इतके दिवस “धर्मनिरपेक्षतेची” संकल्पना संसद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संकुचित आणि उच्चभ्रू चौकटींमध्ये जखडून ठेवली होती आणि फक्त निवडणुकांच्या वेळीच ती मिरवली जात होती. मात्र आता आपल्या इतिहासात पहिल्यांदाच तिथून बाहेर पडून ती रस्त्यावर आली आहे.
येत्या शतकांमध्ये जेव्हा आपला इतिहास लिहिला जाईल (अर्थात खासदार राकेश सिन्हा किंवा दिनानाथ बात्रांसारख्या लोकांद्वारे नव्हे), तेव्हा त्यामध्ये आपली संस्कृती, नीतिमूल्ये, सार्वजनिक संस्था, लोकशाही ताणेबाणे आणि घटनात्मक मूल्ये यांचे सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने किती नुकसान केले त्याबाबत निश्चितच लिहिले जाईल.
परंतु त्या राजवटीने काही चमत्कारही घडवले आहेत, आणि मी हे लिहीत असताना सुद्धा ते घडत आहेत. हे सर्व सरकारच्या क्रूर आणि एकतर्फी आदेश आणि कारवायांचे, त्यांना अभिप्रेत नसलेले परिणाम आहेत, त्यांच्या अत्याचारांची अनपेक्षित निष्पत्ती आहे. मात्र दीर्घकाळचा विचार केला तर याच परिणामांमुळे भारत एक अधिक चांगली लोकशाही होणार आहे. विषारी नागरिकत्व सुधारणा कायदा – राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे परिणाम काय झाले त्याचा विचार करा.पोलिसांचे अत्याचार, आदित्यनाथयांची उघड सूडाची भाषा, पंतप्रधान आणि त्यांच्या अनुयायांचेधादांत खोटेआणि त्यानंतर झालेली आंदोलने!
इतके दिवस “धर्मनिरपेक्षतेची” संकल्पना संसद आणि सर्वोच्च न्यायालयाच्यासंकुचित आणि उच्चभ्रूचौकटींमध्ये जखडून ठेवली होती आणि फक्त निवडणुकांच्या वेळीच ती मिरवली जात होती. मात्र आता आपल्या इतिहासात पहिल्यांदाच तिथून बाहेर पडून ती रस्त्यावर आली आहे.कायदा आणि राजकीय चौकटी मोडून बाहेर पडलेली ही संकल्पना आता भारताच्या रस्त्यांवर, उद्यानांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये आनंदाने नागरिकांमध्ये मिसळून जात आहे.
आपल्याला तिचा खरा चेहरा पाहायचा असेल तर दिल्लीतील शाहीन बागमध्ये जा, किंवाअलाहाबादच्या रोशन बाग मध्ये जाकिंवाकोलकातामधल्या पार्क सर्कसकिंवालखनौच्या क्लॉक टॉवर किंवापाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये जा, किंवा संपूर्ण भारतभर पसरलेल्या अशाच अनेक इतर ठिकाणी जा. तिथे तुम्हाला हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळे एकत्र धरणे धरून बसलेले दिसत असतील. कडाक्याची थंडी, गैरसोयी, कामकाजाचे नुकसान, पोलिसांकरवी केले जाणारे अपमान आणि छळ या सर्वांना तोंड देत! तिथे त्यांची फक्त एकच ओळख आणि एकच धर्म असतो, जो ध्वस्त करण्यासाठी हे सरकार जंग जंग पछाडत आहे – भारतीय.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या ओंगळ डावपेचांनी ते करून दाखवले आहे जे ७० हून अधिक वर्षांमध्ये राज्यघटना आणि न्यायालये करू शकली नव्हती – आपल्या सर्व वेगवेगळ्या धर्मांना एकत्र आणणे. आत्तापर्यंत शब्दांमध्ये, पाठांमध्ये, कायद्यांमध्ये अडकलेला धर्मनिरपेक्षतेचा अर्थ लोकांना समजतो आहे, राज्यघटनेने जे दिले आहे ते कोणीही राजकीय नेता काढून घेऊ शकत नाही ही जाणीव जागृत होत आहे.
मोदी-शाह यांचा आडाखा असा होता, की CAA/NRC यांचा हा संयोग हिंदू आणि मुस्लिमांना कायमचे विभाजित करेल. त्याऐवजी त्यांच्या या कृतीमुळे त्यांना एकत्र आणले आहे. पुस्तकी धर्मनिरपेक्षतेच्या कितीतरी पुढे जाणाऱ्या आपल्या धार्मिक समृद्धीचे एक भान लोकांना मिळाले आहे.
याबरोबरच भारताच्या नागरिकांनी पुन्हा एकदा राष्ट्रगीत आणि तिरंग्यावरचा आपला हक्क प्रस्थापित केला आहे. त्यांना प्रतीकांमधून बाहेर काढले आहे. आता ते हुकूमशाही सरकार आणि विकली गेलेली प्रसारमाध्यमे प्रसृत करत असलेले प्रवाद, असत्ये, खोट्या बातम्या, हिंसाचार आणि धमक्या यांना प्रतिसाद देताना राष्ट्रगीत म्हणत आहेत, झेंडे फडकवत आहेत. देशद्रोही, तुकडे-तुकडे, अर्बन नक्शल, सिक्युलर, लिबटार्ड आणि असल्याच नव्या नव्या द्वेष पसरवणाऱ्या शब्दप्रयोगांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते त्यांना सामर्थ्य देत आहेत. आपला ध्वज आणि राष्ट्रगीत यांना अखेरीस त्यांची योग्य जागा सापडली आहे – नागरिकांच्या, शाहीन बागेतील लहान लहान बालकांच्या हातात ते आता सुरक्षित आहेत. त्यांना आता अर्थ आणि मूल्य प्राप्त झाले आहे.
पण या सरकारच्या विरोधातले सर्वात मोठे आश्चर्यम्हणजे स्त्रिया. त्या सगळ्या धरण्यांचे नेतृत्व करत आहेत. पुरुषी अहंकाराने ज्यांना नेहमीच पाठीमागे ठेवले, ती कधीही उजेडात न आलेली भारताची ५०% लोकसंख्या ठामपणे उभी राहिली आहे. त्या सर्व जातीधर्माच्या आहेत, घुंगट, हिजाब आणि बुरख्यांच्या मागून त्या पुढे आल्या आहेत. भाजप सरकारने गाजावाजा करत ज्यांना तिहेरी तलाक कायद्यातून ‘मुक्त केले’ त्या आता अशा प्रकारे आपल्या स्वातंत्र्याचा जयघोष करत आहेत की त्या पक्षाला तोंड लपवायला लागत आहे. अर्थातच त्यांचे हे स्वातंत्र्य तिहेरी तलाक कायद्यामुळे नव्हे तर नव्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधातून आले आहे.
आपल्या घराच्या चार भिंतींमध्ये राहण्याची सवय असलेल्या गृहिणी फक्त घरातूनच नव्हे तर शतकानुशतकांच्या एकांतवासातून बाहेर पडून त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहेत. त्या आता त्यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या एफआयआरना किंवा पोलिसांकडून घरादारांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना घाबरत नाहीत. त्या आता हिंदू मूलतत्त्ववादी आणि मुस्लिम उलेमा दोघांच्याही समोर ठामपणे उभ्या राहत आहेत. या आंदोलनांनी भारताच्या स्त्रियांना तो आवाज आणि ती शक्ती दिली आहे जी मागच्या कोणत्याही विधेयकांनी दिली नव्हती आणि कदाचित ही भाजपच्या चुकीच्या आडाख्यांची सर्वात मोठी अनपेक्षित निष्पत्ती आहे. आणि यामुळे आपली लोकशाही आणखी मजबूत होणार आहे.
मागच्या एका महिन्यात लोकशाहीचे नवीन शब्दप्रयोग, नवीन भाषाही निर्माण झाली आहे. जी रस्त्यांवर तयार झाली आहे, विद्वानांच्या सभांमध्ये किंवा सुसज्ज स्टुडिओंच्या आरामदायी वातावरणात नव्हे. आंदोलनाच्या ठिकाणांवर कितीतरी सर्जनशील पोस्टर पहायला मिळत आहेत ( “Show me your degree and I will show you my papers!”; “हिंदू-मुस्लिम राजी, तो क्या करेगा नाझी”), समाज माध्यमांमध्ये मीम्स फिरत आहेत, पेंटिंग्ज, काव्ये, गाण्यांची निर्मिती होत आहे. संगीताचा एक पूर्ण नवीनच प्रकार उदयाला आला आहे, जसे व्हिएतनामच्या युद्धाच्या काळात वुडस्टॉक, बॉब डिलन, बॉब मार्ले आणि जोन बेझ यांचे संगीत उदयाला आले होते. आणि त्यामुळे आपल्याला आज वरुण ग्रोवर (‘हम कागज नही दिखायेंगे‘), सुमित रॉय (‘गो प्रोटेस्ट‘), पूजन साहिल (‘पछताओगे‘), अरमान यादव (‘राम भी यहां पे‘) आणि इतर अनेक दिसत आहेत. समतावादी संगीताचा हा उत्सव आहे.
ज्यांची आपण WhatsApp आणि Facebook वरच्या संघटना म्हणून चेष्टा करतो ते आपले तरुण या आंदोलनाचे आघाडीवीर आहेत, अगदी त्यांच्या वरिष्ठांनी सुरक्षित अंतरावर राहणे पसंत केले असले तरीही. तरुणांनी त्यांना इतिहास आणि आपल्या संग्रहित मूल्यांचीसुद्धा चांगली समज असल्याचे दर्शवले आहे – ते स्वतःला राज्यघटना, गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडून घेत आहेत. हुकूमशाही आणि अत्याचारांच्या समोर उभ्या राहणाऱ्या जुन्या गीतांचीही ते नव्याने ओळख करून घेत आहेत – फैज, नागार्जुन, हबिब जालिब, अल्लामा इक्बाल आणि दुष्यंत कुमार यांची गीते.
त्यांना फार लवकर मोठे व्हावे लागले आहे, कमी दुष्ट शक्ती कोणत्या ते ओळखावे लागत आहे, पण आता ते ४० पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये प्रगल्भ होऊन उभे राहिले आहेत आणि त्यांनी ठामपणे “आता पुरे”असे म्हटले आहे. येत्या वर्षांमध्ये यामुळे भारत अधिक समृद्ध होणार आहे, कारण त्यांच्यामधूनच आपल्या राजकीय आणि सामाजिक विश्वात नवीन नेते येणार आहेत आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या आजच्या जुनाट, भ्रष्ट, संधीसाधू, नैतिक दिवाळखोर आणि वैचारिकदृष्ट्या प्रतिगामी नेत्यांची जागा घेणार आहेत.
नागरिकांनी आधुनिक शासनव्यवस्थेचा सामना करणे कठीण असते, कारण शासनव्यवस्थेकडे पोलिस असतात, लष्कर असते, दमन यंत्रणा असते, फेक न्यूज फॅक्टरीज असतात. मात्र कल्पनांच्या लढाईचा निकाल काय लागेल ते कधीच सांगता येत नाही आणि अनपेक्षित परिणामांचा नियम विचारात घ्यावाच लागतो. मोदी अजूनही त्यांच्या रोगट कल्पना पुढे रेटूच शकतात, पण त्यांचा विजय हा निर्भेळ नसेल, आणि अल्पकालीन असेल कारण देशात त्यांना होणारा विरोध अधिकाधिक सकस होत आहे.
नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, बहुलतावाद, राष्ट्रीयता आणि समता या आत्तापर्यंत निर्जीव असलेल्या कल्पना आता सजीव झाल्या आहेत आणि त्यांच्या खऱ्या मूल्याची ओळख लोकांना पटली आहे. सरकारच्या अहंकाराने याची अपेक्षा केली नव्हती. आज कवी मोहम्मद इक्बालचे शब्द आठवतात:“देश कवींच्या हृदयात जन्माला येतात, त्यांची भरभराट आणि त्यांचा मृत्यू राजकीय नेत्यांच्या हातून होतो.” आपण अजूनही हे भाकीत टाळू शकतो.
अवय शुक्ला, हे भारतीय प्रशासकीय सेवेमधून २०१० मध्ये निवृत्त झाले. ते पर्यावरणवादी आणि ट्रेकर आहेत.
COMMENTS