नवी दिल्ली, मुंबई : देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून १ मेपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चार पट वाढ झाली असून मृतांच्या संख्
नवी दिल्ली, मुंबई : देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून १ मेपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चार पट वाढ झाली असून मृतांच्या संख्येतही तीन पट वाढ झाल्याचे दिसत आहे.
पण महाराष्ट्राने करोना रुग्ण दुपटीचा वेग १४ दिवसांवर आणण्यात यश मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंगळवारी दिली.
देशात मंगळवारी सलग पाचव्या दिवशी ६ हजाराहून अधिक जणांना कोरानाची लागण झाल्याचे दिसून आले आहे, तर २४ ते २५ मे या एका दिवसांमध्ये ६,९७७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत एकाच दिवशी आढळलेली ही सर्वात मोठी संख्या आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,४५,३८० इतकी झाली आहे. ही संख्या १ मे ते २५ मे दरम्यान सुमारे चार पटीने वाढली आहे. १ मे रोजी देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३५,०४३ इतकी होती.
गेल्या ५ दिवसांत दररोज ६ हजाराहून अधिक जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न होत आहे.
१ मे रोजी कोरोनामुळे मृत्यूंची संख्या १,१४७ होती ती आता ३ पटीने वाढून ४,१६७ इतकी झाली आहे. या काळात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही तिप्पट झाली आहे.
७ पटीने रुग्ण बरे झाले
पण या एकूण काळात कोरोनातून पूर्णपणे बरे होणार्यांची संख्या ७ पटीने वाढून ती ६० हजाराहून अधिक झाली आहे. १ मे रोजी कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ८,८८८ होती ती २५ मे रोजी ७ पटीने वाढून ६०,४९० इतकी झाली आहे.
१ मे रोजी कोरोना संक्रमणाचे रुग्ण २५,००७ इतके होते. हा आकडा २५ मे रोजी ३ पटीने वाढून ८०,७२२ इतका झाला आहे.
या महिन्यात महत्त्वाची घटना अशी घडली आहे की, १ मे पासून देशभरात स्थलांतरितांना त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या.
१८ मे रोजी लॉकडाऊनच्या ४ थ्या टप्प्यात काही सवलती दिल्याने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. देशभरात १८ मे नंतर एक तृतीयांश कोरोना रुग्ण वाढले आहेत.
२५ मे रोजी देशांतर्गत विमान सेवाही सुरू करण्यात आली आहे.
देशात कोरोनाचे संक्रमण झालेली राज्ये पुढील प्रमाणे – महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली आहेत.
तर बिहार, उ. प्रदेश, म. प्रदेश, ओदिशा, झारखंड या राज्यांमध्ये स्थलांतरित परत गेल्याने तेथील कोरोना रुग्णांच्या संख्येत १० पटीने वाढ झाली आहे.
नागालँडमध्ये गेल्या सोमवारी कोरोनाचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. हे तीन रुग्ण चेन्नईतून विशेष ट्रेनने आले होते. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. भारतात जानेवारी महिन्यात जेव्हा कोरोना संक्रमण सुरू झाले होते तेव्हा नागालँड कोरोना मुक्त राज्य होत होते.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
देशातील सर्वात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात ५३,६६७ इतकी असून दोन कॅबिनेट मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर किमान १८ पोलिस कर्मचार्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रानंतर गुजरातमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. तेथे १४,४६० कोरोना रुग्ण आढळले असून मृतांची संख्या ८८८ इतकी आहे. या राज्यातले १२ लाख स्थलांतरित आपल्या राज्यात परत गेले आहेत.
राजधानी नवी दिल्लीत कोरोनाचे नवे ६३५ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या १४,०५३ तर मृतांची संख्या २७६ इतकी आहे.
बिहारमध्ये संक्रमण २७३० जणांना झाले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ओदिशामध्ये संक्रमित संख्या १,४३८, तामिळनाडूमध्ये १७,०८२ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. या राज्यात मृतांचा आकडा ११८ इतका झाला आहे.
सोमवारी हिमाचल प्रदेशने लॉकडाऊनचा कालावधी जूनपर्यंत ढकलला आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला
राज्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुपटीचा वेग १४ दिवसांवर आणण्यात यश आल्याचा दावा राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केला आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांसाठी ७५ हजार खाटा तयार आहेत आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राज्यात राबवली जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली असून २७ नवीन प्रयोगशाळा सुरू होणार असल्याने कोरोनावर नियंत्रण राखण्यात यश मिळेल, असे मेहता म्हणाले.
मूळ बातमी
COMMENTS