बिहार: एकाला १०० पैकी १५१ गुण, तर दुसरा शून्य गुण मिळवूनही उत्तीर्ण

बिहार: एकाला १०० पैकी १५१ गुण, तर दुसरा शून्य गुण मिळवूनही उत्तीर्ण

बिहारच्या दरभंगा येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठात बीए ऑनर्सच्या एका विद्यार्थ्याला राज्यशास्त्राच्या १०० गुणांच्या पेपरमध्ये १५१ गुण मिळाले आहेत, तर दुसऱ्या एका बीकॉमच्या विद्यार्थ्याला पेपरमध्ये शून्य गुण मिळूनही उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठवण्यात आले आहे.

दरभंगा: येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठाच्या (LNMU) पदवीधर विद्यार्थ्याने नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात कमाल गुणांपेक्षा जास्त गुण मिळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या सरकारी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला १०० गुणांच्या पेपरमध्ये १५१ गुण मिळाले आहेत. बीए (ऑनर्स) भाग २ परीक्षेचा हा राज्यशास्त्राचा पेपर होता. तो विद्यार्थी म्हणाला, ‘निकाल पाहून मला खरोखरच आश्चर्य वाटले. ही वैकल्पीक गुणपत्रिका आहे, मात्र ती प्रसिद्ध करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी तपासून घ्यायला हवी होती.”

एवढेच नाही तर, विद्यापीठाच्या बीकॉम भाग-२ च्या अकाऊंटिंग अँड फायनान्स (पेपर-४) परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या आणखी एका विद्यार्थ्याला पुढील वर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्याने सांगितले की, “विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी ही टायपिंगची चूक असल्याचे मान्य केले आहे आणि त्यांनी मला सुधारित मार्कशीट दिली आहे. ”

विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक मुश्ताक अहमद यांनी सांगितले, की दोन्ही मार्कशीटमध्ये टायपिंगची चूक झाली होती. ते म्हणाले, “टायपिंगच्या चुका सुधारल्यानंतर दोन विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत. ती फक्त टायपिंग एरर होती आणि आणखी काही नाही.

COMMENTS