अश्रुधूर, मोडक्या काठ्या, पॅलेट गोळ्यांची वसुली

अश्रुधूर, मोडक्या काठ्या, पॅलेट गोळ्यांची वसुली

लखनौ : एनआरसीच्या मुद्द्यावरून उ. प्रदेशातील रामपूरमध्ये हिंसाचार झाला आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी उ. प्रदेश सरकारने २८ जणांना हिंसाचार व मालमत्तेची नासधूस करण्याप्रकरणी दोषी ठरवून त्यांना सरकारच्या तिजोरीत १४ लाख ८६ हजार रु. भरण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश रामपूर जिल्हा प्रशासनाने काढले आहे. या २८ जणांमध्ये काही मजूर, कारागिर, मसाले विकणारे आहेत. हे सर्व पोलिस कोठडीत आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारात १८ जणांना मृत्यू झाला होता. त्यापैकी एक जण रामपूरमध्ये मरण पावला होता. राज्यात एनआरसीवरून तीव्र निदर्शन पसरत चालल्याचे पाहून मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडून जबर वसुली केली जाईल अशी धमकी दिली होती. या धमकीचे प्रत्यक्ष कृतीत बुधवारी रुपांतर झाले.

रामपूर जिल्हा प्रशासनाने कोणत्या मालमत्तेचे किती रुपये नुकसान झाले आहे त्याची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार

पोलिसांची जीप : ७ लाख ५० हजार रु.

पोलिसांची मोटार सायकल : ६५ हजार रु.

पोलिस ठाण्याची मोटार सायकल : ९० हजार रु.

या व्यतिरिक्त अश्रुधुराच्या कांड्या, पॅलेट गोळ्या, वायरलेस सेट, हूटर, लाउडस्पीकर, मोडलेल्या १० काठ्या, तीन हेल्मेट व तीन चिलखते यांच्या खर्चाचाही समावेश आहे.

दरम्यान ज्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे ते सर्व गरीब असून जमीर या कामगाराच्या आईने – मुन्नी बेगम यांनी आमच्याकडे वकील करण्यासाठीही पैसे नसल्याचे सांगितले. पोलिस आमच्या घरी घुसले व जमीरला उचलून नेले. त्याला नेताना कारणही पोलिसांनी दिले नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला जमीरवर हिंसाचार पसरवल्याचा आरोप ठेवल्याचे आम्हाला कळाले, असे मुन्नी बेगम म्हणाल्या.

जमीरचा शेजारी महमूदलाही पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. महमूद हा मसाले विकण्याचे काम करतो. त्याच्या पत्नीने माझा नवरा मसाले विकण्याचे काम करतो, त्याच्या कमावण्यातून मुलांच्या खाण्यापिण्याचा खर्च कसाबसा निघतो असे सांगितले. मेहमूदचा मेहुणा फहीमच्या नुसार मेहमूदला दंगलीत भाग घेण्याची काहीच गरज नव्हती त्याची कमाई इतकी कमी आहे की तो एवढे पैसे कसे भरेल, असा सवाल त्याने केला.

रामपूरमधील बिलासपूर गेटच्या नजीक राहणाऱ्या पप्पूलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पप्पूची पत्नी सीमाने माझ्या नवऱ्याला पोलिसांनी काहीही कारण नसताना पकडल्याचा दावा केला. शनिवारी आमच्या घरी पोलिस आले आणि त्यांनी त्याला धरून नेले असे त्या म्हणाल्या.

सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडले

रामपूरचे जिल्हाधिकारी अंजनेय कुमार सिंह यांच्या मते २१ डिसेंबरला हिंसाचार झाला त्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर दंगलीत भाग घेणाऱ्यांना शोधून काढण्यात आले. आजपर्यंत २८ जणांना नोटीस पाठवली असून त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे, असे अंजनेय कुमार सिंह यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS