कॅमेरा फ्रेम, मोदी आणि दगाबाजी

कॅमेरा फ्रेम, मोदी आणि दगाबाजी

टीव्हीवरील 'स्क्रिप्टेड' मुलाखतीमध्ये मोदींनी केलेले अनेक दावे - ज्यांची सत्यासत्यता सध्या चर्चेत आहे. अशा एका क्षणी कॅमेराही आपल्या नायकाचा विश्वासघात करू शकतो आणि खोटे बाहेर येते.

गेल्या पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेतल्यामुळे सातत्याने टीकेला सामोरे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा कार्यकाल संपत आलेला असताना, ते बऱ्याच मुलाखती देताना दिसत आहेत. ते माध्यमांना घाबरत नाहीत हे दर्शवण्यासाठी केलेला हा आटापिटा आहे.

यातल्या बऱ्याच मुलाखती अगदी नीरस आहेत. प्रश्न अगोदरपासून ठरवून आधीच कळवल्याचे आरोपही केले गेले आहेत जरी या मुलाखती अगदी सहज, उस्फुर्त वाटतील अशा पद्धतीने चित्रित केल्या गेल्या असल्या तरी! परंतु कॅमेराही कधीकधी आपल्या नायकाचा विश्वासघात करू शकतो.

न्यूज नेशनच्या दीपक चौरसिया यांनी नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीत मोदींना विचारले – ‘कवी असलेल्या नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या पाच वर्षात त्यांनी कविता केली की नाही?’ उत्तर देताना मोदी एका फाईलकडे निर्देश करून म्हणतात, ‘नेमकी आजच  सकाळी हिमाचल प्रदेशातील एका रस्त्यावर कविता केली आहे.’ ते फाईल चाळत असताना त्यातील कविता लिहिलेल्या पानावर कॅमेरा झूम होतो. परंतु मोदींच्या दुर्दैवाने फ्रेममध्ये खालील ओळ टिपली गेली आहे. ती अशी-

२७. शेवटी मला नरेंद्र मोदींना असे विचारायचे आहे की, गेल्या पाच वर्षांत त्यांनी काही काव्य रचले की नाही?

खरेतर एएनआयआणि एबीपीन्यूजला पंतप्रधानांनी मुलाखती दिल्यानंतर प्रश्न ‘स्क्रीप्टेड’ (आधीच ठरवलेले)असल्याचा आरोप होत सवाल उठवले जाऊ लागले, कारण या मुलाखतींमध्ये मोदींना एकदाही प्रतिप्रश्न केला गेला नाही. पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या मुलाखती ‘स्क्रीप्टेड’ असतात याचा ढळढळीत पुरावा न्यूज नेशनच्या मुलाखतीच्या निमित्ताने मिळाला आहे. मोदींना निश्चितपणे आधीच या प्रश्नाची कल्पना दिली गेली होती – कदाचित सगळ्याच प्रश्नांची, कारण या प्रश्नाला २७ क्रमांक दिला गेला होता – आणि त्यामुळे ते छापील कवितेसह तयार आले होते असे स्पष्ट दिसते.

काँग्रेस पक्षाच्या दिव्या स्पंदना यांनी हे ‘स्क्रिप्टींग’ कोणत्या पातळीला पोहोचले आहे असे म्हणत नमूद केले की “पत्रकार परिषद का घेतली गेली नाही किंवा राहुल गांधींसोबत वादविवाद का झाला नाही हे आता तुम्हाला कळले असेलच.”

(दिव्या स्पंदना यांचे ट्विट)

अगोदरच ठरवलेले असूनही बालकोटवरच्या प्रश्नाला मोदींनी इतके ढोबळ उत्तर कसे दिले याचे आश्चर्य वाटते. ढगाळ वातावरणामुळे आपण पाकिस्तानच्या रडारला चकवा देऊ शकतो असे भारतीय हवाईसेनेला सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “मी काही विज्ञानातील सगळे जाणणारा मनुष्य नाही, परंतु मी हे मात्र सांगितले की ढगाळ आकाश आणि पावसाचा फायदा घेऊन रडारपासून दूर जाणे सहज शक्य आहे.”

तज्ज्ञांच्या मते रडार अशा पद्धतीने काम करत नाही.  पंतप्रधानांच्या या चुकीच्या विधानावर समाजमाध्यमांवर बरीच टीका केली गेली. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने हे विधान ट्विट केले होते, ते लगेचच काढून टाकण्यात आले. याच मुलाखत मोदी असेही म्हणाले की, त्यांनी १९८८ साली दिल्ली येथे लालकृष्ण अडवाणी यांचे डिजिटल कॅमेऱ्यातून घेतलेले छायाचित्र पाठवण्यासाठी सर्वप्रथम इमेलचा वापर केला.  दुसऱ्या दिवशी रंगीत छायाचित्र छापले गेले होते. त्यांच्या या विधानांची सत्यासत्यता पडताळणाऱ्या अनेक चर्चा समाजमाध्यमांवर लगेच सुरू झाल्या.

निकॉन QV100Cहा निकॉनचा पहिला इलेक्ट्रॉनिक कॅमेरा ऑगस्ट १९८८ साली प्रथम बाजारात आला. मोदी हातवारे करून जो बॉक्स कॅमेरा दाखवत होते तो कदाचित हाच असावा.  १९९१ मध्ये त्याची किंमत अमेरिकेत २०,३०० डॉलर्स एवढी होती. हे ऐकताना आश्चर्य या गोष्टीचे वाटते की याच मुलाखतीत मोदी स्वतःचे वर्णन ‘पाकीटही न बाळगणारा अगदी गरीब माणूस’ असे करतात, तर त्यांना इतका महागडा कॅमेरा कसा बरे परवडला असेल.

निकॉन-1000 डायरेक्ट ट्रान्समीटर सुद्धा १९८३ साली बाजारात आला. त्याचा आकारही खोक्यासारखा होता. या ट्रान्समिटरद्वारे दूरध्वनी वाहिनीवरून छायाचित्रे पाठवण्याची सोय होती. माध्यमांसाठी याचा सर्वाधिक वापर होत असे. १९८८ साली अॅलन बार्टलेट यांनी निकॉनची युरोपियन डिजिटल इमेजिंग डिव्हिजन स्थापन केली. त्यांच्या म्हणण्यानुसार १९८५ आणि १९८७ दरम्यान इंग्लंडमधील अनेक माध्यमांनी हे उपकरण विकत घेतले होते तर उत्तर अमेरिकेत फक्त दोन उपकरणे विकली गेली. भारतात हे उपकरण उपलब्ध असल्याचा कोणताही सार्वजनिकपुरावा अस्तित्वात नाही.  

मोदींना इमेल पाठवता येत होती की नाही हा निश्चितच वादाचा मुद्दा आहे. भारतामध्ये तांत्रिकदृष्ट्या इमेल सुविधा उपलब्ध होती, परंतु इंटरनेट मात्र १९९५ सालापासून सार्वजनिकरित्या उपलब्ध झाले.  ERNET ही माहिती प्रसारण यंत्रणा १९८६ पासूनच अस्तित्वात आहे. नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, मुंबई आणि आयआयटी मुंबई यांच्यात पहिल्यांदा इमेल्सची देवाणघेवाण झाली होती. १९८७ आणि १९८८ च्या दरम्यान शहरांतील ERNET संस्थांमध्ये तसेच ऍमस्टरडॅम आणि अमेरिकेतील संबंधित गटांमध्ये इमेल्सची देवघेव झाली.

असे मानले की पंतप्रधानांनी हे उद्गार अनावधानाने काढले, आणि स्वतःची स्तुती करण्यासाठी अथवा आपल्या फायद्यासाठी सत्याला वाकवण्यासाठी काढले नाहीत, तरीही जर त्यांची विधाने खरी मानली तर खूप गंभीर प्रश्न उभे राहतात.  गुजरातमध्ये १९८८ साली त्यांना मॉडेम कुठून मिळाला असेल?  कॅमेऱ्यावरील छायाचित्रे त्यांनी संगणकावर कशी घेतली? वर नमूद केलेल्या कॅमेऱ्यांपैकी कोणताही स्वस्त दरामध्ये उपलब्ध नव्हता – तर मग त्यांना या महागड्या गोष्टी विकत कशा घेता आल्या?  याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते कुठले वर्तमानपत्र होते ज्यांना मोदींनी पाठवलेले छायाचित्र मिळाले, मग त्यांनी ते डाऊनलोडही केले आणि त्याच दिवशी छापलेही?

मूळइंग्रजी लेख

COMMENTS