नवी दिल्ली: रिपब्लिक भारत या कार्यक्रमात पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश व्यावसायिक अनिल मुसर्रत यांना आयएसआयच्या हातातील बाहुले म्हटल्याप्रकरणी, रिपब्लिक व
नवी दिल्ली: रिपब्लिक भारत या कार्यक्रमात पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश व्यावसायिक अनिल मुसर्रत यांना आयएसआयच्या हातातील बाहुले म्हटल्याप्रकरणी, रिपब्लिक वाहिनी प्रसारित करणाऱ्या ब्रिटनमधील कंपनीला, ३७,५०० पौंड्सचा (३५ लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी रिपब्लिक टीव्हीचे संपादक आहे. मात्र, हा दावा गोस्वामी यांची वाहिनी प्रसारित करणाऱ्या ब्रिटनमधील कंपनीवर ठोकण्यात आला होता.
रिपब्लिक भारत या कार्यक्रमात मुसर्रत यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा नव्हता. या आरोपामुळे मुसर्रत यांच्या प्रतिष्ठेची हानी होण्याचा धोका मात्र मोठा होता, असे हायकोर्ट ऑफ जस्टिस- क्वीन्स बेंच डिव्हिजनने म्हटले आहे.
२२ जुलै २०२० रोजी प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश व्यावसायिक अनिल मुसर्रत यांना ‘आयएसआयची कठपुतली’ असे संबोधण्यात आले होते. त्यावरून मुसर्रत यांनी रिपब्लिक वाहिनीच्या प्रसारणाचा परवाना असलेल्या कंपनीवर मानहानीचा दावा ठोकला होता.
रिपब्लिक टीव्हीच्या कार्यक्रमात मुसर्रत यांचे भारतातील बॉलिवूड सेलेब्रिटीजसोबतचे फोटो दाखवण्यात आले होते आणि ‘बॉलिवूडने पाकिस्तानचे समर्थक, दहशतवादाचे समर्थक आणि भारतविरोधी व्यक्तींशी संबंध ठेवणे योग्य आहे का’ अशा आशयाचे कॅप्शन या फोटोला देण्यात आले होते.
‘रिपब्लिक टीव्हीच्या कार्यक्रमात मुसर्रत यांचे नाव व फोटो यांसह त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते,’ असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
वर्ल्ड व्ह्यू मीडिया नेटवर्क लिमिटेड या ब्रिटनमधील नोंदणीकृत कंपनीकडे रिपब्लिक भारत प्रसारित करण्याचा परवाना आहे. या कंपनीने सुनावणीत सहभाग घेतला नाही. प्रतिवादी सुनावणीला उपस्थित राहिला नाही, प्रतिवादीचे प्रतिनिधित्व कोणी केले नाही आणि त्यांनी काही निवेदनही पाठवले नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. प्रतिवादीला खरे तर याहून अधिक दंड ठोठावणे कायद्याच्या दृष्टीने शक्य आहे पण प्रतिवादीने सुनावणीत भागही न घेतल्याने दंडाच्या वसुलीची संभाव्यता कमी आहे याची दखल घेऊन न्यायालयाने दंडाची रक्कम निश्चित केली आहे. दहशतवादाचा आरोप अत्यंत गंभीर व नुकसानकारक असल्याने, असे बेछूट आरोप करणाऱ्यांना सहा आकडी दंड ठोठावण्यात काहीच गैर नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
रिपब्लिक भारतच्या कार्यक्रमात फोटो व नाव यांसह आपला उल्लेख सरळ दहशतवाद्यांना मदत करणारा असा करण्यात आला, असे मुसर्रत यांनी पत्रकारांना सांगितले. आपला आयएसआय किंवा अन्य कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंध नाही, असेही ते म्हणाले.
रिपब्लिक वाहिनीने मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्याकडे मुसर्रत दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा कोणताही पुरावा नाही.
याबाबत ब्रिटिश न्यायसंस्थेने नि:पक्षपाती भूमिका घेतल्याबद्दल मुसर्रत यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मूळ वृत्त
COMMENTS