कंगनाच्या घरावरचा बीएमसीचा हातोडा अवैध

कंगनाच्या घरावरचा बीएमसीचा हातोडा अवैध

मुंबईः ब़ॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचे वांद्रे मुंबईतील ऑफिस पाडण्याची बृहन्मुंबई महापालिकेची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत कंगना रनौत यांच्या इमारतीचे जेवढे नुकसान झाले आहे त्या संदर्भातील मूल्यांकन न्यायालयात सादर करावे, असेही आदेश न्यायालयाने दिले आहे. कंगना रनौत यांचे कार्यालय व घराचा काही भाग अवैध असल्याचे सांगत तो जमीनदोस्त करण्याचा महानगर पालिकेचा निर्णय दुर्दैवीही असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

कंगना रनौत यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, मुंबई पोलिसांवर केलेल्या टीकेवरही न्यायालयाने नापसंती व्यक्त केली आहे. सार्वजनिक पातळीवर बोलताना स्वतःला आवरावे असे सांगत कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार टीका केल्यास त्याच्याविरोधात पावले उचलणे हे सरकारलाही शोभत नाही, सरकारने अशा टीकेकडे दुर्लक्ष करावे, असे न्यायालयाने मत व्यक्त केले.

कंगना रनौत यांच्या घरावर व कार्यालयावर महापालिकेने केलेली कारवाई ही रनौत यांनी महाराष्ट्र सरकारवर ट्विटर व अन्य माध्यमातून वादग्रस्त विधानानंतर केली गेली, याकडेही न्यायालयाने लक्ष्य वेधले. रनौत यांचे घर अनधिकृत असल्यामुळे पाडले गेले हे पालिकेचे म्हणणे असले तरी रनौत यांना त्या संदर्भात कायदेशीर पावले उचलण्याची संधी देण्यात आली नाही. महापालिकेची कारवाई ही नागरिकाच्या अधिकारावर एकप्रकारचे आक्रमण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

कंगना रनौत यांनी आपल्या घराची डागडुजी करण्यास हरकत नाही, पण पुन्हा बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठी न्यायालयाची परवानगी अत्यावश्यक आहे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

मूळ बातमी

COMMENTS