बिल्किस बानो बलात्काराच्या ११ दोषींना माफ करण्याच्या सरकारी समितीचा भाग असलेले गोध्रा येथील भाजप आमदार सीके राऊलजी यांनी एका मुलाखतीत सांगितले, की सुटका झालेले दोषी या गुन्ह्यात सामील आहेत की नाही हे मला माहित नाही आणि हे शक्य आहे की त्यांना गोवण्यात आले असावे.
अहमदाबाद: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषींना माफ करण्याऱ्या सरकारी समितीचा भाग असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने गुरुवारी सांगितले, की २००२ च्या गुजरात दंगलीतील काही दोषी हे चांगले “संस्कार असलेले “ब्राह्मण” आहेत आणि त्यांना गोवण्यात आले असण्याची शक्यता आहे.
समितीच्या भाजपशी संलग्न असलेल्या चार सदस्यांपैकी एक असलेले गोध्रा येथील भाजप आमदार सीके राऊलजी यांनी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे विधान केले.
ते म्हणाले की धार्मिक तणावाच्या परिस्थितीत एका समाजाकडून दुसऱ्या समाजातील निरपराध लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला जातो, ते निर्दोष असू शकतात.
गुजरात सरकारच्या शिक्षा माफी योजनेंतर्गत या ११ कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.
१५ वर्षांहून अधिक काळानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग होता की नाही हे मला माहीत नाही, असेही राऊलजी म्हणाले.
याबाबत विचारले असता राऊलजी म्हणाले, “२००२ चे बिल्किस प्रकरण काय होते, ते कोण आहेत हे मला माहीत नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही निर्णय घेतला. आम्हाला दोषींच्या वर्तनावर आधारीत त्यांच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय घ्यायचा होता.”
त्यांचे म्हणणे होते, की तुरुंगात या दोषींची वर्तणूक चांगली होती, हे त्यांना माहीत आहे.
“आम्ही जेलरला विचारलं आणि कळलं की तुरुंगात त्याची वागणूक चांगली होती… त्याशिवाय ते ब्राह्मण आहेत. त्याचे संस्कार चांगले आहेत, त्याच्या कुटुंबाची वागणूकही चांगली आहे.”
COMMENTS