बॉलिवुडच्या नजरेतून काश्मीर

बॉलिवुडच्या नजरेतून काश्मीर

लोकप्रिय सिनेमामधले काश्मीरचे प्रणयरम्य चित्रण आपल्याला बाकी भारतातील लोकांमध्ये काश्मीरबाबत अशा प्रकारचा अवास्तव आणि हिंसक भेदभाव का आहे, ते थोडेफार समजून घ्यायला मदत करते.

काश्मीरमधील परिस्थिती : अमित शहांच्या गृहमंत्रालयाकडे माहिती नाही
शाह फैजल यांना अटक, काश्मीरमध्ये नजरकैद
काश्मिरी जनतेचे शांततापूर्ण असहकाराचे धोरण

माझ्या लहानपणी काश्मीर म्हटलं की लगेच मणीरत्नमच्या गाजलेल्या ‘रोजा’ (१९९२) सिनेमातलं गाणं आठवायचं: “ये हसीं वादियाँ, ये खुला आसमाँ.” त्या सुंदर दऱ्या, खुलं आकाश. हे काश्मीर होतं, सौंदर्य आणि न संपणाऱ्या शक्यतांची भूमी.

‘रोजा’ मुख्य प्रवाहातल्या काश्मीरचे प्रतीक आहे. आणि बहुसंख्य भारतीयांच्या कल्पनेत हेच रम्य काश्मीर असते. हे सिनेमातले काश्मीर म्हणजे एक कल्पना आणि वास्तवाच्या सीमारेषेवरची अद्भुत जागा आहे.

गाणे हळूहळू पुढे सरकते तेव्हा तुमच्या लक्षात येते, ही एका नवविवाहित जोडप्याला हळूहळू एकमेकांबद्दल वाटू लागलेल्या शारीरिक आकर्षणाची दृश्यमालिका आहे. ऋषी एक क्रिप्टोलॉजिस्ट आहे, तो ‘रॉ’साठी काम करतो आहे आणि अलीकडेच एका सुंदर ग्रामकन्येशी त्याचे लग्न झाले आहे. नाखुशीनेच लग्नाला तयार झालेल्या रोजाला काश्मीरमध्ये आल्यानंतर पतीबद्दल प्रेम आणि विश्वास वाटू लागला आहे. ते दोघे एकमेकांबद्दलची प्रेमभावनेचा शोध घेत असताना, एकाच ब्लँकेटमधून लगटून चालताना, कँप फायरजवळच प्रणयात रममाण होताना, त्याला काश्मीरची एक नितांतसुंदर पार्श्वभूमी लाभली आहे.

या रमणीय काश्मीरच्या चित्रात काहीतरी चुकीचे आहे असे वाटते. या चित्रांमध्ये न दिसणारे काहीतरी तिथे आजूबाजूला घुटमळते आहे असे भासते.

पहिली गोष्ट म्हणजे, त्यात काश्मीरी कुठे आहेत?

१९ व्या शतकापासूनच, जेव्हापासून तंत्रज्ञानाचा उपयोग करून चित्रे लोकांपर्यंत पोहोचवता येऊ लागली, तेव्हापासूनच काश्मीर म्हणजे एक कल्पनारम्य अद्भुत जागा म्हणून लोकांच्या मनात घर करू लागली. जिची इच्छा बाळगावी अशी जागा, समजून घेण्याची नव्हे.

त्या काळातील एक भरपूर छायाचित्रे काढणारा छायाचित्रकार सॅम्युएल बोर्न याने १८६० मध्ये काश्मीरमध्ये नऊ महिने व्यतीत केले. त्याची छायाचित्रे अतिशय प्रसन्न, मात्र निर्जीव आहेत. त्यात पर्वत आहेत, तळी आहेत, चिनार वृक्ष आहेत. माणसे मात्र असलीच तर कुठेतरी दूर, एकूण चित्राची भव्यता ठळक करतील इतपतच आहेत. त्या चित्रांना जिवंत, अर्थपूर्ण करण्यासाठी नव्हेत.

बोर्नने इमारती, बागा आणि पूल यांचीही छायाचित्रे काढली. या सर्व मानवी श्रम आणि बुद्धिमत्तेतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, मात्र या छायाचित्रांमध्ये त्या केवळ सौंदर्याचे आणखी एक रूप आहेत, तिथे माणूस अनुपस्थित आहे. अर्थात, तिथल्या मानवी वंशाचे अभ्यासपूर्ण चित्रण करणारी काश्मीरींची छायाचित्रे आहेत, पण त्यातले लोक त्या “वंशप्रकारा”चे प्रतिनिधित्व करतात, ती खरीखुरी स्वतंत्र माणसे म्हणून येत नाहीत.

अर्थात, बोर्न ब्रिटिश होता आणि तो वसाहतवादी दृष्टिकोनातून हे पाहत होता असे तुम्ही म्हणू शकता. पण अनेक दशके बॉलिवुडमधल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काश्मीरचे चित्रण ज्या पद्धतीने केले गेले आहे तेही बोर्नच्या दृष्टीशी मेळ खाणारेच आहे.

वसाहतवादी दृष्टी तीच आहे.

१९६० च्या दशकात जाऊ – जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनीच ‘काश्मीर की कली’ प्रदर्शित झाला. १९६४च्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांपैकी तो एक होता. चित्रपटाच्या सुरुवातीला नामनिर्देश होत असताना मागे काश्मीरच्या अद्भुत अशा रंगवलेल्या चित्रांची मालिका दिसत राहते: बर्फाच्छादित पर्वत, शंकूच्या आकाराची झाडे, शांत तलाव. कथा आहे एका श्रीमंत तरुण नायकाची ज्याला लवकरात लवकर एक योग्य पत्नी शोधायची आहे. ही भूमिका केली आहे शम्मी कपूरने.

त्याच्या स्वप्नातली सुंदरी त्याला काश्मीरमध्ये सापडते, निष्पाप निरागस, उमलत्या कळीसारखी दिसणारी चंपा. नायिकेची ही भूमिका शर्मिला टागोरने केली आहे. एका आडबाजूच्या गावातल्या सुंदरीवर भाळणारा शहरवासी हे एक अभिजात रूपक आहे. इथे नव्याने शोधलेल्या आणि ताब्यात घेण्यास तयार असलेल्या जमिनीचे प्रतीक म्हणून स्त्री येते. स्त्री म्हणजे प्रदेश आणि प्रदेश म्हणजे स्त्री हे एक लैंगिक रूपक आहे, आणि वसाहतवाद आणि पर्यटन या दोन्हींच्या कल्पनांना पूर्वीपासून त्याने खतपाणी पुरवले आहे.

१९६० च्या दशकात “हिल स्टेशन” चित्रपटांकरिता काश्मीर हेच सर्वात आवडीचे ठिकाण होते. ते युग एलटीसी प्रवासी रजा मिळण्याचे होते, नागरिकांना पर्यटक म्हणून दाखवणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता संदेशांचे होते. इस्टमनकलरमध्ये काश्मीर कृत्रिम हिरव्या आणि गुलाबी कँडीच्या रंगाची अद्भुत जागा दिसे. छायाचित्र काढतानाच नॉस्टाल्जियाने लदबदलेल्या, पुसट झालेल्या पोस्टकार्डसारखी. आपले भटकण्याचे स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगत शम्मी कपूर, जॉय मुखर्जी किंवा शशी कपूर काश्मीरच्या स्थिर कल्पनारम्य चित्रासमोर नायिकेबरोबर प्रणयदृश्ये रंगवत.

‘रोजा’ आला तेव्हा हे खूपच बदलले होते. काश्मीरमध्ये दहशतवादाने पाय पसरले होते. आता नायक केवळ प्रणयात रममाण होणारा नागरिक असू शकत नव्हता – तो देशभक्त, राज्यव्यवस्थेचा पाईक असणे गरजेचे होते, जो भयंकर दहशतवाद्यांच्या विरोधात उभा राहील.

‘रोजा’मध्ये, भारत आणि काश्मीरमधले अंतर ठळकपणे दिसते. भारताच्या मुख्य भूमीतून आलेले जोडपे, निर्जन ठिकाणी त्यांचा मधुचंद्र साजरा करत आहे. प्रणयासाठी सुयोग्य असे शांत वातावरण प्रचंड लष्करीकरणातून आणि व्यापून टाकणाऱ्या दहशतवादी शांततेतून आले आहे.

आज काश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी आहे. आणि हर्षोन्मादाने ट्वीट करणारे बहुसंख्य भारतीय त्याच्यावर काय आघात झाला आहे याबाबत अनभिज्ञ आहेत. निर्जन रस्त्यांना “शांत रस्ते” म्हटले जात आहे आणि लोक एकत्र येऊन करत असलेल्या निदर्शनांना “फेक न्यूज”.

लोकप्रिय चित्रपटांमध्ये काश्मीरचे जे प्रणयरम्य चित्रण दाखवले जाते, त्यातून आपल्याला हा अवास्तव आणि हिंसक भेदभाव थोडाफार समजून घेता येतो. आपल्या कल्पनाविश्वात काश्मीर नेहमीच एक निसर्गरम्य प्रदेश, एक काल्पनिक जागा आहे जिथे आपल्याला या परिदृश्याचा उपभोग घेऊन वैयक्तिक स्वप्नपूर्तीचे समाधान मिळू शकते. आपल्याकरिता काश्मीर ही खराखुरा इतिहास, खऱ्याखुऱ्या जिवंत स्मृती असलेली खरीखुरी जागा नसून चित्रपटांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेली एक इच्छा आहे. ते एक निसर्गरम्य पोस्टकार्ड आहे. एक पार्श्वभूमी, जिच्यासमोर आपण सेल्फी काढू शकतो आणि आपल्या मुक्त आणि संपूर्ण नागरिकत्वाचे हक्क अंमलात आणू शकतो.

सातत्याने काश्मीरला स्त्रीरूपी परिदृश्याच्या आणि ताब्यात घेण्यासाठी तयार प्रदेशाच्या स्वरूपात दाखवून बहुतांश व्यावसायिक चित्रपट भारतीय राज्यव्यवस्थेच्या वसाहतवादी कल्पनेमध्ये सहभागी होतात. या संदर्भात, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांना काश्मीरमध्ये येऊन चित्रीकरण करा असे आवाहन करतात तेव्हा ते निमलष्करी दलांमार्फत सशस्त्र सुरक्षेची हमीही देतात की काय असे वाटते.

तसा विचार केला तर काश्मीरचा चित्रीकरणासाठी उपयोग करणे हे आजवर काश्मीरचे जसे चित्रण केले गेले आहे त्याच्याशी सुसंगतच आहे – चित्रपट निर्मात्यांना जे पाहायचे आहे तेच ते पाहतात. काश्मीरमधल्या जागांवर चित्रीकरण करण्याने हॉटेले आणि शिकारे यांना उत्पन्न मिळेल, पण ते पोलिस तैनात करणे आणि संचारबंदी लागू करणे यावरही अवलंबून असेल. या गोष्टी काश्मीरी लोकांचे दमन अदृश्य करतात आणि काश्मीर व भारताची मुख्य भूमी यांच्यातील सत्तासंबंध उघडे पाडतात.

‘काश्मीर की कली’ ते ‘रोजा’ ते ‘मिशन कश्मीर’, बॉलिवुडचे काश्मीरवर आधारित मोठे चित्रपट अधिकाधिक राजकारणाशी एकरूप होत जातात. तरीही, त्यांचे विषय आणि इतिहास यांच्यात खूपच फरक असला तरीही हे तीन प्रतीकात्मक चित्रपट विचारांच्या बाबतीत काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे ही भारत देश जन्माला आला तेव्हापासून वादग्रस्त असलेल्या भूमिकेवर ठामपणे एकमेकांच्या बरोबर आहेत.

‘काश्मीर की कली’च्या शेवटी चंपा ही भारताच्या मुख्य भूमीतल्या एकाची मुलगी असल्याचे समजते व ती तिच्या “मूळ” कुटुंबात परत जाते. ‘मिशन कश्मीर’मध्ये दहशतवादी मूलतत्त्ववादाची उत्पत्ती समजून घेण्याचा प्रयत्न आहे, पण त्या प्रश्नाचे निराकरण करताना तो कुटुंबाचे एक पर्यायी रूप उभे करतो – दहशतवादी मुलगा आपल्या आईवडिलांना मारणाऱ्या पोलिसाला आपला बाप म्हणून स्वीकारायला शिकतो.

हे चित्रपट काश्मीरकडे स्वयंनिर्णयाचा अधिकार असलेले राज्य म्हणून पाहू शकत नाहीत. ते पुन्हा पुन्हा एका उदार परंतु कठोर पुरुषप्रधान राज्यव्यवस्थेच्या कल्पनेभोवतीच फिरत राहतात.

काश्मीरी स्वतः बॉलिवुडच्या या ज्ञानात्मक उल्लंघनाकडे अधिक क्षमाशीलतेने पाहतात. त्यांच्यापैकी अनेकजण उत्पन्न आणि अभिमानाचा स्रोत म्हणून बॉलिवुडचे स्वागत करतात. इतर अनेकांचा चित्रपटांशी अधिक जवळचा संबंध आहे. त्यांना हवलमधल्या फिरदौस चित्रपटगृहाची आठवण येते. ९० च्या दशकात दहशतवाद खूपच जास्त वाढला होता तेव्हा ते बंद पाडले गेले. पण एकाच ठिकाणाचे अनेक अर्थ असू शकतात.

फिरदौस आता चित्रपटाच्या काल्पनिक जगात रमण्याची जागा मानले जात नाही. अनेक काश्मीरींसाठी ती हिंसक सरकारी कारवायांची जागा आहे. भारतीय लष्कराने ती जागा ताब्यात घेतली होती आणि आता ती बेकायदेशीर कैद, छळ आणि मारहाणीसाठी कुप्रसिद्ध आहे. स्वप्ने आणि इच्छांची जागा आता स्वप्ने मारणारी जागा बनली आहे.

आणि तोच सर्वात कळीचा मुद्दा आहे. कोणतीही जागा इतिहास आणि स्मृती, चिन्हे आणि अर्थ, कृती आणि भावना यांचा कॅलिडोस्कोप असते. चित्रणातली जागा आणि वास्तव जागा एकमेकांत मुळातच गुंफलेल्या असतात. लोकप्रिय चित्रपटांमधल्या काश्मीरच्या ठळकपणे दाखवल्या जाणाऱ्या प्रतिमा कॅलिडोस्कोपची केवळ एक बाजू असतात. आणि तरीही त्या आपण तो भूभाग आणि तिथले लोक, तिथली परिदृश्ये आणि तिथल्या स्त्रिया यांच्याकडे कसे पाहतो त्यावर खूप मोठा परिणाम करतात.

देबश्री मुखर्जी ,या न्यू यॉर्क येथील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ मिडल ईस्टर्न, साऊथ एशियन, अँड आफ्रिकन स्टडीज (MESAAS) येथे फिल्म अँड मीडिया या विषयाच्या प्राध्यापक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0