उपयोजित तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व

उपयोजित तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व

प्रस्तुत लेखमालिकेच्या ‘तत्त्वचिंतन : उपयोग की उपयोजन’ (भाग १२) या लेखात ‘तत्त्वज्ञानाचा उपयोग काय? हा प्रश्न योग्य नसून ‘तत्त्वज्ञानाचे उपयोजन कसे कर

तत्त्वज्ञानाचा नकाशा कसा वापरावा?
तत्त्वचिंतन : उपयोग (Use) की उपयोजन (Application)
“…..चे तत्त्वज्ञान”

प्रस्तुत लेखमालिकेच्या ‘तत्त्वचिंतन : उपयोग की उपयोजन’ (भाग १२) या लेखात ‘तत्त्वज्ञानाचा उपयोग काय? हा प्रश्न योग्य नसून ‘तत्त्वज्ञानाचे उपयोजन कसे करावे?’ हा प्रश्न योग्य असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतरच्या ‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे अंतरंग’ (भाग १३) या लेखात ‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे स्वरूप आणि त्याची सात संकल्पने’ मी विशद केली आहेत. या लेखात ‘उपयोजित तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व’ हा मुद्दा चर्चिला आहे.

‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे अंतरंग’ या लेखात अधोरेखित केल्यानुसार दोन मुद्दे नमूद करणे महत्वाचे आहे: (१) ‘तत्त्वज्ञान उपयोजित करणे’ हा मुद्दा जागतिक पातळीवर तत्त्वज्ञानाच्या आणि इतर ज्ञानक्षेत्राच्या अग्रक्रमावर आला आहे. विशेषतः अमेरिका आणि युरोपियन आणि काही मोजक्या  आशियायी देशातील आहे. अर्थात तेथेही यावर फार कसून काम चालू आहे, असे नाही. (२) भारतात आणखी वाईट अवस्था आहे. ‘तत्त्वज्ञान उपयोजित करणे’ हा मुद्दा अग्रक्रमावर येणे दूरच पण अजून परिघावरही याविषयी आवश्यक तात्त्विक भान विकसित झालेले नाही. अर्थात हे चित्र दुर्दैवाचे आहे.

‘उपयोजित तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व नेमके कोणावर आहे?’ या विषयी अजून जागतिक पातळीवर अभ्यासकांमध्ये संभ्रम आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये विषय अग्रक्रमावर आला असला तरी कसून काम चालू नसण्याचे हे मुख्य मुख्य कारण आहे. ‘संभ्रम आहे’ याचा अर्थ तिथे काहीएक सैद्धांतिक काम झाले आहे-चालू आहे आणि त्यात नेमकी कोणती भूमिका घ्यावी, या विषयी वाद आहेत. इतर काही देशांत ते वादच नाहीत, कारण अभ्यासच नाही. आणि आपल्या देशाचा विचार करता भारतात हे काम न होण्याची बहुविध कारणे आहेत. मूलतः उपयोजित तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाचा विचार येथे अजूनही रुजलेला नाही. परिणामी त्याच्या उपयुक्ततेच्या (use) आणि उपयोजनाच्या (application) अध्ययनाचाही विचार होत नाही. थोडक्यात, ‘अध्ययन-अध्यापन आणि संशोधन या तिहेरी पातळीवर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील अभाव’ हे भारतातील मूलभूत कारण आहे. पण याचा अर्थ असा नाही की, ‘उपयोजन’ (application) या संकल्पनेचे चिंतन झालेले नाही; ‘उपयोजित नीतिशास्त्र’ या ज्ञानशाखेचा विचार करताना ‘उपयोजन’ संकल्पना अभ्यासली गेली आहे. या ज्ञानशाखेचा योग्य तो परिचयही गेल्या दशकभरात विद्यापीठीय अभ्यासक्रमात करून दिला गेला आहे. पण त्यापुढे जाऊन ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ या संकल्पनेबाबत मात्र जाणिव विकसित होत नाही.

‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे अंतरंग’ या लेखात आपण असे पाहिले की ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ या संकल्पनेची चर्चा अमेरिकन विश्लेषक तत्त्ववेत्ता आणि नीतिशास्त्रज्ञ-सौंदर्यशास्त्रज्ञ लेस्ली स्टीव्हनसन (१९०८-१९७९) आणि डेन्मार्क येथील राजशास्त्रज्ञ आणि राजकीय व नैतिक तत्त्ववेत्ता कॅस्पर लीपरेट रासम्युसन (१६-०१-१९६४, हयात …. ) यांनी त्यांच्या दोन स्वतंत्र प्रदीर्घ निबंधात केलेली आहे. स्टीव्हनसन ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ ही संकल्पना स्पष्ट करताना (१) ह्या संकल्पनेची तुलना विद्यापीठीय अभ्यासक्रमात नेमल्या गेलेल्या पारंपरिक तत्त्वज्ञानाशी तो तुलना करतो. म्हणजे पारंपरिक समजले जाणारे ‘शुद्ध तत्त्वज्ञान’ आणि नवे ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ असा फरक करतो. (२) त्यानंतर उपयोजित तत्त्वज्ञाना’ची निर्मिती करण्याचे उत्तरदायित्व स्वीकारणारा वर्ग कोणता असू शकतो, अशा दोन मुद्द्यांची चर्चा तो करतो. (स्टीव्हनसनची ही समग्र चर्चा गृहीत धरून रासम्युसन ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ च्या स्वतःची सात संकल्पने (Conceptions) विकसित करतो.)

येथे आपण स्टीव्हनसनच्या दोन्ही मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार करु.  पहिला मुद्दा ‘शुद्ध तत्त्वज्ञान’ आणि उपयोजित तत्त्वज्ञान’ यात स्टीव्हनसनने केलेल्या फरकाचा आहे. त्यानंतर ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ ची निर्मिती करण्याचे उत्तरदायित्व स्वीकारणारा वर्ग निश्चित करणे’ हा आहे.

शुद्ध तत्त्वज्ञान

शुद्ध तत्त्वज्ञान म्हणजे विद्यापीठीय अभ्यासक्रमात नेमून दिलेले तत्त्वज्ञान. भारतीय-ग्रीक-पाश्चात्य-चिनी-इस्लामी इत्यादी तत्त्ववेत्ते, त्यांच्या विचारधारा, त्यानुषंगाने निर्माण झालेले विविध तात्त्विक वाद;  तसेच सत्ताशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी पाच ज्ञानशाखा आणि त्यांच्या संयुक्त अध्ययनातून निर्माण होणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक तर्कशास्त्र, मनाचे तत्त्वज्ञान/तर्कशास्त्र/ज्ञानशास्त्र, विज्ञानाचे तत्त्वज्ञान/मूल्यशास्त्र/तर्कशास्त्र/सौंदर्यशास्त्र किंवा गणिती/खगोलीय सत्ताशास्त्र यांचे   विद्यापीठीय  चौकटीतील: अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन आणि संशोधन या पद्धतीने होणारा अभ्यास, यांचा समावेश शुद्ध तत्त्वज्ञानात होतो.

उपयोजित तत्त्वज्ञान

उपयोजित तत्त्वज्ञान म्हणजे रोजच्या किंवा नेहमीच्या जगण्याशी निगडीत असणाऱ्या कोणत्याही सामाजिक समस्येची विवेकवादी चर्चा करून तात्त्विक निष्कर्षाला येणे. जसे की युद्धाचे जनजीवनावर होणारे परिणाम तपासणे-म्हणजेच ‘युद्धातील नैतिकता’ तपासणे (युक्रेन-रशिया आणि त्याकडे जगाची पाहाण्याची दृष्टी तपासणे), त्याद्वारे ‘युद्धाचे नीतिशास्त्र’ रचणे. तसेच भारतीय शेती पद्धतीतील बदलाचे परिणाम तपासताना ‘शेतीचे तत्त्वज्ञान’ अथवा ‘शेतीचे नीतिशास्त्र’ रचणे. धार्मिक-राजकीय विचारसरणी (लोकशाहीवाद विरुद्ध हिंदुत्ववाद), जागतिक आर्थिक विकास (श्रीमंत देशांनी गरीव राष्ट्रांना मदत करावी का?), शिक्षण-आरोग्य-वाहतूक-वाहन उद्योगधंदा, नदीजोड प्रकल्प किंवा धरण प्रकल्पांचे नियोजन, याविषयीच्या धोरणांचे आयोजन (विकासाचे तर्कशास्त्र व नैतिकता) अशा विविध मुद्द्यांची तात्त्विक तपासता त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण करणे म्हणजे उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करणे, असते.

आता, असे सुचविले जाईल की शुद्ध तत्त्वज्ञान ही सामान्य स्वरूपाच्या प्रश्नांची चर्चा असते तर उपयोजित तत्त्वज्ञान ही अधिक विशिष्ट स्वरूपाच्या प्रश्नांची चर्चा असते. पण हा फरक फक्त पातळीचा आहे. ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ चे काही प्रश्न शुद्ध तात्त्विक प्रश्नांपेक्षा भिन्न आहेत; उदाहरणार्थ ‘शैक्षणिक धोरणविषयक तत्त्वज्ञान’ हा उपयोजित प्रश्न ‘नाम’ संकल्पनेला अर्थ असतो का? या शुद्ध तत्त्वज्ञानातील तर्कशास्त्र या शाखेतील प्रश्नापेक्षा भिन्न आहे, असे सूचित केले जाऊ शकते. पुढे जाऊन असेही सूचित केले जाईल की, हा फरक केवळ ‘प्रेरणा’ सूचक आहे. म्हणजे शुद्ध तत्त्वज्ञान ही ‘स्वान्तसुखाय पंडिती कसरत’ आहे तर उपयोजित तत्त्वज्ञान हे ज्यांच्या उत्तरांची आता नितांत ‘गरज’ आहे, त्याच्याशी निगडीत आहे.

‘गरज’ ही संकल्पना सूचित करणे, ही त्यातल्या त्यात योग्य उत्तराच्या जवळ जाणारे सूचन आहे. ‘गरज आहे’ म्हणजे नेमके काय आहे? हा प्रश्न येथे उपस्थित केला पाहिजे. तर त्याचे संभाव्य उत्तर “आत्ता आपण काय करावे” ह्या कृतीमध्ये काही बदल होणार आहे. याचा अर्थ थोडक्यात मांडायचे तर उपयोजित तत्त्वज्ञान अनिवार्यपणे ‘कृती’ शी निगडीत आहे, मग ती कृती एखाद्याची खासगी नैतिकता असो की सार्वजनिक धोरण असो. म्हणजे उपयोजित तत्त्वज्ञान हे सॉक्रेटीस म्हणतो तसे किरकोळ बाबीची चर्चा करीत नसून आपण ‘कसे जगणे हे आपले ‘कर्तव्य’  आहे, याच्याशी निगडीत आहे. इथे काही मुद्दे मांडता येतील:

  • पहिला, उपयोजित तत्त्वज्ञान ही अनिवार्यपणे आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा आहे. कारण ज्या प्रश्नांचा आपण विचार करतो आहोत ते असे संकीर्ण आहेत की ज्याच्याशी अनेक विद्याशाखांच्या तज्ज्ञांची गरज आहे. याचाच अर्थ उपयोजित तत्त्वज्ञान ही सहकार्याने करण्याची जोखीमीची गोष्ट आहे. आणि असे सहकार्य मिळविणे बिलकुल सोपे नाही! याचे मुख्य कारण ज्या तत्त्ववेत्त्यावर ही मोठी जबाबदारी येते की त्याने इतर तज्ज्ञांना आपल्या ज्ञानशाखेची (तत्त्वज्ञानाची) आणि त्याची स्वतःची त्यातील तज्ज्ञ म्हणून, अशी दुहेरी उपयोगिता समजून दिली पाहिजे.
  • दुसरा मुद्दा, उपयोजित तत्त्वज्ञानासाठी अंतर्दृष्टी, कल्पनाशक्ती आणि समन्वयवृत्तीची गरज आहे.
  • तिसरा मुद्दा, ‘शुद्ध आणि उपयोजित’ यातील सीमारेषा अतिशय धूसर असतात, जसे की कृत्रिम ‘गर्भनिरोधकबंदी’ मुळे ‘नैसर्गिक नियमाच्या न्याय्यतेचा ‘शुद्ध तात्त्विक प्रश्न’ निर्माण होतो. आणि शुद्ध तात्त्विक तत्त्वे विशिष्ट समस्यांना लागू करता येतात, जसे की सिद्धांताच्या वैज्ञानिकतेच परीक्षण करण्याचा नियम मनोविश्लेषण आणि सामाजिक अवधारणा यांना लागू होऊ शकतो.
  • चौथा मुद्दा असा की उपयोजित तत्त्वज्ञान आणि जीवनाच्या कुठल्याही प्रश्नासाठी सामान्य अक्कल वापरणे यात फरक नाही. (प्रत्येक माणूस स्वतःच एक उपयोजित तत्त्ववेत्ता असतो). पण प्रत्येकजण शुद्ध तत्त्वज्ञानात रुचि रस असलेला असतोच असे नाही आणि प्रत्येकाची तेवढी क्षमता असते असेही नाही. त्याचवेळी शुद्ध तत्त्वज्ञानातील प्रत्येक उपविषयाला त्याला भिडायचे असते असेही नाही. म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक पैलूशी सामान्य माणसाला भिडायचे असतेच, असेही नाही. उदाहरणार्थ गणिताचे तत्त्वज्ञान जगण्याशी कोणताही संबंध राखीत नाही, त्यामुळे गणितात मनापासून रुचि असलेल्या आणि तात्त्विक दृष्टिकोन असणाऱ्या तज्ज्ञाशिवाय या विषयाकडे कोणीही वळणार नाही.

तेव्हा आता निष्कर्ष असा की शुद्ध तत्त्वज्ञानाला असे स्वतःचे असे खास चिंतन विषय असतात; पण तत्त्वज्ञानेतर लोकांनी रुचि घ्यावेत असे नसतात. त्याचबरोबर हेही सत्य आहे की तत्त्वज्ञानाला लोकहिताचे अत्यंत तातडीचे प्रश्न हाताळणे आवश्यक असते. तेव्हा ‘लोकहिताचे तातडीने हाताळणे आवश्यक असलेले तत्त्वज्ञान म्हणजे उपयोजित तत्त्वज्ञान’ होय.

  • यातूनच पाचवा मुद्दा येतो की उपयोजित तत्त्वज्ञानाची स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सार्वजनिक धोरणांच्या संदर्भात आपल्या प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित सामूहिकरीत्या आवश्यकता आहे.आणि आता साहजिकच प्रश्न उद्भवतो की नितांत गरजेची असलेली उपयोजित तत्त्वज्ञान कसे निर्माण करावे, कुणी करावे आणि कुठे करावे? गेल्या काही वर्षात व्यावसायिक तत्त्वज्ञानाची उभारणी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब असली तरी, उपयोजित तत्त्वज्ञानाची गरज मात्र फारशी भागवली गेलेली नाही, खरे तर त्याची गरजेची जाणिवही अजून झालेली नाही.

आता, प्रश्न आहे की उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे काम (१)विद्यापीठांवर सोपवावे की (२) त्यासाठी विशेष संस्था आणि महाविद्यालये स्थापन करावीत की (३) संबधित तज्ज्ञ  व्यक्तीवरच ते सोपवावे? या तिन्ही प्रश्नांना ‘होय’ म्हणता येईलही. विशेषतः ‘मुक्त समाजव्यवस्था’ अन ‘लोकशाही’ नुसार प्रत्येक व्यक्तिला विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे गृहीत धरून प्रत्येक व्यक्ति धर्म, राजकारण, नीती इत्यादी बाबत आपले उपयोजित तत्त्वज्ञान मांडू शकते. प्रत्येकजण व्यापक संवाद माध्यमांच्या साह्याने जास्तीत जास्त तथ्ये व लोकमते गोळा करून त्या विषयाचे उपयोजित तत्त्वज्ञान मांडू शकतोच शकतो. या दिशेने समाजाची पुढील वाटचाल मोठ्या प्रमाणात व्हावी, असे धोरण आखणे हा शैक्षणिक धोरणाचा भाग राहील, म्हणजेच ‘समाजाचे तातडीचे प्रश्न सोडविणारे उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करणे’ हा विद्यापीठांचा विषय ठरतो.

आंतरविद्याशाखीय स्वरूप

अर्थात प्रत्येकजण काहीएक प्रकारचे उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करण्याची क्षमता बाळगतो असे नाही, याचे कारण उपयोजित तत्त्वज्ञानाचे स्वरूप आंतरविद्याशाखीय आहे. याचाच अर्थ उपयोजित तत्त्वज्ञानाच्या निर्मितीत आवश्यक असलेली तज्ज्ञता एकाच व्यक्तीत एकवटलेली असेलच असे नाही. म्हणूनच उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करण्याची जबाबदारी कुणा एकावर आणि तत्त्वज्ञानात प्रशिक्षित नसलेल्या माणसावर सोपविता येत नाही. त्याचवेळी केवळ तत्त्वज्ञानात प्रशिक्षित असलेल्या व्यक्तिवरही ती जबाबदारी सोपविता येत नाही. म्हणजेच कोणत्याही क्षेत्रातील केवळ एका तज्ज्ञ ‘दादा’ व्यक्तिची जबाबदारी असू शकत नाही. कोणाही एका व्यक्तिचे प्रयत्न पुरे पडत नसतात. म्हणूनच ‘सार्वजनिक धोरणांसाठीच्या उपयोजित तत्त्वज्ञान’ निर्मितीसाठी   सामूहिकरीत्या प्रयत्न करणे अनिवार्य ठरते. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक, अभ्यासगट, समित्या, संशोधन संस्था, आयोग (थिंक टंक- विचारसाठे) आणि प्रकाशने यांची गरज आहे.

इंग्लंडमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ सारख्या संस्थेचे उदाहरण यासंदर्भात लक्षात घेता येईल.  ही संस्था धार्मिक स्वरुपाची आहे. तरीही त्या संस्थेने धर्मविरोधी समजल्या जाणारी गर्भपात, गर्भनिरोधके यातील तज्ज्ञांचा आणि डॉक्टरांची कर्तव्ये यांचा अभ्यास करणाऱ्या वैद्यकीय नीतिशास्त्राला उपयोगी पडणारे साहित्य तयार करणारा अभ्यासगट १९६९ ला तयार केला. ब्रिटनमध्ये सरकारनेच १९५७ ला  समलिंगी, वेश्यांचे गुन्हेगारीकरण या विषयावर वोल्फेंडेन समिती स्थापून तिचा अहवाल (Wolfenden report) प्रसिद्ध केला आणि कायद्यात सुधारणा केली. सर्वात मोठे उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करणारे उदाहरण म्हणजे Philosophy at Work ही ब्रिटनमधील १९६५ साली प्रकाशित झालेली ग्रंथमाला (संपादक पॅट्रिक कोर्बेट, हचिसन पब्लिकेशन्स, ब्रिटन) किंवा Philosophy and Public Affair हे नियतकालिक.

‘श्रम’ हा आजपर्यंत केवळ एक आर्थिक मुद्दा समजला जात होता. त्याआधारे कार्ल मार्क्ससारख्या तत्त्ववेत्त्यांनी त्याचे तत्त्वज्ञान मांडले. ‘श्रम’ हाच मुद्दा भारतीय वर्ण-जातभेद आणि मानववंशातील महत्वाचा लिंगभेद करणारा होता. पण आता तो केवळ आर्थिक मुद्दा नसून त्याला तात्त्विक आयाम असल्याचे अभ्यास होत आहेत, हे उपयोजित तत्त्वज्ञानाचे फलित आहे. श्रमाला तात्त्विक अंग असून श्रमांकडे तत्त्वज्ञानात्मक परिप्रेक्ष्यातून पहाणे आवश्यक आहे, असा मुद्दा जागतिक पातळीवर चर्चिला जात आहे (Philosophical Approaches to Work and Labor)

समकालिन जीवनातील प्रश्नांवर तात्त्विक उपाययोजना सुचवून त्याद्वारे तत्त्वज्ञानाची व्यावहारिक संयुक्तता दाखवून देणे हा हेतू उपयोजित तत्त्वज्ञानामागे आहे. आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांमधूनच तात्त्विक प्रश्नांचा उदय कसा होतो, त्यांचा व्यापक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम कसा होतो आणि तत्त्वज्ञान त्याविषयी काय करु शकते, हे तपासणे, त्याचप्रमाणे तात्त्विक विश्लेषण आपल्या नैतिक वृत्ती-प्रवृत्ती, इच्छा आणि निर्णय यांना प्रबोधित कसे करते, हे दर्शविणे हा मुख्य हेतू उपयोजित तत्त्वज्ञानामागे असतो. माणूस आणि तत्त्वज्ञान यासंबंधी समकालोचित उदारमतवादी दृष्टिकोन कसा विकसित करता येईल, याचे सर्वंकष प्रयत्न करणे हीच उपयोजित तत्त्वज्ञानाची संकल्पना आहे.

आणि आता, एकूण विज्ञान-तंत्रज्ञानाची अतिशय गतिमान प्रगती, तिने निर्माण केलेले दारिद्र्य, शोषणाची नवी साधने, मानवी अस्तित्वाचे होत जाणारे अवमूल्यन इत्यादी नैतिक प्रश्न, त्याचप्रमाणे संगणकविश्वनिर्मित आभासी जगासारखा ज्ञानात्मक प्रश्न व त्यात गुंतलेले इतर ‘आभासी गुन्हे इत्यादी कायदेशीर प्रश्न, त्याचप्रमाणे धर्मसंस्था व राज्यसंस्था यांच्या परस्परसंबंधाचा वाढता प्रभाव-त्यामुळे धोक्यात येणारी लोकशाही, इत्यादी मूलभूत  सामाजिक व राजकीय प्रश्नांचा सामना करण्यासाठी उपयोजित तत्त्वज्ञानाची सर्वाधिक गरज आहे. जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता आणि सामाजिक विश्लेषक कार्ल पॉपरच्या म्हणण्यांनुसार ज्यांच्याकडे विशेष ज्ञान आहे, त्यांची सामाजिक व ज्ञानात्मक जबाबदारीही विशेष स्वरुपाची असते. त्याच्या म्हणण्यांनुसार सामाजिक स्वरूपाचे तात्त्विक प्रश्न सोडविण्यासाठी तत्त्वज्ञान आणि इतर विशेष ज्ञानी लोकांनी एकत्र येणे फार आवश्यक आहे. अमेरिकेतली Centre for the Study of Democratic Institutions ही संस्था याच हेतूसाठी २००० साली स्थापन झाली आणि तिचे कार्य तिच्या नावातून जाणवते त्यापेक्षा अधिक मौलिक व व्यापक आहे.

उपयोजित तत्त्वज्ञान र्निमिती: आव्हान आणि आवाहन

अखेरचा मुद्दा असा की उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करण्यासाठी कोणत्या कृती कराव्या लागतील? हे एक मोठे आव्हान आणि आवाहन आहे. याकामी तत्त्वज्ञान विभागाने पुढाकार घेणे आवश्यक राहील. त्यांचे प्रयत्न किमान तीन प्रकारचे असू शकतात:

  • विद्यापीठीय तत्त्वज्ञान विभागांनी शुद्ध तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन करण्याबरोबरच प्राथमिक पातळीवरील अभ्यासक्रमात उपयोजित तत्त्वज्ञानाचा समावेश करावा.
  • त्यानंतर कालांतराने योग्य व पात्र अध्यापक वर्ग तयार झाल्यानंतर स्वतंत्र व स्वायत्त उपयोजित तत्त्वज्ञान विभाग निर्माण करावे. हे विभाग तत्त्वज्ञान विभागाशी कायमस्वरूपी संलग्न असावेत. त्यासाठी आवश्यक नियम व प्रशासकीय तरतूदी संबंधितांकडून मंजूर करवून घ्याव्यात. (अर्थात हेही काम प्रारंभी अवघड असेल, पण अशक्य नसेल.)
  • भारतात गेल्या काही वर्षात स्वायत्त महाविद्यालयांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना विद्यापीठीय अभ्यासक्रम आता फारसे सक्तीचे नाहीत. ही महाविद्यालयांना आपापले अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य लाभले आहे. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांनाही ‘गरजेनुसार’ (need based) उपयोजित तत्त्वज्ञानाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी इत्यादी अभ्यासक्रम तयार करता येतील.

संवेदनशील तज्ज्ञांची गरज

प्रस्तुत अभ्यासक्रम निर्मितीसाठी तत्त्वज्ञान व इतर ज्ञानक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्रातील तज्ज्ञ यांची गरज आहे. त्यांना एकत्रित आणावे. त्यातील प्रत्येक व्यक्तिला लोकशाहीवादी समाजाचा नागरिक या नात्याने ‘आपले जीवन कसे जगावे’ आणि ते जगताना राजकीय, नैतिक आणि धार्मिकबाबतीत विवेकवादी रीतीने विचार करणे आवश्यक आहे, याचे मूलभूत भान जगे करावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीस असा विचार करण्यास उत्तेजन देता यावे, या हेतूने ‘माणूस हा विचार करणारा जीव’ आहे, याचेही भान त्याच्यात निर्माण करावे. विशेषतः भावी राजकारणी, समाजकारणी, सरकारी नोकरशाही, वैज्ञानिक, तंत्रवेत्ते, आर्थिक-सामाजिक विश्लेषक, कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, व्यवस्थापक, माध्यमकर्ते, उद्योजक, नियोजक इत्यादींची एकत्र आणून त्यांना प्रथम तत्त्वज्ञानाचे मूलभूत प्रशिक्षण द्यावे.

उपयोजित तत्त्वज्ञान प्राथमिक पातळीवर ऐच्छिक असावे. त्यानंतर सर्व विद्याशाखीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, पण सक्तीचे नसावे. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, ललितकला, वृत्तपत्रविद्या व संज्ञापन, व्यवस्थापन इत्यादी सर्वांसाठी हा नियम असावा. कदाचित, ह्या नव्या कार्यक्रमाला विरोध होऊ शकेल, हे अधोरेखित ठेवून तत्त्वज्ञानाच्या सुजाण अध्यापकांनी सावधगिरीने समाजसेवा करावी. ‘तत्त्वज्ञान निरुपयोगी, कालबाह्य आहे’ हा प्राचीन आरोप लक्षात घेता सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तत्त्ववेत्त्यांनी व व्यावसायिक तत्त्ववेत्त्यांनी आपले जीवन तुकोबा म्हणतात तसे “बुडती हे जन I न देखवे डोळा” या उक्तीनुसार आणि बुद्धाने प्रतिपादलेल्या ‘महायान’ संकल्पनेनुसार समाजाला अर्पित करणे आवश्यकच आहे. नव्हे तर ते अनिवार्य ठरावे. तत्त्ववेत्त्यांची व व्यावसायिक तत्त्ववेत्त्यांची ‘तत्त्वज्ञानाचे विशेष अभ्यासक व तज्ज्ञ’ या भूमिकेतून कार्ल पॉपर म्हणतो तसे विशेष नैतिक जबाबदारी आहे.

उपयोजित भारतीय तत्त्वज्ञान

या वैचारिक पार्श्वभूमीवर आपण आपल्या प्राचीन दर्शन परंपरेकडे कसे पाहू? हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे.

‘उपयोजित भारतीय तत्त्वज्ञान’ अशी काही नवी ज्ञानराशी आपण निर्माण करु शकतो का? हा एक खूप विस्तारपूर्वक चिंतनाचा मुद्दा आहे. त्यावर स्वतंत्र लेखच नव्हे तर स्वतंत्र ग्रंथमाला लिहिणे आवश्यक आहे. आणि अर्थातच तो आंतरविद्याशाखीय प्रकल्प आहे. येथे मी त्याचे केवळ सूतोवाच करु शकण्याचे धाडस करतो.

उदाहरणादाखल रासम्युसनने ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ ची सात संकल्पने (Conceptions) मांडली त्यापैकी ‘समकाल सुसंबद्ध संकल्पन’ (Relevance Conception) चे प्रारूप जर भारतीय तत्त्वज्ञानास लागू केले-म्हणजे उपयोजित केले तर ‘भारतीय तत्त्वज्ञानाचे समकाल सुसंबद्ध संकल्पन’ निर्माण करता येईल का? असा प्रश्न उपस्थित करता येईल. त्याचे थोडक्यात स्वरूप असे:

भारतीय तत्त्वज्ञानाचे समकाल सुसंबद्ध संकल्पन    

रोजमर्रा जगण्याच्या महत्वाच्या प्रश्नांना तत्त्वज्ञान उपयोजित केले तर, आणि तरच, ते तत्त्वज्ञान उपयोजित तत्त्वज्ञान बनते.”  हे सूत्र ‘तत्त्वज्ञान’  उपयोजित होण्याचा पाया आहे. येथे रासम्युसन ग्रीक-पाश्चात्य, नवयुरोपीय तत्त्वज्ञान समोर ठेवून व्याख्या देतो आहे. पण आपण ती अधिक विस्तृत करून तिच्यात चिनी, भारतीय इत्यादी जगातील सारी तत्त्वज्ञाने समाविष्ट करु. भारताच्या संदर्भात भारतीय दर्शनांचाही समावेश करणे अनिवार्य ठरेल. त्यात त्यांची प्राचीन रूपे आणि आधुनिक रुपे यांचा  समावेश होतो. येथे दोन मुद्दे आहेत.

पहिला असा की, ‘भारत’ या प्रदेशात ‘आज’ च्या विसाव्या शतकातील ‘विद्यमान काळा’ तील हे वरील प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय न्याय-वैशेषिक, सांख्य-योग किंवा वेदांत तत्त्वज्ञान उपयोगी पडू शकते का? भारतीय तत्त्वज्ञानाचे उपयोजन करता येऊ शकते का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांना समाधानकारक, पण सत्य व युक्त उत्तरे देता आली तर  ‘भारतीय तत्त्वज्ञानाचे समकाल सुसंबद्ध संकल्पन’ करता येऊ शकले तर ती ‘समकाल सुसंबद्ध उपयोजित भारतीय तत्त्वज्ञान’ संकल्पना निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, वरील प्रश्नांच्या संदर्भात बौद्ध दर्शनातील ब्रह्मविहार (मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा) चा या प्रश्नांची जाणिव होण्यापुरते उपयोजन होऊ शकेल. त्याचप्रमाणे विवेकानंदांनी मांडलेला ‘व्यावहारिक वेदांत’ हे तत्त्वज्ञान वर्णजातीभेदावरील हिंदूधर्मात सुचविण्यात आलेला उपाय मानता येईल (का?). त्याचप्रमाणे ‘लोकशाही इहवाद’ (सेक्युलॅरिझम) हे तत्त्वज्ञान ‘कालसुसंबद्ध उपयोजित तत्त्वज्ञान’ होऊ शकते पण आरेसेप्रणित ‘हिंदुत्ववादी तत्त्वज्ञान’ ला तो दर्जा मिळू शकणार नाही. या दृष्टिकोनातून पाहाता ‘हिंदुत्ववादी तत्त्वज्ञान किंवा वेदांत, मनुस्मृतीतील विचारसरणीला किंवा ‘लोकशाही इहवाद’ (सेक्युलॅरिझम) या विचारसरणीला ‘कालसुसंबद्ध तत्त्वज्ञान’ म्हणता येऊ शकेल का?’ असा प्रश्न उपस्थित करता येईल.

दुसरा मुद्दा असा की, प्राचीन भारतीय दर्शने आपणास माहित आहेत, पण “आधुनिक भारतीय दर्शने कोणती ?”  हाच तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून तत्त्वज्ञानाच्या विश्वात आणि दैनंदिन जगण्यातील वाढता धर्मज्वर व हिंसक उद्रेक पाहाता लोकांच्या जगण्याच्या विश्वात, रोजमर्रा महत्वाचा प्रश्न होऊ शकतो. त्याची जाण दुर्दैवाने अजून विकसित झालेली नाही.

अशा साऱ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी कालसुसंगत व कालसुसंबद्ध निर्णयासाठी तत्त्ववेत्ते, व्यवसायिक तत्त्ववेत्ते (तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक), धर्माचे तत्त्ववेत्ते आणि राजकीय-सामाजिक-आर्थिक तज्ञ यांच्या अभ्यासगटाची, सरकारी आयोगाची गरज आहे.

श्रीनिवास हेमाडेतत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0