साथींचा इतिहास – फ्ल्यू

साथींचा इतिहास – फ्ल्यू

स्पॅनिश फ्ल्यू साधारण १९१८ चा अखेरीस अमेरिकेन सैन्याच्या ‘सर्जन जनरल’च्या कार्यालयात बसून ‘व्हिक्टर व्हॅन’ने लिहिले "ही साथ याच वेगाने वाढत राहिली

अज्ञान्यांच्या हातात डिजिटल मीडियाचे शस्त्र!
साथींच्या रोगात मुंबईचा साथी- कस्तुरबा रूग्णालय
कोरोनामुळे जगाचे ८,८०० अब्ज डॉलरचे नुकसान

स्पॅनिश फ्ल्यू

साधारण १९१८ चा अखेरीस अमेरिकेन सैन्याच्या ‘सर्जन जनरल’च्या कार्यालयात बसून ‘व्हिक्टर व्हॅन’ने लिहिले “ही साथ याच वेगाने वाढत राहिली तर येणाऱ्या अवघ्या काही आठवड्यात पृथ्वीवरून मनुष्यजातीचे अस्तित्व संपुष्टात येईल”. व्हिक्टर व्हॅन हा सैन्याच्या संसर्गजन्य रोग विभागाचा प्रमुख डॉक्टर आणि संशोधक होता. ती साथ होती साध्या ‘इन्फ्लुएन्झा’ची. त्या ‘इन्फ्लुएन्झा’च्या नवीन साथीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते.

१) साथीची पहिली लाट (स्प्रिंग वेव्ह १९१८)

एप्रिल १९१७ मध्ये अमेरिकेने पहिल्या महायुद्धात सहभागी व्हायचा निर्णय घेतला. जूनमध्ये अमेरिकन सैन्यदलाने ट्रेनिंगसाठी नवीन ३६ सैनिकी तळांची निर्मिती केली आणि मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती करण्याचे ठरवले.

१९१८ च्या सुरुवातीला ‘हस्केल काउंटी’, कन्सास येथे नेहमीपेक्षा गंभीर लक्षणे असलेल्या इन्फ्लुएन्झा(‘फ्ल्यू’)ची साथ आली. डॉ. लोरिंग मायनर याने त्याची सर्वप्रथम नोंद घेतली. मार्चमध्ये ही साथ फन्सटन येथील सैनिकी तळावर पोहोचली. तेथे जवळपास ५६ हजार सैनिक राहत होते. त्यापैकी अनेकांना या ‘फ्ल्यू’ची लागण झाली. काहीशे सैनिक यात मृत्युमुखी पडले.

तरीही १९१८ च्या मे महिन्यापासून अमेरिकेतल्या सैनिकी छावण्यांअंतर्गत व अमेरिका ते फ्रान्स, इंग्लंड येथील युद्धभूमीवर मोठ्या प्रमाणावर सैनिकांची ने आण करण्यात आली आणि त्यातून ही साथ अन्यत्र पसरली. अमेरिकेतल्या ३६ पैकी २४ सैनिकी तळांवर साथ येऊन गेली आणि त्या तळांच्या जवळच्या ३० मोठ्या शहरांत साथीने नेहमीपेक्षा तीव्र लक्षणे दाखवली आणि अधिक मृत्यु झाले.

सैनिकांबरोबर ‘इन्फ्लुएन्झा’ची ही साथ जगभरात पसरली. प्रथम इंग्लंड, फ्रान्स नंतर स्पेन व संपूर्ण युरोपात पसरली. स्पेन युद्धात सहभागी नसल्याने तेथील वर्तमानपत्रात ही मोठी बातमी झाली. स्पेनच्या राजा तेरावा अल्फान्सो हा सुद्धा याने गंभीर आजारी पडला. सगळ्या जगाचे लक्ष या साथिकडे वेधले गेले आणि तिला ‘स्पॅनिश फ्ल्यू’ हे नाव मिळाले. युरोपातून ती आशिया, आफ्रिका आणि सगळीकडेच पसरली.

सैन्याच्या बराकीत, जहाजांवर, बंदरावर छोटे छोटे उद्रेक होतच राहिले. मृत्युदर तुलनेने कमी असला तरी संसर्गित व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणे भयंकर होती. ताप, तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, शरीर काळे निळे पडून (सायनोसिस) ने २४ ते ७२ तासांत मृत्यू येत असे.

२) साथीची दुसरी लाट ( फॉल वेव्ह १९१८)-

सप्टेंबर १९१८ मध्ये कॅम्प डेव्हेन्स या अमेरिकेच्या नाविक तळावर युरोपातून ये-जा करणाऱ्या सैनिकांमुळे ‘इन्फ्लुएन्झा’ची तीव्र साथ पसरली. जवळपास १४ हजार सैनिकांना त्याची लागण झाली.  त्यापैकी ७५७ सैनिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेतील इतर नाविक तळांवर पण कमी अधिक फरकाने हेच चित्र होते. हळूहळू ही साथ अमेरिकेभर पसरली. ही साथ खूप भयंकर होती. एकट्या अमेरिकेत १ लाख ९५ हजार लोक ऑक्टोबरच्या एका महिन्यात मृत्युमुखी पडले.

न्यूयॉर्क, शिकागो, फिलाडेल्फियासह सगळ्या मोठ्या शहरांमध्ये लाखोंनी रुग्णसंख्या गेली. काही आठवड्यातच प्रत्येक ठिकाणी हजारो लोक मृत्युमुखी पडले.

अमेरिका खंडासह लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका येथे सगळीकडे ही साथ पसरली. भारतातही ब्रिटिश सैन्याबरोबर प्रथम मुंबईत फ्ल्यू पोचला. तेथे त्याने अनेक बळी घेतले. मुंबईत मृत्युदर जवळपास १०.३ टक्क्यांपर्यंत गेला. हळूहळू भारतभर ही लाट पसरली. पंजाब, कोलकता सगळीकडे तिने थैमान मांडले. गंगा, यमुना अशा मोठ्या नद्या प्रेतांनी भरून गेल्या. एका विश्लेषणानुसार फक्त भारतीय उपखंडात या साथीने २ कोटी बळी घेतले.

३) साथीची तिसरी लाट (विंटर वेव्ह १९१९)

सप्टेंबरच्या अती तीव्र लाटेनंतर हळूहळू अमेरिकेतून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. तरी जानेवारी १९१९ नंतर काही ठिकाणी साथ डोके वर काढतच होती. जगभरात ठिकठिकाणी फ्ल्यूचे उद्रेक होतच राहिले. पॅरिसमध्ये साथ सुरूच असल्याने पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीदरम्यान खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांना फ्ल्यूची लागण झाली.

साधारण मार्च १९१९ पासून अमेरिकेतून साथ ओसरायला सुरुवात झाली. उर्वरित जगातून सुद्धा १९२०-२१ पर्यंत ही तीव्र साथ ओसरली. असे म्हंटले जाते, की शेवटी ‘इन्फ्लुएन्झा’च्या तत्कालीन विषाणूला नव्याने वाढण्यासाठी मानवी शरीरच उरले नसल्याने साथ संपुष्टात आली. दुसऱ्या एका थिअरी नुसार सतत बदलत जाणाऱ्या विषाणूच्या जेनेटिक स्वरूपानुसार त्याची संसर्ग क्षमता कमी झाली, त्यामुळे साथ आटोक्यात आली.

वैद्यकीय दृष्टिकोनातून स्पॅनिश फ्ल्यू

स्पॅनिश फ्ल्यू हा इन्फ्लुएन्झाचाच तीव्र प्रकार आहे. ‘फ्ल्यू’ हा आजार सिंगल स्ट्रांडेड आर.एन.ए. या विषाणूंमुळे होतो.

गोवर, एड्स, करोना हे आणखी काही आजार सिंगल स्ट्रांडेड, आर.एन.ए. विषाणूमुळे होतात. इन्फ्लुएन्झाच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आवरणावर हिमॅग्लूटीनिन (H) व न्युरामिनीडेज (N) हे दोन प्रकारचे अँटिजेन असतात. अँटिजेन म्हणजे विषाणू वरील प्रथिनांचा प्रकार. जो जिवंत पेशीमध्ये विषाणूचा प्रवेश घडवून आणतो. हिमॅग्लूटीनिन (H) चे १८ तर न्युरामिनीडेज (N) चे ११ प्रकार निसर्गात आढळतात. फ्ल्यूच्या वेगवेगळ्या प्रकारांना या ‘अँटीजन’वरून नावे दिली जातात.

‌उदा. एच१एन१ (H1N1) – हा स्पॅनिश फ्ल्यू च्या साथीला कारणीभूत इन्फ्लुएन्झा चा विषाणू होता. इन्फ्लुएन्झाचा विषाणू निसर्गात पक्षांमध्ये आढळतो. पक्षांमधून हा विषाणू एखाद्या सस्तन प्राण्यामध्ये (बहुतेकदा डुक्कर) प्रवेश करतो आणि त्यांच्यामार्फत तो मानवी शरीरात प्रवेश करतो. या विषाणूचे ए, बी, सी ( A, B, C)  असे तीन गट आहेत. त्यापैकी इन्फ्लुएन्झा ए (A) माणसांमध्ये संक्रमित होऊन साथी निर्माण करतो. तर बी (B)  माणसांना संक्रमित करतो, पण साथी निर्माण करू शकत नाही. सी (C) गटातील विषाणू क्वचितच माणसांमध्ये संक्रमित होतो व आजार निर्माण करतो. हा विषाणू सतत त्याची रचना बदलत राहतो. म्हणजेच म्युटेशनचा वेग या विषाणूमध्ये प्रचंड आहे. या म्युटेशनमध्ये हिमॅग्लूटीनिन (H) व न्युरामिनीडेज (N) हे अँटीजन त्यांचा आकार बदलतात त्यामुळे एकदा फ्ल्यू होऊन गेलेला असला आणि त्याविरोधात प्रतिकारशक्ती तयार झाली असली, तरी विषाणूच्या नवीन प्रकारात व्यक्तीची प्रतिकारशक्ती काम करू शकत नाही. परिणामी आजाराचे संक्रमण होते. त्यामुळेच दरवर्षी फ्ल्यूची नवीन लस तयार करावी लागते.

‌गोवरच्या विषाणूचा म्युटेशनचा वेग फ्ल्यूच्या विषाणू इतकाच असला, तरी त्यावरील अँटिजेन बदलत नसल्याने एकदा आजार होऊन गेल्यावर किंवा लस दिलेली असताना पुन्हा विषाणू शरीरात आला, की प्रतिकारशक्ती कार्यरत होते आणि व्यक्तीला गोवर होत नाही. पण फ्ल्यूमध्ये प्रत्येक वेळी विषाणूचा आकार मोठ्या प्रमाणात बदलला, की लोक संक्रमित होतात आणि  फ्ल्यूच्या साथी येतात.

‌साधारण इन्फ्लुएन्झाचा विषाणू शरीरात गेल्यापासून २४ ते ७२ तासांमध्ये लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू श्वसनमार्गातील पेशींमध्ये प्रवेश करतो. तेथे तो १० तासांत एका विषाणूपासून जवळपास १ ते १० लाख नवीन विषाणू तयार करतो. विषाणू जितका नवीन तितका शरीरातील प्रतिकार शक्तीचा हल्ला तीव्र आणि वेगवान असतो. त्यामुळे श्वसनसंस्थेतील नाक, घसा, श्वासनलिका आणि शेवटी फुफ्फुसे यांच्यात सूज निर्माण होते. १९१८ चा फ्ल्यूचा विषाणू एकदम नवीन असल्याने, तो कमी वेळात अतितीव्र लक्षणे निर्माण करत असे.

‌साधारण फ्ल्यूची सर्दी, खोकला, घसा सुजणे, ताप, अंगदुखी, ही लक्षणे असतात. साध्या सर्दी खोकल्याच्या औषधांनी ही लक्षणे १०-१२ दिवसांत पूर्णपणे कमी होतात.

‌पण १९१८ चा फ्ल्यू साथीचा विषाणू हा नेहमीपेक्षा खूप जास्त मारक होता. लक्षणेसुद्धा अधिक गंभीर होती. फ्ल्यूच्या नेहमीच्या लक्षणांबरोबरच श्वास घेण्यास त्रास होणे, अतितीव्र खोकला, शरीर काळे निळे पडणे (सायनोसिस), जुलाब, डोकेदुखी इ. लक्षणे दिसत होती. खोकला इतका गंभीर होई, की रुग्णाच्या पोस्टमॉर्टेममध्ये छातीचे स्नायू तुटलेले दिसत. नाकातून, कानातून रक्तस्राव होत असे. जवळपास ५० टक्के मृत्यू हे विषाणूजन्य नुमोनियामुळे झाले. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती विष्णुविरोधात इतकी तीव्र प्रतिक्रिया (सायटोकाईन स्टॉर्म) देत असे, की काही तासांतच फुफ्फुसांमध्ये प्रचंड सूज येऊन (consolidation) फुफ्फुसे निकामी होत. त्यामुळे गुदमरून (ARDS) मृत्यू येत असे.

साधारण तरुणांमध्ये रोगप्रतिकार शक्ती सर्वोत्तम असते. त्यामुळे ही प्रतिक्रिया तरुणांमध्ये तीव्र असे. शिवाय सैनिकी छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांना फ्ल्यूची लागण झाली. परिणामी मृत्यूचे  प्रमाण १५ ते ४० या वयोगटात, लहान मुले किंवा वृद्ध यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त होते. (W Shaped curve).

‌या सुरुवातीच्या विषाणू हल्ल्याला परतवून लावल्यानंतर राहिलेल्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमजोर झाल्याने काही दिवसांनी जीवाणूजन्य नुमोनिया होत असे. त्याकाळी प्रतिजैविके उपलब्ध नसल्याने या जीवाणूजन्य संक्रमणामुळे कित्येक मृत्यू झाले.

या अभूतपूर्व साथीला जनतेने व नेत्यांनी दिलेला प्रतिसाद-

राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचा नेतृत्वाखाली १९१७ साली अमेरीका पहिल्या महायुद्धात उतरली होती. वूड्रो विल्सन आणि शासनयंत्रणा, युद्ध आणि राष्ट्रभक्तीचा प्रपोगंडा अतिशय उग्रपणे राबवत होते. युद्ध जिंकणे एवढे एकच त्यांचे ध्येय होते. त्यासाठी ते नागरिकांना वेठीस धरत होते. त्यांच्यावर निर्बंध लादत होते. देशहितासाठी नागरिकांनी, वाटेल तो त्याग करायला तयार असावे, असे ते सांगत होते. डॉक्टर्स आणि नर्सेस यांना मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती केले होते. अमेरिकन प्रोटेक्टिव्ह लीग नावाची गैरसरकारी यंत्रणा लोकांवर, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर नजर ठेवू लागली. एकुणातच युद्धाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष द्यायला सरकारी यंत्रणेकडे वेळ नव्हता. त्यामुळे फ्ल्यूच्या या महाभयंकर साथीकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन दुर्लक्ष करण्याचाच राहिला. शासकीय अधिकाऱ्यांनी खोटेपणाने वारंवार जाहीर केले, की स्पॅनिश फ्ल्यूला घाबरण्यासारखे काही नाही. वृत्तपत्रांनी खरी माहिती लपवली. वूड्रो विल्सन यांनी या साथीबद्दल जाहीररीत्या एक चकार शब्द एकदाही काढला नाही, लोकांना आश्वासन देणे तर दूरच! आरोग्य अधिकाऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी वारंवार सूचना देऊनही सैनिकांची ने आण थांबली नाही.

‘फिलाडेल्फिया’मध्ये २८ सप्टेंबर १९१८ रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून लिबर्टी लोन परेड नावाचे सैनिकांचे मोठे संचलन झाले. त्याच्या परिणामी दहा दिवसातच रुग्णांची संख्या लाखात गेली तर मृतांची संख्या हजारोंच्या संख्येने झाली.

याउलट ‘सॅन फ्रान्सिस्को’च्या महापौरांनी सुरुवातीलाच लोकांना साथीच्या गंभीरतेची कल्पना दिली. परिणामी जनतेला परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटले. आणि त्यामुळे मृतांची व रुग्णांची संख्या तुलनेने कमी राहिली.

इतर ठिकाणी सरकारकडून सूचना नसली, तरी भीतीची लाट लोकांमध्ये होतीच आणि साक्षात हजारोंनी मृत्यू दिसत असताना प्रशासन खोटे बोलत आहे, हे पाहून लोकांचा विश्वास उडाला. लोकांचा डॉक्टरांवर, प्रशासनावर व एकमेकांवर विश्वास राहिला नाही. अराजकाची स्थिती निर्माण झाली. परिणामी उपासमारीचे, काही साध्या औषधोपचाराने बरे होऊ शकणारे असे टाळता येण्याजोगे मृत्यू टाळता आले नाहीत. लोक आजारापासून वाचण्यासाठी काहीही उपाय करू लागले. कापूर-लसूण गळ्यात घालण्यापासून, ते हायड्रोजन पॅरॉक्साईडचे इंजेक्षन घेण्यापर्यंत लोकांनी काहीही केले. शेवटी स्थानिक प्रशासनाला जाग आली. त्यांनी सामाजिक कार्यक्रमावर बंदी घालणे, रुग्णांचे विलगिकरण, मास्क वापरणे इ. उपाय सांगितले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या उपायांचा फारसा उपयोग झाला नाही.

संपुर्ण अमेरिकेत आणि कमी अधिक प्रमाणात जगभरात हीच परिस्थिती राहिली. लाखोंनी लोक मृत झाले. काही कोटी लोक फ्ल्यूने आजारी पडले.

या साथीमध्ये फक्त अमेरिकेत ६ लाख ७५ हजार मृत्यू झाले. तर जगभरात सुमारे १० कोटी लोक बळी पडले.

सैनिकी हालचालीमधून साथ जगभरात पसरली.

जगातील बरेचसे देश युद्धात गुंतलेले होते. त्यामुळे लोकांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याच्या पोकळ अट्टाहासाने साथीच्या बातम्यांवर बंदी घालणे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, साथ नियंत्रणाचे सामाजिक प्रयत्न करणे, याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. देशा- देशांमध्ये कोणतेही सहकार्य किंवा समन्वय नव्हता. जागतिक आरोग्य संघटनेसारखी आरोग्यविषयक माहितीची देवाणघेवाण करणारी कोणतीच शीर्षस्थ संघटना नव्हती.  त्यामुळे जगभर कुठेही साथ नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही.

नेमका आकडा सांगता येत नसला, तरी वेळीच देशोदेशी सैनिकांची ने आण थांबवली असती आणि आरोग्य अधिकारी, शास्त्रज्ञांचे म्हणणे ऐकले असते, तर मोठ्या प्रमाणात झालेले मृत्यू टाळता आले असते.

आजच्या संदर्भात स्पॅनिश फ्ल्यूचे धडे

साधारण १९२०-२२ नंतर ही अतितीव्र इन्फ्लुएन्झाची साथ आटोक्यात आली. त्यांनतर जवळजवळ २०  वर्षांनी प्रतिजैविके आणि इन्फ्लुएन्झाच्या पहिल्या लसीचा वापर सुरू झाला. त्यानंतर फ्ल्यूचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या जागतिक साथी येऊन गेल्या. त्यापैकी कोणतीच साथ इतकी जास्त मारक नव्हती. २००९ ची एच १ एन १ (H1N1) इन्फ्लुएन्झाची साथ गंभीर होती पण जागतिक पातळीवरील तातडीच्या आणि समन्वयी उपायांमुळे ती टाळता आली.

आज ‘कोव्हिड १९’ च्या साथीमुळे पुन्हा एकदा साथरोगांचे आव्हान मानवजातीपुढे उभे राहिले आहे. ‘कोविड १९’ आणि स्पॅनिश फ्ल्यू दोन्हीही आर.एन.ए. विषाणूमुळे होणारे आजार आहेत. ‘कोविड १९’ वर सुद्धा कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. दोन्हीही श्वसनसंस्थेवर हल्ला करणारे विषाणू आहेत. ‘कोविड-१९’ सुद्धा नोव्हेल म्हणजेच एकदम नवीन विषाणू आहे. ‘कोविड-१९’चा पसरण्याचा वेग जवळजवळ स्पॅनिश फ्ल्यू इतकाच आहे. त्यामुळे बरेचदा ‘कोविड-१९’ची तुलना स्पॅनिश फ्ल्यूशी केली जाते.

मात्र ‘कोविड-१९’चा मृत्युदर स्पॅनिश फ्ल्यूपेक्षा बराच कमी आहे. आज विविध प्रतिजैविके व काही विषाणूविरोधी औषधे उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर सारखी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे बरेचसे मृत्यू टाळता येतात. ‘कोविड-१९’मुळे होणारे बहुतेक मृत्यू, हे इतर मधुमेह, हृदयरोग असे आजार असणाऱ्या व वृद्ध व्यक्तींमध्ये झाले आहेत. शिवाय जागतिक आरोग्य संघटना आणि देशोदेशींची सरकारे साथ नियंत्रणासाठी लॉकडाऊन, सामाजिक जागृती, माहितीची देवाणघेवाण, संशोधन यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहेत. त्यामुळे स्थिती गंभीर असली तरी आशादायक आहे.

आज १०० वर्षे मागे वळून पाहताना असे लक्षात येते, की स्पॅनिश फ्ल्यूने जगाला खूप गोष्टी शिकवल्या. अशा गंभीर परिस्थितीत जागतिक नेत्यांनी, सरकारांनी जास्तीत-जास्त पारदर्शकपणे माहिती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. अशा साथीचा मुकाबला करण्यासाठी जगभरात समन्वय आणि एकमेकांवरचा विश्वास असला पाहिजे. सार्वजनिक आरोग्य सेवा कार्यक्षम असली पाहिजे. संसर्गजन्य रोगाची नोंद करणे व त्याची माहिती जागतिक पातळीवर जाहीर करणे गरजेचे आहे.

लोकांनी सरकारचे नियम, आरोग्यविषयक चांगल्या सवयी याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. विज्ञान आणि शासनावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि एकजुटीने भविष्यात येऊ शकतील अशा साथींच्या विरोधात औषधे, संशोधन, नोंदणी, कृतिकार्यक्रम तयार ठेवला पाहिजे.

आतापर्यंतच्या इतिहासात पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध यापेक्षा कितीतरी पटीने जास्त माणसे वेगवेगळ्या साथीच्या रोगांमध्ये बळी पडलेली आहेत. जगभरात याबाबत जागृती होणे, संशोधनावर जास्त भर देणे, त्याकरता जास्त पैसा खर्च करणे, शास्त्रज्ञ आणि संशोधन यांना प्रोत्साहन देणे, हे गरजेचे झालेले आहे. ‘कोविड-१९’ने पूर्ण जगालाच पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलेले आहे, आणि सार्वजनिक आरोग्यव्यवस्था चांगल्या असणे गरजेचे आहे, याची जाणीव करून दिलेली आहे.

 

संदर्भ

  1. The great influenza – the story of the deadliest pandemic in history

Book by  John M. Barry

  1. https://www.cdc.gov/flu/pandemic-resources/1918-pandemic-h1n1.html
  2. Influenza: The Hundred-Year Hunt to Cure the deadliest disease in history.

Book by Dr. Jeremy Brown.

डॉ.तृप्ती प्रभुणे, या डॉक्टर असून, वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0