बिहार: आरसीपी सिंह यांनी जनता दल सोडले

बिहार: आरसीपी सिंह यांनी जनता दल सोडले

पाटणा : माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)ला सोडचिठ्ठी दिली. याच्या काही तासांपू

डिसले प्रकरणातून काय दिसले ?
‘जगात कोविड-मृतांची संख्या ३० लाखाहून अधिक’
कोरोना संकटात मोदी सरकार किती गंभीर?

पाटणा : माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)ला सोडचिठ्ठी दिली. याच्या काही तासांपूर्वीच वृत्त आले होते, की पक्षाने काही अज्ञात कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांना स्पष्टीकरण मागितले होते.

जनता दल (संयुक्त)तर्फे ५ ऑगस्ट रोजी पक्षाचे माजी प्रमुख आरसीपी सिंग यांच्यावर जमीन संपत्ती जाहीर करण्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे त्यांनी राजीनामा जाहीर केला आणि पक्षाला ‘बुडणारे जहाज’ म्हटले. नालंदा जिल्ह्यातील सिंग यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली.

ते म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळात माझ्या समावेशाचा हेवा करणाऱ्यांचे हे आरोप आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नयेत. मी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडत आहे.”

जनता दल (संयुक्त)चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिंग यांना पक्षाने राज्यसभेत आणखी एक टर्म नाकारल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिपद सोडावे लागले होते.

२०१३ ते २०२२ दरम्यान नालंदा येथे किमान ४७ भूखंड विकत घेतल्याचा सिंग यांच्यावर जदयुच्या दोन अज्ञात कार्यकर्त्यांनी आरोप केला होता. त्यावर जदयु बिहारचे अध्यक्ष उमेश कुशवाह यांनी ४ ऑगस्ट रोजी आरसीपी सिंग यांना पत्र लिहून प्रतिक्रिया मागितली होती, असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. या काळात सिंग यांनी जदयुचे सरचिटणीस (संघटन), राज्यसभा खासदार, जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम केले.

२०१६ च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सिंग यांनी नालंदा जिल्ह्यातील अस्थाना गावात ४.८६ लाख रुपयांची (त्याचा हिस्सा म्हणून) सामाईक स्थावर मालमत्ता दाखवली होती. त्यांनी पत्नीच्या नावे सुमारे २.५३ कोटी रुपये आणि १५ लाख रुपयांहून अधिक जंगम मालमत्ता जाहीर केली होती.

जदयुने नुकतेच सिंग यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद सोडावे लागले होते. उत्तर प्रदेश केडरचे माजी आयएएस अधिकारी असलेले सिंह यांनी राजकारणात येण्यासाठी २०१० मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या पाच वर्षात त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केले आणि पक्षात विविध पदे भूषवली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0