गिरीश महाजन : लोकप्रिय तितकेच वादग्रस्त

गिरीश महाजन : लोकप्रिय तितकेच वादग्रस्त

१९९५ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली व माजी आमदार ईश्वरलाल जैन यांना पराभूत करीत विधानसभा गाठली. बाकडा कंपनी आणि सुपारी बाग यांच्यात चालत आलेल्या पारंपरिक राजकारणाला गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत छेद दिला व नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.

आरक्षण, भागवत आणि संघ
आंदोलनाच्या तयारीत धनगर समाज
तेजस्वी सूर्यां यांना जर्मनीत भारतीय संघटनांचा विरोध

उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे आहे. ४७ पैकी ४२ जागा निवडून आणू असा त्यांना विश्वास आहे. जितक्या जागा ते सांगतात तेवढ्या निवडून येतात अशी त्यांची ख्याती आहे. जळगाव व धुळे महानगरपालिकेत ते सिद्ध झाले आहे.

२०१४ नंतर महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते गिरीश महाजन यांचे नाव एकदम प्रकाशझोतात आले. आणि त्यानंतर गेल्या पाच वर्षांत भाजपच्या राजकीय रणनीतीत महाजन यांच्या अनेक चालींना यश मिळत गेले. त्यात विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना गळाला लावण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आगामी काळात त्यांच्यावर महाराष्ट्रात मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते अशी खान्देशात चर्चा आहे.

गिरीश महाजन २०१४ साली पाचव्यांदा जामनेर मतदारसंघातून निवडून आले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते भाजपाशी जोडले गेले होते. १९९२मध्ये जामनेर ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून ते निवडून आले नंतर त्यांनी जामनेरचे सरपंचपदही सांभाळले. १९८८ ते १९९० पर्यंत ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जामनेर तालुका अध्यक्ष होते.

१९९५ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली व माजी आमदार ईश्वरलाल जैन यांना पराभूत करीत विधानसभा गाठली. बाकडा कंपनी आणि सुपारी बाग यांच्यात चालत आलेल्या पारंपरिक राजकारणाला गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत छेद दिला व नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. जामनेरच्या राजकारणाची सुपारी बाग व बाकडा कंपनी ही मुख्य २ केंद्रे होती. सुपारी बाग व बाकडा कंपनीच्या अवती भोवतीच जामनेरचे राजकारण फिरायचे. नंतरच्या काळात महाजन यांनी आपल्या निवासस्थानाचे नाव अडकित्ता बाग असे ठेवले होते.

सुपारी बाग हे राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांचे जामनेर येथील निवासस्थान आहे. तर मोहन धारीवाल यांच्या दुकानाबाहेर असलेल्या बाकड्यावर ईश्वरलाल जैन यांच्या विरोधकांचा जो मित्र मेळा जमायचा तो जामनेरच्या राजकारणातील प्रसिद्ध असलेला ‘बाकडा गट’. बाकडा गटाचे नेतृत्व सुरेशदादा जैन यांचे समर्थक मोहन धारीवाल यांच्याकडे होते.

१९९५साली गिरीश महाजन यांनी पहिली आमदारकी लढवली त्याला सुरेशदादा जैन यांनी मोठी मदत केली होती. महाजन यांनी देखील ही मदत अनेकदा सार्वजनिकरित्या मान्य केली आहे. ईश्वरलाल जैन यांचा पराभव करण्यासाठी सुरेशदादा समर्थक बाकडा गटाने कंबर कसली होती.
या निवडणुकीत बाकडा गटाने युवा गिरीश महाजन यांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. गिरीश महाजन यांना ६३,६६१ तर ईश्वर बाबूजी यांना ४३६२४ मते या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. पुढे १९९९साली झालेल्या निवडणुकीतही ईश्वरलाल जैन यांचा गिरीश महाजन यांनी मोठ्या मतांनी पराभव केला होता.

विद्यार्थीदशेपासून सुरू झालेला गिरीश महाजन यांचा प्रवास सीआर, यूआर, जामनेरचे सरपंच ते राज्यातील भाजपाचे संकटमोचक मंत्री इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. गिरीश महाजन यांनी सरकारविरोधात झालेल्या अनेक आंदोलनात यशस्वी तोडगा काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनतेशी असलेला थेट संपर्क व वावर या त्यांचा जमेच्या बाजू ठरल्या आहेत.

२००४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संजय गरूड यांचा मोठा मतांनी पराभव केला होता. लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणे, जनतेतील त्यांचा सामान्य वावर या त्यांच्या जमेच्या बाजू ठरत होत्या. कुठे अपघात झाला असेल तर तिथे तात्काळ धावून जाणे, रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे यामुळे ते कमालीचे लोकप्रिय झाले होते. अपघातग्रस्त वाहन ते स्वतः चालवून न्यायचे तसेच जामनेर व मतदारसंघातील गावात ते मोटारसायकलने फिरायचे, लोकांमध्ये चहाच्या टपरीवर जाऊन बसणे, युवकांच्या कट्ट्यावर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारणे यामुळे त्यांची जनतेशी असलेली नाळ घट्ट झाली.

जामनेर मतदारसघांतील जातीय समीकरणे

जामनेर मतदारसंघ मराठा बहुल मतदारसंघ आहे. मराठा बहुल मतदारसंघात गिरीश महाजन सातत्याने कसे निवडून येतात याविषयी जळगाव जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चा होत असते. मतदारसंघात मराठा समाजासोबतच बंजारा समाजाचे लक्षणीय मतदान आहे. यामुळेच की काय , चाळीसगाव तालुक्यातील बाबूसिंग राठोड या बंजारा समाजाच्या नेत्याने जामनेर मतदारसंघात विजय मिळविला होता. जवळ जवळ ३३ टक्के मतदान असलेल्या मराठा समाजात येथे दोन गट पाहायला मिळतात. आसामी मराठा व वतनदारी मराठा. यात आसामी मराठ्यांच्या मतदानाचे प्रमाण २८ टक्के तर वतनदारी मराठ्यांचे प्रमाण ५ टक्के इतके आहे. आसामी मराठे आपल्या नावासोबत कुळ लावतात तर वतनदारी मराठे कुळ न लावता सरसकट पाटील लावतात असा दोहोंतील ढोबळ फरक.
गिरीश महाजन यांच्या गुजर समाजाची जेमतेम पाच – साडेपाच हजार मते मतदारसंघात आहेत. मतदारसंघात बहुसंख्य असलेले आसामी मराठे १९९५ पासून भाजपाशी जोडले गेले आहेत. तसेच गिरीश महाजन यांनी बांधलेली बंजारा व अल्पसंख्यांक समाजांची मोट त्यांना तारून नेते.
२००९ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर लढलेले संजय गरूड यांनी गिरीश महाजन यांना चांगलाच घाम फोडला होता. अतिशय अतितटीच्या या लढतीत गिरीश महाजन यांचे मताधिक्य घसरून साडेसात हजारांवर आले होते. या निवडणुकीत महाजन यांना ८९ हजार ४० तर संजय गरूड यांना ८१ हजार ५२९ इतकी मते मिळाली होती. आसामी मराठा असलेल्या संजय गरूड यांना समाजाने दिलेला पाठिंबा व सोनिया गांधी यांची जामनेर येथे झालेली जाहीर सभा गिरीश महाजन यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.
नंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत मात्र मागच्या निवडणुकीत मोठी लढत दिलेल्या संजय गरुडांनी डी. के. पाटील यांना मैदानात उतरवले. महाजनांनी डी. के. पाटील यांना सहजतेने धुळ चारली. डी. के. पाटील हे संजय गरूड यांचे महाविद्यालयीन काळापासून मित्र आहेत. त्यामुळेच त्यांनी माघार घेतली व डी. के. पाटील यांना संधी दिली होती. हा निर्णय मात्र त्यांच्या चांगलाच अंगलट आला. जर संजय गरूड उमेदवार राहिले असते तर तगडी लढत झाली असती अशीच सर्वत्र चर्चा त्यावेळी होती.

२०१४मध्ये पाचव्यांदा निवडून आल्यानंतर गिरीश महाजन यांची राजकीय कारकीर्द बहरली. खडसे व फडणवीस यांच्यातील वादाचा त्यांना फायदा झाला. त्यांच्याकडे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण यासारखी मोठी खाती, नाशिक व नंदुरबारचे पालकमंत्री पद आले.
नंतर नंतर जळगाव जिल्ह्यातील खडसे गटाला महाजन वेळोवेळी शह देऊ लागले. आज घडीला जळगाव भाजपावर पूर्णपणे गिरीश महाजन यांचा अंकुश स्थापित झाला आहे. दरम्यान, जामनेर नगर पालिका व शेंदुर्णी नगर परिषदेच्या निवडणुकीत पैकीच्या पैकी नगरसेवक महाजन यांनी निवडून आणत मतदारसंघातील आपली ताकद दाखवून दिली आहे.

महाजन म्हणजे विजयाची खात्री

गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी सोपवली म्हणजे विजय निश्चित आहे अशी भाजपाला खात्री असते. त्यांनी जळगाव महानगर पालिकेतील सुरेश दादा जैन यांच्या ४ दशकांच्या सत्तेला हादरे देत महानगर पालिका भाजपाच्या ताब्यात आणली. तसेच धुळे मनपात देखील अनिल गोटे व काँग्रेस, राष्ट्रवादीला नेस्तनाबूत केले.
जळगाव मनपा निवडणुकीत ते शेवटपर्यंत सुरेश दादा जैन यांच्याशी युतीबाबत चर्चा करीत होते. शिवसेनेला चर्चेत गुंतवून ठेव त्यांनी एकीकडे स्वबळावर निवडणुकीची तयारीही सुरू होती. अशाच प्रकारे त्यांनी धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनाही नामोहरम केले. समोरच्याला चर्चेत गुंतवून ठेवायचे त्याला कुठलीही तयारी करू द्यायची नाही तसेच त्यांच्या गटातील माणसं फोडत उमेदवारांची यादी तयार ठेवायची हा त्यांच्या रणनीतीचा मोठा भाग आहे.
आज महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी गिरीश महाजन यांचा धसका घेतला आहे. त्यांची निवडणुक लढण्याची पद्धत अफलातून आहे. साम-दाम-दंड-भेद अशा सर्व बाबींचा त्यात समावेश असतो.

सुरेशदादा जैन यांनी त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या वेळी जामनेरच्या बाकडा गटाकरवी त्यांना मोठी मदत केली होती. या मदतीमुळेच ते ईश्वरलाल जैन यांना मात देऊ शकले होते. गिरीश महाजन यांच्या पदार्पणात सुरेश दादांचा वाटा होता. मात्र सुरेशदादा जैन यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या शेवटाला गिरीश महाजन कारण ठरले. गिरीश महाजन यांनी मनपा जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत सुरेश दादांशी चर्चा केली. सोबतच जैन गटातील मोहऱ्यांना गळाला लावत त्यांना मोठा धक्का दिला. मनपा निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव करीत जळगाव शहरातील सुरेश जैन यांचे राजकारण महाजन यांनी संपुष्टात आणले.

गिरीश महाजन जनतेशी थेट संपर्कासाठी जामनेर मतदारसंघात ओळखले जातात. विविध मिरवणुकीत ते सहभागी होतात. मिरवणुकीत नाचतात, लेझिम खेळतात, ढोल वाजवतात आदि गोष्टींसाठी ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत. मात्र मंत्रिपद सांभाळत असतांना सोबत पिस्तुल ठेवल्याने, सांगली-कोल्हापुरात महापूर आला असताना सेल्फी व्हिडिओमुळे त्यांच्याबाबत जनतेत तीव्र नाराजी पसरली होती. सोशल मीडियात तर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलींगला सामोरे जावे लागले आहे.

आतापर्यंत खान्देशातून एकही मुख्यमंत्री झालेला नाही. खडसे यांच्या रूपाने खान्देशाला मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटले होते. मात्र खान्देशच्या जनतेची ती आशाही लवकरच मावळली. देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चा अधून-मधून सुरू असतात. त्यामुळे काही काळानंतर का होईना फडणवीस केंद्रात गेले तर महाजन यांच्या रूपाने खान्देशच्या वाट्याला पहिले मुख्यमंत्रीपद येईल अशा चर्चांनी जोर धरला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: