भाजप कार्यकर्त्यांचा केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

भाजप कार्यकर्त्यांचा केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्लीः ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टिप्पण्णी करून काश्मीर पंडितांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपच्या युवा आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. यात काही सीसीटीव्ही फोडण्यात आले शिवाय बॅरिकेडची नासधूसही कार्यकर्त्यांकडून झाली. गेटच्या दरवाजावर भगवा रंगही फेकण्यात आला. ही निदर्शने भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली झाली. केजरीवाल यांनी काश्मीर पंडितांचा अवमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी सूर्या व कार्यकर्त्यांची होती.

या हल्ल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एक ट्विट करून भाजपचे गुंड मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर चालून आले. या जमावाला दिल्ली पोलिसांनी अटकाव न करता त्यांना मुख्य गेटपर्यंत नेण्यास मदत केली असा आरोप केला. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंदर जैन यांनीही भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप केला.

या वर प्रतिक्रिया देताना भाजप युवा आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही गुंडगिरी केली नाही असा दावा केला. आमच्या २०-२५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अगोदर अडवले होते. तेजस्वी सूर्या यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते व त्यांची सुटका नंतर करण्यात आली, असे स्पष्टीकरण दिले.

गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत द काश्मीर फाइल्सला करमाफी देण्यावरून टीका केली होती. या चित्रपटाला करमाफी देण्यापेक्षा तो यूट्यूबवर प्रदर्शित करावा त्यामुळे सर्वांना तो मोफत पाहता येईल, असा टोमणा त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष मारला होता. त्यानंतर भाजप व आपमध्ये तणाव वाढला आहे. केजरीवाल काश्मीर पंडितांच्या दैन्याची टिंगल करत आहेत, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांचा आहे.

मूळ बातमी

COMMENTS