वा जावडेकर व्वा!

वा जावडेकर व्वा!

घरात बसून कोरोना एन्जॉय करणाऱ्या मध्यमवर्गीयांचा गिल्ट कमी करण्यासाठी रामायणाची संजीवनी कामी आणलीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सेनारो यांना जे जमले नाही, ते जावडेकर तुम्ही आणि नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आहे. हा तुम्ही कोरोनावर मिळवलेला विजय आहे.

मुंबई विकली जात आहे…
गृहखात्यानेच अमित शहा यांचा ‘बॉम्ब’चा दावा फेटाळला
डॉ. बाबा आढाव-सामाजिक कार्याची नवनीती

वा प्रकाशजी जावडेकर व्वा! कोरोनावर लढण्यासाठी तुम्ही काढलेली आयडियाची कल्पना जबरदस्त आहे. जगभरातील नेत्यांना जे सुचले नाही, ते तुम्ही आणि मोदिजिंनी करून दाखवले आहे.

रामायण टीव्हीवर दाखवण्याची कल्पना अतिशय क्रांतिकारी आहे. कोरोना सुरु झाल्यानंतर आणि मोदिजिंनी आवाहन करूनही मध्यमवर्गीय लोक खूप गडबड करीत होते, घराबाहेर पडण्याची धडपड करीत होते. त्यांना घरातच थांबवण्याची तुमची क्लृप्ती खूप भारी आहे. या भयंकर जबरदस्त कल्पनेला सलाम!

तेहतीस वर्षांपूर्वीचे ते भारावलेले वातावरण अनेकाना आठवले. लोक टीव्हीला हार घालून नतमस्तक होऊन ती जगप्रसिद्ध सिरीयल पहायचे म्हणे. आता कदाचित लोक हार घालणार नाहीत, पण मोदिजी आणि तुमच्यापुढे नतमस्तक नक्कीच होतील.

रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता, असे डांबरट लोक उगाच म्हणत असतात, पण कोरोना हैदोस घालत असताना तुम्ही रामायण बघत होता, असा फोटो मात्र नक्की व्हायरल झाला असून, शहाणे लोक तुमचे उदाहरण नक्कीच अनेक दिवस देत राहतील.

दुधाच्या टॅंकर मध्ये, कंटेनरमध्ये, बलेरो पिकअपमध्ये जमेल तसे लोक आपला जीव धोक्यात घालुन आपापल्या गावाकडे जात आहेत. पोलीस पकडून त्यांना मारत आहेत. पुण्यातून, पिंपरीतून, दिल्लीतून, मुबईमधून लोक पायी हजारो किलोमीटर निघाले आहेत.

रस्त्यावर फक्त नागरिकांच्या रांगा आहेत. भारत-पाकिस्तानची फाळणी झाली तेंव्हा अशाच रांगा लागल्या होत्या म्हणे. खायला काही नाही, खिशात पैसे नाहीत. जमेल ते सामान आणि लहान मुलांना घेऊन लोक कसला तरी अनंताचा प्रवास करीत आहेत.

मुंबईत काही मजुरांना रस्त्यावर ट्रकने उडवले त्यात अनेक जणांचे आयुष्य संपले, अनेक जखमी झाले. उरलेल्या अनेकांना फटके पडत आहेत. काही मुंबईत रस्त्यावर अडकले आहेत. दिसेल त्या जागी, कचऱ्यामध्ये लोक थांबण्यासाठी मजबूर झाले आहेत.

अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक जणांचे रोजगार जातील. पर्यटन, छोटे उद्योग देशोधडीला लागणार आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे.

या अशा काळात रामायण आल्याने या अशा विस्थापितांच्या बातम्यांनी आम्हाला अस्वस्थ वाटणे थोडे कमी झाले. तसेही छापील वृत्तपत्र बंद असल्याने, असल्या बातम्या येण्याची तशी काही शक्यता नव्हतीच.

घरात आरामात बसून, ‘मी रामायण बघतोय, तुम्ही बघताय का’, असे तुम्हीच ट्वीट केलेला फोटो आल्याने मध्यमवर्गीयांचा गिल्ट कमी झाला. अरेरे ‘ते’ लोक कसे करीत असतील ना, ही मध्यमवर्गीय भावना थोडी कमी झाली आणि मोदिजिंनी ‘मन की बात’ करून त्यावर थोडी फुंकर मारली आणि हवेत ऐन उन्हाळ्यात कसा गारवा निर्माण झाला.

तेहतीस वर्षांपूर्वी रामायण आले आणि त्यानंतर बाबरी मशीद पडली. झुंडीने एकत्र येऊन विध्वंस करण्याची भारतातील ती पहिलीच घटना होती. मध्यमवर्गीयांनी रामायणासारखीच तीही एन्जॉय केली होती आणि आताही लोक घरात बसून कोरोना एन्जॉय करीत आहेत. त्यांच्या केकवर तुम्ही चेरी दिली आहे जावडेकर. तुम्ही कमाल केली.

फिल्म डिव्हिजन, एफटीआयआय, दूरदर्शन यांच्याकडे खरेतर खूप कन्टेन्ट होता आणि आत्ताच्या काळात तो दाखवता आला असता, पण तुम्ही रामायणाची सार्थ निवड केली. आपल्याला दवाखाने आणि टेस्टिंग कीट आणि प्रयोगशाळा हव्या आहेत. या काळात रामायण दाखवून कोरोनावर सगळे विसरून मध्ययुगात जाण्याचा तुम्ही रामबाण उपाय काढलात, व्वा!

ज्यांना शक्य आहे, ते सगळे सध्या काम करीत आहेत. उद्धव ठाकरे, अजित पवार, राजेश टोपे आणि राज्य सरकार शक्य ती शर्थ करीत आहे. रस्त्यावर उतरून काम करण्याऐवजी राज्य सरकारवर नजर ठेवण्यासाठी मोदिजी यांनी तुमची आणि नितीन गडकरी यांची खास निवड केली आहे. कोरोना वर केलेल्या या उपायांना तोड नाही. प्रत्येक संकटाचा फायदा घेऊन त्याचा आपल्यासाठी उपयोग करण्याच्या तुमच्या आणि मोदिजी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे.

विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगण्याचा संदेश देण्याऐवजी गोमुत्र पिऊन कोरोना बरा होतो, असे म्हणणाऱ्या अनेकांना दैववादाकडे जाण्यासाठी या रामायणाचा चांगलाच उपयोग होईल.

दिल्लीमध्ये गाझियाबादमध्ये अनेक लोक दिल्ली सोडण्याच्या मार्गावर आहेत. त्याना परत आणण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया प्रयत्न करीत आहेत. रैन बसेरा तयार करून लोकांच्या अन्न पाण्याची व्यवस्था अरविंद केजरीवाल करीत आहेत. केरळमध्ये पिनरायी विजयन यांनी साथीच्या आजारात कसे काम करावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. या सगळ्यावर टीका करण्यासाठी भक्तांचे ट्वीटर हँडल आणि आयटी सेल दिवसरात्र काम करीत आहे. या काळात दूरदर्शनचा इतका उत्तम उपयोग दुसरा कोणी केला नसेल, जावडेकरजी!

सगळ्याच गोष्टींचा राष्ट्रवादासाठी आणि आपल्या राजकारणासाठी उपयोग करणाऱ्या पक्षाचा एक मास्टर प्लान आहे, म्हणे! रामायण दाखवून तो अंमलात आणला जाणार आहे, का? महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारऐवजी सतत मोदिजींचा उद्घोष करीत आहेत, त्यांनाही या रामायणाचा फायदा होईल. उगाच मुलाखती देण्यापेक्षा ते किमान घरी तरी बसतील.

कोरोना, ही कशी चीनची खेळी आहे. तिचा पाकिस्तानला कसा उपयोग होतोय आणि प्रत्येक घटना कशी मुसलमानांमुळे घडते, अशा पोस्ट तयार करीत सतत व्हॉटसअप करणाऱ्या मध्यमवर्गीयांना तुम्ही रामायण दाखवून, त्यांच्या बुद्धीला तुम्ही छान खाद्य दिलेत जावडेकर!

धन्य आहे तुमची जावडेकर, तुम्ही शातपणे कोरोनावर विजय मिळवला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सेनारो यांनाही हे जमलेले नाही. रामायणाची संजीवनी अखेर तुम्ही वापरलीच! पण एक कळले नाही, की ते ट्वीट तुम्ही डिलीट का केले?

तरीही वा जावडेकर व्वा!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: