योगींचे ‘अबाऊट टर्न’

योगींचे ‘अबाऊट टर्न’

उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच भाजपला बॉलीवूडबाबत योगी यांची भूमिका खोडून काढावी लागली. आगामी मुंबई महापालिका तसेच इतर महापालिका निवडणुकीत या विषयाचा थेट फटका पक्षाला बसण्याचा मोठा धोका आहे हे लक्षात येताच राज्य भाजपतर्फे योगी यांच्या भूमिकेचा विरोध करण्यात आला.

भाजप नेते चिन्मयानंद यांना अटक
भ्रष्टाचाराचे बिंग फोडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा
गोरखपूर बालहत्याकांड प्रकरण – डॉ. कफील खान निर्दोष

२०२४ नंतर आपणच या देशाचे पंतप्रधान होणार अशी अपेक्षा ठेवत गेली काही महिने सूत्रबद्धरित्या आपली प्रतिमा रेटण्याच्या प्रयत्नात असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत असलेले बॉलीवुड मुंबईमध्ये राहील असे सांगताना उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारणार असे सांगून अबाऊट टर्न केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

‘योगी है तो यकीन है’, ही घोषणा करत योगी यांचा अश्वमेध चौखूर उधळत आहे. सर्वच वृत्तपत्रांना पानभर जाहिराती देऊन उत्तर प्रदेश हा किती उत्तम प्रदेश आपण करत आहोत याची सचित्र माहिती देण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला देशव्यापी नेतृत्व रुजविण्यासाठी योगी कोणत्याही महापालिका निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. अलीकडे हैद्राबादेत योगी यांनी आपल्या प्रचारसभेत हैद्राबादचे नाव भाग्यनगर करू अशी घोषणा करून आपले नेतृत्व ठसठशीतपणे रुजविण्यासाठी प्रयत्न केला.

कालच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईत येऊन त्यांनी विविध उद्योजक तसेच काही निर्माते-दिग्दर्शक यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांना आकर्षित करणे तसेच मुंबईत असलेल्या बॉलीवूडला आपल्याकडे खेचणे हा यामागील उद्देश.

पण योगी यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपला बॉलीवूड बाबत योगी यांची भूमिका खोडून काढावी लागली. आगामी मुंबई महापालिका तसेच इतर महापालिका निवडणुकीत या विषयाचा थेट फटका पक्षाला बसण्याचा मोठा धोका आहे हे लक्षात येताच राज्य भाजपतर्फे योगी यांच्या भूमिकेचा विरोध करण्यात आला. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माध्यमांसमोर येऊन कोणीही मुंबईत असलेली बॉलीवूड बाहेर घेऊन जाऊ शकत नाही असे सांगावे लागले.

योगी यांच्या या भूमिकेमुळे राज्य भाजपची कोंडी झाली. त्यातच महापालिका निवडणुकीत आपल्याला साथ देऊ शकेल अशी भाजपला अपेक्षा असलेल्या मनसेने तर प्रचंड विरोध करत शहरात योगी यांच्या निषेधार्थ फलक लावले. त्यामध्ये योगी यांचा यूपीचा ठग असाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनीही योगी यांच्या या सर्व भूमिकेचा तीव्र निषेध केला.

याचा थेट परिणाम योगी यांच्या दौऱ्यात झाला. त्यांनी निर्माते दिग्दर्शक आणि काही कलाकार यांच्या भेटी घेतल्या. पण त्यानंतर एकंदरीत सर्व रागरंग आणि वातावरण पाहून योगी अबाऊट टर्न भूमिकेत गेले. मुंबईत असलेले बॉलीवूड आम्ही घेऊन जाणार नाही असे त्यांना बळेबळे सांगावे लागले. उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारणी करू असे त्यांनी सांगितले.

हैद्राबादेत रामोजी फिल्म सिटी आहे. तरीही मुंबईवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात सुद्धा फिल्म सिटी उभी झाली तरी काहीही फरक पडणार नाही असे एका प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सांगितले.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0