दिल्ली जळत असताना केजरीवालांकडून काय शिकायचे?

दिल्ली जळत असताना केजरीवालांकडून काय शिकायचे?

केजरीवाल यांनी दिल्लीकरांना दिलेले सुरक्षिततेचे आश्वासन मोदींच्या विकास व अच्छे दिनासारखे पोकळ असल्याचे दिसून आले आहे.

सरकारी शाळेतील कार्यक्रमात केजरीवाल, सिसोदियांना निमंत्रण नाही
भाजप कार्यकर्त्यांचा केजरीवाल यांच्या घरावर हल्ला
आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल

राज्यघटनेवर हात ठेवून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची तीन वेळा शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ‘तुमचा मुलगा या राज्याचा पुन्हा मुख्यमंत्री झाला असून आपण आपल्या घरात फोन करून सांगा की आता दिल्लीत भय उरलेले नाही,’ असे विधान दिल्लीकरांना उद्देशून केले होते.

या शपथविधीनंतर १० दिवसांतच ३६ वर्षापूर्वी अनुभवलेले अराजक दिल्लीने पुन्हा पाहिले. दिल्लीत झालेल्या या भयाण दंगलीत ४७ जणांचा मृत्यू व सुमारे ३०० हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अनेक मशिदी, शाळा, छोटी-मोठी दुकाने, घरे दंगलखोरांकडून भस्मसात झाली आहेत. हजारो लोक बेघरही झाले आहेत.

आता दिल्लीत भयाशिवाय काही शिल्लक राहिलेले नाही. आणि हे भय केवळ ईशान्य दिल्लीपुरते मर्यादित नाही.

शनिवारीच राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या परिसरात ‘देश के गद्दारों को, गोलीं मारों सालो को’, अशा घोषणा पुन्हा ऐकावयास मिळाल्या. राजीव चौक मेट्रो स्टेशन दिल्लीच्या अत्यंत केंद्रस्थानी आहे. यावरून दिल्लीच्या वातावरणात अजून किती तणाव शिल्लक आहे हे लक्षात येते. या अशा वातावरणामुळे केजरीवाल यांनी दिल्लीकरांना दिलेले सुरक्षिततेचे आश्वासन मोदींच्या विकास व अच्छे दिनासारखे पोकळ असल्याचे दिसून आले आहे.

या एकूण घटनाक्रमातील सर्वांत संतापजनक त्याचबरोबर चिंताजनक बाब म्हणजे पंतप्रधानांपासून केंद्रीय गृहमंत्र्यांने घडलेल्या दंगलीबाबत व दंगलीत बळी गेलेल्यांबाबत एकही सांत्वनपर शब्द उच्चारलेला नाही. शिवाय दंगलग्रस्त भागाचा दौरा या दोन बड्या नेत्यांनी केलेला नाही.

पण दिल्लीचे नागरिक केजरीवाल यांच्याकडून अधिक अपेक्षा करतात आणि त्यांनी तशा अपेक्षा पूर्वी केलेल्याही आहेत.

मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरने म्हटल्या प्रमाणे, ‘अखेरीस आपल्या मनात शत्रू काय म्हणतोय हे राहात नाही तर आपल्या बाजूच्या लोकांचा मूकपणा, मौनपणा आपल्या लक्षात राहतो.’ केजरीवाल यांची जेव्हा बोलायची वेळ होती तेव्हा त्यांनी घेतलेला मौनपणा दिल्लीकरांच्या मनात अनेक वर्षे राहील.

दिल्लीत पहिले दोन दिवस दंगल पेटली होती, या दोन दिवसांत मोठ्या बहुमताने दिल्ली विधानसभा जिंकलेला हा नेता सार्वजनिक स्तरावर कुठेच दिसला नाही. तो लपून बसला होता. १० दिवसांपूर्वीच ‘दिल्लीचा मुलगा’ म्हणवून घेणाऱ्या या नेत्याने दंगलीत होरपळलेल्यांच्या कुटुंबासोबत संवाद न साधता, त्यांच्याबाबत कोणतीही संवेदना, भाईचारा व्यक्त न करता थेट राजघाटावर जाऊन म. गांधी यांच्या समाधीपुढे प्रार्थना करणे पसंत केले.

२५ फेब्रुवारीला जामिया मिलियातील विद्यार्थ्यांनी केजरीवाल यांच्या घरापुढे निदर्शने केली, मोर्चा नेला पण या नेत्याने विद्यार्थ्यांशी संवादही साधण्याचीही तसदी घेतली नाही. उलट दिल्ली पोलिसांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा केला त्यांना सैरावेर पळायला भाग पाडले. एवढेच नव्हे तर या नेत्याने जेएनयूतील माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया याच्यावर देशद्रोह आरोपासंदर्भात चौकशी करण्यास मंजुरीही दिली.

दिल्लीतील हिंसाचारग्रस्त कुटुंबियांना मदत देण्यासाठी आप सरकारने काही प्रयत्न सुरू केले पण हे प्रयत्न अपुरे असल्याचे दिसून आले. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदेर यांनी ट्विटद्वारे आप सरकारने उभे केलेले रिलिफ कॅम्प, त्यातील सोयी किती अपुऱ्या आहेत हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.

जे केजरीवाल काही दिवसांपूर्वी ज्या काहींच्या गळ्यातले ताईत होते त्यांच्यासाठी केजरीवाल आता कडवट झाले आहेत. केजरीवाल यांच्याबद्दल एकप्रकारचा संताप त्यांच्या प्रशंसकांमध्ये धुमसताना दिसतोय. एखाद्या उच्च पातळीवर गेलेल्या नेत्याचा एकाएकी ऱ्हास कसा होतो तसे दिल्लीत केजरीवाल यांचे झाले आहे. जॉर्ज संत्यायनाने म्हटल्याप्रमाणे, आपल्या चुकांतून जे काही शिकत नाही ते त्याच चुका करून स्वत:चा नाश करून घेतात.

मला वाटते, गेले काही दिवसांत दिल्लीत ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्यातून दिल्लीकरांनी पाच धडे घ्यावेत.

धडा क्रमांक १ : मत देण्यापूर्वी आपला नेता खरोखरीच सेक्युलर आहे का, हे कळालं पाहिजे.

शाहीन बागमध्ये सीएएविरोधात जी निदर्शने सुरू आहेत, त्याबद्दल केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी या आंदोलनाबद्दल आपली थेट प्रतिक्रियाही दिलेली नाही. यातून लक्षात यायला हरकत नाही की तुम्ही जर सेक्युलॅरिझमला राजकारणात महत्त्व देत नसाल तर तुम्ही जातीयतेला, धर्मांधतेला वाट देत असता.

धडा क्रमांक २ : जे नेते विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहात नाहीत त्यांच्याविषयी आपण जरा जागरूक असणे महत्त्वाचे आहे.

राजकीय नेत्याचे विद्यार्थ्यांशी असलेले संबंध हे बरेच काही स्पष्ट करत असतात. कॉलेज, विद्यापीठातील मुले हे लोकशाहीचा खरे स्वरुप मांडणारे असतात.त्यामुळे अधिकारशाहीचा जुलुम याच वर्गाला सोसावा लागतो. सत्तेच्या जुलुमा विरोधात नागरी चळवळीतील कार्यकर्त, पत्रकारही असतात त्यांनाही सत्तेची झळ सोसावी लागते. केजरीवाल या काळात एकदाही तरुणांशी, तरुणींशी संवाद साधताना दिसले नाहीत. हेच तरुण जगासाठी हिरो होते. पण तरुणांपासून दूर राहण्याचे केजरीवाल यांनी ठरवले. केजरीवाल यांनी आपल्या राजकीय उद्देशासाठी कन्हैया, उमर, अर्निबन सारख्या तरुण नेत्यांचा उपयोग झाल्यानंतर त्यांना दूर केले.

धडा क्रमांक ३ : नेत्याच्या चारित्र्याएवढे त्याची क्षमताही पाहणे महत्त्वाचे आहे.

ग्रीक तत्ववेत्ता हेराक्लिटसने म्हटले होते, व्यक्तीचे चारित्र्य म्हणजे त्याचे भाग्य/प्राक्तन असते.

एखाद्या नेत्याचे चारित्र्य कसे जोखाल?

एक पर्याय म्हणजे तो अखेरीस काय साध्य करतोय त्यावरून. दुसरा पर्याय ती व्यक्ती आपल्या सोबत असणाऱ्या, मदत करणाऱ्यांबरोबर कसे वर्तन करते, ज्यांचे हात धरून, ती व्यक्ती पुढे आली असेल, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने एक टप्पा गाठला असेल त्यांच्यासोबत ती कसे वागते यावरून.

केजरीवाल यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यांचे प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांच्यासोबत झालेले संघर्ष सर्वांना माहिती आहेत. हे दोघे आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्यांमध्ये होते. पण त्यांना केजरीवाल यांनी पक्षातून बाहेर काढले. हा इतिहास आपण नजरेआड करायचा का?

धडा क्रमांक ४ : नेत्यांची पूजा करणे आता सोडावे व त्यांना प्रश्न विचारावेत.

भारतात नेत्यांची पूजा करण्याची एक पितृसत्ताक मानसिकता आहे. नेत्यांना प्रश्नही विचारले जात नाहीत. मोदींच्या समर्थकांचे प्रेम, निष्ठा व भक्ती याबाबत वेगळी मते आहेत, ती भीती केजरीवाल यांच्याबाबत आहे.

लोकशाहीत नेत्याला भक्तांची गरज लागत नाही. नागरिकांनी आपल्या नेत्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

धडा क्रमांक ५ : आपण सर्वसामान्य नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत स्वत:ला सामावून घेण्याची वेळ आली आहे.

लोकशाही प्रक्रियेत उतरणे, स्वत:ला सामावून घेणे म्हणजे राजकीय संघटना, किंवा एखाद्या पक्षाचे कार्यालय चालवणे नव्हे. तर वेळोवेळी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, शोषित-गरीबांच्या हिताच्या राजकारणाच्या बाजूने उभे राहणे, लोकशाही सदृढ होईल यासाठी स्वत:चे राजकीय शिक्षण करून घेणे, अधिकाधिक प्रतिक्रियावादी होणे यासाठी सतत प्रयत्न करणे.

आपल्याला आता जागे होण्याची वेळ आली आहे. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यात ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हटले आहे, त्या प्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे.

रोहित कुमार, हे शिक्षणतज्ज्ञ मनोविश्लेषक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0