सर्वसमावेशक भारतीयत्वाचे खरे शत्रू कोण?

सर्वसमावेशक भारतीयत्वाचे खरे शत्रू कोण?

सेक्युलॅरिझम या तत्वाचा अंगीकार करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांचे सार्वजनिक व्यवहार हे अशा पद्धतीचे असावेत की ज्यामुळे विशिष्ट धर्म किंवा विचारसरणीच्या इतर नागरिकांवर अन्याय होऊ नये.

डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’
भारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे
‘रक्त संकलना’मागचा डावा दृष्टिकोन

रक्तदान या शब्दाऐवजी रक्तसंकलन हा शब्द वापरणे आणि तसे करण्याचे ठराविक स्पष्टीकरण देणे यावर मी लिहिलेल्या ‘डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’’ लेखावर प्रतिक्रिया देणारा ‘रक्त संकलना’मागचा डावा दृष्टिकोन हा लेख वाचला. या लेखातून लोकशाही आंदोलनाच्या संयोजकांनी, त्यांची दान हा शब्द वगळण्यामागची अधिकृत भूमिका मांडलेली आहे. दान हा शब्द लोकांना धार्मिक चौकटीतून विचार करायला भाग पडतो असे संयोजकांचे म्हणणे दिसते. शिवाय, दान करण्याच्या संधीपासून अनेक लोक वंचित असतात आणि समाजात विषमता असणे ही दान करण्यामागची पूर्वअट असते, असेही त्यांचे म्हणणे दिसते. दान शब्द वापरणाऱ्यांच्या संदर्भात ‘भारतीय’ असा शब्द वापरण्याला सुद्धा संयोजकांनी आक्षेप घेतलेला दिसतो. संयोजकांची भूमिका आणि मांडणी पाहता दान या शब्दाचा उगम आणि वावर, भारतीय संदर्भात इहवादी दृष्टीकोन आणि भाषिक आग्रहातून दिसणारी टोकाला जाण्याची वृत्ती याबाबत काही मुद्दे मांडणे गरजेचे वाटते.

सुरुवातीलाच मला हे नमूद करणे आवश्यक वाटते की आपल्या समाजात गेल्या काही वर्षांपासून धार्मिक मुद्द्यांवरून मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होत आहे. भारतीय समाजाची मूळची बहुसांस्कृतिक वीण विस्कटून टाकण्याचे प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यासारख्या ज्ञानी आणि वयोवृद्ध धुरीणांच्या निर्घृण हत्त्या करण्यामध्ये कडव्या उजव्या संघटनेचे नाव आलेले आहे. एकंदरीतच सर्वसमावेशक भारतीयत्वाच्या संकल्पनेला धोका निर्माण व्हावा अशा टोकाच्या भूमिका घेतल्या जाताना दिसत आहेत. भारतीय संवैधानिक मुल्यांवर विश्वास असणारा एक सजग नागरिक म्हणून मला या गोष्टी निषेधार्ह वाटतात.

असे असले तरी, बहुसांस्कृतिक आणि सर्वसमावेशक भारतीयत्वाचा पुरस्कार करण्याचा दावा करणारे लोकच जेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय म्हणता येतील अशा सांस्कृतिक चिन्हांना वर्ज्य मानायला लागतात, तेव्हा त्या गोष्टीचा विरोध करणे, एक ‘सर्वसमावेशक भारतीयत्वाचा आग्रह धरणारा’ म्हणून मला भाग आहे.

दान हा अनेक प्रकारचे वापर असलेला, अनेक क्षेत्रात वावर असलेला आणि जवळपास सगळ्याच भारतीय भाषांमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. हा शब्द ‘दा’ या धातूपासून तयार होतो. ‘दा’ या धातूचा अर्थ असतो देणे, आणि त्यापासून जे नाम तयार होते ते म्हणजे ‘दान’. त्यामुळेच नेत्र, देह, अवयव, रक्त इत्यादी गोष्टी देणे यासाठीची नामे देहदान, नेत्रदान, रक्तदान अशी तयार झालेली दिसतात. तसेच दान हा शब्द मतदान, योगदान, आदान, प्रदान, जीवदान (अगदी क्रिकेटमधले सुद्धा), अनुदान या नामांमध्ये देखील दिसतो. अनेक ठिकाणी हा शब्द निव्वळ देण्याची क्रिया या अर्थाने ज्याला इंग्रजीत secular usage म्हणता येईल अशा प्रकारे वापरलेला दिसतो. या शब्दाचा धार्मिक क्षेत्रात वापर होतो तसाच तत्ववैचारिक क्षेत्रात देखील वापर होताना दिसतो. बौद्ध आणि जैन तत्वज्ञानात दान ह्या या शब्दाचा उन्नयन घडवून आणणारी क्रिया अशा अर्थाने उल्लेख आहे. हा शब्द सम्राट अशोकाच्या प्रसिद्ध शिलालेखांमध्ये पाली भाषेत आहे तसेच तमिळ तिरुक्कुरळमध्ये पण आहे. अशा प्रकारे दान हा शब्द समस्त भारतीय भाषांमध्ये प्रचलित असलेला आणि सेक्युलर, धार्मिक तसेच तत्ववैचारिक अशा नानाविध अंगांनी वापरला जाणारा आणि खोलवर रुजलेला शब्द आहे.

दान या शब्दाचा उगम, इतिहास आणि जागतिक पातळीवरील प्रचलन तर जास्तच मनोरंजक आहे. दान हा शब्द जरी ऋग्वेद आणि बृहदारण्यक उपनिषदात वापरलेला आढळत असला तरी या शब्दाचा उगम त्याच्याही आधीचा आहे. सगळ्यात आधी “देह्नोम” हा शब्द प्रोटो इंडो युरोपीय भाषेत आणि त्यानंतर “दाह्नम” हा शब्द प्रोटो इंडो इराणीयन भाषेत आढळत होता.  या शब्दांपासूनच दान ह्या संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती झालेली आहे, अशी विक्शनरी मधील नोंद सांगते. “देहनोम” आणि “दाहनम” या दोन्ही शब्दांचा अर्थ भेट (gift) असा दिलेला आहे. बौद्ध धर्मियांच्या मार्फत दान हा शब्द आशियात सर्वदूर पसरलेला दिसतो. जपानी, चीनी, मंडारीन, बर्मी, थाई, ख्मेर, लाओ, मलय, इंडोनेशियन, बालिनीज, अशा अनेक आशियाई भाषेत हा शब्द प्रचलित आहे.

भाषा ही प्रवाही असते. भाषेतले शब्द आणि त्यांच्या अर्थाच्या प्रवाही छटा या त्या भाषिक समूहाच्या सांस्कृतिक प्रवासाचे निदर्शक असतात. सुरुवातीला ठराविक अर्थाने वापरले जाणारे शब्द बऱ्याचदा काही काळानंतर अधिक विस्तारित किंवा संकुचित किंवा निराळ्याच अर्थाने वापरले जाऊ शकतात. जेव्हा एखादा शब्द आधीच्यापेक्षा जास्तीच्या अर्थांनी वापरला जायला लागतो तेव्हा त्याचा अर्थविस्तार झाला असे म्हणतात. दान या शब्दाचा आधुनिक मराठी भाषेत असाच अर्थविस्तार झालेला दिसतो. मतदान, अनुदान, योगदान, आदान, प्रदान या नामांपासून ते अगदी क्रिकेटच्या परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या ‘जीवदान’ या नामांचे उदाहरण घेता हा अर्थछटांचा विस्तार दिसून येतो. भविष्यात, देणे या क्रियेशी संबंधित एखादे नवे नाम घडवण्यासाठी दान या शब्दाचा अगदी सहजपणे उपयोग केला जाऊ शकतो, इतका त्याचा मराठी भाषेतला वापर लवचिक आणि सहज आहे. असे असताना या शब्दाची संभावना निव्वळ “धार्मिक चौकटीतील शब्द” अशी करणे हे भाषाविषयक अज्ञानाचे तसेच पूर्वग्रहदुषित दृष्टीचे निदर्शक आहे असेच खेदाने म्हणावे लागते.

सदर लेखात “लोकशाहीवादी समाजातील नागरिकांची विचार करण्याची पद्धत आणि भाषाही इहवादी असायला हवी” असा आग्रह व्यक्त झालेला दिसतो. या आग्रहाची चिकित्सा करणे आवश्यक आहे. याबाबतीत मे. पुं. रेगे यांनी “इहवाद आणि सर्वधर्मसमभाव” या पुस्तिकेत भारतीय संदर्भात इहवादाचा अर्थ काय असू शकेल याचे जे विवेचन केले आहे, ते मला मार्गदर्शक वाटते. सेक्युलॅरिझम याचा एक अर्थ, प्रत्यक्ष प्रमाणावर आधारलेला आणि अनुभववादापासून निष्पन्न होणारा सिद्धांत/दर्शन/तत्वज्ञान असाही आहे. या अर्थाने भारतीय तत्वज्ञानापैकी चार्वाकाचे तत्वज्ञान हे इहवादी तत्वज्ञान मानता येईल असेही ते म्हणतात. विश्व आणि माणूस यांच्या स्वरुपाविषयीची एक विशिष्ट तत्वज्ञानात्मक विचारप्रणाली हा जर ‘इहवादा’चा नेमका अर्थ असेल, तर विचारस्वातंत्र्य आणि अविष्कारस्वातंत्र्य ह्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना मान्यता देणारी राज्यघटना इहवादी असू शकत नाही असेही ते म्हणतात. म्हणूनच भारतीय प्रजासत्ताकाने शिरोधार्य मानलेल्या इहवाद (सेक्युलॅरिझम) या तत्वाचा भारतीय संदर्भातील अर्थ “शासनाने सर्व धर्माप्रती समान दृष्टीकोन बाळगणे म्हणजेच सर्वधर्मसमभावाचा अंगीकार करणे असा होतो” असे त्यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर असे म्हणता येऊ शकते की सेक्युलॅरिझम या तत्वाचा अंगीकार करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांचे सार्वजनिक व्यवहार हे अशा पद्धतीचे असावेत की ज्यामुळे विशिष्ट धर्म किंवा विचारसरणीच्या इतर नागरिकांवर अन्याय होऊ नये. याचा अर्थ, समाजातील नागरिकांनी ठराविकच दर्शनास अनुसरून त्यांचे विचार करावेत आणि त्यांची भाषा वापरावी, असा लावणे सुयोग्य ठरणार नाही. वरील चर्चेच्या उजेडात भारतीय संदर्भात ‘इहवादी भाषा’ अशी संकल्पना असू शकते काय हा एक प्रश्नच आहे. पण अशी संकल्पना वापरायचीच झाल्यास तिचा काय अर्थ असू शकतो याचा उहापोह देखील वरील चर्चेच्या उजेडात करता येईल. ‘इहवादी भाषा’ म्हणजे अशी भाषा (आणि शब्द), जे सर्वांनी सहजपणे मान्य केलेले आहेत, जे सगळे सहजपणे वापरतात आणि ज्याला इतर कुठल्याही समाजघटकाचा आक्षेप नाही. एखादा शब्द सर्व प्रकारच्या भाषिक घटकांमध्ये विनासायास आणि विनातक्रार चलनात असेल तर आपोआपच तो शब्द या कसोटीवर टिकेल.               

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या लोकशाहीवादी आणि संविधानवादी संघटनांनी त्यांच्या आंदोलनात फैज अहमद फैज या थोर उर्दू कवीच्या “हम देखेंगे” या प्रसिद्ध कवितेचा वापर केला होता. या कवितेतील आशय, खास करून काही शब्द आणि प्रतिमा, हिंदू धर्मविरोधी आहेत अशी तक्रार काही लोकांनी केलेली होती. वस्तुतः फैज अहमद फैज यांनी पाकिस्तानातील हुकुमशाही राजवटीचा निषेध करण्यासाठी, इस्लामधर्मीय लोक ज्या प्रतिमा वापरतात त्या प्रतिमा या कवितेत वापरल्या होत्या. त्या प्रतिमांमधील ठराविक शब्दांना विपरीत तर्काने पकडून न ठेवता, कवितेच्या रोकड्या आशयाच्या अंगाने बघितले असता, त्यामध्ये हिंदू धर्मविरोधी असे काही नव्हते असे माझे मत आहे. असेच मत इतरही अनेक हिंदूंचे होते. पण काही लोकांनी आणि गटांनी टोकाची भूमिका घेऊन या कवितेतील काही शब्द वेगळे काढून त्यावर आक्षेप घेतला. सध्या धार्मिक अक्षावर जे दुर्दैवी ध्रुवीकरण झाले आहे त्याचाच हा परिणाम आहे असे म्हणता येईल. दान या शब्दाला ओढून ताणून वर्ज्य ठरवणारे लोक अंतिमतः “हम देखेंगे” प्रकरणात टोकाची भूमिका घेणाऱ्या प्रवृत्तीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच देत आहेत असे म्हणता येईल.

सर्वसमावेशकता आणि बहुविधतेचा आदर ही अस्सल भारतीयत्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. खेड्यापाड्यातील तथाकथित अडाणी माणूस असो की शहरात राबणारा सोशिक श्रमजीवी असो, हे सगळेच सहजपणे ही वैशिष्ट्ये बाळगताना दिसतात. अस्सल भारतीयत्वाला खरा धोका हा विशिष्ट विचारसरणीने पछाडून जाऊन टोकाच्या भूमिका घेणाऱ्यांकडून आहे. भारतीय मुसलमानांच्या भारतीय वैशिष्ट्यांना गैर इस्लामी मानून विरोध करण्याचा विचार असो की इहवादाच्या अभारतीय रूपाचा कडवा आग्रह असो की मुस्लिम द्वेषावर पोसलेला हिंदुत्ववादी विचार असो, हे सगळेच सर्वसमावेशक भारतीयत्वाचे परस्परपूरक शत्रू आहेत.  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0