कोरोनाबरोबरच बर्ड फ्ल्यूचे संकट

कोरोनाबरोबरच बर्ड फ्ल्यूचे संकट

कोरोनाचा ब्रिटनमधून आलेला नवा जनुकीय अवतार जेवढा खतरनाक तेवढाच आता दक्षिण आफ्रिकेतून आयात झालेला त्याचा आणखी एक अति भयानक नवीन अवतार सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यातच बर्ड फ्ल्यूने सुद्धा सर्वत्र हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने २०२१ हे वर्ष सुद्धा भीती आणि चिंतेच्या सावटाखाली जाण्याची शक्यता आहे. बर्ड फ्ल्यूने परभणी आणि लातूरमध्ये शिरकाव केल्याने भीती आणि चिंतेत वाढ झाली आहे. परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे अनेक कोंबड्या दगावल्या आहेत.

ब्रिटनमध्ये जनुकीय बदल करून ७० टक्के अधिक वेगाने प्रसार करणाऱ्या कोरोनाच्या नवीन अवताराने देशात सर्वत्र शिरकाव करून सर्वांची झोप उडविली असतानाच यापेक्षाही अतिशय खतरनाक आणि घातक अशा ‘E484K’ या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नवीन कोरोना विषाणूमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.

विशेष म्हणजे मुंबई जवळील खारघर येथील टाटा मेमोरिअल केंद्रात कोरोनाचा हा नवीन म्युट आढळून आला आहे. याबाबत एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या नवीन जनुकीय अवतारामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या विषाणूवर अँटी बॉडीजचाही काहीही परिणाम होत नाही. मुंबईतील तीन रुग्णामध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत म्युट झालेल्या ‘K417N’ आणि ‘E484K’, ‘N501Y’ या तीन जनुकीय बदलातून हा नवीन कोरोना विषाणू आला आहे.

याबाबत टाटा मेमोरियल केंद्राचे डॉ. निखिल पाटकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या टीमने ७०० कोविड 19 नमुन्यांची तपासणी केली होती. त्यापैकी तीन नमुन्यात ‘E484K’ हा नवीन कोरोना मिळाला आहे. हा सर्वात घातक आणि धोकादायक आहे कारण त्याच्यावर अँटिबॉडीचा काहीही परिणाम होत नाही.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या नवीन कोरोना विषाणूवर लसीचा काही परिणाम होईल का या बाबत तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. दरम्यान ज्या तीन रुग्णांमध्ये हा नवीन विषाणू आढळून आला आहे ते गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संक्रमित झाले होते. त्यापैकी दोघे रायगडचे तर एक जण ठाण्यात राहणारा आहे. आता त्या तिघांची प्रकृती स्थिर आहे.

सप्टेंबरमध्येच आफ्रिकी कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केला असला तरी तो अद्याप जास्त पसरलेला नाही तर ब्रिटनमधून आलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत रुग्ण संख्येची शंभरी गाठली आहे. यातच बर्ड फ्ल्यूने देशातील ९ राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून महाराष्ट्रमध्येही त्याची लागण झाली आहे. परभणीत बर्ड फ्ल्यू मुळे अनेक कोंबड्या दगावल्या. तर लातूर, बीड तसेच ठाणे येथेही अनेक पक्षी तसेच कोंबड्या दगावल्या आहेत. परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे ८० हजार कोंबड्या आता त्यामुळे मारून कराव्या लागणार आहेत.

सोमवारपर्यंत महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, राजस्थान, म. प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात व उत्तर प्रदेश या ९ राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्याचे जाहीर करण्यात आले. छत्तीसगडमधील बालोद येथे एव्हिएन इन्फ्लूएन्झा विषाणूची चाचणी करण्यात आली होती. तर दिल्लीत संजय सरोवरामध्ये १७ बदके मृतावस्थेत आढळली आहेत. त्यानंतर दिल्ली विकास प्राधिकरणाने हे सरोवर बंद केले आहे. त्याचबरोबर दिल्ली विकास प्राधिकरणाच्या १४ उद्यानात ९१ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. शनिवारी दिल्ली सरकारने जिवंत पक्षांच्या आयातीला राज्यात बंदी घातली आहे.

हिमाचल प्रदेशात पोंग धरण अभयारण्यात २१५ स्थलांतरित पक्ष मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे एव्हिएन इन्फ्लुएंझाने मृत झालेल्या पक्षांच्या संख्या ४,२३५ इतकी झाली आहे.

राजस्थानातही विविध भागात ४०० पक्षी मृत झाल्याचे वृत्त आहे. येथे गेल्या काही दिवसात मृत झालेल्या पक्षांची संख्या २,९५० इतकी झाली आहे. मध्य प्रदेशात १,१०० कावळे मरण पावले असून २७ जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणाचा ग्रँड सोहोळा होत असला तरी ती लस कितपत परिणामकारक आहे याबाबत तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अहवालावर दोन लसींना मान्यता देणे योग्य नसल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण हा विषाणू सातत्याने त्याचे जनुकीय बदल करत असून नेमक्या कोणत्या बदलावर आधारित या लसी तयार करण्यात आल्या आहेत याची माहिती सर्वांसाठी खुली करावी तरच सत्य समजेल असेही या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS