वरवरा राव यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश

वरवरा राव यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश

मुंबईः भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी व कवी-सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांची वैद्यकीय तपासणी तळोजा कारागृहात जाऊन करावी. त्यात त्यांची प्रकृती नाजूक असल्यास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत.

८१ वर्षांचे वरवरा राव स्मृतीभंश व अन्य शारीरिक व्याधींनी ग्रस्त असून त्यांना जामीन द्यावा अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली होती. पण न्यायालयाने त्यांना जामीन न देता त्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे तपासणी करावी वा तसे शक्य नसल्याने कारागृहात जाऊन तपासणी करावी. या तपासणीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासारखी परिस्थिती असल्यास शुक्रवारी निर्णय घेता येईल, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरपर्यंत ढकलली आहे. त्यावेळी न्यायालय डॉक्टरांच्या अहवालावर विचार करेल व त्यानंतर राव यांना रुग्णालयात हलवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

वरवरा राव यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती ऐकल्यानंतर गेल्या २९ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने वरवरा राव यांच्या जामीनावर तत्परतेने विचार करावा असे मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते. त्याला कारण असे की १७ सप्टेंबरनंतर वरवरा राव यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली नव्हती. त्यामुळे एखाद्या कैद्याच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ शकते, असे न्या. ललित, न्या. सरन, न्या. भट यांच्या पीठाने मत व्यक्त केले होते.

त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दुपारी ३ वाजता न्या. मेनन व न्या. तावडे यांच्या पीठापुढे जामीन अर्जाची सुनावणी झाली. यावेळी वरवरा राव यांचे वकील इंदिरा जयसिंह यांनी कैद्याचे मौलिक अधिकार असतात असा मुद्दा मांडत राव यांची प्रकृती ढासळत असल्याचे सांगितले. त्यांना अशाच स्थितीत ठेवल्यास त्यांच्या जीवाला धोका असून तसे झाल्यास पोलिस कोठडीत मृत्यू झाला असा खटला होऊ शकतो. वरवरा राव यांना स्मृतीभंश असून त्यांना लघवी संक्रमणाचाही त्रास आहे, ते बेडवर पडून आहेत, असे न्यायालयाला सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS