माझी अखेरची निवडणूकः नितीश कुमार

माझी अखेरची निवडणूकः नितीश कुमार

पटनाः बिहार विधानसभा निवडणुकांच्या तिसर्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार गुरुवारी संपुष्टात आला. या प्रचारात पुर्णिया जिल्ह्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपली ही अखेरची निवडणूक असल्याची घोषणा केली. ‘अंत भला तो सब भला’, असे म्हणत जेडीयूच्या उमेदवाराला निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी केली.

तिसर्या टप्प्यात १९ जिल्ह्यातील २ कोटी ३५ लाख मतदान असून १२०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. शनिवारी हे मतदान होत आहे. हे मतदान बहुतांश बिहारच्या सीमांचल भागात होत असून तेथे मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अररिया व सहरसा येथे प्रचार सभा घेतल्या. त्यांनी एकूण १२ सभा घेतल्या. नितीश कुमार यांना निवडून द्यावे असे एक पत्र मोदींनी बिहारच्या जनतेला उद्देशून लिहिले आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी मधेपुरा व अररिया येथील सभेत ईव्हीएमवर ‘एमव्हीएम’ (मोदी वोटिंग मशीन) अशी टीका करत मतदानात घोटाळा होईल अशी शक्यता व्यक्त केली.

राजद नेता व महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी शेवटच्या टप्प्यात झंझावती दौरे केले. त्यांनी एकेक दिवसात १० ते १७ प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या प्रत्येक सभेला हजारोंची गर्दी उपस्थित राहात असल्याने या निवडणुका चुरशीच्या होतील असे संकेत आहेत. आता धर्म-जातीची भाषा नको आहे तर विकासाची, प्रगतीची भाषा हवी आहे, असे मतदारांना आकर्षित करणारा प्रचार तेजस्वी यादव सभांमध्ये करताना दिसत होते. गेल्या १५ वर्षांत राज्यात काहीच घडले नाही. आता नव्याने काम करावे लागणार आहे. ज्यांना काम करायचे आहे, त्यांना संधी मिळायला हवी. तरुणांनी नव्या दृष्टिकोनातून समाजाकडे पाहायला हवे आहे व आपण त्या दिशेने काम करत राहू असे तेजस्वी आपल्या भाषणात सांगत होते.

तर एनडीएपासून वेगळे होत लढणार्या चिराग पासवान यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

मूळ बातमी

COMMENTS