बिहारमध्ये एमआयएम व भीम आर्मीची युती

बिहारमध्ये एमआयएम व भीम आर्मीची युती

किशनगंज (बिहार) : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका पाहता ‘ऑल इंडिया मजलिस ए एत्तेहाद उल मुसलमीन’ (एआयएमआयएम) संघटनेने आपली रणनीती ठरवली असून पक्षाने

बिहारः ११ जागांवर १ हजाराहून कमी मताने उमेदवार विजयी
मुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८
मुजफ्फरपूर – सामाजिक विषमतेचे बळी

किशनगंज (बिहार) : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका पाहता ‘ऑल इंडिया मजलिस ए एत्तेहाद उल मुसलमीन’ (एआयएमआयएम) संघटनेने आपली रणनीती ठरवली असून पक्षाने मुस्लिम-दलित युतीच्या मदतीने आपला पक्षविस्तार सुरू केला आहे. या पक्षाचे घोषवाक्य ‘जय भीम, जय मिम’ हे आहेच.

मुस्लिम-दलित युती हा भारतीय राजकारणातील एक पारंपरिक प्रभावगट आहे आणि या प्रभावगटाचे नेतृत्व आजपर्यंत दलित नेते करत आले आहेत. पण आता एआयएमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी यांनी हे समीकरण बदलण्याचे ठरवले असून तेच आता या युतीचे नेतृत्व स्वीकारण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहेत.

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला थोडे बहुत यश मिळाले आहे. वंचित आघाडीने स्वत:चा मोठा एक मतदारही तयार केला आहे. ओवेसी आता बिहारमध्ये या वर्षअखेर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दलित-मुस्लिम युतीची चाचपणी करत आहेत. हैदराबाद, महाराष्ट्र व आता बिहार असा हा तिसरा प्रयत्न ओवेसींचा आहे.

गेल्या वर्षी २९ डिसेंबरला किशनगंजमध्ये ओवेसी यांनी ‘संविधान बचाओ, देश बचाओ’, अशी गर्जना करत सुमारे ५० हजारांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात ओवेसी यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला विरोध करण्याची घोषणा केली.

ऑक्टोबरमध्ये किशनगंज येथे विधानसभा पोटनिवडणुकीत एमआयएमने काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून आपला पहिला विजय मिळवला होता. या विजयानंतर ओवेसी यांची बिहारमधील ही पहिली अशी सभा होती.

ओवेसी यांच्या सभेला प्रतिसाद पाहता सीमांचलमध्ये ते एक नवे राजकीय समीकरण तयार करू लागले आहेत. या भागात काँग्रेसचा प्रभाव आहे. पण तेथे मुस्लिम-दलितही मतदार प्रभावशील आहे. ओवेसी यांच्या सभेच्या एक दिवस अगोदर याच ठिकाणी काँग्रेसचे नेते व उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांनी एक सभा बोलावली होती. या सभेला काँग्रेसचे खासदार मोहम्मद जुवेद आझाद व आमदार तौसिफ अलाम हे उपस्थित होते. पण या सभेला मिळालेला प्रतिसाद ओवेसींच्या सभेच्या तुलनेत फारच कमी होता.

ओवेसींची किशनगंज सभा आणखी एका घटनेने प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या सभेला बिहारचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ दलित नेते जीतन राम मांझी यांनी आपण उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या अशा उपस्थित राहण्याने बिहारमधील दलित-मुस्लिम युतीला गती मिळेल असाच तो एक संदेश होता. पण प्रत्यक्षात मांझी या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होणार असल्याने आपल्याला रांची येथे शपथविधी सोहळ्याला जावे लागेल, असे मांझी यांनी अगोदर स्पष्ट केले होते. हेमंत सोरेन हे काही पुन्हा-पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांचा फोन आल्यावर मात्र मला रांचीला जावे लागेल असे त्यांनी सांगून ठेवले होते.

२९ डिसेंबरला झारखंडमध्ये सत्तापालट झाला व हेमंत सोरेन राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. पण जीतन मांझी यांची ओवेसींच्या सभेदिवशीची अनुपस्थिती त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांनी जाणवून दिली नाही. जीतन मांझी यांचे मोठे पोस्टर्स सभेच्या ठिकाणी, मंचावर लावण्यात आले होते.

या सभेला मांझी यांचा एमआयएमच्या किशनगंजमधील विजयाबद्दलचे कौतुक व विरोधकांवर टीका करणारा संदेश वाचून दाखवण्यात आला. या संदेशात किशनगंजमधील विजयाने देशभर दलित-मुस्लिम एकता पसरत जाईल असे विधान मांझी यांनी केले होते.

पण मांझी यांच्या पोस्टर्सनंतर सभेला उपस्थित असलेल्यांचे लक्ष आणखी एका नेत्याने वेधून घेतले. ते नेते होते भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद. हिंदी पट्‌ट्या सध्या एक दलित नेता चर्चेत आहे ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. पण तेही या सभेत उपस्थित राहिले नाहीत

मात्र या सभेत बिहारमधील भीम आर्मीचे प्रमुख मनोज कुमार भारती यांचे -भाषण लक्षवेधी ठरले. त्यांनी मोदी-शहा दुकलीला रंगा बिल्ला असे उद्देशून बाबासाहेब व कलाम यांना आव्हान देऊ नये असा इशारा दिला. आमचे रक्त सम्राट अशोक व टिपू सुलतानचे आहे. भीम आर्मी व ओवेसी आता एकत्र आले आहेत. ही दलित-मुस्लिम शक्ती मनुवाद्यांना कडवे आव्हान असून आज तुमचे राज्य आहे, उद्या ते आमचे असेल. पण आमच्या राज्याची ताकद दुप्पट असेल, संविधानाचे पालन करा, असा इशाराही त्यांनी दिला.

भीम आर्मी व एआयएमच्या बिहारमधील युतीसाठी दोन्ही पक्षांकडून अनेक बैठका घेतल्या जात आहेत. गयामध्ये वामन मेश्राम हे बामसेफच्या माध्यमातून एमआयएमशी चर्चा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने ओवेसी हे किशगंजमध्ये सभेस आले होते.

बिहारच्या सीमांचल प्रदेशातील चार जिल्ह्यात २४ विधानसभा मतदारसंघात दलित-मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अरेरिया व पूर्णियामध्ये दलितांची टक्केवारी १४ व १२ टक्के आहे. तर कटिहार व किशनगंजमध्ये हे प्रमाण ९ व ७ टक्के आहे. मुस्लिम मतदारांसोबत दलित वर्ग गेल्यास आगामी विधानसभा निवडणुकांत या चार विधानसभा निवडणुकांत एमआयएमचे यश दिसून येईल अशी परिस्थिती आहे.

एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ओवेसी खुलेपणाने उभे राहिल्याने आमचा त्यांना राजकीय मुद्यावर पाठिंबा आहे असे भीम आर्मीचे म्हणणे आहे. ही युती आगामी विधानसभा निवडणुकात भाजपला टक्कर देईल असे चित्र आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0