भारत बंद यशस्वी

भारत बंद यशस्वी

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन शेती कायद्यांच्याविरोधात देशातल्या शेतकरी, कामगार व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला बहुतांश राज्यात चांगला प्रति

संघप्रणित किसान संघाची बंदपासून फारकत
आज भारत बंद, २५ कोटी नागरिक सामील होण्याची शक्यता
भारतबंद संमिश्र प्रतिसाद, रेल्वे सेवेवर मात्र परिणाम

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन शेती कायद्यांच्याविरोधात देशातल्या शेतकरी, कामगार व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला बहुतांश राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. निमशहरी व ग्रामीण भागात सकाळपासून दुकाने, कार्यालये, व्यापारी आस्थापने बंद होते. रस्त्यावरची वाहतूकही तुरळक होती. शेतकरी संघटना व विरोधी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. अनेक ठिकाणी निदर्शने झाली. बँकांमधील व्यवहार काही ठिकाणी विस्कळीत झाले होते. पण कडकडीत बंद पंजाब, हरयाणा व दिल्लीमध्ये दिसून आला.

पंजाबमध्ये सर्व जनजीवन ठप्प झाले होते. राज्यातले चार हजारहून अधिक पेट्रोल पंप बंद होते. शेतकरी नेते दुकानदारांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. राज्यातले भाजप वगळता सर्व पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. ५० हजारहून अधिक सरकारी कर्मचार्यांनी मंगळवारी नैमत्तिक रजा घेतली होती.

प. बंगाल, बिहार व ओदिशात, म. प्रदेश, छत्तीसगडमध्येही बंदचा परिणाम दिसून आला. राजस्थानमध्ये मंडया बंद होत्या पण दुकाने चालू होती. या राज्यात काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुरळक झडपा दिसून आल्या.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद, सांगली, विदर्भातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. या शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, शेतकरी-कामगार संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

राजधानी दिल्लीत बंदचा चांगला परिणाम दिसून आला. एपवर चालणार्या टॅक्सीसेवा बंद होत्या. रिक्शा व टॅक्सी संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. सरकारी कार्यालये, बँका सुरू होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवल्यावरून दिल्ली पोलिस व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती. केजरीवाल हे शेतकरी संघटनांच्या नेत्यांना भेटणार असल्याच्या कारणावरून त्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आपच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. पण दिल्ली पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले. संध्याकाळी केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात आपण सकाळीच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आंदोलकांसोबत अर्धा तास बसणार होतो. पण ही बातमी पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी आपल्याला घरातून बाहेर पडू दिले नाही, असे सांगितले.

प. बंगालमध्ये तृणमूल, डावे व काँग्रेस पक्ष भारतबंदमध्ये सामील झाले होते. आंदोलकांनी काही ठिकाणी रेल्वेसेवा बंद करण्याचा प्रयत्न केला. बंदमध्ये सार्वजनिक बससेवा, टॅक्सी सेवेवर परिणाम झाला.

बिहारमध्ये बंदचा रेल्वे सेवेला फटका बसला. राजद, काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पटण्यात पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. जेहानाबादमध्ये पटना-पलामू एक्स्प्रेस अडवून धरण्यात आली होती.

ओदिशात भुवनेश्वर, कटक, भद्रक, बालासोर येथे बंदचा परिणाम दिसून आला.

छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी बंदचा परिणाम दिसून आला. राजधानी रायपूरमध्ये बंद यशस्वी झाला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: