गुपित महाधनेशाचे

गुपित महाधनेशाचे

एका झेपेत कोसो अंतर कापताना अख्ख्या जंगलाचा नकाशा माडगरुडाला माहीत असावा की काय अशी शंका नक्की मनात येते. खूप अंतर कापू शकत असल्यामुळेच फळे खाऊन त्यांच्या बिया या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे काम इमानइतबारे ही धनेश प्रजाती वर्षानुवर्षे करत आहे. जंगलाचे शेतकरी ही उपाधी सार्थ करत असतानाच देवराया जपण्याचं अमूल्य कार्य आपल्या पंखांवर लीलया तोलत आजही माडगरुड कोकणात ठिकठिकाणी दिसून येतात.

स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन
चिगा (सुगरण)
धुळ्याचे पक्षी नंदनवन – नकाणे तलाव

पहाटेची सूर्य किरणे धुक्याच्या हळुवार चादरीतून धरित्रीला अलगद स्पर्श करत असताना देवराई सुद्धा जडावलेले अंग झटकत जागी होऊ लागलेली असते. देवळाच्या पुजाऱ्याची घंटा वाजवण्याची लगबग आणि सुगंधी अगरबत्तीचा मंद सुवास वातावरण प्रफुल्लित करत असतो. सोनसळी किरणे आणि वाऱ्याने मंदावलेल्या पणत्या ल्यालेली दीपमाळ धुक्याने कुंद हवेत प्रकाशाची तिरीप निर्माण करतात. अशा वेळी समोरच्या भेळ्यावरून येणारा एक उच्च स्वरातला आवाज आपलं लक्ष्य वेधून घेतो. महाधनेश नुकताच जागा झालेला असतो. रात्रभर अंगामध्ये खोचून बसलेली मान उंचावत तो धनेशाचा पहिला उच्चारव संपूर्ण आसमंतात भरून राहतो. ही साद देवराईच्या नसानसात भिनते आणि आळसावलेली अख्खी देवराई लख्खदिशी जागी होती. कोकणातल्या बहुसंख्य देवराईमध्ये घडणारी ही घटना अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात आणि नकळत महाधनेशाच्या विषयी मनात कुतूहल निर्माण होते.

महाधनेश म्हणजेच स्थानिक भाषेत माडगरुड. सूरमाडाच्या झाडावर रसिली पिवळसर तपकिरी रंगाची फळे खाण्यासाठी हमखास हजेरी लावणारा पक्षी. पिवळसर शिंगवाली चोच, काळे पांढरे अंग, उडताना सो सो येणारा पंखाचा आवाज यामुळे चट्टदीशी ओळखू येणारा पक्षी. उडत असताना लांबूनच पंखांच्या आवाजामुळे याचे अस्तित्व जाणवते. एखादे हेलिकॉप्टर तर येत नाहीना अशी शंका नक्कीच वाटून जाते. कोकणचे वैशिष्टय मानावा असा हा विहंग. वड, पिंपळ, उंबर फळांनी बहरले की या झाडांवर पक्ष्यांची जत्रा भरते. हरियल, साळुंक्या, तांबट, हळद्या, मलबारी धनेश, पोपट हे जरी आपली उपस्थिती लावत असले तरी जेव्हा एखादा माडगरुड जवळपास असेल तेव्हाच ते झाड खऱ्या अर्थाने जिवंत असल्याचे भासते. अधिकाधिक फळे खाण्याची स्पर्धा निःसंशय रित्या माडगरुड जिंकत असावेत यात शंका असण्याचे कारण नाही. अत्यंत ताकदवान पंख, बाकदार चोच आणि दणकट पंजे या कामी यांना चांगलीच मदत करतात. एका झेपेत कोसो अंतर कापताना अख्ख्या जंगलाचा नकाशा यांना माहीत असावा की काय अशी शंका नक्की मनात येते. खूप अंतर कापू शकत असल्यामुळेच फळे खाऊन त्यांच्या बिया या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे काम इमानइतबारे ही धनेश प्रजाती वर्षानुवर्षे करत आहे. जंगलाचे शेतकरी ही उपाधी सार्थ करत असतानाच देवराया जपण्याचं अमूल्य कार्य आपल्या पंखांवर लीलया तोलत आजही माडगरुड कोकणात ठिकठिकाणी दिसून येतात.

स्थानिक भाषेत गरुड, ककणेर अशा अनेक नावांनी हा पक्षी ओळखला जातो. बरेचदा देऊळ आणि वस्ती शेजारी यांचं निवासस्थान असल्यामुळे स्थानिक लोक याला सहजतेने ओळखतात. धनेशाच आयुष्य तसं एकदम रंगतदार किंबहुना रोमँटिक. आयुष्यभर एखादा जोडीदार निवडावा आणि जणू एकत्र आयुष्य व्यतित करण्याच्या आणाभाका घेऊन जीवन कंठावे हा यांचा जीवनक्रम. नर आणि मादी यांची जोडी एकमेकांना पसंद पडली की यांचे प्रणयाराधन शिगेला पोहोचते. ठिकठिकाणाहून रसिली चविष्ट फळे गोळा करून आपल्या गळ्यामध्ये साठवून मादीला भरवतना रामायणातील शबरीच्या बोरांची कथा डोळ्यासमोर तळरून जाते. मादी नराने आणलेली फळे प्रेमाने स्वीकारून आपला अबोल होकार कळवते आणि प्रचंड पंख फुलवून यांचे काही क्षण टिकणारे मिलन पार पडते. इथून पुढे मात्र अरे संसार संसार कहाणीला सुरुवात होते. मिलन होण्याआधी शोधलेली ढोलीमध्ये मादी स्वतःला कोंडून घेते. बेहडा, सातविण, आंबा, शेवर, ऐन असे महावृक्ष सहसा ढोल्या असणारे असतात. असे वर्षानुवर्ष टिकून राहिलेले वृक्षराज धनेशाची नवीन पिढी या जगात आणण्यास मदत करतात. मादीने ढोलीत प्रवेश केला की मातीच्या साहाय्याने ढोलीचे तोंड फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवून बंद केले जाते. मग सुरू होतो तो मादीचा तुरुंगवास आणि नराचा कष्ट प्रद प्रवास. मादीने अंडी दिली की साधारण ५० दिवसाने पिल्लू बाहेर येते. या सर्व दिवसात नर अख्खं जंगल पालथ घालून वेगवेगळी फळं गळ्यात साठवून घेऊन येतो आणि मादीला भरवतो. या फळात ७० टक्के फिग म्हणजेच वड, पिंपळ प्रजातीचे प्रमाण असते. लिपिड आणि शर्करेने युक्त अशी सर्व प्रकारची फळे यांच्या आहाराचा भाग आहेत. तसेच ही फळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने युक्त असल्यामुळे अंडी देण्यात आणि हाडांची वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच मादीच्या शरीराची झालेली झीज आणि पिल्लाची वाढ पटकन होण्यासाठी प्रोटीन रिच फूड म्हणून मांसाहार सुद्धा यांच्या आहारात सामील होतो. छोट्या पक्ष्यांची पिल्ले, साप, सरडे, पाली, उंदीर असे काही प्राणी प्रथिनांची गरज भागवण्यासाठी मदतगार ठरतात. यावेळी नराची प्रचंड धावपळ होते. ढोलीत मादी सुद्धा कृश झालेली दिसून येते. तिची पंख आणि मानेवरची पिसे गळतात, वजन कमी होत. आपल्या पुढच्या पिढीच्या संरक्षणासाठी केलेला हा त्याग पिल्लू अंड्यातून बाहेर आले की फळणार असतो. मग माती फोडून मादी बाहेर येते. मग दोघेही पिल्लाच पालन पोषण करण्यात हातभार लावतात.

परंतु गेल्या काही वर्षात मोठ्या झाडांची कमी होणारी संख्या, रानातील फळे देणारी झाडांची घटलेली संख्या, आणि देवराईवर झालेले विकासाचे अतिक्रमण यामुळे महा धनेश विरळ झाले आहेत. अनेक ठिकाणी जंगली झाडे तोडून शोभिवंत झाडे लावण्याचा अट्टाहास या प्रजातीच्या मुळावर उठला आहे. सूर माडाच्या झावळ्या मोठ्या प्रमाणात तोडून त्याची तस्करी केल्याची घटना वेळोवेळी उघडकीस येत आहेत. देवराईमधली भेळे, बकुळ सारखी जुनी मोठ्या बुंध्याची झाडे देवळाचे काँक्रिटीकरण करण्याच्या नव्या पद्धतीमुळे तोडीच्या हवाली झाली आहेत. आंबा काजू अननस रबरचे एकसुरी लागवड एकंदरीत जंगलांची विविधता नष्ट करतात. फळं न मिळाल्याने ग्रेट हॉर्नबिलला आता प्रचंड लांबवर फेऱ्या माराव्या लागत असणार हे नक्की. दक्षिण भारतात तर कॉफी लागवडीचे अनेक पर्वतांची जंगलेच संपुष्टात आणली. आंबोली दोडामार्गमध्ये रबर लागवडीचे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. काही पर्यटन स्थळांजवळ तर महा धनेश ब्रेकफास्ट हॉटेल सुरू केले गेले होते. यामुळे वर्षानुवर्ष वापरात असलेले एक घरटे त्या जोडीने कायमचे सोडले. सह्याद्रीचे भूषण असणारा हा पक्षी आता नष्टप्राय प्रजातीच्या दर्जापर्यंत पोचला आहे. अजून वेळ गेलेली नाही. देशी झाडांची लागवड, जंगलांची तोड रोखणे, आणि असणारे जंगल पट्टे community reserve म्हणून घोषित करणे हाच तातडीचा उपाय आता शिल्लक आहे. याचबरोबर या पक्ष्याचे जंगल वाढीमध्ये असणारे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. नाहीतर विकासाच्या हव्यासापायी ज्या मूलनिवासी पक्ष्याने ही सह्याद्रीची जंगलं वाढवली, त्यांना आकार उकार दिला, त्यांच्या सीमा वाढवल्या त्याच पक्ष्याचे नष्टप्राय होणे हे परवडणारे नाही. त्यामुळे आता आपणच पुढे येऊन माडगरुडाची मदतीची हाक ऐकणे गरजेचे बनले आहे.

प्रतीक मोरे, निसर्ग अभ्यासक, फुलपाखरे, पक्षी आणि कोकणातील जैव विविधता विषयक लेखन करतात. स्वयंसेवक सह्याद्री निसर्ग मित्र, (खवले मांजर संरक्षण प्रोजेक्ट )

छायाचित्रेः शार्दुल केळकर, प्रतीक मोरे

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0