नितीश यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

नितीश यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

जदयु नेते नितीश कुमार यांनी राजभवनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि म्हटले की, २०१४ मध्ये ते जिंकले होते, पण आता त्यांना २०२४ ची काळजी वाटायला हवी. त्याचवेळी नवे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नसल्याचे भाजपने म्हटले आहे.

पाटणा: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबतची युती तोडल्यानंतर आणि आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी (१० ऑगस्ट) विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) बरोबर महाआघाडी करत पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राजदचे तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जनता दल (युनायटेड) नेते नितीश कुमार यांनी राजभवनात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ते २०१४ मध्ये आले, पण आता त्यांना २०२४ ची काळजी वाटायला हवी.’

ते म्हणाले, “जे २०१४ मध्ये सत्तेवर आले, ते २०२४ मध्येही जिंकतील का? मला २०२४ मध्ये सर्व विरोधी पक्षांना एकत्र पाहायला आवडेल. मात्र मी कोणत्याही पदाच्या (पंतप्रधान) शर्यतीत नाही.

नवे सरकार लवकरच पडेल या भाजपच्या दाव्यावर नितीश म्हणाले की, बिहारमध्ये नवे सरकार चांगले चालेल.

भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी दावा केला आहे, की बिहारमधील नवीन सरकार २०२५ मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पडेल.

जदयुचे प्रमुख नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मतदान करणाऱ्या बिहारच्या जनतेचा अपमान केल्याचेही सुशील मोदींनी म्हटले आहे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री मोदी यांनी पत्रकार परिषदेला बोलताना लालू प्रसाद यांच्या प्रकृतीचा फायदा घेऊन नितीश राजदशी गद्दारी करतील आणि ते तोडण्याचा प्रयत्न करतील असा आरोप केला.

त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंग यांच्यामार्फत ‘षड्यंत्र’ केल्याचा जदयुचा आरोप फेटाळून लावला आणि असा दावा केला, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्याकडून मंजुरी घेतल्यानंतर सिंह यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते.

COMMENTS