नवी दिल्ली : नागरी अधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावर भीमा-कोरेगाव आंदोलन व माओवाद्यांशी कथित संबंध ठेवल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीतून स्वत:ला विलग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एस. रवींद्र भट यांनी गुरुवारी अचानक घेतला. न्या. भट यांच्या या निर्णयाने गौतम नवलखा यांच्यावरच्या खटल्यातून स्वत:चे अंग काढून घेणारे ते सर्वोच्च न्यायालयातील पाचवे न्यायाधीश ठरले आहेत.
भीमा-कोरेगांव हिंसाचार प्रकरणातील एक आरोपी म्हणून नवलखा यांच्यावर खटला सुरू आहे. नवलखा यांनी आपल्यावरचे आरोप मागे घ्यावेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका फेटाळल्याने नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी ज्या पीठापुढे आल्या त्या पीठातील आजपर्यंतच्या चार न्यायाधीशांनी स्वत:ला या प्रकरणातून विलग केले आहे. त्यामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एन. वी. रमण, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. बीआर गवई या न्यायाधीशांचा समावेश आहे. गुरुवारी न्या. भट यांनी स्वत:ला वेगळे केले. न्या. भट यांच्या पीठात न्या. विनित सरन व न्या. अरुण मिश्रा होते. आता या खटल्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
COMMENTS