साधना”.

(२) xīxián (उच्चार- ‘शि शियान’) म्हणजे “ज्ञानी आणि शहाणा माणूस होण्यासाठी शिक्षण घेणे”.

या दोन शब्दांचा उपयोग निशी अमनने zhéxué  हे रुपांतर करण्यासाठी केला. निशीने ‘kiken’ साठी जपानीत ‘kitetsu'(gaku)’ [उच्चार- ‘कितेत्सु (गाकु)’] हा शब्द वापरला.Kitetsu’ (gaku)’  म्हणजे “अर्थाची निःसंदिग्धता प्राप्त करण्याचे विज्ञान”. आणि त्याचाच उपयोग तो नंतर जपानी भाषेत Tetsugaku (‘तेत्सुगाकु’) शब्दाच्या नियोजनासाठी करतो. मग पुन्हा त्याचे भाषांतर zhéxué असे करतो.

() यान फू चे योगदान : अनुवाद कार्य 

निशी अमनने Philosophy साठी ‘चे श्वे’ (zhéxué ) हे चिनी भाषांतर १८७३ साली रूढ केले तरी ‘Philosophy’ या ग्रीक-पाश्चात्य शब्दाचा परिचय प्रथम ‘यान फू‘ (Yan Fu, जन्म: १८५४, मृत्यू: १९२१) या चीनच्या प्रबोधनकालीन विचारवंताने १८९८ साली चीनी विचारविश्वाला करून दिला.

यान फू

यान फू

यान फूच्या मते, पाश्चात्य राष्ट्रांची समृद्धी आणि राजकीय व आर्थिक सत्ता यांचे रहस्य पाश्चात्य तंत्रज्ञानात्मक प्रगतीत नाही; तर त्या प्रगतीचे रहस्य त्या प्रगतीमागे असलेल्या त्यांच्या विचारधारा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांनी शेकडो वर्षात उभ्या केलेल्या, जपलेल्या विविध वैचारिक संस्था ह्यात दडलेले आहे.

आधुनिक भांडवलशाही पाश्चात्य राष्ट्रांकडून आली, भांडवलशाहीचे तत्त्वज्ञान त्यांच्याकडून आले आणि त्या तत्त्वज्ञानाला हावरटपणाचे ग्रहण लागले. त्यामुळे शोषणाने मूळ धरले, त्याला जणूकाही समाजमान्यता मिळाली. समाजात विषमता निर्माण झाली. यान फू ला स्वतःच्या चिनी संस्कृतीचा व तत्त्वज्ञानाचा विलक्षण अभिमान होता. ‘भांडवलशाहीचा हावरटपणा-शोषण नाहीसे करण्यात चिनी तत्त्वज्ञानच तारक-उपकारक ठरेल’ असा त्याचा प्रगाढ विश्वास होता. पण तो विश्वास सिद्ध करण्यासाठी आधी पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रगतीचे रहस्य जाणून घेणे आवश्यक होते. त्या हेतूने ‘यान फू’ ने पाश्चात्य उदारमतवादी तत्त्वज्ञानातील अनेक ग्रंथांचे आणि निबंधांचे १८९६ ते १९०९-१० दरम्यानच्या पंधरा वर्षांत चिनी भाषेत अनुवाद केले. ह्या अनुवादांनी चिनी तत्त्वज्ञानाचे आधुनिकीकरण सुरु झाले.

चीनी तत्त्वज्ञानात शहाणपणाच्या अनेक गोष्टी किंवा संकल्पना स्पष्ट केल्या असल्या तरी चिनी तत्त्ववेत्त्यांनीही ‘तर्कशत्रू’ किंवा ‘विचारशत्रू’ अशी स्वतंत्र संकल्पना मांडलेली नाही, असे दिसते. अर्थात मूर्ख किंवा विचारशत्रू माणसे सर्वत्र असतात, या नियमानुसार चिनी संस्कृतीत देखील मूर्ख माणसांच्या अनेक कथा सांगितल्या जातात. त्यात “पर्वत हलवणाऱ्या मूर्ख म्हाताऱ्याची गोष्ट” प्रसिद्ध आहे. (तथापि भारतात खरोखरीच दशरथ मांझी नावाच्या एका वृद्धाने डोंगर पोखरण्याचा प्रयत्न केला होता.)

कन्फ्युशियसने शहाणपणाची आणि मूर्खपणाची काही उदाहरणे दिली आहेत. त्याची चार वचने महत्वाची आहेत :

 • “तो जो जाणतो आणि ‘आपण काय जाणतो’ हे जो जाणतो ते प्रज्ञानी असतो – त्याला अनुसरा (“He Who Knows And Knows That He Knows Is A Wise Man – Follow Him).
 • “तो जो जाणत नाही आणि ‘आपण काय जाणत नाही’, हे जो जाणत नाही तो मूर्ख असतो – त्याला टाळा (“He Who Knows Not And Knows Not That He Knows Not Is A Fool – Shun Him”).
 • जो माणूस प्रश्न विचारतो तो केवळ काही क्षणांसाठी मूर्ख असतो, जो प्रश्न विचारतच नाही तो आयुष्यभर मूर्ख असतो. (“The man who asks a question is a fool for a minute, the man who does not ask is a fool for life.”)
 • काहीतरी शिकल्याखेरीज तुम्ही पुस्तक उघडू शकत नाही. (“You Cannot Open a Book Without Learning Something”)

लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि  व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS