स्वयंचलित यंत्रांच्या ताब्यातले आयुष्य

स्वयंचलित यंत्रांच्या ताब्यातले आयुष्य

भवताल आणि समकाल - पुरोगामित्व वा प्रगतीवादाच्या व्याख्यांचे कधीकाळी विशाल वाटलेले पण आता संकुचित झालेले केंद्र सोडून आपण ‘प्रजातीवादा’ची व्याख्या मांडणे गरजेचे आहे. एक जबाबदार प्रजातीची नैतिक भूमिका काय असली पाहिजे यावर आपण उलटसुलट विचार केला पाहिजे. दर शनिवारी ‘भवताल आणि समकाल’ या सदरातून आपण याचा वेध घेणार आहोत.

’अ‍ॅप’ले आपण!
संगणकानां सर्व्हरोऽहम्
गणक-यंत्र

वाढत्या ऑटोमेशनचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे कितीतरी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, नव्याने रोजगार निर्माण होणार नाहीत आणि समाजात बेकारी प्रचंड वाढेल. या बेकारीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते, लोकांमध्ये असंतोष वाढल्याने मग ते कुठल्या थराला जातील याची कल्पना देखील करवत नाही. सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि जैविक तंत्रज्ञानात लागणारे नवनवे शोध अनेक लोकांच्या झोपा उडवीत आहेत. तसे पहाता समाजातल्या एका मोठ्या संख्येची झोप तशीही उडालेली आहे, काहींनी ती अभ्यास करवून स्वतःच उडवून घेतली आहे तर काहींनी यूट्यूब, फेसबुकसारख्या सिम्युलेशन्समध्ये स्वतःला बुडवून करून घेतली आहे. सिम्युलेशन्समध्ये आनंद, दु:ख आणि राजकीय इच्छाशक्तींचे आलटून पालटून चाललेले खेळ बघता लोकांच्या झोपेचे नेमके काय करायचे हा विचित्र प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला तर त्यात नवल वाटण्याची गरज नाही.

पबजीचे वेड

‘पबजी’ नावाच्या एक सिम्युलेटेड मोबाईल गेममध्ये काही लोक इतके बुडून गेलेले आहेत की सरासरी सोळा तासांच्या जागेपणातले सहा तास ते या सिम्युलेशनमध्ये जगत असतात. आपल्याला पूर्ण सोळा तास याच सिम्युलेशनमध्ये जगता आले असते तर किती बरे झाले असते, अशी सुप्त इच्छा काहीजण बाळगून आहेत. आयुष्यात त्यांची ही इच्छा खरचं पूर्ण झाली तर जमिनीवरच्या वास्तव समाजाची अवस्था नेमकी कशी असेल ते शब्दात सांगता येणे कठीण आहे. पण समाज चोवीस तास एखाद्या सिम्युलेशनमध्ये जगत असेल तर तो जमिनीवरच्या वास्तवाशी अनभिज्ञ झाल्याने समाजाची अवस्था फार चांगली असेल असे म्हणता येत नाही. शिवाय या सिम्युलेशन्सची मालकी ज्या मूठभर लोकांकडे आहे त्यांनी सिम्युलेशन्समधून मिळविलेल्या डेटाचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्या सिम्युलेशन्समध्ये असलेल्या वापरकर्त्यांना म्हणजेच एंड यूझर्सला भोगावे लागणार आहे.

ऑनलाईनऑफलाईन समाज

सभोवताली स्क्रीन्सने व्यापलेल्या एका विचित्र समाजात आपण राहात आहोत, जिथे माणसे मोबाईलमधून आपले डोके वर काढायला तयार नाहीत. अन्न-वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजानंतर नेटवर्क ही चौथी गरज भागत जिथे कुठे भागत असेल तेथील माणसे ही ‘ऑनलाईन माणसे’ म्हणून ओळखली जातात, तर जिथे अद्याप वीज पोहचलेली नाही किंवा मग फारसे फायद्याचे नसल्याने जिथे मोबाईल टॉवर उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे लोक ‘ऑफलाईन लोक’ म्हणून ओळखले जातात. ऑनलाईन आणि ऑफलाईन ही माणूस प्रजातीची दोन मुख्य रुपे गेल्या दशकभरात आपल्यासमोर आलीत. सध्या ऑफलाईन अवस्थेत जगणारी लहान मुले किंवा तरुण ‘एक दिवस आपल्याही गावात वीज येईल, नेटवर्क येईल आणि आपल्याला ऑनलाईन जाता येईल’, हे एकच स्वप्न पाहात जगत आहे.

काही ठिकाणी हे स्वप्न पुरेही होईल पण तंत्रज्ञान उपलब्धीचा सध्याचा वेग पाहाता काही लोक हे आता आयुष्यभरासाठी ऑफलाईनच राहणार आहेत हे जवळजवळ निश्चित होत चालले आहे. काहींना ऑनलाईन जायला मिळाले तरी फोनशिवाय इतर स्मार्ट डिव्हायसेस किंवा प्रगत तंत्रज्ञान विकत घ्यायला परवडत नसल्याने त्यांचा वावर हा मोबाईलपुरता मर्यादीत राहाणार आहे. ‘फोन’ नावाच्या एका कनेक्टेड डिव्हाईससोबत जगणारा ‘नाहीरे’चा एक नवा वर्ग तयार होतो आहे, ज्याच्या हाताला काम नाही कारण त्या हातात मोबाईल फोन आहे. एरव्ही ‘काम’ हा शब्द दक्षिण आशियात लैंगिकतेसाठी जास्त वापरला जातो, पण बेरोजगारीच्या अवस्थेचे वर्णन करताना हा शब्द वापरला तर त्याचे अर्थ अनेक अंगाने बदलतात.

लोकांच्या हातांना ‘काम’ हवे आहे, पण या कामाची त्यांची स्वतःची व्याख्या काय आहे याबद्दल विचारल्यास त्यांना काम हे फक्त पैसे मिळवून देण्याचे साधन वाटते. या पैशातून आपल्याला हव्या त्या नवनव्या वस्तू खरेदी करता येऊन आपल्याला हवे तसे आयुष्य जगता येईल असा त्यांचा समज आहे. ‘आपल्याला हवे तसे आयुष्य जगणे’ आणि ‘चांगले आयुष्य जगणे’ या गोष्टी आता पूर्णतः वेगवेगळ्या आहेत. ‘चांगले आयुष्य जगणे’, म्हणजे नेमके काय करणे याची कुठलीही योग्य तात्विक व्याख्या समकालीन अवस्थेत उपलब्ध नाही. या अगोदरही ती होती असे म्हणता येणार नाही पण किमान धर्म, राजकीय विचारधारा, साहित्य, अध्ययन संस्कृती, एकत्र कुटुंबे, या क्षेत्रात ‘चांगल्या’ आयुष्याची काहीतरी व्याख्या उपलब्ध होती.

जगाच्या ज्या भागात भांडवलवाद उशीराने पोहचला त्या सर्व देशांमध्ये तो फोफावण्यासाठी अनिवार्य असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रसार वेगाने होईल हे पाहाण्यात आले. एकदा का माणसाला तो इतरांपेक्षा कसा वेगळा आहे हे पटवून दिले की त्यानंतर त्याच्या अशा आभासी वेगळेपणाला ‘अहं’ची जोड देऊन त्या ‘अहं’ला काय हवे ते विकता येते. मॉलमध्ये शॉपिंग करताना शॅम्पूच्या सेक्शनमध्ये ‘तुमचे केस पातळ असतील तर ते वाईट आहे आणि असे केस घनदाट करण्यासाठी हिरव्या रंगाचा शॅम्पू वापरा’ असे खालच्या शेल्फमध्ये सांगणारी कंपनी ‘तुमचे केस जाड असतील तर ते वाईट आहे आणि असे केस पातळ करण्यासाठी गुलाबी रंगाचा शॅम्पू वापरा’, असे वरच्या शेल्फमध्ये ठासून सांगत असते आणि हा विरोधाभास कुणाच्या चटकन लक्षातही येत नाही.

दक्षिण आशियातील माणसे रंगाने काळीसावळी असतात, त्यांच्या या नैसर्गिक त्वचेच्या रंगाला कुरुपतेचे नाव देऊन ती गोरी करण्यासाठी गेल्या तीस वर्षात उभी केली गेलेली बाजारपेठ या वर्षाच्या अखेरपर्यंत एक अब्ज डॉलरचा व्यवसाय करेल, असा एक अंदाज आहे. बर्फाळ प्रदेशांमधली माणसे रंगाने गोरी अथवा थेट पांढरीफटक असतात, त्यांच्याही या नैसर्गिक त्वचेच्या रंगाला कुरुपतेचे नाव देऊन ती गडद करण्यासाठी उभी केलेली बाजारपेठ या वर्षाखेरपर्यंत एक अब्ज डॉलरचा व्यवसाय करेल असा अंदाज आहे. अशा एकूण दोन अब्ज डॉलरच्या बाजारपेठेवर अवघ्या सात ते आठ कंपन्यांचे वर्चस्व आहे. आणि या कंपन्यांसाठी काम करणारी काही हजार माणसे काळ्या लोकांना गोरेपणाचे प्रोडक्ट्स विकतात  आणि गोऱ्या लोकांना काळेपणाचे प्रोडक्टस विकत ही उर्वरीत अब्जावधी माणसे सुंदर आहेत की नाहीत हे ठरवत असतात.

गेल्या दहा वर्षात झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे माणसे अधिकाधिक अहंवादी झाली असून अशा लोकांना कुठलीही गोष्ट विकणे अतिशय सोपे होत चालले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या असंख्य वस्तू एकेकट्या व्यक्तींना महत्त्वाच्या वाटत असल्या तरी एकूण समाजाला त्याची कुठलीही गरज नाही हे अद्याप कुणाच्या लक्षात आलेले नाही. काही मुलभूत गरजा सोडता आता प्रत्येक व्यक्तीच्या इतर गरजा पूर्णपणे वेगळ्या असणे, त्याची सुखाची व्याख्या वेगळी असणे आणि हे सुख मिळविण्यासाठी नेमके काय करावे लागेल याचे आकलन वेगळे असण्याच्या परिस्थितीत या व्यक्ती ज्या समाजाचा घटक आहेत तो समाज संभ्रमित अवस्थेत नसल्यास त्यात नवल ते काय? अशा समाजासाठी सेवा आणि उत्पादने निर्माण करण्यासाठी आणि ती विकण्यासाठी भांडवलवाद्यांनी आता अधिकाधिक ऑटोमेशनचा पर्याय स्वीकारला आहे.

वरवर पाहाता यामुळे व्यक्तिकेंद्रीत समाजाला अधिकाधिक चांगल्या सेवा आणि वस्तू देणे काहींना अतिशय फायद्याचा सौदा वाटत असला तरी त्यासाठी समाज तंत्रज्ञानात अधिक गुरफूटून राहील आणि आपली सुखाची व्याख्या खऱ्या आयुष्यात न शोधता सिम्युलेशन्समध्येच शोधत राहील, याची बाजाराला खात्री हवी आहे. काही ठिकाणी अद्याप ही खात्री आलेली नाही तर काही ठिकाणी आता जग पूर्णतः ऑटोमेशनच्याच ताब्यात जाणार आहे, इतपत दावे काही लोक करू लागले आहेत.

तंत्रज्ञानाने बदलून टाकलेला आपला भवताल आणि समकाल हा असंख्य चित्रविचित्र शक्यतांनी भरलेला आहे. यातून आता कुठल्या प्रकारच्या समाजाची निर्मिती होईल याबद्दल कुणीही ठामपणे बोलू शकत नाही, ‘समाजाची निर्मिती अशीच होत नसते तर त्यासाठी काही लोकांना विशेष प्रयत्न करावे लागतात’, असे म्हणणारे असंख्य लोक आपापल्या परीने बदल घडवून आणू पाहात आहेत. अशा प्रत्येकाला सकाळी उठल्यानंतर आपण यशस्वीच होणार आहोत, असा विश्वास वाटतो आणि संध्याकाळपर्यंत हा विश्वास मावळून त्याची जागा निराशा घेते.

जग नेमके कुठे जात आहे हे सांगण्याअगोदर जग सध्या कुठे आहे याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. रोज विज्ञान-तंत्रज्ञानात होणाऱ्या नव्या आविष्कारांचा आढावा घेणे, जगात सर्वदूर पसरलेल्या भांडवलवादाची अवस्था मोजणे, या भांडवलवादाने जन्माला घातलेल्या पर्यावरणाच्या भयंकर प्रश्नांना सामोरे जाणे आणि हे सर्व करीत असतांना माणसांचा फक्त एकेकट्या व्यक्ती म्हणून विचार न करता एक सकल प्रजाती म्हणून विचार करणे ही कुठल्याही जबाबदार माध्यमाची नैतिक भूमिका असली पाहिजे. अशा भूमिकेतून निर्माण होणारे वाद-प्रतिवाद आणि संवाद एका नव्या समाजाच्या रचनेला निश्चित हातभार लावू शकतात.

पुरोगामीत्व वा प्रगतीवादाच्या व्याख्यांचे कधीकाळी विशाल वाटलेले पण आता संकुचित झालेले केंद्र सोडून आपण ‘प्रजातीवादा’ची व्याख्या मांडणे गरजेचे आहे. एक जबाबदार प्रजातीची नैतिक भूमिका काय असली पाहिजे यावर आपण उलटसुलट विचार केला पाहिजे. ‘द वायर मराठी’च्या या सदरातून दर आठवड्याला असा विचार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या विचारांच्या पुरकतेत, सहमतीत अथवा विरोधात येणाऱ्या मतांचाही मागोवा घेण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल.

राहुल बनसोडे, मानववंश शास्त्राचे अभ्यासक असून ते सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: