नितीश कुमारांना गोत्यात आणणारी भाजपची खेळी

नितीश कुमारांना गोत्यात आणणारी भाजपची खेळी

बिहारच्या राजकारणात रविवारी राम विलास पासवान व चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने खुलेआम नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)ला (जेडीयू) आव्हान दिले. आगामी विधानसभा निवडणुकांत त्यांनी जेडीयू व भाजपशी आपली मैत्री तोडली पण भाजपच्या विरोधात आम्ही एकही उमेदवार उभे करणार नाही, असे सांगत जेडीयूच्याविरोधात मात्र उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट करत आगामी सरकार भाजप व लोकजनशक्ती पक्षाचे असेल अशीही घोषणा केली.

भाजपशी आमचे संबंध उत्तम आहेत, पण जेडीयूशी वैचारिक मतभेद असून ते सुटत नसल्यामुळे केवळ भाजपसोबत आम्ही आहोत व नितीश कुमार यांच्या उमेदवारांविरोधात आमचे उमेदवार निवडणूक लढवतील असे पक्षाने सांगितले.

आपल्या प्रसिद्धी पत्रकात लोजपाने भाजपसोबत बिहारमधील सरकार स्थापन होईल, असाही दावा केला आहे.

ही घोषणा झाल्यानंतर लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी ट्विट करून ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ या पक्षाच्या मोहिमेची घोषणा केली.

गेल्या आठवड्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी जेडीयू, लोजप व भाजप हे तिघे एकत्र निवडणुका लढवतील असे जाहीर केले होते. या घोषणेनंतर असे वाटले की जेडीयू व लोजपमधील जागा वाटपांवरची चर्चा पूर्णत्वास आली आहे. पण रविवारी चित्र स्पष्ट झाले.

लोजपने ज्या पद्धतीने भाजपसोबतचा आपला दोस्ताना जाहीरपणे दाखवला व जेडीयूविरोध दाखवला तो पाहता नितीश कुमार यांच्याविरोधात भाजप पडद्याआडून हा खेळ खेळत असावा, असे वाटू लागले आहे. कारण भाजपचे या घडामोडीबाबतचे मौन संशय निर्माण करत आहे.

गेले काही दिवस बिहारचे नेतृत्व नव्या पिढीकडे यावे व नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला फाटा द्यावा अशी चर्चा भाजपमध्ये सुरू झाली होती.

काही राजकीय निरीक्षक भाजप नव्हे पण नितीश कुमार यांच्याविरोधात लाट आहे असे म्हणू लागले आहेत. त्यामुळे भाजप लोजपने स्वतंत्र निवडणूक लढावे म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे. नितीश कुमार यांच्याविरोधातील लाटेचा फायदा लोजपला मिळेल तो काँग्रेस-राजदला मिळणार नाही, असेही सांगितले जात आहे.

यात राष्ट्रीय लोक समता पार्टी व विकासशील इन्सान पार्टी हे विरोधी पक्ष भाजपने आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सरकार विरोधी लाटेचा फायदा भाजपला व्हावा, अशी त्यामागची खेळी आहे.

स्वतंत्र लढण्यामागे लोजपला काय मिळणार? 

लोजपचा इतिहास सांगतो की ते नेहमी केंद्रातील सत्तेला धरून असतात. २००५चा इतिहास वगळता बिहारमध्ये लोजप कधीही सत्तेतील भागीदार राहिलेला नाही.

अशा परिस्थितीत लोजपची वाटचाल भाजपच्या फायद्याची आहे. २००७मध्ये नितीश कुमार यांनी महादलित आयोग उभा केला होता. या आयोगात पासवान व पासी जमातींना आयोगाच्या कक्षेबाहेर ठेवले होते. त्याचा संताप आजही या दोन जातींमध्ये आहे. २०१७मध्ये नितीश कुमार यांनी या दोन जातींना या आयोगात आणले पण त्याने या जातींची राजकीय महत्त्वाकांक्षा कमी झालेली नाही.

लोजपच्या एका नेत्याने द वायरला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नितीश कुमार यांचे सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. पोलिस व सरकारी खाती सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. जनता या सरकारच्या एकूण कारभारावर नाराज आहे.

राजकीय विश्लेषक महेंद्र सुमन यांच्या मते लोजप हा नेहमी केंद्रातल्या सरकारशी जुळवून घेणारा पक्ष आहे. त्यांच्या रविवारच्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी भाजप व मोदींचे ज्या पद्धतीने कोडकौतुक केले आहे, ते पाहता ते भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत. जो पक्ष वागतो त्याला कधीच तडजोड करता येत नाही. जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे करून चिराग पासवान यांना नितीश कुमार यांची शक्ती कमी करायची आहे. जर नितीश कुमार यांना भाजपपेक्षा कमी जागा मिळतील तेव्हा हा धोका वाढू शकतो. चिराग यांना चांगल्या जागा मिळाल्यास ते किंगमेकर होऊ शकतात. चिराग यांची ही सर्व पावले त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देऊ शकते.

पटण्यातील एक पत्रकार दीपक मिश्रा म्हणतात, २०२५च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चिराग पासवान आपली पावले टाकत आहेत. बिहारमध्ये नवा चेहरा भाजप देऊ शकत नाहीत. जेडीयूकडे नवा चेहरा नाही. राजदचा चेहरा तेजस्वी यादव आहे पण त्यांना पक्षांतर्गत विरोध सहन करावा लागतो. अशावेळी २०२५पर्यंत जी राजकीय पोकळी बिहारमध्ये दिसते ती भरून काढण्याचा प्रयत्न चिराग यांचा आहे.

पण बिहारचे जातीय समीकरण चिराग यांच्यापाशी सध्यातरी दिसत नाही. बिहारच्या एकूण लोकसंख्येतील ४ ते ५ टक्के लोकसंख्या ही पासवान जातीची आहे. २०१०च्या बिहार विधानसभा निवडणुकांत भाजपसोबत लढून लोजपाला ६.७ टक्के व केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. २०१५च्या विधानसभा निवडणुकांत त्यांचा मतदान टक्का घटून ४.८ टक्के व केवळ २ जागा मिळाल्या होत्या.

विरोधी पक्षांची स्थिती

काही दिवसांपर्यंत महागठबंधनमध्ये ९ पक्ष होते. गेल्या शनिवारी जागा वाटपाबाबत महागठबंधनची पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी ६ पक्ष उरले होते. या पत्रकार परिषदेत अन्याय झाला म्हणून विकास इन्सान पार्टीचे मुकेश सहानी यांनी महागठबंधनला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप तेजस्वी यादव यांच्यावर केला. त्यामुळे सध्या या महागठबंधनमध्ये राजद, काँग्रेस, व डावे पक्ष आहेत. राजद १४४ जागा, काँग्रेस ७०, सीपीआय (एमएल) १९, माकप ४ व भाकप ६ जागा लढवणार आहेत.

या गठबंधनने तेजस्वी यादव यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.

२०१५च्या विधानसभा निवडणुकांत राजदने १०१ जागा लढवून ८० जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसने ४१ जागा लढवून २७ जिंकल्या होत्या.

आता भाजप व जेडीयूचे उमेदवार ज्या ठिकाणी निवडून आले होते, तेथे काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे.

महागठबंधनला डाव्या मतदारांचा पाठिंबा मिळेल असे चित्र आहे. बिहारमध्ये दलित व अन्य पिछड्या जातींमध्ये डाव्यांचे वर्चस्व आहे, त्याचा फायदा महागठबंधनला होईल असे मत राजकीय पत्रकार दीपक मिश्रा यांचे आहे.

तिसरी आघाडीचे चित्र

दोन महाआघाड्यांनंतर तिसरी आघाडी बिहारमध्ये आकारास आली आहे.

आरएलएसपी यांनी बहुजन समाज पार्टी, जनता पार्टी सोशॅलिस्ट यांच्याशी युती केली आह. तर दुसरीकडे जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष व खासदार पप्पू याद यांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्स स्थापन केले आहे. त्यांनी आपली युती प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी केली आहे.

त्याचबरोबर सीमांचल येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तिहाद मुसलमीन यांनी समाजवादी जनता दल (डेमोक्रेटिक)शी युती केली आहे.

अर्थात एवढे पक्ष असूनही खरा सामना एनडीए व महागठबंधन यांच्यातच होणार आहे. बिहारचा तसा राजकीय इतिहासही आहे.

मूळ बातमी

COMMENTS