आरोपी बिशपच्या व्यंगचित्रावरून केरळमध्ये वाद

आरोपी बिशपच्या व्यंगचित्रावरून केरळमध्ये वाद

आपण विश्वाचे रक्षण करतोय अशा आविर्भावात असलेल्या व्यक्तीला धर्म व राजकीय व्यवस्थेचे पाठबळ मिळाल्यास तिच्यात येणारा अहंभाव व सत्तेची मग्रुरी याचे उत्कृष्ट विडंबन हा ‘विश्वम रक्षती’ या व्यंगचित्राचा खरा विषय आहे.

एका ख्रिश्चन ननवर बलात्कार केल्या प्रकरणात जामीनावर असलेले जालंदरचे ख्रिश्चन धर्मगुरु बिशप फ्रँको मुलाक्क्ल यांच्यावर काढलेल्या एका व्यंगचित्राला ‘केरळ ललितकला अकादमी’ने पुरस्कार दिल्याने केरळमध्ये राजकारण तापले आहे. केके सुभाष या केरळमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे ‘विश्वम रक्षती’ हे व्यंगचित्र गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘हास्य कैराली’ या मासिकात प्रसिद्ध झाले होते. या व्यंगचित्रातून वाचकांपर्यंत जाणारा संदेश योग्य वाटत असल्याने त्याची निवड सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून आम्ही केली आहे, असे ‘केरळ ललित कला अकादमी’चे म्हणणे आहे. पण या निर्णयावर चर्चने नाराजी व्यक्त आहे.

‘विश्वम रक्षती’ या व्यंगचित्रात, बिशप मुलाक्कल यांना एका कोंबड्याच्या रुपात दाखवले असून त्यांच्या हातात असलेल्या अधिकार दंडावर एक अंतर्वस्त्र बांधलेले आहे. हा कोंबडा (बिशप मुलाक्कल) केरळ पोलिसांच्या टोपीवर उभा आहे व त्याला भयभीत होऊन नन धावताना दिसत आहेत. आपण विश्वाचे रक्षण करतोय अशा आविर्भावात असलेल्या व्यक्तीला धर्म व राजकीय व्यवस्थेचे पाठबळ मिळाल्यास तिच्यात येणारा अहंभाव व सत्तेची मग्रुरी याचे उत्कृष्ट विडंबन हा ‘विश्वम रक्षती’ या व्यंगचित्राचा खरा विषय आहे. पण केरळमधील चर्चना धर्मगुरुचे असे विडंबन त्यांच्या धर्माची टिंगल वाटत आहे.

आमच्या भावना दुखावल्या : केरळ चर्च

'हास्य कैराली', या मासिकात प्रसिद्ध झालेले आणि वादग्रस्त ठरलेले व्यंगचित्र.

‘हास्य कैराली’, या मासिकात प्रसिद्ध झालेले आणि वादग्रस्त ठरलेले व्यंगचित्र.

कोंबड्याच्या हातात चर्चचा पवित्र दंड देणे याने ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत आणि याने ख्रिश्चन धर्माचे चुकीचे चित्र समाजात जाते, त्यामुळे ‘केरळ ललित कला अकादमी’ने हा पुरस्कार, अशा व्यंगचित्राला देऊ नये अशी मागणी ‘द केरला कॅथलिक बिशप्स कौंन्सिल’ने सरकारकडे केली आहे.

या संस्थेने, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका माकपप्रणित डाव्या आघाडीला २० पैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला, हा पराभव ख्रिश्चनांची मते न मिळाल्यामुळे झाला असे सरकारला वाटत आहे का, असाही सवाल विचारला आहे.

‘सरकार हस्तक्षेप करणार नाही’

केरळ सरकारने हा विषय अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा असून सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. पण या व्यंगचित्रातून ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचे दिसते, अशीही भूमिका राज्याचे सांस्कृतिकमंत्री ए. के. बालन यांनी घेतली आहे.  ‘केरळ ललित कला अकादमी’ आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करेल, अशीही आशा बालन यांनी व्यक्त केली आहे.

 दिग्गज व्यंगचित्रकार एकवटले

विशप मुलाक्लल यांच्या व्यंगचित्राला पुरस्कार देऊ नये या केरळ चर्चच्या मागणीला राज्यातील अनेक दिग्गज व्यंगचित्रकारांनी विरोध केला आहे. ‘केरळ ललित कला अकादमी’चे संचालक नेमम पुष्पराज यांनी, कलाकाराची अशा व्यंगचित्रातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखाव्यात अशी इच्छा नसते, असे स्पष्ट केले.

या व्यंगचित्राला पुरस्कार देताना अकादमीने प्रसिद्ध व्यंगचित्रकार पी. सुकुमार, पीव्ही कृष्णन, मधू औमाल्लूर यांची समिती स्थापन केली होती. या समितीने एकमताने केके सुभाष यांची सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून निवड केली आहे, पुष्पराज यांनी सांगितले. आपली संस्था या निर्णयाचा पुनर्विचारही करेल असे त्यांनी स्पष्ट केले.

तर केरळ व्यंगचित्रकार अकादमीचे चिटणीस थॉमस अँटोनी यांनी हा वाद उफाळण्याची काहीच आवश्यकता नव्हती. अशा व्यंगचित्रावर बंधने घातल्यास त्या विषयाचा मुख्य हेतू पुसून जाईल, असे मत व्यक्त केले. केरळच्या सांस्कृतिक इतिहासात कलाकृतींवर टीका अनेकदा झाली आहे, अगदी प्रसिद्ध कलावंत कुंजन नंबियार यांच्यावरही टीका झाल्याचे अँटोनी यांनी निदर्शनास आणून दिले.

मूळ बातमी 

COMMENTS